झाडाचे मूळ तोडले, फांद्यांचा आपोआप नाश होतो, त्याप्रमाणे कामाचा नाश केला म्हणजे क्रोधाचा सहज नाश होतो. म्हणून काम हा शत्रू मारून टाकला, म्हणजे क्रोधाची येण्या-जाण्याची वारी संपते. ज्याप्रमाणे राजा आपला खोडा ज्या गुन्हेगाराच्या पायांत घालावयाचा, त्याच्याच डोक्यावर त्याला वहावयास लावतो. त्याप्रमाणे जो परिग्रह-भोग देऊन बलवान झाला आहे जो परिग्रह-वैराग्यशीलाचे फक्त नाव ऐकल्याबरोबर वैराग्यवान माणसाच्या अंगात संचार करून अवगुण उत्पन्न करतो आणि ‘हे माझे’ अशा अभिमानात त्याला गंतवून ठेवतो, ज्या परिग्रहाने निसं:ग पुरूषालादेखील ‘हा माझा स्वत:चा मठ आहे’, ‘हे माझे अनेक शिष्य आहेत’, ‘हे माझे विविध ग्रंथ आहेत’, अशा चिन्हांनी पाशामध्ये घातले आहे, वैराग्यशील माणूस आपल्या संसाराचा त्याग करून वनात गेला, तरी वनातील झोपडी, दंड, कमंडलू, भिक्षापात्र या पदार्थांवर ममत्व ठेवतो, सर्वस्वाचा त्याग करणाऱ्यादेखील आपल्या पाशात गुंतवून ठेवतो. असा जो जिंकण्यास कठिण असलेला परिग्रह, त्याचा ठावठिकाणा नाहीसा करून जो पुरूष संसार-विषयांचा उत्साह भोगत असतो, तेव्हा त्यांच्या भेटीला ज्ञानगुणाचे अमानित्वादिक समुदाय हेच जसे कोणी मोक्षरूपी देशाचे सर्व राजेच आले,तसे ते यथार्थ ज्ञानाचे राज्य त्या साधकाला अर्पण करून ते गुण आपण स्वत: त्याचे परिवार होऊन राहतात. प्रवृत्तिरूपी राजमार्गाने त्याची स्वारी चालली असता तीन निरनिरळया अवस्थारूपी स्त्रिया येऊन त्याच्यावरून पदोपदी आपल्या सुखाचे लिंबलोण करून टाकतात. त्या साधकाच्यापुढे विवेक हा चोपदाराप्रमाणे बोधरूपी सुवर्णदंडाने पाहण्यासाठी झालेली दृश्यरूपी प्रेक्षकांची गर्दी बाजूला सारतो; आणि शुभेच्छा, सुविचारणा, तनुमानसा सत्त्वापत्ती, असंसक्ती आणि पदार्थाभाविनी आणि तूर्यगा या सात योगभूमिका जणू काही हातांत आरत्याच घेऊन त्यास ओवळण्यास येतात. ( ओवी १०६१ ते १०७० )
तेव्हा त्या प्रसंगी ऋध्दि-सिध्दींचे अनेक समुदाय येतात आणि पुष्पवर्षाव करतात. त्या पुष्पवर्षावामध्ये तो राजा स्वभावत:च न्हाऊन निघतो. याप्रमाणे ब्रह्मैक्यरूप स्वराज्य प्राप्त होण्याची वेळ जो जो जवळ येते, त्या वेळी तिन्ही लोक आनंदाने भरलेले दिसतात. तेव्हा अर्जुना, त्या आत्मज्ञानी राजाला ब्रह्माची समानता प्राप्त झाल्यामुळे कोणी मित्र, कोणी शत्रू, अशा प्रकारचे द्वैत शिल्लक राहत नाही. एवढेच नव्हे; तर कोणत्याही निमित्ताने तो ज्याला ‘माझे’ असे म्हणेल, एवढेदेखील द्वैत राहत नाही. कारण तो स्वत:च अद्वितीय ब्रह्म झालेला असतो.अर्जुना, त्या एका सत्तेने सर्व विश्व व्यापून टाकल्याने ‘माझे’ ‘माझे’ असे म्हणावयास अवकाश नसल्यामुळे ममतेचा त्याग होत असतो. याप्रमाणे अहंकार वगैरे शत्रूंना जिंकल्यावर हे सर्व विश्व आपणच आहेत, याची जाणीव झाल्यावर योगरूपी घोडयाची धाव आपोआप बंद होते; आणि मग वैराग्याचे अभेद्य कवच, जे अंगावर घातलेले असते, तेही तेव्हा थोडा वेळ ढिले होते. आता ध्यानाच्या तलवारीने नष्ट होईल, असे ते द्वैत पुढे शिल्लकच नसते; म्हणून ध्यान वृत्तीचादेखील हात मागे ओढून घेतो. जसे एखादे रासायनिक औषध रोगाचा नाश करते आणि ते स्वत:ही नाहीसे होते, तशी याची स्थिती होते. मुक्कामाचे स्थान प्राप्त झाल्यानंतर जसे धावणारे पाय थांबतात, तसा ब्रह्माशी ऐक्य पावल्यावर अभ्यास आपोआप थांबतो. ( ओवी १०७१ ते १०८० )
गंगा सागराला मिळाल्यावर ती प्रवाहाच्या वेगाला टाकून देते अथवा कामिनी स्त्री आपला म्हणजे जशी शांत होते; किंवा केळीला फळांचा घड आला म्हणजे जशी केळीची वाढ थांबते किंवा गावापुढे जसा रस्ता संपतो, म्हणून त्या साधकाची ब्रह्माशी ऐक्य पावण्याची जेव्हा वेळ येते, तेव्हा साधनांना आहोटी पडते, म्हणजे साधना थांबतात. म्हणून अर्जुना, ब्रह्माशी ऐक्य होण्याच्या वेळी सर्व साधने मागे परत फिरतात. मग वैराग्याची जी मावळती वेळ आहे किंवा ज्ञानरूपी अभ्यासाचे जे वार्धक्य आहे आणि योगरूप फळाची जी परिपक्व अवस्था आहे, हे अर्जुना! ती शांती जेव्हा त्याच्या अंगी पूर्णपणे भिनते, तेव्हा तो साधक ब्रह्म होण्यास अधिकारी होतो. पौर्णिमेपेक्षा चतुर्दशीला जसे कमी महत्त्व असते अथवा सोळा दराच्या सोन्यापेक्षा पंधरा दराचा कस असलेले सोने जसे काही प्रमाणात हिणकस असते, जसा समुद्रामध्ये गंगा नदीने प्रवेश केल्यावर तिचा वेग जेथपर्यंत दष्टीस पडतो, ती गंगा आणि जेथे तो थांबतो, तो समुद्र असतो, त्याप्रमाणे ब्रह्म आणि ब्रह्म होण्याच्या योग्यतेस फार थोडेसे अंतर राहिलेले असते. ते अंतर वैराग्यादी साधनाचा शांतीच्या योगाने ताबडतोब नाहीसे होऊन तो अधिकारी त्वरित ब्रह्मस्वरूप होतो. ते ब्रह्म प्रत्यक्ष झाल्याशिवाय जे ब्रह्मपण अनुभवास येत असते, ती ब्रह्म होण्याची योग्यता आहे. (ओवी १०८१ ते १०९० )
अर्जुना! मग तो ब्रह्माशी एकरूप होण्याच्या योग्यतेस पोचलेला पुरूष आत्मबोध-प्रसन्नतेच्या पदावर विराजमान होतो. उष्णतेच्या आधारे अन्न शिजते, तेव्हाच ते अन्न प्रसन्नतेने खाता येते. शरद ऋतू आला म्हणजे वर्षाकालात दररोज येणारी भरती व ओहोटी संपून गंगा स्थिर होते; अथवा गायनाचा समारंभ संपला, म्हणजे तंबोरा, तबला बंद होऊन श्रवणसुखाचा आनंद शिल्लक राहतो, त्याप्रमाणे आत्मबोधाच्या प्राप्तीकरता ज्या अनेक साधनांचा प्रयत्न केला जातो, ते श्रमदेखील संपून जातात. हे महान बुध्दिमान अर्जुना! त्या श्रेष्ठ अवस्थेचे नाव आत्मनुभूतीची प्रसन्नता असे आहे. ती श्रेष्ठ अवस्था साधन व साधनेशी एकरूप झालेला पुरूष अनुभवत असतो. अशा प्रकारचा ऐक्यभाव जेव्हा निर्माण होतो, त्या वेळी लौकिक गोष्टींविषयीचा शोक संपलेला असतो; आणि आपणास काही मिळवायचे आहे, असे आहे, असे शिल्लक राहिलेले नसते. सूर्यनारायण उदयाला येताच आपल्या परम तेजाने अनेक नक्षत्रांच्या आकाराला जसा लोपून टाकतो, त्याप्रमाणे आत्मानुभावाचा उदय झाला, की प्राणिमात्रांच्या भेदाची रचना नाहीशी होऊन तो आपल्या चैतन्य-स्वरूपालाच सर्वत्र पाहत असतो. पाटीवर लिहिलेली अक्षरे ज्याप्रमाणे सहज पुसता येतात, त्याप्रमाणे चैतन्यरूप दिव्य शक्तीने विविध प्रकारचे भेद लोपून जातात.त्याप्रमाणे व स्वप्न या दोन्ही अवस्थांमध्ये जी विपरीत ज्ञाने घन अज्ञानात लीन होऊन जातात. (ओवी १०९१ ते ११००)
मग ते अज्ञानदेखील जसजसा आत्मज्ञान बोध वाढत जाईल, तसतसे नाहीसे होत जाते आणि आत्मज्ञानाच्या पूर्ण प्रकाशात अज्ञानाचा काळोख पूर्णपणे नाहीसा होतो. ज्याप्रमाणे भोजन करत असताना प्रत्येक घासाने भूक कमी-कमी होत जाते; आणि शेवटच्या तृप्तीच्या घासाने भूक नाहीशी होते; अथवा चालण्याचा वेग असता वाट कमी-कमी होत जाते व नंतर मुक्कामास आले असता ती वाट पूर्णपणे संपते. अथवा मनुष्य जो जो हळूहळू जागा होतो, तो तो झोप कमी-कमी होत जाते आणि मनुष्य पूर्णपणे जागा झाला म्हणजे निद्रादेखील पूर्णपणे नाहीशी होते असो. हे दृष्टांत राहू देत. पौर्णिमेच्या दिवशी चंद्राला आपले पूर्णत्व प्राप्त होत असते. चंद्राचे वाढणे थांबले की जसा शुक्ल पक्ष नि:शेष नाहीसा होतो, त्याप्रमाणे जे ज्ञान ज्ञेयाला बाध करत असते, त्या ज्ञानाने साधक माझ्या स्वरूपी येतो व माझ्या स्वरूपात पूर्ण ऐक्य पावला असता अज्ञान हे आवरणापासून विक्षेपापर्यंत पूर्ण नष्ट होऊन जाते. कल्पांताच्यावेळी सर्व जलमय होवुन जाते. त्या वेळेस समुद्र व नदी यांची मर्यादा मोडुन पाताळांपासुन ब्रम्हलोकापर्यत जी चौदा प्रकारची भुवने आहेत, ती सर्वही प्रलयकालीन पाण्याने भरून जातात. अथवा घट आणि मठ फुटल्यानंतर त्यातील घटाकाश जसे आकाशीशी एकरुप होवुन जाते अथवा लाकडे प्रज्वलित होऊन ती अग्नीरूप होतात, किंवा विविध आकाराचे दागिने मुशीमध्ये घालून आटले म्हणजे दागिन्यांचा आकार नाहीसा होतो,त्याचे नाव नाहीसे होते आणि केवळ सोने शिल्लक राहते हे असो. मनुष्य जागा झाला म्हणजे विविध प्रकारची स्वप्ने नाहीशी होतात आणि मग केवळ आपणच एकटा असतो. ( ओवी ११०१ ते १११०)
त्याप्रमाणे त्या श्रेष्ठ पुरूषाला एका माझ्यावाचून त्याच्या स्वत:च्या स्वरूपासह दुसरे काहीही उरत नाही. तेव्हा तो श्रेष्ठ पुरूष माझी चवथी ज्ञानलक्षण भक्ती प्राप्त करून घेतो दुसरे आर्त, जिज्ञासू आणि अर्थार्थी हे भक्त मला ज्या मार्गाने भजतात, ते भक्तीचे तीन मार्ग पाहून या भक्तीस मी ‘चौथी भक्ती’ असे म्हटले आहे. एरवी पहिली, दुसरी, तिसरी व चवथी असे काहीच हिला म्हणता येत नाही. परंतु माझी जी केवळ सहज स्थिती, तिलाच भक्ती असे म्हणतात. जे दिव्य प्रकाशरूप अज्ञान, जगत् आणि भ्रमज्ञान या तिघांचे प्रकाशन करून या सर्वांना सर्वस्वरूप परमात्म्याची सहज भक्ती घडवून सर्वांना शांत करते. जो भक्त ज्या ज्या ठिकाणी जशी कल्पना करतो, त्याला ती वस्तू तेथे तशीच दिसते. हे ज्या अखंड प्रकाशामुळे भासते, ज्याप्रमाणे आपण असल्यामुळे स्वप्नाचा आहेपणा आणि नाहीपणा भासतो, त्याप्रमाणे विश्वाचे असणे व नसणे ज्या प्रकाशाच्या योगाने प्रकाशते, हे अर्जुना, असा जो माझा सहज सदैव दिव्य प्रकाश आहे, तोच ‘भक्ती’ या उत्तम शब्दाने वर्णिला आहे. म्हणून आर्ताच्या ठायी ही उत्कट इच्छेच्या रूपाने बनून त्या इच्छेला जो काही विषय आहे, तो विषयही ती भक्तीच बनते. हे वीर अर्जुना, जिज्ञासू भक्ताची पुढे जाण्याची इच्छा व जाणणे ही दोन्हीही आपणच बनते. त्या अज्ञानाने मलाच माझ्याविषयी अर्थी करून त्याची प्रार्थानादेखील मलाच व्हावयास लावते. अर्थ, अर्थप्राप्तीचे साधन आणि अर्थप्राप्तीची इच्छा करून अशी त्रिपुटी बनून मलाच ‘अर्थ’ या नावाला आणते. ( ओवी ११११ ते ११२०)
याप्रमाणे अज्ञानाचा स्वीकार करून, ही माझी भक्ती व्यवहार करू लागली, की भक्ती दृष्टयाला दृष्ट करून दाखविते. आरशामध्ये आपजे स्वरूप पाहिल्यानंतर त्याचे प्रतिबिंब दिसते. या माझ्या बोलण्यात काही चूक नाही. एकाच मुखात बिंब आणि प्रतिबिंब असे खोटे द्वैत आरसा करीत असतो. दृष्टी खरोखर चंद्राला पाहते; परंतु तिमिर एवढे करतो की, एक असलेल्या चंद्राला दोन करून दाखवितो. त्याचप्रमाणे भक्तीच्या आधारे मी आपल्याला सर्वत्र प्रतीत होतो. परंतु जे दृश्य आहे, तो जडाचा भाग आहे. तो मिथ्या असून अज्ञानाच्या उपाधीमुळे होत असतो. ते भेद दाखविणारे अज्ञान ज्ञानोत्तर भक्तियोगाने नाहीसे होऊन माझे जीव-रूपाने असलेले दृष्टत्व मला अभेदाने प्राप्त झालेले असते. प्रतिबिंब जसे आरसा दूर सारल्यानंतर आपल्या बिंबामध्ये एकरूप झालेले असते, जेव्हा सोन्यामध्ये हिणकस धातू मिसळलेला असतो, तेव्हा ते सोनेच आहे; परंतु त्यातील हिणकस धातू निघाला, म्हणजेच ते केवळ शुध्द सोने होते. अरे, पौर्णिमेच्या अगोदर चंद्र संपूर्ण नाही काय? परंतु एवढेच आहे की, पौर्णिमेच्या दिवशी त्याला ती पूर्णता भेटते, म्हणजे त्याची पूर्णता व्यक्त होते. त्याप्रमाणे मी अज्ञानद्वारा दृश्यरूपाने दिसतो; परंतु हस्तांतराने दिसत असतो. जशी एकाच हातातील वस्तू दुसऱ्या हातात जशी दिसते, त्याप्रमाणे मीच ज्ञानाच्या हातामध्ये दृष्टा या रूपाने दिसतो आणि अज्ञानाच्या हातात दृश्य या रूपाने दिसतो. मग आत्मज्ञानाने दृश्याचा निरास होऊन भिन्न रूपाने दिसणारे दृश्य एकद्रष्टेपणामध्ये नाहीसे होऊन जाते, तेव्हा माझ्याकडून मीच प्राप्त होतो. म्हणून अर्जुना, माझा जो चौथा भक्तियोग आहे, तो दृश्यमार्गाहून भिन्न आहे, असे मी म्हटले आहे. या ज्ञानभक्तीने जो भक्त माझ्याशी सहज ऐक्य पावला आहे, तो केवळ मीच आहे, हे तू श्रवणही केले आहेस. (ओवी ११२१ ते ११३०)
कारण अर्जुना, मागे सातव्या अध्यायामध्ये ज्ञानी हा माझा आत्मा आहे, ‘ज्ञानी त्वात्मैव मे मतम् | (अ. ७ श्लो.१९) असे मी हात उभारून प्रतिज्ञापूर्वक सांगितलेले आहे. अर्जुना, ती ही चौथी ज्ञानयूक्त कल्पाच्या प्रारंभी मी ब्रह्देवाला चतु:श्लोकी भागवताच्या रूपाने सांगितली आहे. ज्ञानी हिलाच ‘स्वसंवित्ती’ असे म्हणतात, शैव ‘शक्ती’ असे म्हणतात; आम्ही तिला ‘परमश्रेष्ठ भक्ती’ असे म्हणतो. ही ज्ञानलक्षण भक्ती, माझ्या त्या मागे सांगितलेल्या क्रमयोगाला माझ्याशी ऐक्य पावण्याच्या वेळी फलद्रूप होते आणि मग सर्व विश्व माझ्याच स्वरूपाने भरून जाते. तेव्हा त्या अवस्थेत विवेकासह वैराग्य नाहीसे होते, बंध हा मोक्षासह आटून जातो आणि वृत्ती निवृत्तीसह बुडून जाते. ज्या ज्ञानयुक्त भक्तीच्या आधारे अलिकडील व पलिकडील हे भेद नाहीसे होतात, जसे प्रलयकालामध्ये चार भूतांना गिळून आकाश असते, तसे अलिकडील काठ, मध्यभाग आणि पलिकडचा काठ याप्रमाणे साध्य, साधन व साधक या त्रिपुटींच्याही पलीकडे जे माझे शुध्द स्वरूप आहे, त्याच्याशी ऐक्य पावून तो भक्त माझे भजन आनंदाने करतो. समुद्राच्या अंगाशी एकरूप होऊन, गंगा नदी जशी समुद्रावर तळपत असते, तोच प्रकार भक्ताच्या ज्ञानयुक्त भक्तीत आहे. दोन आरसे स्वच्छ करून जर एकापुढे ठेवले, तर ते जसे एकमेकांना पाहण्याचे सुख भोगतात, त्याप्रमाणे माझ्याशी ऐक्य पावल्यावर तो ज्ञानी माझ्या भक्तीचा उपभोग घेतो. एवढेच नव्हे; तर आरसा दूर केला आणि त्यातील प्रतिबिंबही नाहीसे झाल्यानंतर पाहणारा आपले ठिकाणी आपल्या स्वरूपाचाच आनंद घेत असतो. (ओवी ११३१ ते ११४०)