लोहचुंबकाच्या सत्तेने लोखंड जसे फिरु लागते त्याप्रमाणे ईश्वराच्या सत्तेच्या आधारे सर्व भुते क्रिया करीत असतात. ज्याप्रमाणे चंद्राचा उदय झाला की सागर, चकोर, कुमुद आाणि चंद्रकांत मणी या सर्वाची हालचाल सुरू होते. समुद्राला भरती आली म्हणजे सोमकांत मणी पाझरतो, चंद्रविकासी कमळे प्रफुल्लीत होतात आणि चकोर चंद्रामृताचे सेवन करते होतात, त्याप्रमाणे सर्व विश्वाचे उपादानकारण असलेल्या प्रकृतीच्या अधीन असलेली भुते विश्वाचे कारण असलेल्या त्या एका ईश्वराकडुन हालविली जातात तो ईश्वर तुझ्या हदयामध्ये विराजमान आहे. हे पांडुसुता, देहासंबंधी अर्जुनपणाचा अभिमान न घेता मी मी अशी स्फुर्ती जी निर्माण होते तेच खरोखर ईश्वराचे स्वरुप होय. म्हणुन आतुन स्फुर्ती देणाऱ्या ईश्वर-प्रकृतीला प्रवृत्त करुन तु जरी युध्द केले नाहीस तरी ती तुझ्याकडुन युध्द करवीलच म्हणुन तो ईश्वर स्वामी आहे, तो संपुर्ण प्रकृतीचे नियमन करतो त्या प्रकृतीकडुन आपली इंद्रिये सहजपणे राबविली जातात, तु कोणतेही कर्म करणे आणि न करणे हे दोन्ही प्रकृतीच्या स्वभावाकडे सोपवुन ती प्रकृतीदेखील ज्या हदयस्थ ईश्वराच्या अधीन आहे, गंगेचह जल सागराला शरण जावुन त्याचेशी एकरुप होते. तसे त्या ईश्वराला अंहकार, वाचा, चित्त व शरीर ही सर्वस्वी अर्पण करुन शरण जा, मग त्या ईश्वराच्या कृपाप्रसादाने सर्वाचा लय जिच्यामध्ये होतो अशा स्वरुपशांतिरुप तरुण स्त्रीचा पती होवुन तु आत्मानंदरुपी स्वरुपातच रममाण होशील. (ओवी १३११ ते १३२०)
विश्वाची उत्पत्ती ज्याच्यापासुन होते ते कारण, विश्रांतीचे विश्रांतीस्थान, विषयाची अनुभूती ज्याचा अनुभव घेते, त्या आपल्या आत्मपदाचा तु राजा होवुन राहशील असे लक्ष्मीपती भगवान श्रीकृष्ण बोलले. जे ज्ञान “गीता” या नावाने प्रसिध्द आहे ते सर्व वैदिक ग्रंथाचे सारभुत ज्ञान तुला सांगितले आहे या ज्ञानाने आत्मरुप रत्न स्वाधीन होते, वेदान्ताचे ज्ञान या नावाने ज्या गीताशास्त्राचा मोठेपणा वर्णन केल्यामुळे वेदान्ताला जगतात अमाप किर्ती प्राप्त झाली आहे. बुध्दी, इंद्रिये आदी जे डोळस म्हणजे ज्ञानवान पदार्थ आहेत ते ज्या ज्ञानाचे कवडसे आहेत, ते व मी सर्वद्रष्टादेखील ज्या गीताज्ञानाचा उदय झाला असता अनुभवास येतो ते हे गीतारुपी आत्मज्ञान जो मी गुढ त्या गुढाचाही गुप्त असा अनमोल ठेवा आहे, परंतु तु माझा प्रिय भक्त आहेस म्हणुन तुला सांगण्याविषयी लपवुन कसे बरे ठेवु? याकरीता अर्जुना, आम्ही करुणेने व्यापल्यामुळे आपला हा आत्मज्ञानाचा गुप्त ठेवा तुला दिला आहे, आईचे हदय हे प्रेमाने तुडुंब भरलेले असते परंतु एकादे वेळी तीही आपल्या बाळाला रागावुन बोलते परंतु मी सर्वज्ञ असल्यामुळे अयथार्थ कधी बोललो नाही, माझे बोलणे इतके सुक्ष्म आहे की, अतिसुक्ष्म असलेल्या आकाशाला जसे गाळुन प्यावे, अमृत आतुन-बाहेरुन गोड असुनदेखील त्याचीही साल काढावी अथवा दिव्याकडुन जसे दिव्य करवुन घ्यावे, ज्या सुर्याला मूलभुत प्रकाशाने पाताळातील परमाणु देखील दिसतो त्या सुर्याला देखील अंजन घालावे. (ओवी १३२१ ते १३३०)
याप्रमाणे अर्जुना, मी सर्वज्ञानी असुनदेखील अनेक गोष्टीचा विचार कर आणि तुझ्या इच्छेप्रमाणे योग्य वाटेल तसे आचरण कर हे देवाचे बोलणे ऐकल्यानंतर अर्जुन स्तब्ध झाला, तेव्हा देव म्हणाले, अर्जुना, ज्ञानासंबंधी प्रश्न विचारण्यास तू कधीही संकोच बाळगत नाहीस तु एक उत्तम प्रकारचा श्रोता आहेस. वाढणारा वाढत असताना भुकेलेला माणुस जर भुक असुनदेखील लाजेने माझे पोट भरले असे म्हणेल, तर त्याला स्वताचीच भुकेची पीडा होते आणि खोटे बोलल्याचाही त्याला दोष लागतो, त्याप्रमाणे सर्वज्ञ असे सदगुरु भेटल्यावर भीड धरुन आत्मस्वरुपाचा विचार विचारला जात नसेल तर आपला लाभ आपणच गमावुन वचंना केल्याचे पापही लागते आणि आपणच आपल्या आत्मस्वरुपाला अंतरलो असेही होईल, परंतु अर्जुना, तुझा स्तब्ध राहण्याचा असा अभिप्राय दिसतो की पुन्हा एकदा आत्मज्ञान सारांश रुपाने सांगावे. तेव्हा अर्जुन म्हणाला, हे दातारा, तु माझ्या मनातील भाव उत्तम प्रकारे जाणतोस मग असे औपचारीक बोलणे तरी कशासाठी? तुझ्याशिवाय प्रत्येकाचे अंतकरण जाणणारा दुसरा कोणी आहे काय? देवा, विश्वातील सर्व पदार्थ जड असल्यामुळे ज्ञानाला विषय होणारे आहेत, आणि तुच एक चेतन असल्यामुळे स्वभावता ज्ञाता आहेस, म्हणुन सुर्य म्हणून सुर्याचे काय वर्णन करावे? त्याचे वर्णन नाही केले तरी तोच एक प्रकाशमान आहे हे अर्जुनाचे बोलणे ऐकुन भगवान श्रीकृष्ण म्हणाले, आम्ही सांगितलेले तु समजुन घेतलेस हेच काय आमचे थोडे वर्णन आहे? (ओवी १३३१ ते १३४०)
तु अत्यंत एकाग्रतेंने माझा परिशुध्द उपदेश आणखी एक वेळा श्रवण कर, हे ज्ञान बोलता येण्यासारखे आहे म्हणुन मी बोलतो किवां श्रवण करण्यासारखे आहे म्हणुन तु श्रवण करतोस, असे नाही परंतु तु भाग्यवान आहेस म्हणुन हे न घडणारे घडत अर्जुना, द्रृष्टीला पान्हा फुटत नसतो, पण कासवीच्या पिलाकरता कासवीच्या दृष्टीला पान्हा फुटतो, आकाशाच्या पोकळीमध्ये काही साठवले जात नाही परंतु चातकाला लागणारे पाणी मेघाच्या रुपाने आकाश धारण करते, ज्या विषयामध्ये जो व्यवहार घडत नाही त्या विषयात भाग्याने एकदम फळ प्राप्त होते, अनुकूल दैव असल्यावर कोणता लाभ होणार नाही? याविषयी सहज विचार केला तर द्वैताची येरझारा नाहीशी करुन ब्रम्हैकाच्या घरात जे भोगायचे ते रहऱ्य हे आहे हे तु निश्चीत लक्षात ठेव, प्रियतम अर्जुना! भोगनिरपेक्ष निस्वार्थ प्रेमाचा जो विषय असतो, तो दुसरा कोणीच नसुन तोच आत्मा असतो,असे जाणावे, आरशाला आपण घासुन स्वच्छ करतो ते आरशासाठी नव्हे तर स्वताला पाहण्यासाठी असते, त्याप्रमाणे अर्जुना! तुझे निमित्त करुन मी आपल्यासाठीच बोलतो एऱ्हवी तुझ्या-माझ्यामध्ये काही द्वैत आहे काय? याकरीता अंतकरणातील जीवाचे गुहय मी तुला सांगतो कारण अनन्यभावाने शरण आलेल्या भक्ताच्या भावाचे आम्ही भुकेलो आहोत, हे अर्जुना, मीठ जसे जलाला आपलेपणा सर्वस्वी देते आणि जलाशी एकरुप होण्यास लाजत नाही. (ओवी १३४१ ते १३५०)
तसा तु माझ्यापासुन काहीच गुप्त ठेवण्याचे जाणत नाहीस तर मी तरी तुला चोरून गुप्त गोष्ट कशी ठेवु? म्हणुन जगातील जेवढी म्हणुन गुहये आहेत तेवढी सर्वही ज्या आमच्या गुहय वचनासमोर उघडी पडतात, ते गुढ व शुध्द असे वचन श्रवण कर. तरी हे वीरा अर्जुना, तु आपल्या बाहयदेह-इंद्रियांच्या क्रियेकरता आणि अंर्तमन-बुध्दीच्या क्रियेकरीता मज व्यापकालाच विषय कर, सर्व अंगाने वारा जसा आकाशाशी एकरुप होत असतो, त्याप्रमाणे तु सर्व कर्मानी माझ्याशी एकरुप होवुन रहा, फार काय सांगावे? तु आपले मन माझे राहण्याचे एकमेव ठिकाण कर आणि तु आपल्या कानांनी माझ्या गुणांचेच प्रेमाने श्रवण कर, आत्मज्ञानाने परिपुर्ण असलेले जे संत आहेत ते माझीच रुपे आहे त्यांच्या चरणकमलावर आपली दृष्टी स्थिर कर, जशी विषयासक्त माणूस एकादया कामिनीवर दृष्टी ठेवतो, संपुर्ण विश्व हे माझे राहण्याचे स्थान आहे त्यामुळे श्रेष्ठ अशी राम, कृष्ण, हरी आदी शुध्द नामे आहेत ही अंतकरणामध्ये स्थिर कर म्हणजे सहजपणे ती वाणी द्वारा मुखातुन प्रगट होतील हानाने करावयाची कर्मे अथवा पायाचे चालणे हे माझ्याकरताच होईल असे कर. आपल्या अथवा दुसऱ्यांच्या उपयोगी पडणाऱ्या ज्या ज्या क्रिया करत राहशील त्या त्या माझ्याच ठिकाणी निस्वार्थ भावनेने अर्पण करुन माझा उत्तम याज्ञिक हो. असे निनिराळे भक्तीचे प्रकार किती किती व काय काय शिकवु? अंतकरण सेवाभावनेने भरुन राहु दे, हे विश्व माझा लिलाविलास आहे हे जाणुन घे, “विश्व मंदिर आणि कर्म पूजा” याची जाणीव ठेव. (ओवी १३५१ ते १३६०)
या प्रेममय सेवेने सर्व भुतमात्राविषयीचा द्वैष नाहीसा होवुन सर्वच मीच आहे अशा भावनेने सर्वाशी नतमस्तक हो, त्यामुळे माझा अव्याभिचारी आश्रय प्राप्त करशील मग चराचर पदार्थानी भरलेल्या या विश्वामध्ये तुझ्या आणि माझ्यावाचुन तिसरी वार्ता शिल्लक राहाणार नाही. तुझा आणि माझा एकांत झालेला पाहशील. त्या वेळी कोणत्याही अवस्थेमध्ये मी तुला भक्तरुपाने आणि तु मला देवरुपाने अनुभवशील त्यामुळे आनंदाची वेल गगनावरती चढु लागेल. आणि अर्जुना, तुझ्या-माझ्यातील सुखाला प्रतिबंध करणारे दृश्य जगत् सत्य आहे ही कल्पना जेव्हा नाहीशी होईल, तेव्हा तु म्हणजे मीच आहे, ही अनुभूती स्थिर होवुन तु मलाच येवुन मिळशील, ज्याप्रमाणे जलामध्ये पडलेले प्रतिबिबं जल संपुन गेल्यानंतरही बिबंरुपाशी एकरुप होताना कसलाही प्रतिबंध होत असतो काय? अरे वारा आकाशाला मिळत असताना अथवा लाट सागराला मिळत असताना त्यास कोणता प्रतिबंध आहे काय? म्हणुन तु व मी अशा प्रकारचे द्वैत केवळ देहाच्या उपाधीमुळे दिसत आहे, देहाचा निरास झाल्यावर तु मद्रुपच होशील. या माझ्या बोलण्यामध्ये ब्रम्हयाशी ऐक्य पावणे शक्य आहे किवां नाही अशा प्रकारची शंका घेवु नकोस. माझ्या बोलण्यात अन्यथा जर काही असेल तर तुझी शपथ वाहतो. तुझी शपथ वाहणे, म्हणजे आम्ही आपली शपथ वाहण्यासारखेच होय, ही शपथ वाहणे म्हणजे लज्जेची बाब होय, परंतु निस्वार्थी प्रेम हे असे आहे की तेथे लज्जेची आठवण होत नाही, एरवी मी संपुर्ण प्रपंचाला व्यापुन आहे, अज्ञानी लोकांना हे सर्व विश्व खरेच वाटते व ज्याच्या आज्ञेची शक्ती अशा प्रकारची आहे की ती काळालाही सहज जिकंते. (ओवी १३६१ ते १३७०)
तो मी सत्यसंकल्पी देव असुन जगाचे कल्याण करणारा बाप आहे तर मग शपथेचा आग्रह मी का बरे करावा? परंतु अर्जुना, तुला माझा अत्यंत छंद लागला आहे, त्यामुळे मी आपले देवपणाचे ब्रीद तुझ्यापुरते टाकलेले आहे आणि तुझा भक्त झाल्यामुळे तुझ्या अधीन आहे. तसेच तुला माझा छंद लागलेला आहे आणि तु मद्रुप झाल्यामुळे तु संपुर्ण आहेस. अर्जुना, राजा आपण करावयाच्या कामासाठी आपल्या प्रधानादी लोकांचा आपल्यावर विश्वास बसण्याकरता आपली शपथ आपणच वहातो, तसाच हा प्रकार आहे, त्या वेळी अर्जुन म्हणाला, आपले हे बोलणे खरोखर अचाट आहे केवळ आपल्या प्रेमाच्या नामस्मरणाने आमची सर्व कर्मे सिध्दीस जातात, परंतु असे असुनही तु उपदेश करतोस शिवाय शपथ वाहतोय, अधुन-मधुन प्रतिज्ञाही करतोस, या तुझ्या विनोदाला पार आहे काय? जेथे सुर्याचा एक किरण संपुर्ण कमलवनाचा विकास करु शकतो त्या ठिकाणी तो सुर्य या कमलवनाला अखंडपणे सर्वत्र प्रकाश देतो, चातकाला एका जलबिंदुची गरज असते परंतु मेघ सर्व पृथ्वीवर जल वर्षाव करतो व समुद्राची भरती होते एवढे त्याचे अगाध औदार्य आहे हे कृपानिधी तुझ्या औदार्याला सीमाच नाही मला निमित्तमात्र करुन जगाच्या उध्दार करण्यासाठी आपण ज्ञानदान केले आहे, तेव्हा देव म्हणाले, आता माझी स्तुती पुरे कर, मी तुला जो उपाय सांगितला आहे त्या उपायाने तु माझ्याशी ऐक्य पावशील, अर्जुना, ज्या क्षणाला मिठाचा खडा समुद्रात पडतो त्या क्षणी तो विरळघू लागतो तेव्हा त्याला खडेपणाने उरण्याचे कारण काय? (ओवी १३७१ ते १३८०)
त्याप्रमाणे विश्वातील सर्व पदार्थमात्रांच्या ठायी मी सम प्रमाणात भरलेलो आहे हे जाणुन माझे भजन केले असता, अहंकार पुर्णपणे नाहीसा होवुन तु माझ्याशी ऐक्य पावशील. कर्मापासुन ज्ञानाने माझी प्राप्ती होईपर्यत विविध उपाय तुला स्पष्ट करुन सांगतो, हे पांडुसुता, प्रारंभी सर्व कर्मे ईश्वराच्या चरणकमलावंर अर्पण करावीत म्हणजे सर्व ठिकाणी ईश्वर परिपुर्ण भरलेला आहे, याची जाणीव होईल आणि प्रसन्नता लाभेल, नंतर माझा कृपाप्रसाद प्राप्त झाला असता माझ्यासंबंधाचे ज्ञान सिध्दीस जाईल व त्याआधारे माझ्यास्वरुपी एकरुप होता येईल. पार्था, माझ्या स्वरुपी ऐक्य पावल्यावर साध्य व साधना लय पावते असे झाल्यावर तुलाही काही करण्याचे शिल्लक राहणार नाही, तु आपली सर्व कर्मे सदैव मला अर्पण केलीस म्हणुन माझे सच्चिदानंद स्वरुप तुला प्राप्त झाले, या प्रसादाने तुझे बळ वाढल्यामुळे युध्दाच्या प्रतिबंध पुढे आडवा आला नाही, उपदेश करताना मी मध्ये थांबलो नाही, कारण मी तुझ्या प्रेमावर भाळलो आहे, ज्या योगाने कार्यासहीत अज्ञान नाहीसे होते आणि मी एक आत्मरुपाने प्रत्यक्ष होतो त्या अनेक विविध उपायांनी हे गीतेचे रुप धारण केले आहे, तेच गीतारुपी आपले गुहयरुपी ज्ञान हे विविध प्रकारच्या उपपत्तीने तुला उपदेशीलेले आहे, या ज्ञानाने धर्म-अधर्माला प्रसवणारे जे अज्ञान आहे, त्या अज्ञानाचा तु त्याग कर, आशेपासुन जशी सर्व दुखे प्राप्त होतात, निंदेपासुन सर्व पातके जशी उत्पन्न होतात आणि दुर्भाग्य जसे दारीद्रयाला उत्पन्न करते. (ओवी १३८१ ते १३९०)