सर्वशास्त्ररुपी रत्नांचे तेज प्रगट करणारा हा गीताग्रंथ, लक्ष्मीपती भगवंताच्या वदनरुपी गगनातील सुर्य नव्हे काय? त्या कुळामध्ये अर्जुनाने जन्म घेतला व जो गीतेच्या आत्मज्ञानाला पात्र झाला सर्व जगाला ज्याने गीताशास्त्राचे आवरण भव्य प्रमाणात घातले, ते कुळ खरोखरच धन्य होय. आता हे गीतेचे वर्णन असो त्या जगदगुरु श्रीकृष्णाने अर्जुन आपल्यामध्ये मिसळुन गेला होता, तो द्वैताच्या अवस्थेमध्ये आणला. त्यानंतर भगवान श्रीकृष्ण म्हणाले, अर्जुना, गीतेतील अंर्तज्ञान तुझ्या अंतकरणात स्थिर झाले काय? त्यावर अर्जुन म्हणाला, “देवा तुझ्या कृपेने मी आत्मज्ञानसंपन्न झालो.” भगवान श्रीकृष्ण म्हणाले, हे अर्जुना, भाग्याने कदाचित ऐश्वर्याची प्राप्ती होते पण मिळालेल्या ऐश्वर्याचा उपभोग कसा घ्यावयाचा हे एखाद्यालाच कळते. क्षीरसागराएवढे विरजले न जाणारे दुधाचे भांडे मंथन करताना देवांना आणि दैत्यांना किती कष्ट लागले? त्यांनी केलेले कष्टही फळास आले, ते अमृतही त्यांनी डोळयानी पाहिले परंतु त्या अमृताच्या प्राप्तीनंतर त्याचे जे संरक्षण करावे लागते ते करावयास ते चुकले, जेव्हा ते अमृत अमरत्व प्राप्त होण्यासाठी वाढले गेले तेव्हा राहु नाावाचा दैत्य देवांचे रुप घेवुन देवांच्या पंक्तीस बसला, त्यामुळे तो मारला गेला अमृत हेच दैत्यांच्या मरणाला कारण झाले, तेव्हा प्राप्त झालेले कसे भोगावे हे माहीत नसल्यामुळे अशी अवस्था होते, महुष राजा यज्ञ वगैरे कष्टमय कर्म करुन स्वर्गाचा अधिपती इंद्र झाला परंतु तेथे कसे वागावे हे न कळल्यामुळे तो भांबावुन गेला आणि पुढे त्याला सर्प योनी प्राप्त झाली अर्जुना, हे तुला माहीत नाही काय? अर्जुना तु पुष्कळ पुण्य केले आहेस, म्हणुन आज गीतारुपी श्रेष्ठ शास्त्र ऐकण्यास पात्र झाला आहेस. (ओवी १४७१ ते १४८०)
तर या शास्त्राच्या वागण्याचा जो संप्रदाय आहे तो समजावुन घेवुन मग शास्त्राप्रमाणे उत्तम रीतीने आचरण कर. एरवी अर्जुना, संप्रदाय सोडुन जर त्याचे अनुष्ठान करावयास लागशील तर अमृतमंथनाप्रमाणे परीनाम निष्फळ होतील. अे अर्जुना, गाय धष्ट-पुष्ट मिळाली तरी तिचे दुध तेव्हाच पिण्यास मिळेते जेव्हा धार काढण्याची हातवटी कळु शकेल. त्याप्रमाणे सदगुरु प्रसन्न होतील आणि शिष्याला आत्मविद्याही प्राप्त होईल परंतु त्या आत्मविद्येचे संप्रदायाप्रमाणे अनुष्ठान केले तरच ती फलद्रुप होईल. म्हणुन गीताशास्त्र समजुन घेण्याचा जो योग्य संप्रदाय आहे तो आता अत्यंत आदराने आणि एकाग्रतेने श्रवण कर. हे अर्जुना! तु हे जे गीताशास्त्र परम श्रध्देने अत्यंत आावडीने प्राप्त केलेस, ते तपश्चर्या न करणाऱ्यांना कधी सांगु नकोस. अथवा तपश्चर्या करणारा मनुष्य असला आणि तो सदगुरुंची मनोभावे भक्ती करत नसेल तर वेदांनी जसा वाईटाचा त्याग करायला सांगितला तसा तु त्याला दुर कर. अथवा कावळा जसा वृध्द असेल तर त्याला यज्ञाचा भाग प्रसाद म्हणुन घालीत नाहीत, त्याप्रमाणेच जो गुरुभक्तीहीन असेल तर मग तो कितीही मोठा असला तरी त्याला गीता सांगु नकोस. एखादयाने शरीराने तपही खुप केले आणि गुरुदेवांची भक्तीही केली परंतु त्याला शास्त्र-श्रवणांची इच्छा नसेल, तर तप व गुरुभक्ती या दोन अंगांनी जरी तो योग्य आहे तरी श्रवणाची इच्छा नसल्यामुळे तो गीताशास्त्र समजुन घेण्यास योग्य नाही. (ओवी १४८१ ते १४९०)
उत्तम प्रकारचा मोती असुन त्याल छिद्र नसेल तर तेथे दोरा अथवा सोन्याची तार प्रवेश करु शकेल काय? सागर अतिशय खोल आहे हे कोण नाही म्हणतो? पण त्याच्यावर कितीही पाऊस झाला तरी वायाच जाणार. भोजन करुन तृप्त झालेल्या माणसाला पक्वाने करुन वाढली असता ती वाया जातात. त्यापेक्षा भुकेल्या माणसाला ती पक्वाने वाढुन आपले औदार्य का बरे प्रगट करु नये? म्हणुन सर्व रीतीने योग्य असलेला माणुस जरी असला तरी हे गीताशास्त्र ज्याला श्रवण करण्याची इच्छा नाही त्याला चुकूनदेखील कौतुकानेही सांगु नये. डोळयांनी रुप पाहता येते परंतु डोळयांनी सुगंध घेता येतो का? म्हणुन ज्याला ते कळते, पटते, तेथेच ते फळाला येते. म्हणुन हे सुभद्रापती! तपश्चर्या करणारा असला गुरु व देव यांची भक्ती करणारा असला तरीपण त्याला जर शास्त्र-श्रवणाची ओढ नसेल तर त्याचा त्याग करावा. अथवा तपस्वी, गुरु आणि देव यांची भक्ती करणारा असला आणि शास्त्र-श्रवणाची इच्छाही आहे, असा सर्व प्रकारे युक्त असलेला मनुष्य तुला दिसला तरीपण गीताशास्त्र निर्माण करणारा आणि अखिल प्राणीमात्रांचे नियमन करणारा जो मी सर्वज्ञ ईश्वर त्या माझ्याविषयी सामान्य बुध्दीने जो बोलेल. माझ्या भक्ताचां व माझा कोणत्याही प्रकारचा दोष नसताना खोटे दोषांचे आरोप करुन दुष्टपणाने जे कोणी बोलणारे आहेत, त्यानां योग्य अधिकारी समजु नये, त्यांची सर्व सामुग्री कशी आहे म्हणशील तर रात्री दिव्याच्या ज्योतीशिवाय तेल-वातीने भरलेली पणती जशी व्यर्थ आहे. (ओवी १४९१ ते १५००)
ज्याप्रमाणे एखादा सुंदर गोरापान तरुण असुन त्याने अंगावर उत्तम प्रकारची आभुषणेही घातलेली आहेत, परंतु त्या तरुणामध्ये जीव नसेल, सुर्वणाचे सुंदर घर उत्कृष्टपणे निर्माण केले आहे परंतु त्या घराच्या दारात जर नागीन बसलेली असेल मधुर पक्वाने निर्माण केली आहेत परंतु त्यामध्ये काळकूट नावाचे विष पडले आहे. मैत्री आहे परंतु पोटामध्ये कपट आहे. तर या सर्वाचा काय बरे उपयोग? असो हे दृष्टात पुरे, हे बुध्दीमान अर्जुना! त्याप्रमाणे जो माझी आणि माझ्या भक्ताची निंदा करतो त्याचे तप व भक्ती आणि बुध्दी ही कपटपणाची होय. याकरीता हे अर्जुना, तो भक्त बुध्दीमानतपस्वी जरी असला तरी त्याला या शास्त्राला स्पर्श करु देवु नये. तरी अधिक काय बरे सांगावे? जरी तो ब्रम्हदेवाप्रमाणे योग्य असला तरी त्याला कौतुकानेही गीताज्ञान सांगु नये. म्हणुन हे धनुर्धरा, ज्या मंदिराच्या पायात तपाचे दगड मजबुत भरुन त्यावर गुरुभक्तीचे मंदिर बांधले आहे. आणि त्या मंदिराचा श्रवणेच्छारुपी दरवाजा सदैव उघडा ठेवला आहे, व ज्या मंदिरावर अनिंदारुपी रत्नांचा शुध्द कळस चढविला आहे. अशापवित्र भक्तीरुपी मंदिरात या गीतारत्नेश्वराची प्राणप्रतिष्ठा केल्यावर या जगात तुला माझी योग्यता प्राप्त होईल. कारण ओमकार एक अक्षरपणाने अकार, उकार, मकार या तीन मात्रांच्या गर्भात राहण्याच्या संकटात सापडला होता. (ओवी १५०१ ते १५१० )
तो वेदांचे बीज जो ओमकार जो गीतेच्या विस्ताराने विस्तारला गेला अथवा ही गीता म्हणजे जणु गायत्रीच श्लोकरुपाने फळांनी व फुलांनी बहरास आली आहे. मातेशिवाय ज्याला वेगळे असे जीवन नाही, अशा बाळाची आणि मातेची भेट ज्याप्रमाणे करवावी त्याप्रमाणे गायत्रीमंत्राचा गुढ अर्थ असलेली ही गीता माझ्या भक्तांना स्पष्ट करुन सांगतो, त्याप्रमाणे भक्ताची व गीतेची परम आदराने भेट करुन देतो. तो आंतरबाहय आनंदी राहुन देह ठेवल्यानंतर माझ्याशी ऐक्य पावतो. आणि देह धारण करुनही जो जीवाने आणि प्राणाने देहभावापासुन अलिप्त असतो तोच मला अधिक प्रिय आहे. ज्ञानी, कर्मठ व तरस्वी अशा विशिष्ठ लक्षणांमध्ये जो गीतेचे अंतरंग प्रगट करणारा उत्तम निरुपणकार आहे तोच मला अत्यंत प्रिय आहे. जो भक्तगणांच्या मेळाव्यात गीतेचे निरुपण करतो, त्यासारखा दुसरा कोणीही मला आवडता या भुतलावर दिसत नाही. माझ्या ईश्वराच्या भक्तीप्रमाने जो अभिमान त्यागुन आणि नि:स्पृह बुध्दीने पठण करणारा आहे तो खरोखरच संतांच्या सभेत भुषण होतो, तोच संतांचा मुकूटमणी होय. जो गीतारुपी वसंत ऋतु प्रेमाने श्रवणभक्ती करणा-या माझ्या भक्तरुपी उद्यानात त्या अष्टसात्विक भावरुपी नवपल्लवांनी रोमांचित करीत हळूहळु वाहणा-या वा-याने डोलणा-या झाडाप्रमाने आनंदाने शरीर डोलवितो आणि मकंरदाच्या रसाने फुले जशी बहरतात त्याप्रमाणे डोळे आनंदाश्रुनी भरुन टाकतो. कोकीळ पक्ष्याच्या पंचम स्वरांनी शब्दांचे स्वरुप धारण करुन सदगदित वाणीने बोलत कंठ दाटुन आणीत गीतेचे प्रेमाने आणि एकाग्रतेने श्रवण करणा-या माझ्या भक्तरुपी उद्यानामध्ये जणू तो अलौकिक वसंत ऋतु प्रवेश करीत आहे. अथवा गगनामध्ये चंद्र उदय पावल्यानंतर चकोर पक्ष्यांच्या जन्माचे सार्थक होते अथवा मोराच्या आवाजाला ओ देतच नुतन मेघ जसे आकाशामध्ये यावेत. (ओवी १५११ ते १५२०)
याप्रमाणे माझ्या स्वरुपी चित्त ठेवुन संत-सज्जनाच्या मेळाव्यावर जो गीताश्लोकरुपी रत्नाचा अपार वर्षाव करतो. मग त्याप्रमाणे मला आवडणा-या भुतकाळात अथवा भविष्यकाळात पाहीला असता दुसरा कोणी मिळत नाही. अर्जुना! याप्रमाणे जो गीतेच्या भावार्थाची संत-सज्जनांना मेजवानी करतो त्याला मी आपल्या हदयात धारण करतो. तुझ्या व माझ्या संगतीत गीतेचा जो हा सुख संवाद झाला व त्या गीतेत मोक्ष प्राप्त करुन देणारे जे उपाय जगण्यासाठी आले, तो सर्व अर्थ प्राप्त करुन देणारा आपला दोघांचा सुसंवाद, त्यातील पदांचा विचार न करता जो केवळ पठण करतो. हे सुमती अर्जुना! त्याने प्रदिप्त ज्ञानाग्नीमध्ये मुळ अविद्येची आहुती देवुन मी जो परमात्मा, त्या मला संतुष्ट केले आहे. हे बुध्दीमान अर्जुना! गीतेच्या अर्थाचा अनुभव घेवुन जे शोधक ज्ञानी आहेत ते जी योग्यता पावतात तशीच योग्यता गीतेचे गायन करणारे व वर्णन करणारे यांनाही प्राप्त होते. याप्रमाणे गीता-पठण करणा-यालाही गीतेचा अर्थ समजण्यासारखेच फळ मिळते गीतामाऊलीला हे जाणते मुल आहे हे नेणते मुल आहे असा भेद माहीतच नाही.आणि जो सर्व शास्त्रांनी वर्णन केलेल्या ज्ञान,कर्म, ध्यान, भक्ती या राजमार्गाची निंदा करणे त्यागुन परिशुध्द आस्थेने गीतेतील वचनांच्या श्रवणावर श्रध्दा ठेवतो. त्यांच्या कानांवर गीतेची अक्षरे पडतात आणि त्यांचे पाप जलद गतीने पळुन जाते. (ओवी १५२१ ते १५३०)
ज्याप्रमाणे अरण्यामध्ये अग्नी एकदम प्रज्वलित झाला असता त्या अरण्यात राहणारे प्राणी पक्षी वाट फुटेल तिकडे सैरावैरा धावत जातात, अथवा उदयाचलावर सुर्यनारायण उगवला असता सर्व अंधार नाहीसा होतो, तसा गीतेतील विचारांचा गजर कानांच्या सहाय्याने महाद्वारापर्यत अंतकरणापर्यत पोचल्यावर सृष्टीच्या आरंभकालापासुनचे त्या श्रवण करणा-या पुरुषाचे पाप नाहीसे होते. अशा रितीने त्याचे सर्व कुळ परमपवित्र होवुन तो पुरुष पुण्यरुप होतो. याप्रमाणे त्याला अलभ्य लाभ होतो, गीतेतील जेवढी वचने कानाच्या द्वाराने आत शिरतात, तितके अश्वमेघ यज्ञ केल्याचे पुण्य लाभते. म्हणुन परमश्रध्देने केलेल्या श्रवणाने पाप नाहीसे होते. धर्माचा उत्कर्ष होतो, आणि त्या आधारे शेवटी स्वर्गाच्या राज्यांचे ऐश्वर्य प्राप्त होते. परमश्रध्देने गीता श्रवण करणारा आणि त्याप्रमाणे आचरण करणारा पुरुष अनेक दिव्य सात्विक स्वर्गरुप फळाचां उपभोग घेतो आणि नंतर मलाचप्राप्त होतो. हे धनंजया, अशी ही गीता ऐकणा-याला आणि वाचणा-याला सत्-चित्त्-आनंदरुप असलेल्या माझी प्राप्ती फलद्रुप होते आता अधिक काय बरे सांगावे? आता हा विस्तार राहुदे पण ज्या कारणाकरीता तुला गीताशास्त्र सांगण्यास प्रारंभ केला ते तुझे कार्य तुला विचारतो.हे पांडवा! सांग बरे, हया गीताशास्त्रात सांगितलेले सर्व सिध्दांत ऐकुन तुझ्या हदयात ते पुर्णपणे अंकित झाले काय? (ओवी १५३१ ते १५४०)
आम्ही ज्या रीतीने हे मनातले सिध्दांत तुझ्या कानांच्या स्वाधीन केले तसे त्यांनी तुझ्या चित्ताच्या ठिकाणी स्वाधीन केले काय? अथवा मध्येच तुझ्या कानांनी दुर्लक्ष केले काय? अथवा उपेक्षेने ते सिध्दांत दुर केले काय? आम्ही सांगितलेले सिध्दातं जर तुझ्या हदयापर्यत पोचले असतील तर मी जे प्रश्न विचारीन त्यांची उत्तरे दे. अज्ञानामुळे उत्पन्न झालेल्या मागील मोहाने तुला भुरळ पाडली होती. तो तुझा मोह गेला की नाही? फार काय विचारु? अमुक एक कर्म मी करीन अथवा करणार नाही हे केवळ आपल्या स्वताच्या हाती आहे असे तुला अजुनही वाटते काय? जर अर्जुन हा आत्मानंद ऐक्यरसामध्ये पुर्ण विरघळुन गेला तर युध्द करणार नाही, अशा विचाराने अशा प्रश्नांच्या निमित्ताने अर्जुनाला पुन्हा द्वैताच्या भेदबुध्दीवर आणले. अर्जुन हा ब्रम्हाशी ऐक्य पावला तर आपले पुढील कार्य साधले जाणार नाही म्हणुन श्रीकृष्णांनी त्याला भेदाच्या सीमा ओलांडु दिली नाही. एऱ्हवी आपण केलेला उपदेश सफल झाला की नाही हे सर्वज्ञ श्रीकृष्ण जाणत नव्हते काय? परंतु वर सांगितलेल्या कारणासाठीच देवांनी प्रश्न केला. याप्रमाणे प्रश्न विचारुन नाहीसे झालेले अर्जुनपण आणुन अर्जुन पुर्णदशेस आला किवां नाही हे त्याच्या मुखातुन वदविले. पुर्ण चंद्र हा क्षीरसागराला सोडुन आकाशातील तारकापुंजास सुशोभित करीत आहे, असे दिसले, तरी तो जसा क्षीरसागरापासुन वेगळा नाही. (ओवी १५४१ ते १५५०)
त्याप्रमाणे मी ब्रम्हरुप झालो होतो हे विसरुन सर्व विश्वच ब्रम्हरुप आहे हे देखील विसरुन आपोआप विरघळेल. अशा रीतीने ब्रम्हयाचे स्मरण ठेवुन वागणारा आणि ब्रम्हाच्या विस्मृतीने ब्रम्हरुपीच असणारा मोठया कष्टाने मी अर्जुन आहे असे समजुन देहस्थितीवर येवुन उभा राहीला, मग थरथर कापणाऱ्या तळहातांनी उभे राहीलेले रोमांच दडपुन सर्व शरीरावर आलेल्या घामाचे बिदुं जिरवुन प्राणाच्या वेगवान श्वसनाने डोलणाऱ्या अंगाला अंगाचाच आधार देवुन कंठ सदगदित झाला होता हे सर्व विकार त्याने आतल्या आत जिरवुन टाकले. दोन्ही डोळयांतुन आंनदाश्रुंच्या अमृताचे लोट चेहऱ्यावरुन ओघळत होते ते आवरुन ते पुसुन टाकले, विविध प्रकाराच्या उत्कंठांच्या भारात कंठ दाटुन आला होतात्या उत्कंठा हदयामध्ये दाबुन आणि वाणीचे अडखळणे सावरुन प्राणाचे क्रमरहित श्वसन करणे ते पुर्ववत सावरले, मग अर्जुन देहभानावर येवुन श्रीकृष्णास म्हणाला, तुम्ही मला मोहाची आवड आहे कि काय असे विचारले तर तो मोह आपल्या परीवारासह सर्व अज्ञान घेवुन निघुन गेला आहे. सुर्य जवळ आल्यानंतर डोळयासं अंधार दिसतो काय? हे म्हणणे कोणत्या बरे गावाला शोभेल? त्याप्रमाणे हे श्रीकृष्णा, तुम्ही आम्हाला प्रत्यक्ष दर्शन दिल्यावर त्यामुळे मोहाचा नाश होणार नाही काय? (ओवी १५५१ ते १५६०)
शिवाय जे कोणत्याही उपायाने जाणता येणार नाही ते आईपेक्षाही अधिक प्रेमाने विस्तारपुर्वक सांगितले आहे. आता मोह आहे किवांनाही ? असे जे विचारले त्याचे उत्तर आहे की तुमचा कृपाप्रसाद मला लाभला आहे त्यामुळे मी कृतकृत्य झालो आहे, मी अर्जुन आहे अशा अभिमानात मी गुंतुन गेलो होतो पण तुझ्या कृपेने आत्मबोध झाल्याने माझा मोह पुर्णपणे नाहीसा झाला आहे. मी तुझ्या कृपाप्रसादाने प्राप्त झालेल्या आत्मबोधाने मोहाचे मुळ अज्ञान माझ्या ठिकाणी शिल्लक राहु देणार नाही.आता ज्या द्वैतामुळे कर्म करणे किवां न करणे हे भाव उत्पन्न होतात, ते द्वैत मी जाणत नाही या जगात तुझ्याशिवाय दुसरं काही मी जाणत नाही. याविषयी माझ्या मनात आता कोणत्याही प्रकारचा संदेह शिल्लक नाही ज्या आत्मस्वरुपाच्या ठिकाणी कोणतेही कर्म नाही अशा आत्मस्वरुपाशी मी ऐक्य पावलो आहे. तुझ्या दिव्य उपदेशाने मला माझे स्वरुप प्राप्त होवुन माझे कर्तव्य, कर्ता, क्रिया ही सर्व त्रिपुटी नाहीशी झाली परंतु हे प्रभु तुझ्या आज्ञेशिवाय मला आता दुसरे काही करावयाचे नाही, का? तर जे गुरुरुपी दृश्य जगददृश्याचा नाश करते जे द्वैत गुरु-शिष्य हा भाव नाहीसा करतो, तो एक असुनही सर्व देश व्यापुन राहतो. ज्याचा संबंध आला असतासर्व प्रकारचे बंध नाहीसे होतात. ज्याची आशा केली असता विविध प्रकारच्या आशा तुटुन जातात, आणि ज्याची भेट झाली असता सर्वत्र आत्मचैतन्य दिसु लागते, जे एकटेपणाच्या अवस्थेत मदत करणारे आहे, ज्याची सेवा करण्यासाठी अद्वैत ज्ञानाचेदेखील उल्लघंन करावे ती तु माझी सदगुरु-मुर्ती आहेस. (ओवी १५६१ ते १५७०)