अध्याय-२-भाग-३

हे अर्जुना ! अशा प्रकारचा आत्मा आहे हे जाणावे आणि तो सर्वत्र सम प्रमाणात आहे हे पाहावे म्हणजे सर्व प्रकारचा तुझा शोक नाहीसा होईल अथवा आत्म्याचे अमरत्व मेला समजत नसेल आणि आत्मा नाशवंत आहे असे तू मानत असशील तरी देखील अर्जुना, तूला शोक करण्याचे कारण नाही कारण गंगेच्या पाण्याचा प्रवाह हा ज्याप्रमाणे अखंड आहे  त्यामध्ये उत्पत्ती, स्थिती आणि लय  ही नित्य घडत आहेत गंगेचे पाणी उगमस्थनी खंडित नसते ते सदैव सागरामध्ये मिळत असते आणि उगम आणि संगम यामध्ये असलेले जल सदैव वाहत असलेले दिसते त्याप्रमाणे उत्पत्ती, ‍स्थिती व लय अखंड आणि सर्वकाळ चालूच आहेत हे लक्षात ठेव हा भूतमात्रांचा प्रवाह थांबविता येत नाही.

           म्हणून तुला या सर्वाबाबत शोक करण्याचे कारण नाही कारण उत्पत्ती आणि लय ही सर्व विश्वाची अनादिृ स्वाभाविक अशी व्यवस्था चालत आलेली आहे हे तुझ्यामनात येत नसले, तरी देखील तुला शोक करण्याचे काही कारण नाही. असे पाहा की हे जन्म-मरणाचे चक्र टाळता न येणारे आहे. जे उत्पन्न होते त्याचा नाश होतो आणि ज्याचा नाश होतो ते दुसऱ्या रुपात पुन: दिसू लागते रहाट गाडग्या सारखा असा हा क्रम सदैव सुरू असतो जसा सुर्याचा उदय आणि अस्त आपोआप निरंतर होत असतो त्याप्रमाणे देहाचे जन्म-मरण अखंड होत असते तसेच जगात जन्म-मरण अपरिहार्य आहे. (ओवी १५१ ते १६० )  महाप्रलयाच्या वेळी या त्रैलाक्याचा ही नाश होत असतो म्हणन कोणत्याही वस्तूची उत्पत्ती आणि अंत हा टळत नाही अर्जुना, हे जर तुला पटत असेल तर तू का बरे खेद करतोस  तु जाणता असुन देखील नेणता का बरे होतो? हे अर्जुना ! कोणत्याही प्रकारे विचार करून पाहिले तरी तुला दु:ख करण्याचे मुळीच कारण नाही कारण सर्व भूतमय शरीरे जन्मापूर्वी अमूर्त स्वरूपात होती जन्मल्या नंतर त्यांना आकार प्राप्त झाला ते नाश होउन जेथे कोठे जातात तेथेही नि:संशय त्या अमुर्ताहून ते वेगळे नसतात ते आपल्या पूर्वस्थितीला प्राप्त होतात.

            जन्म आणि नाश यामध्यो जे मूर्त दिसते ते झोपी गेलेल्याच्या स्वप्नासारखे भासते त्याप्रमाणे सतस्वरुपाच्या ठिकाणी मायेमुळे हा देहाचा आकार भासतो जलाला वाऱ्याने स्पर्श केला की त्यावर लाटेचा आकार भासमान होतो किवां दुसऱ्याच्या इच्छेने सोन्यावर दागिन्याचा आकार भासमान होतो ज्या प्रमाणे आकाशात ढगाचे आवरण भासमान होते त्याप्रमाणे विश्वातील सर्व मूर्त पदार्थ मायेमुळे आकाराला आलेले आहेत ते केवळ भासमान आहेत त्याप्रमाणे मुळात जे उत्प्रननच होत नाही  त्यासाठी तू  दु:खाने का बरे रडत बसला आहेस? जे निर्विकार असे चैतन्य आहे त्याकडे तू पूर्ण लक्ष दे त्या विश्वचैतन्याचा प्रत्यक्ष अनुभव घेण्यासाठी संतांनी विषयांचा त्याग केला ते विरक्त बनले आणि वनात निघून गेले. (ओवी १६१ ते १७०)

          ज्याच्यावर दृष्टी एकाग्र करुन महान मुनि-महात्मे ब्रम्हचर्यादी व्रतांचे पालन करतात आणि  तपाचे अनुष्ठान करतात कित्येक लोक आत्म्याचा विचार करत अंत:करण शांत करतात आणि संसाराला विसरून जातात कित्येक साधक आत्म्याच्या गुणाचे वर्णन करतात त्यांना उपरती प्राप्त होते संसारा विषयी वैराग्य निर्माण होते आणि त्यांच्या चित्ताला दीर्घकाळ तल्लीनता  प्राप्त होते कित्येक साधक आत्मज्ञानाचे श्रवण करताच शांत होतात त्यांचा देहभाव संपून जातो ते अनुभवाने तद्रुपता प्राप्त करतात.ज्याप्रमाणे सर्व नद्यांचे ओघ समुद्रास मिळतात.समुद्रात पाणी मावत नाही ;म्हणून त्या कधी परत फिरत नाहीत.तशी श्रेष्ठ योगीश्वरांची बुध्दी आत्मसाक्षात्काराने तद्रूप होते.

           पुन: विचार करून देखील ते देहबोधावर येत नाहीत जे सर्वत्र आणि सर्व देहांमध्ये  आहे कोणत्याही प्रयत्नाने त्याचा नाश होत नाही ते चैतन्‍य विश्वामध्ये सम प्रमाणात भरलेले आहे  हे तू जाणून घे विश्वचैतन्याच्या सत्तेने संपूर्ण विश्वाची निर्मिती होते व ते नाहीसे होते तर मग तू का म्हणून शोक करावास ते सांग परंतू हे अर्जुना आत्म्याच्या अमर तत्वाचा विचार तुला का पटत नाही हे कळत नाही विविध प्रकाराने विचार केला असता शोक करणे अयोग्य आहे हे सिध्द होते तू याचा अजून का बरे विचार करत नाहीस? मनामध्ये वेगळेच काय चिंतन करत आहेस? भवसागरातुन तारुन नेणारा स्वधर्म तू का विसरला आहेस ? (ओवी १७१ ते १८० ) या कौरवांचे भलते- सलते झाले अथवा तुझ्यावर काही संकट आले हे युग जरी बुडाले तरी  देखील तुझा जो स्वधर्म आहे तो कोणत्याही कारणाने त्याग करणे योग्य नाही. तुझ्या मनात जो दयाभाव निर्माण झाला आहे त्याने तू तरून जाणार आहेस काय? हे अर्जुना ! तुझे चित्त जरी दयाभावाने द्रवले असले तरी या संग्रामाच्या वेळी तसे करणे उचित नाही अरे, गायीचे शुध्द दूध असले तरी ते पथ्यास घेउ नये असे सांगितले असतानाही ते दूध नवज्वरामध्ये दिले तर ते विषासमान मारक होते त्या प्रमाणे भलत्या ठिकाणी भलते आचरण केले तर त्याच्या हिताचा नाश होतो.

          म्हणून तू आता सावध हो. तू मोहाने का बरे व्याकूळ होतोस ? ज्याचे आचरण केले असता कोणत्याही काळी बाधा होत नाही त्या आपल्या स्वधर्माकडे पूर्ण लक्ष दे ज्याप्रमाणे सुयोग्य मार्गाने चालले असता कधीही अपाय होत नाही किवां रात्री दिव्याच्या उजेडाने चालले असता ठेच लागत नाही. हे अर्जुना ! त्याप्रमाणे स्वधर्माने वागत असता सर्व इच्छा सहजपणे पूर्ण होतात म्हणून याकरिता तुम्हा क्षत्रियांना आता संग्रामावाचुन दुसरे काहीही योग्य नाही हे तू जाण निष्कपट भावाने समोरासमोर उभे राहून शौर्याने युध्द करावे परंतु हे असो, प्रत्यक्षच युध्दाचा प्रसंग आला आहे तरी जास्त काय सांगावे? (ओवी १८१ ते१९०)  हे अर्जुना ! आत्ताचे हे युध्द म्हणजे तुमचे पूर्वजन्मीचे भाग्य होय अथवा सर्वधर्माचा ठेवाच प्रगटलेला आहे याला काय साधे युध्द म्हणावयाचे? संग्रामाच्या रूपाने हा स्वर्गच अवतरला आहे अथवा तुझा मूर्तिमंत प्रताप प्रगटला आहे  तुझ्या शौर्यगुणाचा लौकिक ऐकून तुझ्यावर आसक्त झाल्यामुळे कीर्तिरूप स्त्री तुला वरण्यासाठी आली आहे क्षत्रियांने खूप पुण्य करावे तेव्हा त्याला असे हे धर्मयुध्द करावयास मिळते ज्याप्रमाणे एखाद्या माणसाला मार्गावर चालत असताना मनातील इच्छा पुर्ण करणारा चिंतामणी सापडावा.

            अथवा जांभई देण्यासाठी तोंड उघडले तर त्यात अमृत पडावे त्याप्रमाणे तुला हे युध्द अनायासे प्राप्त झाले आहे हे समजून घे आता असला हा संग्राम त्याशील आणि नसत्या गोष्ठीचा शोक करीत बसशील तर आपणच आपली हानी करून घेतल्यासारखे होईल. हे धर्मयुध्द न केल्यामुळे तुझी असलेली कीर्ती संपून जाईल जगातील लोक तुझी निंदा करतील आणि तुझ्याजवळ राहण्यासाठी महादोष तुझा शोध घेत येतील.ज्या प्रमाणे पतिविरहीत स्त्रीचा सर्वाकडून अपमान होत असतो त्याप्रमाणे स्वधर्माचा त्याग करणाऱ्याची अवस्था होत असते  अथवा रणभूमीवर टाकून दिलेल्या मृत सैनिकाला ज्याप्रमाणे गिधाडे टोचे मारीत असतात त्याप्रमाणे स्वधर्मरहित मनुष्याला महापापे त्रास देत असतात. (ओवी १९१ ते २००)

          म्हणून तू स्वधर्माचा त्याग करशील तर तू पापाला पात्र होशील आणि कल्पांतापर्यत त्या अपयशाची अपकीर्ती जाणार नाही. अपकीर्ती अंगाला जोपर्यत स्पर्श करत नाही तोपर्यतच जाणकार माणसाने जगावे असे असताना तू सांग की युध्दातून कसे बरे निघुन जावे? तू मत्सररहित होउन दयायुक्त अंत:करणाने रणांगणातून परत फिरशील परंतू तुझी ही भूमिका सर्वाना कळू शकणार नाही हे कौरव तुला चारी बाजूनी घेरतील तुझ्यावर बाणांचा वर्षाव करतील पार्था! त्या वेळी या संकटचक्रातुन केवळ दयाळूपणामुळे तुझी सुटका होउ शकणार नाही. कदाचित अशाही प्राणसंकटातुन तू सुखरूप सुटका करून घेतलीस तरी ते जगणे मरणापेक्षाही वाईट असेल तू आणखी एका गोष्टीचा विचार करत नाहीस आत्मविश्वासाने तू युध्दास आला आहेस आणि जर दयायुक्त अंत:करणाने परत निघालास तर हे अर्जुना, तुझे दयाळूपण या दुष्ट वैऱ्यांच्या मनाला समजेल तरी काय हे मला सांग ते म्हणतील युध्द सोडून हा पळून गेला हा अर्जुन आम्हाला भ्याला. असा दोष तुझ्यावर राहीला तर ते चांगले आहे का ते सांग? लोक अनेक प्रकारचे कष्ट करुन अथवा प्रसंगी प्राणाचे बलिदान सुध्दा देउन हे धर्नुधरा, आपली कीर्ती वाढवितात तुला अनायासे निर्दोष अशी कीर्ती लाभलेली आहे आकाश जसे व्यापकपणा विषयी भेदरहित असते. (ओवी २०१ ते २१० )

         त्या प्रमाणे तुझी कीर्ती अमर्यादित आहे तुझे गुण देखील उपमारहित आहेत त्रैलोक्यात तुझ्या गुणांची प्रसिध्दी आहे दाही दिशांचे राजे भाट होउन तुझ्या गुणांचे वर्णन करीत असतात ते ऐकून यमादिक देखील दचकतात अशी तुझी कीर्ती गंगेच्या जलासमान निर्मल आणि अथांग आहे ती पाहून जगातील योध्दयांना मार्गदर्शन लाभते. तो तुझा अलौकिक पराक्रम ऐकून सर्व कौरव जीविताविषयी निराश झाले आहेत ज्याप्रमाणे सिंहाची प्रचंड गर्जनाऐकून उन्मत्त हत्तीला देखील प्रलयकाळ जवळ आला आहे असे वाटू लागते त्याप्रमाणे सर्व कौरवांना तुझी भीती वाटत आहे. ज्याप्रमाणे पर्वत वज्राला किवां सर्प जसे गरूडाला ज्या भीतीच्या भावनेने मानतात त्याप्रमाणे कौरव तुला भीतीच्या भावनेने मानतात जर तू युध्द न करताच  रणांगणातुन निघून जाशील तर तुझी मोठी कीर्ती नाहीशी होईल आणि तुला कमीपणा येईल तू पळून जाण्याचा प्रयत्न केलास तरी कौरव तुला पळुन जाउ देणार नाहीत तुला पकडून तुझी फजिती करतील  तुझ्या समोरच ते तुझी अमर्याद निंदा करतील ते निंदेचे शब्द ऐकून तुझे हदय विदीर्ण होईल त्यापेक्षा आता तु शौर्याने का बरे लढत नाहीस? तु जर कौरवांना जिंकलेस तर तुला पृथ्वीच्या राज्याच्या उपभोग घेता येईल.

            अथवा या रणांगणामध्ये तू शत्रूंशी झुंज देताना तुझे प्राण खर्ची  पडले तर तुला विनासायास स्वर्गसुख प्राप्त होईल. ( ओवी २११ ते २२०)  म्हणून हे अर्जुना ! युध्द करावे अथवा करू नये या गोष्टीचा विचार करत बसु नकोस तर उठ आणि हातात धनुष्य घेउन युध्दाला त्वरीत सुरूवात कर असे पाहा की, स्वधर्माचे आचरण केले असता सर्व पातके नाश पावतात असे असुन युध्दामुळे पातक निर्माण होईल हा भ्रम तुझ्या चित्तात कसा निर्माण झाला तुच सांग की, नावेत बसून जाणारा कधी  बुडेल काय ? किवां सुयोग्य मार्गाने जात असताना कोणास ठेच लागेल काय?  परंतु कदाचित व्यवस्थित चालता येत नसेल तर ते पण घडेल अमृता समान गोष्टी विषासह सेवन केल्या तरी मृत्यू प्राप्त होतो.

           त्याप्रमाणे स्वधर्म हा फलाच्या आशेने केला तर दोष लागत नसतो म्हणून हे अर्जुना ! फळाची आशा सोडून क्षत्रियांच्या धर्माप्रमाणे युध्द करीत असताना तुला पाप लागणार  नाही सुख प्राप्‍त झाले तरी संतोष मानू नकोस आणि दु:ख प्राप्त झाले, तरी त्याचा विषाद मानू नकोस. मनात लाभ आणि हानी याचा विचार करू नकोस. या युध्दात आपला जय होईल की पराजय होउन देह नाहीसा होईल या पुढील गोष्टीचे युध्दापूर्वी चितंन करू नये आपल्याला विहीत असलेल्या स्वधर्माचे आचरण करीत असताना जे काही बरे वाईट प्रसंग येतील ते शांत चित्ताने सहन करावेत. अशा प्रकारे तुझे मन शांत झाले असता तुझ्याकडून स्वभावत:च पाप घडणार नाही. म्हणून तु आता भ्रमरहित होउन शत्रुशी झुंज देण्यास तयार व्हावे. येथपर्यत तुला आत्मज्ञान थोडक्यात संक्षिप्त रुपात सांगितले, आता निश्चीत असा निष्काम कर्मयोग सांगतो तो तु ऐक. ( ओवी २२१ ते २३० )

पुढील भाग