अध्याय-२-भाग-५

            इंद्रियांना कोंडुन ठेवण्यासाठी जे साधक साधनेची घरटी बांधतात, यम-नियमाचे दार लावतात आणि सदैव मनाला मुठीत धरून बसतात. त्या साधकानां देखील ही इंद्रिये अतिशय व्याकुळ करतात. इंद्रिये अतिशय व्याकुळ करतात, अशी या इंद्रियांची प्रौढी आहे.जसे मांत्रिकाला हडळ देखील फसवी असते, त्याप्रमाणे पाहा, हे विषय ऋधि-सिध्दीच्या रुपाने प्राप्त होतात आणि इंद्रियांच्या व्दारे साधकाला गुरफटुन टाकतात. अशा चक्रात मन सापडले , म्हणजे ते अभ्यासाने देखील जागृत होत नाही, अशी बलवत्तर इंद्रिये आहेत. म्हणुन अर्जुना ऐक अंत:करणापासुन जये सर्व विषयांची आसक्ती सोडुन इंद्रियांवर विजय मिळवितो, ज्याचे अंत:करण विषयसुखाने मोहित होत नाही, तोच योगनिष्ठा प्राप्त होण्यास सुयोग्य आहे, असे जाणावे. त्याचे अंत:करण आत्मज्ञानाने परिपूर्ण भरलेले असते आणि तो मला कधी विसरत नाही. एखाद्या साधकाने जही बाहय रूपाने विषयांशी संबंध ठेवला नाही. तरीसुध्दा मनात जर विषयवासनेची लालसा असेल, तर त्याला संसाराची बंधने  जखडुन ठेवतातच. ज्याप्रमाणे विषांचा एक थेंब जरी घेतला, तरी तो सर्व शरीरात पसरुन संपूर्ण जीवनाचा नाश करतो. त्याप्रमाणे विषयांतुन सुख मिळते काय, अशी शंका जरी मनात निर्माण झाली , तरी  अंत:करणातील विवेकाचा ती घात करते. (ओवी ३११ ते ३२०)

            हदयामध्ये नुसते विषयांचे स्मरण झाले, तरी विरक्ताच्या मनात देखील आसक्ती निर्माण होते. त्या आसक्तीमुळे मनात कामाचे चित्र -विचित्र आकार प्रगट होउ लागतात. जेथे काम निर्माण होतो, तेथे क्रोध आधीच आलेला असतो. क्रोधामध्ये अविचाराचा भ्रम निमार्ण होतो. ज्याप्रमाणे प्रचंड वाहणाऱ्या वाऱ्याच्या वेगाने दिव्याची ज्योत विझून जाते, त्याप्रमाणे अविचाराचा भ्रम निर्माण झाला, की  स्मृती नाहीशी होउन जाते. सुर्यास्त होण्याच्या वेळी रात्र जशी सुर्याच्या तेजाला गिळून टाकते, त्याप्रमाणे स्मृतीचा भ्रंश झाला, की माणसाची अवस्था होते.

            मग अज्ञानाच्या अंधकाराचे साम्राज्य सर्वत्र पसाते आणि शरीरातील सर्व गोष्टीना ते बुडविते, त्यामुळे बुध्दीला विचार स्फुरत नाहीत आणि बुध्दी व्याकुळ होउन जाते. जन्मांध व्यक्तीला काही कारणामुळे पळण्याचा प्रसंग आला, तर ती व्यक्ती अतिशय दीन होते आणि सैरावैरा धावत सुटते, त्याप्रमाणे बुध्दीला अनेक प्रकारचे भ्रम निर्माण होतात, अशा प्रकारे स्मृतीभ्रंश झाल्यामुळे बुध्दी सर्व बाजूंनी चक्रात सापडते त्यामुळे सर्व ज्ञान मुळासह नाहीसे होते.शरीरातुन प्राण निघुन गेला असता शरीराची जशी दशा होते, त्याप्रमाणे बूध्दिनाश‍  झाला ,म्हणजे पुरूषाची अवस्था होते.म्हणून  अर्जुना, ऐक एखादी लहान ठिणगी जरी लाकडाला लागली तरी मोठा अग्नी प्रज्वलित होतो आणि तो त्रिभुवनाला जाळण्यास देखील पुरतो. त्याप्रमाणे मनाकडुन नकळत देखील थोडेसे विषयाचे चिंतन घडले , तरी एवढे मोठे पतन त्याला शोधीत येते.(ओवी ३२१ ते३३०)

        म्हणन सर्व प्रकारच्या विषयांचा मनापासुन त्याग करावा, त्यामुळे राग-व्देष सहजच नाहीसे होतील,  पार्था ! आणखी एक गोष्ट ऐक.अंतकरणातुन राग-व्देष नाहीसे झाले, तर शास्त्रशुध्द मार्गाने इंद्रिये विषयात जरी रममाण झाली, तर ते बाधक होत नाही. ज्याप्रमाणे आकाशात असलेला सुर्य हा आपल्या किरणरुपी हातांनी जगातील विविध वस्तुना स्पर्श करीत असतो, परंतु त्या वस्तूच्या संगंदोषाने तो लिप्त होतो काय ? त्याप्रमाणे विविध विषयांचे ठिकाणी जो उदासीन , अनासक्त  असतो, आत्मानंदात रंगुन गेलेला असतो, जो काम-क्रोधाचा त्याग करुन जगत असतो, ज्याला सर्व विषयांत आत्मस्वरुपाशिवाय दुसरे काही दिसत नाही,

            त्याला विषय कोणते, कोणाला, आणि कशी बाधा करतील ? जर जल जलामध्ये बुडाले किवां अग्नीच्या ज्वालेने अग्नी पोळला गेला, तसेच आत्मज्ञानाने परिपुर्ण असलेला पुरूष असा जो विश्वचैतन्याशी एकरूप होउन राहतो, त्याची प्रज्ञा स्थिर आहे. (असे तु निश्चीत जाण ) ज्याच्या चित्तात अखंड प्रसन्नता भरलेली आहे. तेथे कोणत्याही प्रकारचे संसारदु:ख प्रवेश करु शकत नाही. ज्याच्या उदरात अमृताचा झरा उगम पावलेला असतो, त्याला कधीही भूक-तहान लागण्याची भीती नसते, त्याप्रमाणे ज्याचे हदय परिपूर्ण प्रसन्न झाले आहे, तेथे दु:ख कसे व कोणाला होणार ? तेथे बुध्दी परमेश्वराच्या स्वरुपाशी आपोआप स्थिर झालेली असते. (ओवी ३३१ ते ३४०)

            ज्याप्रमाणे निवाऱ्याच्या ठिकाणी असलेली ज्योत मुळीच हालत नाही. त्याप्रमाणे स्थिरबुध्दी पुरूष सतस्वरुपाशी एकरुप होउन राहिलेला असतो.आपल्या सतस्वरुपाशी एकरुप होण्याचा विचार त्याचे हदयात नाही, त्याला शब्दादिक विषय आपल्या पाशाने जखडुन टाकतात. हे अर्जुना ! स्थिरतेची इच्छा ज्याच्या मनात कधी उत्पन्न होत नाही, त्याची बुध्दी कधी स्थिर नसते.ज्या स्थिरपणाचा थोडा खील भाव ज्याच्या हदयात निर्माण होत नाही. त्याला शांती कशी बरे लाभेल ? ज्याप्रमाणे पापी माणसाकडे मोक्ष चुकून देखील पाहात नाही. त्याप्रमाणे ज्याच्या हदयामध्ये शांती नाही. तेथे सुख मुळीच प्रवेश करत नाही, असे पाहा की , विस्तवावर घातलेली, भाजलेली बी जर उगवली, तरच हदयात शांती नसलेल्या मनुष्याला सुखाची प्राप्ती होउ शकेल.

           म्हणून मन सर्वत्र धावते, हेच दु:खाचे कारण‍ आहे,याकरता इंद्रियाचा दृढ निग्रह करणे आवश्यक आहे.इंद्रिये जे जे म्हणतात तेच ते पुरूष करत असतात,आपण विषयरुपी सागरातुन तरलो आहोत,असे त्यांना वाटते,पंरतु ते खरोखर तरत नाहीत.जर एखादी नाव तीराजवळ आली,आणि जर प्रचंड वादळ उत्पन्न झाले, तर चुकवून आलेल्या अपायात ती पुन्हा सापडते, त्याप्रमाणे  पारमार्थिक पुरूषाने जर इंद्रियाचे लाड केले तर तो संसारचक्राच्या दु:खात पुन्हा सापडला जातो असे समज.(ओवी ३४१ ते ३५०) म्हणून हे धनंजया ! आपली इंद्रिये आपल्या स्वाधीन झाली, तर यापेक्षा जीवनाचे अधिक सार्थक ते काय आहे ? असे पाहा की, ज्याप्रमाणे कासव प्रसन्न असताना आपले अवयव पसरत असले किवां मनात आले, तर अवयव आवरुन घेत असते, त्याप्रमाणे ज्याची इंद्रिये ताब्यामध्ये असतात आणि जो बोलेल त्याप्रमाणेच वागतो, त्याची बुध्दी स्थिर झाली असे समज,हे अर्जुना ! स्थितप्रज्ञाचे आणखी एक गहन लक्षण्‍ तुला सांगतो, तरी ते  श्रवण करावे.

            सर्व प्राणिमात्र आत्मज्ञानाविषयी अज्ञानाने झोपी गेलेले असतात, मात्र त्याविषयी ज्याच्या हदयात ज्ञानाचा सुर्य उजाडलेला असतो आणि सर्व प्राणिमात्र ज्या विषयभोगाच्या कर्मामध्ये जागे असतात, त्याविषयी आत्मज्ञानी झोपी गेलेला असतो.हे अर्जुना अशा प्रकारच्या आत्मज्ञानी पुरूषाला कोणत्याही प्रकारची उपाधी नसते, तो स्थितप्रज्ञ असतो, तो मुनीश्वर विश्वचैतन्याशी एकरूप झालेला असतो. पार्था ! आणखी एका प्रकाराने स्थितप्रज्ञ मनुष्याला ओळखता येईल, ते कसं, ते ऐक. जशी सागरामध्ये अखंड शांतता असते, जरी सर्व नद्यांचे ओघ परिपूर्ण पणे समुद्रात येउन मिसळत असतात, तरी तो थोडादेखील मोठा होत नाही, आणि आपली मर्यादा सोडत नाही, किवां उन्हाळयामध्ये सर्व नद्या आटून जातात, तरीपण,

           हे अर्जुना,तो सागर कमी होत नसतो, त्याप्रमाणे स्थितप्रज्ञ पुरूषाला ऋध्दी-सिध्दी प्राप्त झाली, तरी त्याला हर्ष होत नाही आणि  ऋध्दी-सिध्दी प्राप्ती झाली नाही तरी त्याला विषाद होत नाही आणि त्याचे धैर्य कमी होत नाही,         (ओवी ३५१ ते ३६०) सांग बरं, सुर्याच्या घरी दिवा लावला, तर प्रकाश असतो आणि दिवा नाही लावला, तर तो अंधारात कोडंला जातो काय ?त्याप्रमाणे स्थितप्रज्ञ पुरूषाच्या घरी  ऋध्दी-सिध्दी आल्या किवां गेल्या, तरी त्याला त्याचे स्माण सुध्दा नसते, कारण तो आतील आनंद स्वस्वरुपात रंगून गेलेला असतो, जो आपल्या ऐश्वर्यापुढे इंद्रभुवनाला देखील कमी मानतो, तो भिल्लाच्या पालांच्या झोपडीत कसा बरे रमुन जाईल ? जो अमृताला नावे ठेवितो , तो ज्याप्रमाणे भातावरची पेज पीत नाही, त्याप्रमाणे जो स्वस्वरुपाचा अनुभव घेत असतो, तो  ऋध्दी-सिध्दीच्यां भोगांमागे लागत नाही, अर्जुना ! असे हे आश्चर्य बघ , जेथे स्वर्गसुखाची पर्वा नाही, तेथे सामान्य  ऋध्दी-सिध्दीची काय कथा असणार ? असा जो आत्मबोधाने संतोष पावलेला आणि परमानंदाने पुष्ट झालेला आहे, तोच खरा स्थितप्रज्ञ झाला आहे, हेतू जाण.

             तो स्थितप्रज्ञ दृढपणाने अहंकाराला दुर करुन , मनातील सर्व कामनांचा त्याग करुन विश्वचैतन्याशी एकरुप होउन विश्वामध्ये संचार करीत असतो. अशा प्रकारची ब्रम्हस्थिती अकर्याद आह्रे, जे निष्काम पुरूष या स्थितीचा अनुभव घेतात, ते अनायासे परब्रम्हाशी एकरूप होतात, चिद्रुपता प्राप्त होत असताना देहांताच्या वेळी होणारी व्याकुळता स्थितप्रज्ञाच्या चित्ताच्या आड येउ शकत नाही.तीच ही ब्रम्हस्वरुपाशी एकरुप होण्याची स्थिती श्रीकृष्णाने स्वमुखाने अर्जुनाला सांगितली, असे संजय धृतराष्ट्रास म्हणाला,अशा प्रकारचा श्रीकृष्णाचा उपदेश ऐकुन अर्जुन मनात म्हणाला, आता या ज्ञानामुळे आमचे युध्द न करण्याविषयाचे मतास आधारच मिळाला, कारण देवाने सर्व कर्माचा निषेध केला आहे, तर मग युध्दाचे कर्म मी करावे, हे सहजच थांबले , श्रीकृष्णाच्या अशा उपदेशामुळे अर्जुनाचे चित्त प्रसन्न झाले .

            आता त्याची शंका तो उत्तम प्रश्नाच्या द्वारे प्रगट करील, तो प्रसंग अतिशय सुंदर असा आहे, जणु काही तो सर्व धर्माचे आगरच असू विवेक अमृताचा अमर्याद असा सागरच आह्रे. त्या सुखसंवादाचे निरुपण सर्वज्ञांचा सर्वश्रेष्ठ राजा श्रीअनंत श्रीकृष्ण स्वत: करतील. ती ज्ञानकथा मी निवृत्तीदास ज्ञानदेव सांगेन. (ओवी ३६१ ते ३७५)

सर्वश्रेष्ठ ग्रंथराज सार्थ ज्ञानेश्वरी दुसरा-अध्याय भगवंताच्या कृपेने संपन्न ! (भगवतगीता श्लोक ते ७२ आणि मराठीत भाषातंरीत ज्ञानेश्वरी ओव्या ते ३७५ )