मग नाना प्रकारचे हेतु मनामध्ये धरून आपण मानलेल्या विविध देवदेवतांची योग्य उपचारांनी उपासना करतात. त्या उपासकांच्या अंतकरणात ज्या फळाची अपेक्षा असते, ती फळे त्यांना प्राप्त होतात परंतु ही त्यांनी केलेल्या कर्माची फळे आहेत कर्मा पासुनच फलप्राप्ती होते शेतामध्ये आपण जे पेरतो तेच उगवते त्याशिवाय दुसरे काही उगवत नाही अथवा आरशात जे पाहावे ते आरशाच्या उपाधीमुळेच दिसत असते पर्वताच्या कडयाच्या तळाशी आपण जे मोठयाने बोलतो तेव्हा त्या कडयाच्याच निमित्तमात्राने बोलण्याचा प्रतिध्वनी निर्माण होत असतो.त्याचप्रमाणे हे अर्जुना! मी सर्व उपासकांचा साक्षी आहे येथे प्रत्येकाच्या भावने प्रमाणे ज्याला-त्याला फळाची प्राप्ती होत असते.आता याप्रमाणे तु जाण की, जे चार वर्ण आहेत ते गुण व कर्म यांच्या विभागाने मी निर्माण केले आहेत चारही कर्माची आपआपल्या प्रकृती धर्माने आणि गुणांच्या तारतम्याने योजना केली आहे. हे अर्जुना! हे सर्व लोक वस्तुता एकच असुन गुण आणि कर्म यांच्या योगाने चार वर्णाची व्यवस्था सहजच झाली आहे. म्हणून हे अर्जुना! ऐक ही वर्णभेदाची व्यवस्था अशा प्रकारची असल्यामुळे त्याचा कर्ता मुळीच नाही.(ओवी ७१ते ८०)
हे व्यवस्थापन माझ्यापासुन झाले आहे परंतु मी केलेले नाही हे तत्वता जो जाणतो तो कर्मबंधना पासुन मुक्त होतो. हे अर्जुना! पूर्वीच्या काळी जे मुमुक्षू होते, त्यांनी मी अकर्ता आहे. हे जाणले आणि त्यानुसार सर्व कर्म केली. ज्याप्रमाणे भाजलेली बी पेरली असता मुळीच उगवत नाही त्याप्रमाणे त्यांची निष्कात कर्मे त्यांना मोक्षप्राप्ती साठी उपयोगी पडली नाहीत. हे अर्जुना! आणखीन एक गोष्ट अशी आहे की हा कर्मा अकर्माचा विचार विद्वान मनुष्याने देखील आपल्या इच्छेप्रमाणे करणे योग्य नाही. कर्म ज्याला म्हणतात ते कोणते? अथवा अकर्माचे लक्षण काय? असा विचार करीत असताना विद्वान लोक देखील भ्रमामध्ये गुंतून गेले ज्याप्रमाणे खोटे नाणे हे खऱ्या नाण्या सारखे भासत असल्यामुळे संशय निर्माण होतो वस्तुता डोळयाला होणारे ज्ञान प्रत्यक्ष यथार्थ असते तरीपण ते संशय निर्माण करते. त्याप्रमाणे फक्त मनाच्या संकल्पाने प्रतिसृष्टी निर्माण करण्याचे सामर्थ्य अंगी असलेले महापुरूष देखील आम्ही कर्मातीत झालो आहोत अशा भ्रमाने युक्त होउन बरोबर कर्माच्या पाशामध्ये सापडले जातात.कर्माअकर्मा विषयी क्रांतदर्शी मोठ मोठे विद्वान देखील मोह पावले आहेत तर मग जे मूळचेच अज्ञानी आहेत त्यांची काय कथा?म्हणूनच मी तुला आता तोच विषय सांगतो तरी त्याचे श्रवण कर. ज्याच्या योगाने विश्वाचा आकार निर्माण होतो त्याला कर्म म्हणतात या ठिकाणी त्याचेच प्रारंभी यथार्थ ज्ञान प्राप्त करुन घेतले पाहिजे मग वर्ण व आश्रम यांना जे कर्म विशेष म्हणुन सांगितलेले आहे ते देखील उपयुक्ततेसह निश्चीतपणे जाणून घ्यावे.(ओवी ८१ते ९०)
नंतर ज्याला निषिध्द कर्म म्हणतात त्याचेही यथार्थ स्वरुप समजून घ्यावे. याप्रमाणे कर्माचे स्वरूप जाणुन घेतले म्हणजे माणूस कर्माने बध्द होत नाही. येऱ्हवी हे संपूर्ण जग कर्माच्या अधीन आहे असा कर्माचा विस्तार दुर्बोध आहे पण हे असू दे. आता ब्रम्हज्ञानी पुरूषाची लक्षणे सांगतो ती ऐक. सर्व कर्म करीत असताना आपण कर्मे करीत नाही हे जो जाणतो आणि कर्माच्या फळाची अपेक्षा धरत नाही. आपल्या खेरीज कर्तव्य करण्याला जगात दुसरेपणाने काहीच नाही अशा प्रकारच्या नैष्कर्म्यतेचा खरा बोध ज्याला झालेला असतो. तरी तो उत्कृष्टपणे कर्माचे आचरण करीत असताना दिसतो तोच या लक्षणाने ज्ञानी आहे असे जाणावे जसे एखादा मनुष्य जलाशया जवळ उभा राहिलेला असतो तेव्हा तो स्वताचे प्रतिबिंब पाण्यामध्ये पाहतो तरी पण मी त्या प्रतिबिंबा पेक्षा वेगळा आहे असे तो निश्चितपणे जाणतो. अथवा नावेत बसुन मनुष्य जात असतो त्यावेळी त्याला नदीच्या तीरावरील झाडे जलद गतीने चालली आहेत असे दिसते पण खरी वस्तुस्थिती तो ज्या वेळी पाहतो त्यावेळी ती झाडे स्थिर आहेत असे तो म्हणतो त्या प्रमाणे आपले सर्व कर्मात असणे हे निश्चीतच मिथ्या आहे असे आतुन आपले मुळचे स्वरुप कर्मातीत आहे असे तो जाणतो सूर्याचा उदय होतो आणि अस्त होतो त्यामुळे तो फिरत असतो असे भासते परंतु वास्तविक तो स्थिर असतो फिरत नाही. त्याप्रमाणे कर्म करीत असताना ते कर्म आपण करीत नाही असे जो जाणतो तो आपले नैष्कर्म्य जाणतो तो वरून मनुष्या सारखा दिसतो परंतु आतुन परब्रम्हयाशी एकरुप झालेला असतो ज्याप्रमाणे सूर्याचे प्रतिबिंब पाण्यात पडले तरी सूर्य पाण्यात बुडत नाही.( ओवी ९१ ते १०० )
त्याने चर्मचक्षूने विश्व पाहिले नसले तरी दिव्य चक्षुने तो सर्व काही पाहत असतो तो काही न करताही सर्व कर्मे केल्या प्रमाणे आहे आणि भोग्य वस्तुंचा उपभोग न घेतासुध्दा त्याने भोगल्याप्रमाणेच आहेत तो एके ठिकाणी बसला तरी आतुन सर्वत्र संचार करीत असतो त्याच्याबद्दल आणखीन काय सांगावे? तो संपूर्ण विश्वचैतन्याशी एकरूप झालेला असतो. ज्या पुरूषाच्या मनामध्ये कर्म करण्या सबंधी कोणत्याही प्रकारचा खेद नसतो अतिशय तत्परतेने तो कर्म करीत असतो परंतु त्याच्या मनामध्ये फळांची इच्छा थोडी देखील निर्माण होत नाही आणि हे कर्म मी करीन अथवा आरंभिलेले कर्म सिध्दीस नेईन या संकल्पनेने देखील ज्याचे मन विटाळले जात नाही. ज्ञानरूपी अग्नीच्या द्वारा ज्याने सर्व कर्मे जाळुन टाकली आहेत तो मनुष्यवेषा मध्ये असला तरी तो परब्रम्हरूप आहे हे तू जाण. ज्याच्या मनामध्ये आपल्या शरीराबद्दल अहंकार नसतो फळाच्या प्राप्ती विषयी जो निरिच्छ असतो आणि सतचित आनंद रूप होवुन राहीलेला असतो. हे अर्जुना! जो संतोषाच्या गाभाऱ्यात बसून ब्रम्हरसाचे भोजन करीत असताना पुरे असे कधीच म्हणत नाही. तो अहंकाराला सुध्दा आशेची ओवाळणी करतो आणि ब्रम्हानंदाची गोडी अधिक प्रमाणात चाखत असतो.म्हणून ज्या वेळीस जे जे काही प्राप्त होईल त्यातच तो सुख मानत असतो त्याच्या मनात हा परका व हा आपला अशा प्रकारचा कोणताही भेदभाव नसतो तो डोळयांनी जे जे पाहतो ते दृश्य आपण स्वता होउन जातो तो कानांनी जे ऐकतो, तो शब्द तोच झालेला असतो. ( ओवी १०१ ते ११० )
तो पायांनी चालत असतो तोंडाने बोलत असतो आणि शरीराने जे जे कर्म करत असतो ते सर्व आपणच बनतो. संपुर्ण विश्व ज्याला आपल्या स्वरूपावाचुन वेगळे दिसत नाही त्याला कोणत्या कर्मापासुन कसली बाधा होणार ? मी आणि विश्व वेगळे मानले तर द्वैत निर्माण होत असते आणि मत्सर प्रगट होतो. ज्याच्या हदयात द्वैतच नाही. तो पुरूष निर्मत्सर आहे असे शब्दाने बोलुन दाखवण्याची आवश्यकता आहे काय ? तो बाहयता कर्म करीत असला तरी आतुन कर्मरहित असतो तो देहाने सगुण असला तरी ब्रम्हरूपाने गुणातीत असतो. अशा प्रकारे तो पुर्णता मुक्त असतो यात शंका नाही. तो देहधारी असला तरी चैतन्यरुप दिसतो. परब्रम्हाच्या कसोटीने त्याला जाणून घेतले तर तो अगदी शुध्द दिसतो.असे असुनही त्याने जर कौतुकाने कर्मे केली तरीपण ती कर्मे केली तरीपण ती कर्मे त्याच्या ब्रम्हस्वरुपा मध्ये लीन होउन जातात. आकाशात अकाली आलेले मेघ वृष्टी केल्यावाचुन आपोआप जसे विरून जातात त्याप्रमाणे तो शास्त्रशुध्द कर्मे यथाविधी करीत असला तरी त्याच्या हदयातील ऐक्य भावनेमुळे ती कर्मे ऐक्यालाच प्राप्त होतात. ही हवनक्रिया आहे मी हवन करणारा आहे तसेच या यज्ञामध्ये ईश्वर हा भोक्ता आहे अशा प्रकारे कोणत्याही प्रकारचा भेद ब्रम्हज्ञानी पुरूषाच्या ठिकाणी नसतो म्हणून जे जे इष्ट यज्ञ करतो. त्यातील होमद्रव्ये व मंत्र इत्यादी सर्व ब्रम्हस्वरूप आहेत असे तो समजतो. (ओवी १११ ते १२० )
म्हणून ब्रम्ह तेच कर्म अशी समत्वबुध्दी ज्याच्या अंतकरणात स्थिर झाली त्याने कर्म केले तरी ते नैष्कर्म्य होय ज्याचे अविवेकरूपी बालपण संपून गेले आणि विवेकरूपी तारुण्याचे वैभव ज्याला प्राप्त झाले ज्याचे विरक्तीरूपी वधूशी लग्न झाले आणि ज्याने योगरूप अग्नीची उपासना सुरू केली.ते रात्रंदिवस ज्ञानयज्ञ करणारे आत्मज्ञानी लोक आहेत आणि त्यांनी गुरूबोधरूपी अग्नीत मनासह अज्ञानाचे हवन केले आहे.अशा प्रकारे अग्नीमध्ये जे हवन करतात त्याला दैवयज्ञ असे म्हणतात. हे अर्जुना ! त्या दैवयज्ञाने आत्मसुख प्राप्त होते देहाचे पालन हे प्रारब्धाप्रमाणे होत असते असा ज्याचा दृढनिश्चय असतो तो देहाच्या पोषणाकरता मनात चिंता करत नाही. तो दैवयोगाने महायोगी आहे असे तु जाण.आता ब्रम्हाग्नीचे अग्नीहोत्री स्वकर्माने ईश्वराची आराधना करतात ते यज्ञातच यज्ञाला पहातात. धारणा, ध्यान, समाधीरुप संयम हे अग्नीहोत्र , त्याचे आचरण करणारे कित्येक मूलबंधदिक तीन बंधरूपी मंत्राच्या द्वारे इंद्रियरूपी पवित्र अशा द्रव्यांनी यज्ञ करतात. दुसरे कित्येक वैराग्यरूपी सुर्यराज उदय पावल्याबरोबर संयमरूपी कुंडाची रचना करतात. मग त्या कूंडामध्ये इंद्रियरुपी अग्नी प्रकट होतो. त्या इंद्रिय-अग्नीच्या पाच कुंडातुन आशारूपी धुर निघुन गेलेला असतो . मग वेदातं सांगितलेल्या विधीच्या पध्दतीने इंद्रियरुप अग्नी असलेल्या कुंडात विषयरुप आहुती देउन ते यज्ञ करतात.( ओवी १२१ ते १३० )
हे अर्जुना ! अनेक साधकांनी विविध प्रकारचे यज्ञ करून आपल्या चित्तातील दोष नाहीसे केले आहेत दुसरे कोणी हदयाची अरणी करून विवेकाचा मंथा करतात. तो धैर्यरूपी भाराने दाबून शांतिरूप रवीने घुसळून गुरूवाक्यरुपी मंत्राने मंथन करतात.समरसतेने मंथन केले असता त्याचा त्वरीत उपयोग होतो आणि ज्ञानाग्नी प्रगट होतो.त्यावेळी ऋध्दि सिध्दिचा मोह हाच उत्पन्न झालेला धुर नाहीसा होउन जातो मग सुक्ष्म अशी अग्नीची ठिणगीउत्पन्न होते.यम-नियमाच्या अभ्यासाने वाळुन हलके असे झालेले मन,त्या ज्ञानरुपी अग्नीला पेटवण घालतात. त्याच्या आधारे ज्वाला प्रज्वलित होतात, मग त्यामध्ये विविध प्रकारच्या वासनारूपी समिंधा मोहरूपी तुपासह जाळतात.यज्ञ करणारा पुरूष ” मी ब्रम्हरूप आहे ” या मंत्राने त्या प्रदीप्त अशा ज्ञानाग्नीत इंद्रियकर्ताच्या आहूती देतो. प्राणाच्या श्वासादी क्रियारूपी स्त्रुवापात्रासह ज्ञानाग्नीत पूर्णाहुती पडली असता सहजपणे निर्बीज अशा समाधीच्या ऐक्यामध्ये त्या यज्ञकर्त्या पुरूषाचे अवभूत स्नान झालेले असते. संयम-अग्नीमध्ये होमद्रव्याचे हवन करून शिल्लक राहिलेले जे आत्मज्ञानाचे सुख, तोच पुरोडाश मग ते सेवन करतात. अशा प्रकारचा यज्ञ करून अनेक लोक या त्रिभुवनात मुक्त झाले आहेत. या पुरूषाच्या यज्ञक्रिया जरी भिन्न-भिन्न असल्या तरीपण त्या सर्वाचे प्राप्तव्य एकच आहे. (ओवी १३१ ते १४०)
त्यापैकी एकाला ‘द्रव्ययज्ञ’ म्हणतात, एकाला तपोयज्ञ म्हणतात आणि अष्टांग साधनाने साधलेल्या यज्ञाला ‘योगयज्ञ’ म्हणतात. ज्यामध्ये शब्दाने शब्दांचा होम केला जातो अर्थात विधीप्रमाणे वेदांचे अध्ययन केले जाते त्याला ‘वाग्यज्ञ’ म्हणतात आणि ज्या यज्ञात ज्ञानाने ब्रम्हाशी एकरूपता प्राप्त होते त्याला ‘ज्ञानयज्ञ’ म्हणतात. हे अर्जुना ! हे सर्व यज्ञ करणे अतिशय कठीण आहे कारण यांचे अनुष्ठान करणे अतिशय अवघड आहे. परंतु ज्यांनी आपली इंद्रिये जिंकली आहेत त्यांना मात्र ते करण्याची योग्यता प्रांपत होते आणि त्याचे आचरण घडते. ज्यांनी इंद्रिये जिंकली आहेत ते यज्ञकर्मामध्ये प्रवीण असतात आणि साधनसमृध्दीने संपन्न असतात म्हणून त्यांनी आपल्या जीवाचे आत्म्याच्या ठिकाणी हवन केलेले असते. कित्येक योगी अभ्यासाने अपानवायूरूप अग्नीच्या मुखात प्राणरूप द्रव्याचे हवन करतात म्हणजे ‘पूरक’ नावाचा प्राणायाम करतात. हे अर्जुना ! काही साधक प्राणचायूच्या ठिकाणी शरीरात असलेल्या अपानवायूला बाहेर सोडून हवन करतात त्याला रेचक म्हणतात कित्येक योगी प्राण आणि अपान या दोघांच्याही गतीचा निरोध करतात. त्यांना ‘प्राणायामी’ म्हणतात. कित्येक योगी वज्रासनाच्या हइयोगाच्या क्रमाने आहाराचा संयम करतात आणि प्रयत्नाने प्राणाचे प्राणाच्या ठिकाणी हवन करतात याप्रमाणे हे सर्व यज्ञ करणारे मोक्षाची इच्छा करतात, यज्ञ करणे हा त्यांचा स्वभाव आहे, त्यांनी यज्ञाच्या आधारे मनातील सर्व प्रकारचे दोष घालविलेले असतात.त्यांनी सर्व प्रकारचे अज्ञान नाहीसे केल्यामुळे स्वाभाविकपणेच मूळचे शुध्द स्वरूप शिल्लक राहते तेथे अग्नी व यज्ञकर्ता हा कोणत्याही प्रकारचा द्वैतभाव शिल्लक राहत नाही.ज्या ठिकाणी यज्ञ करण्याची इच्छा पुर्ण होते आणि यज्ञक्रिया संपून जातात आणि जेथून क्रिया या मागे परतून ओसरून जातात. (ओवी १४१ ते १५० )