अध्याय-६-भाग-६

           हे अर्जुना ! हा योगाचा अभ्यास कष्टदायक आहे असे जर तुझ्या मनाला वाटत असेल तर ही दुर्जन इंद्रिये याविषयी उगीचच त्याचा बाउ करतात. असे पाहा की, जे आयुष्य स्थिर करते संपत आलेल्या जिविताला मागे आणते, ते औषध जीभ शत्रु समजत नाही का? त्याप्रमाणे आपल्या पारमार्थिक हितासाठी जे जे काही चांगले ते नेहमीच इंद्रियांना दुखकारक वाटत असते. एरवी योगासारखे सुलभ साधन कोणते आहे का ? म्हणुन आसनांच्या बळकटपणापासुन समाधी पर्यत जो अभ्यास तो उत्तम प्रकारे आम्ही तुला सांगितला आहे, त्याने त्या इंद्रियांचा निग्रह होईल. एरवी हया योगाच्या साधनेने ज्यावेळी इंद्रियांचा निग्रह होतो त्या वेळी चित्त आपल्या मूळ आत्मस्वरुपाच्या भेटीला निघते, ज्या वेळी चित्त विषयांपासून परावृत्त होते आणि अंतर्मुख होउन स्थिर पावते त्या वेळी त्या स्व-स्वरुपाची ओळख होते हे आत्मतत्व मी आहे असा ते अनुभव घेते.

        हया आत्मतत्वाची ओळख होताच ते चित्त सुखाच्या साम्राज्यावर बसते आणि आत्म्याशी एकरूप झाल्यामुळे चित्तांचा चित्तपणा नाहीसा होतो. त्याच्यापेक्षा श्रेष्ठ दुसरे काही नाही, ज्याला इंद्रिये जाणत नाहीत असे जे परब्रम्ह ते स्वताच आपल्या ठिकाणी होउन राहते. अशी अवस्था प्राप्त झाल्यावर मेरुपर्वतापेक्षाही मोठया दुखाच्या भाराने देह दडपला असतादेखील त्याच्या चित्ताला मात्र दुख होत नाही, किवां त्याचा देह शस्त्राने तोडला अथवा अग्नीमध्ये पडला, तरी आनंदस्वरुपाशी एकरूप झालेले त्याचे चित्त देहबोधावर येत नाही. (ओवी ३६१ ते ३७०)  अशा प्रकारे आत्मस्वरुपात निमग्न झाल्यावर तो देहाची आठवण विसरतो , ब्रम्हानंद त्याच्या चित्ताचे स्वरुप  होवुन गेलेले असते, म्हणुन तो देहाला विसरतो, जे मन पुर्वी संसाराच्या तोंडात अडकलेले असते ते मन आता समाधीत आत्मानंद अनुभवते, त्यामुळे विषयवासनेची आठवणदेखील निर्माण होत नाही, जे सुख योगाची  शोभा आहे , संतोषाचे केवळ हाज्य आहे. ज्या सुखासाठी आत्मज्ञानाचा अनुभव घ्यावा लागतो. ते सुख योगाचा अभ्यास केल्याने मुर्तिमंत दिसु लागते आणि पाहणारा आपण स्वता सुखरुप होउ शकतो.तथापि हे अर्जुना ! एका प्रमाराने तो योग सोपा आहे संकल्पाचे पुत्र काम,क्रोध, लोभ, वगैरे आहेत त्यांचा नाश केल्यामुळे त संकल्पाला जेव्हा पुत्रशोक होईल तेव्हा तो योग साध्य होतो.

         जर संकल्प पाच विषय पुर्णपणे नाहीसे झाल्याचे ऐकेल आणि इंद्रिये अत्यंत नियमितपणाने वागतात असे पाहील, त्या दुखाने हा संकल्प उर फुटून प्राणास मुकेल, हे सर्व प्रकार वैराग्य जर करेल तर मनात निर्माण होणाऱ्या संकल्पांची येरझारा बंद होउन जाईल व सात्विक बुध्दी धैर्याच्या मंदिरात सुखाने नांदेल. बुध्दीला जर धैर्याचा आश्रय मिळाला तर ती मनाला हळुहळू अनुभवाच्या वाटेने आत्मस्वरुपी स्थिर करते , याही पध्दतीने परब्रम्हप्राप्ती होउ शकते ,याचा  तु विचार कर. आणि हे साधन तुला करता येणे शक्य नसेल तर आणखी एक सोपी अशी युक्ती सांगतो. आता हा एकटा निग्रह जीवेभावे आपलासा करावा ज्यायोगे ते चित्त निग्रहासाठी केलेल्या निश्चयरुपी शब्दाच्या बाहेर थोडेदेखील जाणार नाही. (ओवी ३७१ ते ३८०)

        जर एवढयाने चित्त स्थिर झाले तर आपोआपच कार्य सफल झाले असे मानावे, परंतु एवढया निग्रहाच्या निश्चयाने चित्त स्थिर झाले नाही, तर त्याला स्वैर सोडून द्यावे. मग स्वैर सोडलेले चित्त ज्या विषयाकडे जाईल तेथून नियमच त्याला परत घेवुन येईल, अशा प्रकारे चित्ताला अनेक वेळा ओढुन आणल्यावर ते आपोआप स्थिर होईल. नंतर अशा प्रकारे चित्त अनेक वेळेला स्थिर राहिल्यामुळे ते सहजच आत्मस्वरूपाजवळ येईल. आणि चित्ताने आत्मस्वरुपाला पाहिल्यावर ते चित्त आत्मस्वरूपाशी एकरूप होईल. या अलौकिक अवस्थेत अद्वैतामध्ये द्वैत बुडून जाईल आणि अवघे त्रैलोक्य ऐक्याच्या तेजाने उजळुन जाईल. आकाशामध्ये निर्माण झालेली अभ्रे ज्या वेळी वाऱ्याने नाहीशी होतात त्या वेळी सर्वत्र शुध्द आकाशच दिसते. त्याप्रमाणे आत्मस्वरुपामध्ये चित्त लय पावले की संपुर्ण विश्व चैतन्यमय होते या सुखमय उपायाने ब्रम्हप्राप्ती होते, मनातील संकल्प-विकल्पांचा त्याग करून अशा या योगमार्गाने अनेकांनी आत्मप्राप्तीचे रहस्य जाणले आहे.

           मीठ पाण्यात विरघळून गेल्यावर ते जसे पाण्याला सोडू शकत नाही, त्याप्रमाणे ते साधक सुखाच्या संगतीने परब्रम्हपदास येवुन मिळाले, त्याप्रमाणे जिवा-शिवाचे मिलन झाल्यावर त्याची स्थिती होते, मग समरसतेच्या मंदिरात संपूर्ण जगासह त्याला महासुखाची दिव्यप्रकाशी दिवाळी दिसते,या प्रमाणे आपलेच पाय आपल्या पाठीवर घेवुन योगी चालत असतो, असा अवघड योगमार्ग तुला साध्य करता येत नसेल तर अर्जुना, तुला आणखी एक उपाय सांगतो तो ऐक. (ओवी ३८१ ते ३९०) मी सर्वाच्या देहांत आहे यात काही शंका नाही , त्याचप्रमाणे माझ्या ठिकाणी हे सर्व आहे, हे असेच बनलेले आहे आणि परस्परांत मिसळलेले आहे, परंतु साधकाने आपल्या बुध्दीचा दृढनिश्चय करावा, अर्जुना ! एरवी तरी जो पुरूष ऐक्यभावाने सर्व भूतमात्रामध्ये सम प्रमाणात असलेल्या मला जाणुन भजतो, भूतमात्रांच्या भेदाने ज्याच्या अतंकरणात कोणत्याही प्रकारचे द्वैत उत्पन्न होत नाही  आणि जो सर्व ठिकाणी केवळ माझे एकत्वच जाणतो, हे अर्जुना ! मग तो माझ्याशी एकरुप आहे हे बोलणे देखील व्यर्थ आहे, कारण असे जरी बोलले नाही तरी तो मीच आहे दिवा आणि प्रकाश यांच्यामध्ये जशी एकाच प्रकारची योग्यता आहे ‍त्याप्रमाणे तो माझे ठिकाणी आणि मी त्याचे ठिकाणी ऐक्य भावाने आहोत, ज्याप्रमाणे पाण्याच्या अस्तित्वाने रसाला अस्तित्व असते अथवा आकाशाच्या अस्तित्वाने पोकळीला अस्तित्व असते, त्याप्रमाणे योगी पुरूष सच्चिदानंदरुपाने सच्चिदानंद झालेला असतो, अर्जुना ! ज्याप्रमाणे  वस्त्रामध्ये केवळ एकच सूतच असते त्याप्रमाणे ज्याने ऐक्याच्या भावाने सर्वत्र मलाच पाहीले आहे, ज्याप्रमाणे अलंकाराचे आकार जरी पुष्कळ असले तरी सोने हे एकच असते, त्याप्रमाणे विभिन्न आकार असले तरी अचल पर्वताप्रमाणे ज्याची ऐक्य स्थिती असते, अथवा वृक्षाची जितकी पाने असतात, तितकी रोपे लावलेली नसतात, त्याप्रमाणे अद्वैवताच्या दिवसाने द्वैताची रात्र संपुन ज्याला उजाडलेले असते.  (ओवी ३९१ ते ४००)

         तो पुरुष पंचमहाभुतात्मक शरीरामध्ये सापडला असला तरी असे सांग कि तो देहाच्या योगाने कसा बरे बध्द होईल ?  कारण अनुभवाच्या योगाने तो माझ्याशी ऐक्य पावतो, ज्याच्या अनुभवाने माझे व्यापकत्व सर्व ठिकाणी आहे असे जाणले आहे , त्याला व्यापक नाही असे म्हटले, तरी तो सहजच व्यापक झालेला असतो. आता तो पुरुष देहधारी जरी असला तरी देहाशी तादात्म नसतो, अशी स्थिती केवळ शब्दाने प्राप्त होईल असे काही करता येईल काय? म्हणुन त्याचे विशेष वर्णन राहु दे, जो आपल्या प्रमाणेच चराचराला सुख-दुखे होतात असे सदैव पाहतो, जो सुख आणि दुख यांचे विकार अथवा शुभ व अशुभ कर्मे ही दोन आहेत, असे मनाने जो जाणत नाही, हे सम विषम भाव आणि जगात जे चित्रविचित्र पदार्थ आहेत, ते जणु काही आपलेच अवयव आहेत असे जो मानतो, हे एकेक काय सांगावे? ज्याने सर्व त्रैलोक्य मीच आहे असे अनुभवाने जाणलेले असते त्याला शरीर आहे ही गोष्ट खरी आहे, तो  सुख-दुख भोगतो  असे लोकही म्हणतात, परंतु आमचा अनुभव असा आहे  कि तो परब्रम्ह आहे, म्हणुन आपल्या ठिकाणी विश्वस्वरुप पाहावे आणि आपणच अनुभवाने विश्वरुप व्हावे अशा साम्य अवस्थेची  हे अर्जुना ! तु उपासना कर, तू समदृष्टी ठेव, हे तुला अनेक प्रसंगानी आम्ही सांगत आलो आहोंत, कारण साम्या पलीकडे या जगात दुसरा लाभ नाही. (ओवी ४०१ ते ४१०)

        अर्जुन म्हणाला, हे देवा ! तुम्ही आमचे हीत व्हावे म्हणुन कळवळयाने सांगत आहात परंतु मनाच्या चंचल स्वभावापुढे आमचा टिकाव लागत नाही, हे मन कसे आहे केवढे आहे, याचा विचार करुन पाहु म्हटले तरी  ते कोठेच सापडत नाही, येऱ्हवी मनाला फिरण्याव त्रैलोक्य देखील थोकडे आहे, म्हणुन असे कसे घडेल? माकडाला कधी समाधी लागेल काय? किवां सोसाटयाचा वारा थांब म्हटल्याबरोबर थांबेंल काय? जे मन बुध्दीला छळते, बुध्दीने बुध्दीला भ्रमात पाडते, संतोषालाही विषादाची आशा निर्माण करते, मनुष्य एके ठिकाणी बसला तरी त्याला दाही दिशांना फिरवते, ज्याला आवरण्याचा प्रयत्न करु लागलो, तर  ते अधिकच उसळते आणि निग्रह केला तर ते उलट त्याला साहाय्य करते, असे हे चंचल मन आपला स्वभाव सोडेल काय?  म्हणुन हे मन निश्चल राहील आणि मग आम्हाला साम्यावस्था प्राप्त होईल, परंतु मनाची वृत्ती चंचल असल्यामुळे ती प्राप्त होणे अतिअवघड आहे. तेव्हा श्रीकृष्ण म्हणाले, तु म्हणत आहेस ते खरोखर तसेच आहे, या मनाचा स्वभाव खरोखर चंचल आहे, परंतु वैराग्याच्या आधारे मन जर अभ्यासाकडे वळविले, तर काही एक काळाने ते स्थिर होउ शकेल, कारण या मनाचा असा एक उत्तम गुण आहे की त्याला एकदा भोगलेल्या विषयांची आवड निर्माण झाली की, ते त्या ठिकाणीच राहावयास सोकावते, म्हणून कौतूकाने त्याला आत्मानंदकडेच वळवावे.  (ओवी ४११ ते ४२०)

          येऱ्हवी ज्याचे ठिकाणी वैराग्य नाही  जे कधीही अभ्यासाकडे वळत नाहीत, त्यांना मन वश होत नाही, हे आम्हालाही मान्य नाही का? परंतु यम-नियमांच्या वाटेला कधी जावयाचे नाही, वैराग्याची कधी आठवणदेखील करावयाची नाही, केवळ विषयांच्या जलात राहुन विषय सेवन करीत राहावयाचे , अशा या विषयांमध्ये रममाण झालेल्या मनाला जन्मापासुन कधीही चिमटा लागलाच नाही, तर मग ते मन निश्चल कसे होईल व का बरे होईल? हे तुच सांग, म्हणुन मनाचा निग्रह होईल असा जो उपाय आहे, त्याचा तु आरंभ कर, मग ते निश्चल कसे होत नाही, ते पाहू, मनाच्या निग्रहासाठी यम-नियमांपासुन समाधी पर्यत जी अष्‍टांग योगसाधना सांगितली आहे, ती काय खोटी आहे काय? परंतु आपल्या हातुन अभ्यास होत नाही, असे म्हण. अंगी योगाचे सामर्थ्य प्राप्त झाले,की त्यापुढे मनाची चंचलता कशी राहील? योगाच्या अभ्यासाने महत्तत्वादी संपुर्ण जग आपल्या स्वाधीन होते, त्या प्रसंगी अर्जुन म्हणाला, खरे आहे,  देव बोलतात त्यामध्ये काही चुक नाही, खरोखर योगबला पुढे मनाचे बल टिकणार नाही, परंतु तोच योग कसा आहे व कशा रीतीने जाणावा, याची वार्ता ही इतके दिवस आम्हाला नव्हती, म्हणून महाराज आम्ही म्हणत होतो की, हे मन अनावर आहे, हे पुरूषोत्तमा ! आत्तापर्यतच्या अनेक जन्मात आज मात्र आम्हाला तुझ्या कृपाप्रसादाने योगाचा परिचय झाला. परंतु महाराज, मला आणखी एक शंका सहजपणे आलेली आहे, ती दुर करण्यासाठी तुझ्यावाचुन कोणी समर्थ नाही.     (ओवी ४२१ ते ४३०)

पुढील भाग