अध्याय-७-भाग-१

ज्ञानदेवांची ज्ञानेश्वरी

सार्थ भगवदगीता अध्याय

ज्ञानविज्ञान योग

 श्री ज्ञानदेवांनी भगवदगीतेतील अध्याय मधीलज्ञानविज्ञान योगया अध्यायातील ते ३० संस्कृत श्लोकांचे इसवी सन १३ व्या शतकात तत्कालीन मराठीतुन २१० ओव्यामधुन सखोल निरूपण केले आहे खरतर हा मराठी भाषेचा अतिव गौरव आहे. परंतु कालपरान्वये बोली आणि लिखीत मराठी भाषेमध्ये फरक पडल्यामुळे ती मराठी भाषाही अवघड वाटू लागली. श्री ज्ञानदेवांच्या कृपार्शिवादाने तेच सखोल निरूपण मराठी वाचंकासाठी सोप्या मराठी भाषेत (२१व्या शतकातील प्रचलित मराठी भाषा) जसे आहे तसे देत आहेहा श्री ज्ञानदेवांचा अमुल्य  कृपाप्रसाद आहे, आपणही याचा अवश्य लाभ घेवून जीवनाचे कोटकल्याण साधावे.

          ऐका, मग ते श्री अनंत अर्जुनाला म्हणाले,तू आता योगाच्या ज्ञानाने युक्त झाला आहेस, आपल्या तळहातावर ठेवलेले रत्न ज्याप्रमाणे पुर्णपणे जाणले जाते, त्याप्रमाणे मला पुर्णपणे जाणशील, असे तुला प्रपंचज्ञानासह ब्रम्हज्ञान सांगतो. या ठिकाणी प्रापंचिक ज्ञानाशी काय करायचे आहे, अशी जर मनात शंका घेशील तर खरोखर ब्रम्हज्ञानाच्या आधी हे समजून घेतले पाहिजे कारण की  ज्या वेळी ब्रम्हज्ञान होते त्या वेळी  बुध्दीचे डोळे झाकले जातात, ज्याप्रमाणे नदीच्या तीराला नाव टेकली असता पुढे सरकत नाही, त्याप्रमाणे जेथे बुध्दीचा प्रवेश होत नाही,विचारही मागे फिरतो आणि ज्याच्या स्वरुपात तर्काचे काही चालत नाही, अर्जुना ! त्याला ब्रम्हज्ञान असे म्हणतात. त्याहुन दुसरा जो प्रपंच ते विज्ञान होय, प्रपंचाला खरे मानणे हे अज्ञान होय, हे ही तू समजून घे आता अज्ञान हे संपुर्णपणे नाहीसे होईल प्रंपच पुर्णपणे बाधित होउन जाईल आणि ब्रम्हज्ञानस्वरुप आपण स्वताच होउन जावु , ज्याच्या योगाने सांगणाऱ्याचे बोलणे खुंटते, ऐकणाऱ्याची इच्छा कमी होउन जाते आणि हे ब्रम्हज्ञान प्राप्त झाल्यावर हा लहान हा मोठा असा कोणताही भेद उरत नाही असे हे गुढ वर्म आहे ते मी शब्दांनी प्रगट करीन, त्या थोडयाशा प्रतिपादनाने मनाचे पुर्ण समाधान होईल. हजारो मनुष्यांमध्ये एखाद्यालाच‌ब्रम्हज्ञानाची इच्छा होते, तसेच या इच्छा करणाऱ्या  अनेक पुरूषामध्ये एखादाच मला तत्वत: जाणतो. ( ओवी १ ते १० )

          अर्जुना ! ज्याप्रमाणे संपुर्ण त्रैलोक्यामध्ये एक-एक पराक्रमी सैनिक निवडून लक्षावधीचे सैन्य तयार करतात. असे सैन्य निवडल्यानंतर युध्दात ज्यावेळी लोखंडाच्या शस्त्राने अंगावा प्रहान होतात, त्यावेळी एखादाच विजयलक्ष्मीच्या सिंहासनावर विराजमान होतो त्याप्रमाणेच ब्रम्हज्ञानाच्या इच्छारुपी महापुरात कोटयावधी साधक प्रवेश करतात, परंतु त्या महापुराच्या पैलतीराला एखादाच साधक पोचतो म्हणून ब्रम्हप्राप्ती ही सामान्य गोष्ट नसुन ती परमश्रेष्ठ आहे परंतु ती तुला पुढे सांगण्यात येईल. प्रस्तुत तुला विज्ञान सांगतो हे ऐक, हे धंनजया ! एकाग्रतेने ऐक. ज्याप्रमाणे आपल्या अंगाची पडछाया असते त्याप्रमाणे महदादी तत्व म्हणजे माझी माया आहे, आणि या मायेलाच प्रकृती असे म्हणतात, ती प्रकृती आठ प्रकाराने वेगवेगळी आहे या प्रकृती पासुनच संपुर्ण त्रैलोक्य उत्पन्न होते ही प्रकृती आठ प्रकारानी भिन्न कशी अशी जर तुझ्या मनामध्ये शंका आली असेल, तर त्यासंबंधीचा विचार तुला सांगतो, तो ऐक पाणी, अग्नी, आकाश, वायु, मन, बुध्दी, आणि अहंकार हे एकाच प्रकृतीचे निरनिराळे आठ भाग आहेत पार्था ! या आठाची जी साम्य अवस्था , ती माझी परम प्रकृती होय, तिलाच जीव असे नाव आहे ती जडाला सजीव करते संवेदनात्मक चेतनेला जागृत ठेवते आणि मनाला शोक-मोह मानावयास लावते.( ओवी ११ ते २० )

             असे पाहा की, हिच्या सानिध्याने बुध्दीच्या अंगी जाणण्याची शक्ती येते तिने अहंकाराच्या कुशलतेने जगत धारण केले आहे ही सुक्ष्म परा प्रकृती जेव्हा स्वताच्या इच्छेने स्थुल प्रकृतीशी संयुक्त होते तेव्हा सृष्टीतील प्राण्यांची टांकसाळ सुरू होते मग त्या प्राणिमात्रांवर अंडज, स्वेदज, जारज, उदभिज असा चार प्रकारचा ठसा आपोआप उमटु लागतो. त्यातील पंचमहाभुते सारख्याच योग्यतेची असतात परंतु त्यांचे आकार मात्र भिन्न भिन्न असतात चौऱ्यांशी लक्ष योनीचे आकार निर्माण होतात इतर अनेक नाण्यांचे आकार त्या टांकसाळीच्या भांडारात तयार होतात त्यांची गणतीच करता येत नाही. त्या सर्व प्राणिरुप नाण्यांनी अव्यक्ताचा गाभारा भरून जातो, याप्रमाणे प्रकृतीच्या टांकसाळीतुन एकाच योग्यतेची पंचमहाभुतां पासुन उत्पन्न झालेली अशी अनेक प्राणिरूप नाणी पडतात या नाण्यांचा हिशोब प्रकृतीच ठेवते कारण हि प्रकृतीच प्राणिरुपी नाण्यांचा चौऱ्यांशी लक्ष संख्येने विस्तार करते, त्यानंतर प्रलयकाळी नाण्यांची  आटणी करुन साम्य अवस्था निर्माण करते आणि मधील काळात नाण्यांना कर्माकर्माचा व्यवहार करुन दाखविते, परंतु हे रुपक असो, तुला कळेल अशा रीतीने सांगावयाचे म्हटले तर ही प्रकृतीच प्राण्यांच्या नामरुपांचा विस्तार करते, आणि ही प्रकृतीच माझ्या ठायी भासते, अर्थात जगाची उत्पत्ती,स्थिती व लय यास मीच कारण आहे, मृगजळाचे मुख्‍य कारण पाहु लागला असता असे कळुन येईल की किरणे त्या मृगजळाला कारणभुत नसुन तो सुर्यच मुख्‍य कारण आहे हे अर्जुना ! त्याप्रमाणे जेव्हा या प्रकृतीपासुन जगाची उत्पत्ती झालेली असते आणि सर्व जगत एकत्र करुन त्याचा लय केलेला असतो तेव्हा उत्पत्ती, स्थिती व लय यास मीच मुख्‍य कारण आहे.  (ओवी २१ ते ३०)

             या प्रकारे जे निर्माण होते दिसते आणि लय पावते ते माझ्यातच विलीन होते, ज्याप्रमाणे दोऱ्याने मणी धारण केलेले असतात त्याप्रमाणे मी हे विश्व धारण केले आहे, ज्याप्रमाणे सुवर्णाचे गोल मणी तयार करावेत आणि ते  सुवर्णाच्या तारेत ओवावेत, त्याप्रमाणे मी हे संपुर्ण जगत आतुन-बाहेरुन धारण केले आहे  यास्तव जलामध्ये जो रस आहे, वायुमध्ये जो स्पर्श आहे, चंद्र-सुर्यामध्ये जो प्रकाश आहे तो मीच आहे, हे जाण.त्याचप्रमाणे पृथ्वीच्या ठिकाणी जो नैसर्गिक शुध्द गंध आहे तो मीच आहे, आकाशातील शब्द आणि वेदांतील ओमकार मीच आहे, पुरूषाच्या ठिकाणी जे पुरूषत्व आहे जे मी अशा अहंकाराने व्यक्त होते ते पौरुष‍मी आहे, हे तत्व मी तुला सांगुन ठेवतो तेजाला अग्नी अशा नावाचे जे वरवर दिसणारे कवच असते ते दुर केल्यानंतर जे स्वयंसिध्द तेज असते ते मी आहे, आणि या त्रिभुवनामध्ये नाना प्रकारच्या योनीमध्ये प्राणी जन्माला येवुन आप-आपला आहार सेवन करुन राहतात, कित्येक वारा पितात, कित्येक गवतावर जगतात,  कित्येक अन्नाच्या आधाराने जगतात, कित्येक पाण्यामुळे जगतात,अशा प्रकारे प्रत्येक प्राण्याचे त्याच्या प्रकृतीच्या मानाने जे वेगवेगळे जीवन दिसते त्या सर्वामध्ये अभिन्नरुपाने मीच एक आहे.

           जे बीज सृष्टीच्या उत्पत्तीकाली आकाशाच्या अंकुराने वाढते आणि जे सृष्टीच्या लय होण्याच्या वेळी ओमकाररुपी पीठावरील अक्षरे गिळुन टाकते.         ( ओवी ३१ ते ४० ) स्थितिकालामध्ये जोपर्यत विश्वाला आकार आहे, तोपर्यत ते बीज विश्वाच्या आकारासमान दिसते मग महाप्रलयाच्या काळी फक्त बीज बसते त्या वेळी त्याला स्थुल -सुक्ष्म असा कोणत्याच प्रकारचा आकार नसतो, असे ते अनादि स्वयंसिध्द विश्वाचे बीज ते मी आहे ही गुपित गोष्ट तुझ्या तळहातावर ठेवत आहे म्हणजे तुला स्पष्टपणे सांगत आहे, मग  हे अर्जुना ! तु हे रहस्य समजुन घेउन याचा पुर्णपणे विचार करशील तर तुला याचा चांगला उपयोग दिसुन येईल परंतु आता विषयाला सोडुन असलेले माझे बोलणे राहु दे, ते मी आता बोलत नाही आता थोडक्यात सांगतो, तपस्वी लोकांतील जे तप आहे ते माझे स्वरुप आहे, बलवानातील जे बल ते निश्चीत मी आहे हे समज आणि बुध्दीवानांच्या ठिकाणी जी बुध्दी आहे तो मी आहे. ज्या योगाने धर्माची वृध्दी होते असा मनुष्याच्या ठिकाणी असणारा काम तो मी आहे असे आत्माराम श्रीकृष्ण म्हणाले, एऱ्हवी विकारांच्या मुळे इंद्रियांस अनुकूल अशी कर्मे तो काम करत असतो परंतु ती कर्मे धर्मा विरुध्द जाउ देत नाहीत कारण की जो कामशास्त्राने निषिध्द मानलेल्या कर्माची आडवाट सोडुन शास्त्रातील विहित कर्माच्या राजमार्गाने वाटचाल करतो आणि त्याच्याबरोबर नियमरुपी मशाल पेटलेली असते, अशा प्रकारे काम चालतो, म्हणुन धर्माला पोषक होतो आणि त्यामुळे प्रपंचात राहणाऱ्यास मोक्षरुपी तीर्थात मुक्ती प्राप्त होते, तो काम वेदप्रामाण्याच्या मांडवावर कर्मफलाची पाने मोक्षाला जावुन भिडतात, तोपर्यत सृष्टीचा वेळ वाढवितो. ( ओवी ४१ ते ५० )

              हे एकेक तुला किती बरे सांगावे? सर्व प्रकारच वस्तूंचे समुदाय माझ्यापासुन विस्तार पावले आहेत असे जाणावे जे काही सात्विक राजस तामस भाव आहेत ते सर्व माझ्या स्वरुपापासुन उत्पन्न झाले आहेत हे ओळखुन ठेव ते सर्व भाव माझ्या अधिष्ठानावर उत्पन्न झाले आहेत, परंतु मी त्यात नाही जसे स्वप्नाच्या डोहात जागृती  बुडत नाही, अथवा भरीव बी म्हणजे गोठलेला रसच असतो परंतु त्यापासुन अंकुर निर्माण होउन त्याचेच लाकुड बनते मग त्या लाकडाच्या ठिकाणी बी पणा काही आहे का हे सांग? त्याप्रमाणे मी विश्वाच्या रुपाने विकारलेला दिसला तरी त्या विकारात मी नाही आकाशात ढग उत्पन्न होतात परंतु त्या ढगात केवळ आकाश नसते किवां ढगामध्ये पाणी असते परंतु पाण्यात ढग नसतात, नंतर त्या पाण्याच्या घर्षणाने उत्पन्न होणारे तेज म्हणजे वीज ही लखलखीत दिसते, परंतु त्या विजेमध्ये पाणी असते काय? अग्नीपासुन धुर तयार होतो परंतु त्या धुरात अग्नी आहे काय ?  त्याप्रमाणे हे विकारी भाव जरी माझ्यापासुन उत्पन्न झाले असले तरी ते विकार म्हणजे मी नाही, परंतु पाण्यात उत्पन्न झालेले शेवाळ ज्याप्रमाणे पाण्याला झाकुन टाकते किवां ढगाने आकाश जसे खोटेच झाकले जाते. ( ओवी ५१ ते ६० )

पुढील भाग