अध्याय-७-भाग-३

           त्या वेळी गुरूकृपारुप उ‌ष:काल होतो आणि मग ज्ञानरुप सुर्याची कोवळी किरणे सर्वत्र पसरतात, त्या वेळी ज्ञानी पुरूषाला सर्वत्र ब्रम्हैक्य भावाचे विपुल ऐश्वर्य दिसु लागते, त्या वेळी तो जिकडे पाहिल तिकडे त्याला माझ्याशिवाय दुसरे काही दिसत नाही, अथवा तो निवांत जरी राहिला तरी त्याला आत्मरुपाने मीच दिसतो, हे बोलणे असो, त्याला सर्व ठिकाणी माझ्यावाचुन दुसरे काही दिसत नाही, ज्याप्रमाणे डोहात घट बुडाला असता त्या घटाच्या आत-बाहेर जल असते त्याप्रमाणे तो माझ्यामध्ये असतो आणि मी त्याच्या आत-बाहेर असतो, ही अलौकिक स्थिती शब्दांने वर्णन करता येईल अशी नाही, म्हणुन हे बोलणे असो, याप्रमाणे तो प्रत्यक्ष ज्ञानाचे भांडार आहे आणि तो जिकडे संचार करतो, तिकडे आपणच विश्वरुपाने पसरलो आहोत हे जाणवते हे संपुर्ण विश्व वासुदेवस्वरुप आहे, असा ज्याच्या भावरुपी अंत:करणपात्रा मध्ये अनुभूतीचा रस ओतला आहे तो सर्व भक्तांमध्ये राजा आहे आणि ज्ञानीही तोच आहे ज्याच्या अनुभवाच्या भावमंदिरात संपुर्ण चराचर सामावलेले असते अर्जुना ! तो महात्मा दुर्लभ आहे, ज्यांची विविध प्रकारची भजने भोगासाठी असतात आणि आशारुपी अंधकार-रोगाने ज्यांची दृष्टी मंद झालेली असते असे अनेक उपासक जगात असतात, फल प्राप्तीच्या तीव्र इच्छेमुळे ज्याच्या अंत:करणात कामविषयांने प्रवेश केला आणि त्याच्या संसर्गाने अंत:करणातील ज्ञानाचा दिवा मालवला आहे अशा प्रकारे त्यांचे आतंर बाहय जीवन अंधकारमय होते, म्हणुन मी त्यांच्या जवळ असुनही मला ते विसरतात आणि मग फलप्राप्ती साठी विविध देवी -देवताना सर्वभावाने भजू लागतात.    ( ओवी १३१ ते १४० )

                आधीच ते प्रकृतीच्या म्हणजे मायेच्या अधीन झालेले असतात आणि भोगासाठी दीन झालेले असतात मग त्या त्या लालसेने कशी उपासना करतात, हे एक कौतुकच असते, त्या उपासनेचे कोणते नियम असतात त्याची माहिती ते प्रारंभी मिळवतात नंतर त्या देवी-देवतांसाठी कोणते उपचार लागतात, त्याचे साहित्य जमा करतात मग उपचार कसे  अर्पण करावयाचे ही माहिती मिळवुन विहित क्रिया करु लागतात परंतु जो ज्या विविध देवी देवतांना भजावयाची इच्छा   करतो त्याची ती इच्छा पुरविणारा मीच आहे. सर्व देवी -देवतांत मीच भरलेला आहे परंतु अज्ञानी उपासकांना हे देखील निश्चयात्मक ज्ञान नसते म्हणुन त्या त्या देवी-देवतांच्या ठिकाणी त्यांचा निरनिराळा भाव असतो मग श्रध्देने त्या देवतेची योग्य उपासना  असते  ती उपासक फल प्राप्ती होईपर्यत करतो ज्याने ज्याची उपासना करावी ते फळ त्याला प्राप्त होते परंतु ती सर्व फळे माझ्यामुळे निर्माण होतात परंतु हे भक्त मला जाणत नाहीत कारण ते भ्रामक कल्पनेच्या चक्रातुन बाहेर पडत नाहीत म्हणुन जरी त्यांना इच्छित फळ प्राप्त होते तरी ते नाशवंत असते, किबंहुना अशा प्रकारचे हे सकाम भजन म्हणजे संसाराचे साधन असते त्याचा फलभोग म्हणजे स्वप्नातील क्षणभगुंर सुख‍होय या फळाच्या क्षणभंगुरतेचा भाग बाजुस राहु दे त्याचे जे आवडते दैवत असते त्या दैवताचे त्याने पुजन केले म्हणजे तो त्या त्या देवत्वास प्राप्त होतो दुसरे जे शरीराने मनाने प्राणाने माझी उपासना करतात ते देहाच्या नाशानंतर मीच होतात.  ( ओवी १४१ ते १५० )

            परंतु ते प्राणी ज्यायोगे माझ्याशी ऐक्य पावतील अशी उपासना करत नाहीत त्यामुळे व्यर्थ आपल्या हिताचा तोटा करुन घेतात ते त्यांचे करणे तळहातावरील पाण्यात पोहण्याप्रमाणे आहे, किवां अमृताच्या समुद्रात बुडी घ्यावी आणि अमृताचा एकही थेबं मुखात जाउ नये म्हणुन तोंडाला वज्रमिठी पडावी आणि मनात डबक्यातील पाण्याची आठवण करावी तसे आहे. अमृतात शिरुन मुखामध्ये अमृत जाउ न देता मरुन जावे असे का बरे करावे? अमृतात अमृत होवुन अमर का बरे होउ नये? त्या चिदाकाशात आपण जितके उंच उंच जाउ तितका आपणास सुखाने संचार करण्यासाठी पाहिजे तसा विस्तार प्राप्त होतो, मी अमर्याद असता मला बुध्दीच्या मापाने का बरे मोजावे? मी अव्यक्त आणि निराकार असताना मला व्यक्त साकार का बरे मानावे? मी सिध्द असताना माझ्या प्राप्तीकरता इतर साधनांनी का बरे कष्ट घ्यावेत ? हे अर्जुना ! हे आत्मज्ञानाचे उदात्त बोलणे सर्वसामान्य जीवांना समजत नाही आणि आवडतही नाही, कारण त्यांच्या दृष्टीवर योगमायेचा पडदा असल्यामुळे ते सर्व आधंळे झाले आहेत देहबुध्दीच्या बळाने प्रकाशरुपी जो “मी”  त्या मला ते पाहत नाहीत एरवी मी ज्यामध्ये नाही, असा एकतरी पदार्थ आहे काय? असे पाहा की रसाशिवाय कोणतेही पाणी आहे काय? वारा कोणाला बरे स्पर्श करीत नाही? आकाश कोठे बरे मावत नाही? हे असो संपुर्ण विराट विश्वात मीच एक भरलेला आहे.  ( ओवी १५१ ते १६० )

           या विश्वामध्ये मागे जितके प्राणी होउन गेले ते सर्व मीच होउन राहीले आहेत आणि वर्तमानकाळात जितके प्राणिमात्र आहेत त्यांतही मीच आहे, पुढे जे प्राणि मात्र निर्माण होणार आहेत तेही माझ्यापासुन वेगळे होणार नाहीत. परंतु हे बोलणे सुध्दा व्यर्थ आहे कारण खरे तर माझ्या स्वरुपाच्या ठिकाणी परमार्थत: काही होत नाही व जात नाही, दोरी ऐवजी भासलेला सर्प काळा आहे, का खवले असलेला आहे, का गव्हासारख्या ठिपक्यांचा आहे  याचे वर्णन कोणालाही करता येत नाही, कारण दोरीवर भासलेला सर्प  मिथ्या  असतो त्याप्रमाणे सर्व प्राणि मात्र मिथ्या असल्यामुळे कोणत्याही प्रकारची कल्पना करता येत नाही, हे पंडुसुता ! अशा प्रकारे मी सदैव समान प्रमाणात व्याप्त असताना सर्व प्राणिमात्राच्यां मागे जो संसार लागला आहे त्याचे कारण वेगळे आहे तरी त्यासंबंधी आता थोडा विचार सांगतो, तो ऐक ज्या वेळी अहंकार आणि देह यांचे एकमेकांवर प्रेम जडले तेव्हा त्या दोघांपासुन इच्छा नावाची कन्या जन्माला आली  ती आपल्या पुर्ण तारुण्यात आल्यावर त्या दोघांनी तिचे द्वेषाबरोबर लग्न लावले पुढे  इच्छा आणि द्वेष या दोघांपासुन द्वंद्वमोह नावाचा पुत्र जन्माला आला, मग त्याचा आजोबा जो अहंकार त्याने त्याला  लहानाचे मोठे केले  तो द्वंद्वमोह सात्विक धैर्याला नेहमी प्रतिेकुल असतो आणि आज्ञारुपी अन्नाने पुष्ट झाला असता तो धर्मनियमांना जाणत नाही, धर्माविषयी वैर निर्माण असते. हे धर्नुधरा !  तो असंतुष्टीची मदिरा पिवुन उन्मत्त होतो आणि पंचविषयरुपी खोलीत विकाररुपी स्त्री सह राहतो, त्या द्वंद्वमोहाने अंत:करण शुध्दीच्या वाटेवर विकल्परुपी काटे पसरले आणि मग वाईट मार्गाच्या आडवाटा काढल्या. ( ओवी १६१ ते १७० )

           त्या द्वंद्वमोहाच्या वाईट कृत्यांनी प्राणिमात्र भांबावुन गेले आणि जन्म-मरणरुप संसाराच्या अरण्यात पडले मग त्यांना मोठया दुखाचे आघात सोसावे लागले,  पुण्यवान विवेकी पुरुष असे विकल्पाचे अणकुचीदार काटे पाहुन बुध्दीला भ्रम पडु देत नाहीत जे भक्तीच्या एकनिष्ठेच्या पावलांनी सरळ जाताना विकल्परुपी काटे चिरडुन टाकतात ते महापातकाचे अरण्य मागे टाकुन पुढे जातात नंतर ते पुण्याच्या मार्गाने धाव घेतात आणि माझे सानिध्य प्राप्त करतात, अशा रीतीने ते कामक्रोधादिक वाटमाऱ्यांच्या हातुन सुटतात, एरवी तरी अर्जुना ! जन्म-मरणाच्या चक्रातुन सुटावे असे जे साधन आहे त्याच्या प्राप्तीची ज्यांना इच्छा उत्पन्न होते त्यांना त्यांचा तो प्रयत्न फलद्रुप होवुन ब्रम्हाची प्राप्ती होते आणि पिकलेल्या फळांच्या रसाप्रमाणे त्यातुन आनंदरुप रस गळु लागतो, त्यावेळी कृतकृत्यतेने जग भरुन जाते सर्वत्र आनंद भरलेला दिसतो. आत्मतत्वाच्या अनुभवाने त्याविषयीचे आश्चर्य नाहीसे होते कर्माचे प्रयोजन संपते आणि मन आत्म्याच्या ठिकाणी विराम पावते हे धनंजया ! अशा प्रकारे त्याला अध्यात्माचा लाभ होतो कारण त्याच्या या परमार्थरुप व्यापारात मीच त्यांना भांडवल असतो. त्याला साम्याच्या वाढीमुळे ऐक्याचा व्यापार साधतो समृध्दी होते त्यामुळे भेदरुपी दैन्याची ओळखच राहत नाही. ज्यांनी अधिभुतासह मला अनुभवाच्या हातांनी धरुन अधिदैवाला जाणले. ( ओवी १७१ ते १८०)

            ज्यास ज्ञानाच्या आधारे जो मी तो अनुभवास येतो ते पुरूष शरीराच्या वियोगाच्या काळी विरहाने दुखी होत नाहीत, एरवी आयुष्याची दोरी तुटावयाची वेळ आली असता प्राणिमात्र भीतीने गडबडुन जातात, त्यांचे मरण पाहुन न मरणाऱ्या माणसाच्या चित्ताला प्रलयकालसमान दुख होत नाही का? परंतु जे माझ्याशी एकरुप झाले ते प्राणिमात्र मला कधीही सोडीत नाहीत हे कसे घडते हे सांगता येत नाही? एरवी सुध्दा जे पुरूष असे पुर्णज्ञानी असतात ते माझ्या ठिकाणी स्थिर अतं:करण झालेले योगी आहेत असे जाण. भगवंताच्या शब्दरुपी कुपीमधुन शांतरस खाली टपकत असताना तो आपल्या हातावर घेण्यासाठी अर्जुनाची अवधानरुपी ओजंळ पुढे आली नाही, कारण त्या वेळी तो अवधानाच्या मागे होता, त्या ठिकाणी ब्रम्हयाचे वर्णन करणारी वाक्यरुपी फळे विविध प्रकारच्या अर्थरुपी रसांनी भरलेली होती आणि ती अभिप्रायाच्या पवित्र सुगंधाने दरवळली होती. ती वचनफळे श्रीकृष्णरुपी कल्पवृक्षाची होती, जी सहज कृपारुपी मंद वायुने अर्जुनाच्या श्रवणेंद्रियरुपी ओटीत अकस्मात पडली होती, ती वचनरुपी फळे जणु काही आत्मज्ञानाच्या सिध्दांताचीच बनलेली होती आणि ब्रम्हरसाच्या सागरात बुडवुन मग‍ती तशीच परमानंदा मध्ये घोळलेली होती, अशा  त्या परमपवित्र वचनाने अर्जुनाला ज्ञानप्राप्तीचे डोहाळे लागले, ते डोहाळे आश्चर्यरुपी अमृताचे घुटके घेउ लागले अशी वचनरुपी सुखसंपत्ती प्राप्त झाल्यावर तो स्वर्गसुखाला वाकुल्या दाखवीत होता आणि त्याच्या हदयरुपी कमलातील जीवास गुदगुल्या होउ लागल्या..( ओवी १८१ ते १९० )

            अशा त्या वचनरुपी फळाच्या बाहय सौदर्याने अर्जुनाचे सुख वाढु लागले त्या वेळी त्या फळाचा आस्वाद घेण्याची जिभेला तीव्र इच्छा उत्पन्न झाली म्हणुन ताबडतोब ती श्रीकृष्णवचनरुपी फळे अनुमानरूपी तळहातावर घेउन अर्जुन ती अनुभवरुप मुखात एकदम घालू लागला, त्यावेळी ती विचाराच्या रसनेने दबली जाईनात आणि अनेक हेतुंच्या दातांनी फुटेनात असा त्या अमृतमधुर वचनफळाचा कठिणपणा जाणुन सुभद्रापती जो अर्जुन तो त्यांना तोंड लावेना हा चमत्कार पाहुन अर्जुन मनाशी म्हणाला ही अनमोल वचने म्हणजे जलात पडलेले ताऱ्यांचे प्रतिबिबं होय ती हाती लागत नाहीत त्याप्रमाणे अक्षराच्या सुलभपणाने मी कसा फसलो?  ही केवळ अक्षराची पदे नसुन जणु काही आकाशाच्या घडया आहेत त्यामुळे या ठिकाणी आमच्या बुध्दीने कितीही प्रयत्न केला तरी काही थांग लागणार नाही,अक्षराच्या पदाचा अर्थ कळणे जेथे अवघड आहे तेथे त्या अर्थाला अनुभवणे जाणावयाची गोष्ट कशाला? असा अर्जुनाने मनात विचार केला आणि त्याने पुन्हा यादवेंन्द्र  श्रीकृष्णाकडे पाहीले मग अर्जुनाने विनंती केली की हे देवा ! ब्रम्ह,अध्यात्म, कर्म, अधिभूत, अधिदेव, अधियज्ञ, प्रमाणकाळी योगी पुरुषाकडून होणारे तुझे स्मरण, ही सातही पदे परिचित नाहीत म्हणुन आश्चर्यकारक आहेत एरवी या सात पदांतील वेगवेगळया प्रमेयांचा उलगडा वेगाने अवधान देवुन श्रवण केले असता त्या श्रवणाच्या बलाने काही बोलून दाखविता येईल काय ? परंतु हे देवा ! तु जे सांगितलेस ते साधारण नाही ही अक्षरे नुसती पाहिल्यावर विस्मयलादेखील आश्चर्य वाटेल माझ्या कानांच्या झरोक्यावाटे तुझ्या वचनांची किरणे आत प्रवेश करतात न करतात तोच मला आश्चर्य वाटल्यामुळे माझे अवधान बंद पडले.( ओवी १९१ ते २०० )

             परंतु त्याच बरोबर मला शब्दांचा अर्थ समजण्याची तीव्र इच्छा आहे हे सांगण्यापुरताही विलबं मला सहन होत नाही म्हणुन हे देवा ! आपण त्या शब्दांचे लवकरात लवकर निरुपण करावे अशा रितीने देवाने मागे काय सांगितले याचा विचार करून व देव पुढे काय सांगतील त्या अभिप्रायावर दृष्टी ठेवुन आणि मध्येच आपली श्रवण करण्याची इच्छा दर्शवुन अर्जुनाने विचारले, हे अर्जुनाचे विचारण्याचे चार्तुय कसे आहे ते पाहा एरवी तो अर्जुन श्रीकृष्णाच्या हदयाला आलिगंन देण्यासाठी तयार झाला होता परंतु श्रीकृष्णाविषयी असणाऱ्या आदरभावनेची मर्यादा उल्लंघू देत नव्हता. अहो, सदगुरुला जेव्हा विचारावयाचे असते, त्यावेळी अवधान ठेवावे लागते  हे अर्जुन संपूर्णपणे जाणत होता आता  अर्जुनाचे नम्र भावनेने प्रश्न करणे आणि  त्याची उत्तरे श्रीहरीने बोलणे, हे संजय कशा प्रकारे धृतराष्ट्रास प्रेमाने सांगेल ते पाहा त्या अमृतमधुर वचनांकडे श्रोत्यांनी लक्ष द्यावे, मी परिशुध्द मराठी भाषेत सांगणार आहे, ज्या योगाने कानांच्या अगोदर दृष्टीला अर्थ दिसेल. बुध्दीरुप जिभेने शब्दांचा भावरस न चाखताही केवळ अक्षरांच्या बाहय सौदर्याने इंद्रियाचे समाधान होईल असे पाहा की, मालतीच्या कळयांतील सुगंधामुळे घ्राणेंद्रियाला तर समाधान लाभते परंतु त्या कळयांचे बाहय सौदर्य पाहुन डोळे देखील सुखी होत नाहीत का ? त्याचप्रमाणे मराठी भाषेच्या शोभेने इंद्रिये सुखाचे राज्य करतील आणि मग मुख्य सिध्दांताच्या गावाला अधिकारसंपन्न होउन जातील जेथे बोलणे संपते त्या ब्रम्हस्वरुपासंबंधी जे बोलणे आहे ते नागरी भाषेच्या शैलीने आपण एकाग्रतेने श्रवण करावे असे सदगुरू निवृत्तीनाथांचे शिष्य ज्ञानदेव महाराज म्हणतात.( ओवी  २०१ ते २१० )

सर्वश्रेष्ठ ग्रंथराज सार्थ ज्ञानेश्वरी सातवा अध्याय भगवंताच्या कृपेने संपन्न !

भगवदगीता श्लोक ते ३० आणि ज्ञानेश्वरी ओव्या २१०  )

पुढील अध्याय