अध्याय-८-भाग-२

           त्या विहीरीत पडण्यापुर्वी पडणे चुकविण्यासाठी दुसरे कोणतेही साधन नव्हते म्हणुन त्याला पडणे भाग पडते. त्याप्रमाणे मरणकालाचे समयी जीवासमोर ज्या वस्तुचे समरचित्र उभे ठाकते ती वस्तु पुढील जन्मात होणे कोणत्याही प्रकारे चुकत नाही. आणि  मनुष्य जोपर्यत जागृत आहे तोपर्यत ज्या एका वस्तुच्या ध्यासाने जे भावचित्र निर्माण होते तेच चित्र डोळा लागताच त्याला स्वप्नामध्ये दिसत असते. ज्याप्रमाणे जिवंत असताना जी गोष्ट आवडी मुळे अंत:करणामध्ये ठसते, तीच मरणसमयी वारंवार मनात येते ती संस्काररुप झालेली वस्तू मरणापर्यत अधिक -अधिक दृढ होउ लागते  मृत्यूसमयी ज्याला ज्या वस्तुची आठवण होते तो त्याच गतीला प्राप्त होतो म्हणून हे अर्जुना ! तु माझे सदैव स्मरण ठेव, डोळयांनी जे पहावे किवां कानांनी जे श्रवण करावे, मनाने जे चिंतन  करावे आणि वाणीने जे बोलावे  ते आत-बाहेर असलेले सर्व विषय मीच आहे हे जाणूनच ते विषय हदयी स्थिर करावेत, मग सर्व काळी स्वभावत: मीच आहे. अर्जुना ! अशी अवस्था झाली म्हणजे देह गेला  तरीपण तू माझ्याशी एकरुप झाल्यामुळे मृत्यू पावणार नाहीस तर मग तू संग्राम केलास तर तुला भीती कशाची आहे. जर मग तू खरोखर मन आणि बुध्दी माझ्या स्वरुपाच्या ठिकाणी अर्पण करशील तर मला प्राप्त करशील ही माझी प्रतिज्ञा आहे  अशी स्थिती कशाने होईल ? असा जर तुझ्या मनात संशय निर्माण होत असेल तर प्रारंभी अभ्यास करुन याचा अनुभव घे आणि मी म्हणतो त्याप्रमाणे माझी प्राप्ती झाली नाही, तर मग माझ्यावर रागव. ( ओवी ७१ ते ८० )

         या अभ्यासाच्या योगाने चित्त शुध्द कर अरे, प्रयत्नाने पांगळा देखील पर्वतावर चढु शकतो याप्रमाणे सदैव सदअभ्यासाने चित्ताला परमपुरुषाचा छंद लाव मग शरीर राहो अथवा जावो आता गती प्राप्त करुन देणारे चित्त जर आत्म्याला वरील तर मग देह आहे किवां गेला याची कोण बरे आठवण करील? नद्यांचे ओघ धो धो करीत समुद्रात मिळाले असता मागे काय चालले आहे हे पाहण्यासाठी परत येतात काय? नाही, ते जलाचे ओघ समुद्रात मिळाल्यावर समुद्ररुप होवुन जातात त्याप्रमाणे चित्त चैतन्यरुप झाले की जन्म -मरणाची यातायात थांबली जाते कारण त्या अवस्थेत सत-चित-आनंदाशी एकरुपता प्राप्त झालेली असते. ज्याचे कोणत्याही आकारावाचुन अस्तित्व आहे ज्याला जन्म नाही त्यामुळे मृत्यू नाही जे सर्वत्र सम प्रमाणात असुन सर्वपणाने पाहते जे आकाशाच्याही आधीचे आहे जे परमाणू पेक्षाही अतिशय लहान आहे ज्याच्या सानिध्याने विश्वातील सारे कर्म चालते जे या संपुर्ण  विश्वाला उत्पन्न करते ज्याच्या सत्तेने संपुर्ण विश्व जगते कोणताही हेतु ज्याची अनुमानाने सिध्दी करण्यास भीत असतो. ते अचिंत्य म्हणजे चितंनाचा विषय होत नाही असे पाहा की, विस्तवाला जशी वाळवी लागत नाही अधंकार हा जसा प्रकाशामध्ये शिरत नाही जो ज्ञानप्रकाशाचा दिवस असुनही चर्मचक्षुंना अंधाराप्रमाणे आहे, जो निर्मळ सुर्यरुपी कणांच्या राशी आहे ज्याच्या ज्ञानी साधकांकरिता नित्य उदय आहे व ज्याला अस्तमानाचे आडनावदेखील नाही म्हणजे जे कधीही अस्त पावत नाही.    ( ओवी ८१ ते ९० )

         त्या अव्यंग स्वरुपाच्या ब्रम्हाला जाणुन, मृत्यू काल जवळ आला असता जो एकाग्र चित्ताने त्याचे अखंड स्मरण करतो अशा साधकाने प्रारंभी अनासक्त कर्मयोगापासुन निर्माण झालेली चित्तशुध्द अमृतमधुर अंत:करणामध्ये स्थिर करुन पद्यासन घालुन उत्तरेकडे तोंड करुन बसावे. आतमध्ये सर्व मनोवृत्ती एकरुप झाल्याने स्वरुपप्राप्तीच्या प्रेमाने आपोआप ब्रम्हस्वरुपास सत्वर मिळण्याकरता स्वाधीन केलेल्याअष्टांगयोगाच्या साहाय्याने कुंडलिनीशक्तीचे उत्थापन होते आणि ती शक्ती सुष्मनेच्या मध्यमार्गाने अग्नीस्थानापासुन ब्रम्हरंध्रापर्यत जाण्यास निघते, जेव्हा प्राण हा मुर्धन्याकाशात प्रवेश करतो तेव्हा जड प्राण आणि चित्त स्वरुप आत्मा यांचा वरवर संगम झालेला दिसतो तो मनाच्या स्थैर्याने धारण केलेला भक्तीयुक्त्‍ा भावनेने भरलेला व योगबळाने आवरून धरलेला असतो आणि लय पावावयास तयार होवुन शरीराच्या आतील जड  पदार्थाना तिथल्या तिथेच विरवुन टाकतो आणि आपण स्वता भृकुटिमध्यामध्ये स्थिर होवुन तेथेच लय पावतो, ज्याप्रमाणे घंटेतुन निर्माण होणा-या नादलहरी घंटेतच लय पावतात. किवां दिव्यावर घट झाकला असता तो दिवा केव्हा व कसा विझला हे कळत नाही, अशा प्रकारे हे अर्जुना ! जो आपला प्राण शरीरातच लय करुन स्वताच्या इच्छेने देह ठेवतो तो  केवळ परब्रम्ह असतो ज्याला परमपुरुष हे नाव आहे. असे जे माझे निजधाम आहे तो त्या स्वरुपाशी एकरुप होतो. जे ज्ञान म्हणजे सर्व ज्ञानाचा शेवट आहे जे ब्रम्हज्ञानाची खाण आहे  ज्ञानी पुरुषांच्या बुध्दीने ज्याला अक्षर म्हणजे अविनाशी म्हटले आहे.  ( ओवी ९१ ते १०० )

           जे प्रचंड सोसाटयाच्या वाऱ्याने मोडुन पडत नाही असे खरे तर या जगात एक आकाशच आहे जर आकाशच मेघप्रमाणे हलके होईल तर ते प्रचंड वाऱ्यापुढे कसे टिकेल. त्याप्रमाणे ज्ञानाला जे विषय झाले आणि ते ज्ञानाकडुन मोजले जातात म्हणुन ते क्षर म्हणजे नाशवंत होत. जे वृत्तिज्ञानाला विषय होत नाही त्याला सहजच अक्षर म्हणजे  अविनाशी असे म्हणतात,म्हणुन वेद जाणणारे पुरूष ज्याला अक्षर असे म्हणतात की जे प्रकृतीच्या पलीकडे परमात्मारुप आहे, आणि जे विषयांचा विषाप्रमाणे त्याग करुन सर्व इंद्रियाचे दमन करुन देहरुपी झाडाच्या तळी उदासीन वृत्तीने बसलेले आहेत याप्रमाणे जे विरक्त पुरुष आहेत ते सदैव परब्रम्हाची वाट पाहत असतात आणि  जे निष्काम पुरुषाला सर्वकाळ अत्यंत प्रिय आहे. ज्याच्या आवडीकरता योगी ब्रम्हचर्या सारख्या अत्यंत कठिण संकटाची पर्वा करीत नाहीत आणि जे निष्ठुर होवुन इंद्रियांना निग्रहाचा मार देतात व दीन करून सोडतात. असे जे दुर्लभ आणि अगाध असलेले “ब्रम्हपद”  ज्याचा अंत नाही आणि ते वेदांनाही जाणता आले नाही वेद अलिकडच्या काठावर गटांगळया खात राहिले आहेत जे पुरुष याप्रमाणे देह ठेवतात ते त्या पदाला प्राप्त होतात, म्हणुन हे पार्था !‍ही अवस्था तुला आणखी एक वेळ सांगत आहे त्या वेळी अर्जुन म्हणाला, हे स्वामी ! मी हेच म्हणणार होतो त्यावेळी तुम्ही सहजच कृपा केली, तरी महाराज, आता आपण सांगावे, परंतु आपण जे सांगाल ते अत्यंत सोपे करुन सांगावे त्याप्रसंगी त्रिभुवनाला प्रकाशित करणारे श्रीकृष्ण म्हणाले, तुझे मनोगत आम्ही जाणत नाही काय ? तुला आता संक्षेपाने सांगतो त्याचे श्रवण कर.     ( ओवी १०१ ते ११० )

           तरी या मनाला विषयांकडे बाहेर धावण्याची जी सवय लागलेली आहे ती सवय ज्या योगाने सहज मोडेल आणि मन हे हदयाच्या डोहामध्ये बुडेल तसे करावे. परंतु जर सर्व इंद्रियांच्या दारात सदैव निग्रहाची कवाडे लावली तरच  योगधारणा घडेल ज्याप्रमाणे हात-पाय मोडलेला मनुष्य घर सोडीत नाही त्याप्रमाणे मग स्वभावताच कोंडलेले मन हदयामध्ये स्थिर राहील त्याप्रमाणे अर्जुना ! चित्ताची स्थिरता झाल्यावर प्राणायामाने ओमकाराचे ध्यान करावे आणि मग सुषुन्मेच्या मार्गाने त्या प्राणाला मूर्धन्याकाशापर्यत आणावे त्या मूर्धनीला आकाशात प्राण मिळतो न मिळतो, तोच धारणेच्या आधारे धरुन ठेवावा जेथेपर्यत आकार, उकार, मकार या तीन मात्रा अर्धमात्रा ओमकार बिंदुमध्ये नाहीशा होत नाहीत. तोपर्यत तो प्राणवायु मूर्धन्याकाशात  स्थिर करावा आणि जेव्हा तो त्याच्यांशी एकरुप होईल त्या वेळी ओमकार अर्धबिबांतच लीन होतो त्या बरोबरच ओमकाराचे स्मरण संपते आणि त्या मूर्धन्याकाशात प्राण लीन होतो  मग ओमकाराच्या पलिकडे जे उरते ते पूर्ण सच्चिदानंदघन परमब्रम्ह स्वरुप असते म्हणुन प्रणव ज्याला म्हणतात त जे एकाक्षर ब्रम्ह आहे, ते माझे परम स्वरुप आहे त्यामुळे त्याचे स्मरण करीत असता जो या प्रकारच्या अवस्थेत देहाचा त्याग करतो तो निश्चीतच मला पावतो कारण त्याला माझ्या प्राप्तीशिवाय दुसरी श्रेष्ठ प्राप्ती नाही हे त्रिकालाबाधित सत्य आहे. अर्जुना ! तुझ्या मनात अशी शंका निर्माण होईल की मृत्यूसमयी नेमके माझेच स्मरण कसे व्हावे? ( ओवी १११ ते १२० )

        कारण अंतकाली सर्व इंद्रिये आपली कर्मे करण्यास असमर्थ असल्यावर जिवंतपणाचे सुख नाहीसे होउन अंतबाहय मृत्यूची लक्षणे उघड दिसु लागल्यावर त्या वेळी शास्त्रशुध्द योग-साधण्यास कोणी बसावे? इंद्रियाचा निग्रह कोणी करावा? अशा वेळी अंतकरणाने ओमकाराचे स्मरण तरी कसे करावे? तरी अरे, अशा संशयाला तु आपल्या अंतकरणामध्ये थारा देवु नकोस कारण ज्यांनी माझी अखंड पणे सेवा केली आहे त्यांच्या  मृत्यूच्या समयी मी त्यांचा सेवक होतो.जे विषयांना तिलांजली देवुन बाहेर धावणाऱ्या प्रवृत्तीच्या पायात बेडी घालुन मला हदयात साठवुन माझ्या स्वरुपाचा सुखानुभव घेतात त्या अलौकिक समाधानामध्ये त्यांना भुक व तहान इत्यादीची आठवणदेखील राहात नाही मग बिचारे डोळे, कान, इत्यादीकांचे काय महत्व आहे? अशा प्रकारे जे माझ्याशी निरंतर अनन्यरुप झाले आहेत अंतकरणात माझ्याशी ऐक्य पावलेले आहेत ते मद्रूप होवुन देहादी उपाधीरहित झाले आहेत असे भक्त तेव्हाही माझीच उपासना करतात ज्या वेळी त्यांचा देह पडण्याचा  एखादाचा प्रसंग येतो तेव्हा त्यावेळी त्यांनी माझी आठवण करावी आणि नंतर मी त्यांना प्राप्त व्हावे एवढे प्रकार घडले तर त्या उपासनेचे महत्व काय?  जर कोणी एखादा माणूस मृत्यू समयी अनेक क्लेशांनी दीन झाला आणि काकुळतीला येवुन देवा ! धाव, धाव,असे म्हणाला तर त्या वेळी मी धावत येत नाही काय? माझ्या अनन्य भक्ताचीसुध्दा अशीच अवस्था होत असेल तर मग भक्तीचा हव्यास कशासाठी पाहीजे? म्हणुन असा संशयात्मक अभिप्राय व्यक्त करु नये. कारण त्यांनी ज्या वेळी माझे स्मरण करावे त्या वेळीच मी त्यांच्या जवळ यावे एवढा स्मरणाचा भार देखील माझ्या जीवाला खरोखर सहन होत नाही.  ( ओवी १२१ ते १३० )

         अशा प्रकार आपण ऋणी झालो आहोत हे पाहुन त्या ऋणातुन मुक्त होण्याकरता भक्ताच्या देहत्यागाच्या प्रंसगी मी त्यांची सेवा करत असतो मृत्यू समयी देहाला होणाऱ्या क्लेशांचा वारा माझ्या सुकोमल भक्तांना लागू नये म्हणुन मी त्यांना आत्मबोधरुपी पिजंऱ्या मध्ये ठेवतो. त्यावर पुन्हा माझ्या स्मरणाची विस्तृत शीतल अशी सावली करतो अशा प्रकारे त्यांची आत्मबुध्दी स्थिर झाली म्हणजे मी त्यांना माझ्या निगुर्ण स्वरुपाकडे आणतो. म्हणुन देह ठेवावयाचे वेळी माझ्या भक्ताला कधी दुख होत नाही भक्तास माझ्याकडे मी सुखाने आणतो मी भक्ताच्या आत्मतत्वावर असणारे देहरुपी आच्छादन काढुन टाकुन वरवर असणारी धुळ झाडुन टाकतो. तसेच शुध्द सदिच्छा निवडुन काढुन त्याचे माझ्याशी ऐक्य घडवितो भक्त जिवंत असतानाच त्याच्या देहाची विदेही अशी अवस्था झालेली असते म्हणुन मृत्यू समयी देहाचा त्याग करीत असताना वियोग होत आहे असे त्याला काहीच वाटत नाही. अथवा देहाचा त्याग करत असताना मी भक्ताजवळ यावे आणि माझ्या मुळ स्वरुपाकडे न्यावे असे बोलणेही योग्य नाही कारण भक्त हा मरणकाळाच्या आधीपासुनच माझ्याशी एकरुप झालेला असतो. येऱ्हवी जलामध्ये चांदण्यांचे जे अस्तित्व दिसते तो खरोखर भास असतो कारण ते चांदणे जलात नसुन चंद्राच्या ठिकाणी स्थिर असते. त्याप्रमाणे शरीररुपी जलामध्ये जरी तो भक्त दिसत असला तरी तो नुसता भासमात्र आहे वास्तविक तो भक्त देहावाचुन माझ्याच ठिकाणी असतो याप्रमाणे जे माझ्याशी नित्य युक्त आहेत त्यांना मी सदैव सुलभ आहे म्हणून ते देह ठेवल्यावर निश्चीत मीच होतात. मग जे शरीर क्लेशरुपी झाडांचे वन आहे ते अधिदैविक, अधिभैातिक आणि आध्यात्मिक या त्रिविध तापरुप अग्नीची शेगडी आहे ते मृत्यूरुपी कावळयाकरिता उतरुन टाकलेला बळी आहे. ( ओवी १३१ ते १४० )

पुढील भाग