अशा उत्तम प्रकारे जुळून आलेल्या योगाची प्राप्ती होवुन जे योगी आपला देह ठेवतात ते ब्रम्हवेत्ते ब्रम्हस्वरुपाशी ऐक्य पावतात. हे अर्जुना ! तु निश्चीतपणे लक्षात ठेव की एवढे या काळात सामर्थ्य आहे ब्रम्हस्वरुपाकडे येण्यास हाच एक मार्ग आहे या मार्गात जठराग्नी ही पहिली पायरी आहे ज्योतिस्वरुप ज्ञान ही दुसरी पायरी आहे दिवस ही तिसरी पायरी आहे आणि शुक्लपक्ष ही चौथी पायरी आहे आणि सहा महिन्यांचे उत्तरायण ही वरची पायरी आहे. अशा पायरी-पायरीने योगी सायुज्य सिध्दी-सदनाला प्राप्त होतात हा उत्तम काळ आहे असे जाणावे. यालाच “अर्चिरादि मार्ग” किवां देवयान मार्ग असे म्हणतात. आता प्रयाणाला अयोग्य मार्ग कोणता तोही प्रसंगानुरुप सांगतो तरी ऐक मनुष्याच्या मृत्यूचे समयी विषम वात आणि कफ हे शरीरात गच्च भरलेले असतात आणि त्यामुळे अंत:करणात अज्ञानरुपी अंधकार कोंदाटून राहिलेला असतो सर्व इंद्रिये लाकडासारखी जड होतात स्मरणशक्ती भ्रमामध्ये बुडून जाते मन वेडेपिसे होते प्राण देहात कोंडला जातो जठराग्नीचा अग्नीपणा विझू लागतो मग तो धूरच सर्वत्र पसरतो त्या धूराने शरीरातील चेतना आच्छादिली जाते स्वच्छ प्रकाशही नसतो अशी झुजूंमुजूं असते त्यामुळे तो मनुष्य लवकर मृत्यू पावत नाही आणि शुध्दीवरही राहत नाही. अशा प्रकारे मनुष्याचे शरीर नुसते पडलेले असते आणि त्याचे आयुष्य मरणाच्या शेवटच्या वेळेची वाट पहात असते. (ओवी २२१ते २३०)
अशा प्रकारे मन, बुध्दी व इंद्रिये यांच्याभोवती अतिशय धुर कोंडतो. त्यावेळी जन्मभर जोडून ठेवलेली परमार्थाची संपत्ती जणू युगच बुडावे त्याप्रमाणे अंधकार-प्रवाहामध्ये बुडून जाते, जन्मभर केलेला हातचा अभ्यास ज्या वेळी जातो त्या वेळी दुसऱ्या नवीन लाभाची गोष्ट तरी काय आहे? म्हणुन प्रयाणकाळी माणसांची अशी दुर्दशा होते देहाच्या आत अशा प्रकारे दु:स्थिती आणि बाहेर वातावरणात चंद्रकलेचा क्षय ज्या दिवसांत आहे असा कृष्णपक्ष तसेच दक्षिणायणचेही सहा महिने पुढे आलेले असावेत. हे सर्व जन्म-मरणाच्या चक्रात फिरवणारे प्रकार ज्याच्या मृत्यूचे वेळी एकत्र आलेले असतात, अशा परिस्थिती मध्ये तो साधक स्वरुपसिध्दीच्या गोष्टी कशा ऐकू शकेल? अशा प्रकारे ज्याचा देह पडतो तो योगी असल्यामुळे चंद्रलोकात जातो तेथुन भोग भोगून कर्माचा क्षय झाला, म्हणजे मृत्यूलोकात जन्म घेतो. हे अर्जुना ! आम्ही मृत्यूस अयोग्य काळ जो म्हटला तो हाच होय, हाच पुर्नजन्मरुप गावास येण्याचा “धूम्रमार्ग” आहे, दुसरा जो “अर्चिरादि मार्ग” आहे तो मुक्कामाच्या ठिकाणी पोचून सदैव वास करविणारा आहे आणि मध्येच खंडित न होणारा, सहजपणे मोक्षरुपी गावापर्यत सोपा आणि उत्तम असा मार्ग आहे. अशा दोन अनादि वाटा आहेत त्यापैकी एक सरळ आणि एक आडामार्गाची आहे म्हणून अर्जुना, तुला या वाटा योग्य विचारपुर्वक दाखविल्या आहेत कारण की या मार्गापैकी उत्तम मार्ग कोणता आणि वाईट मार्ग कोणता याचा तु विचार करावास सत्य आणि असत्य ओळखावे आणि स्वताचे हित कोणते आणि अहित कोणते हे समजुन घ्यावे. असे पाहा की सुसज्ज अशी नाव पाहिल्यावर कोणी अथांग अशा पाण्यात उडी टाकील काय? तसेच ज्याला सात्विक मार्ग माहीत आहे तो आडरानांत शिरेल काय? (ओवी २३१ते २४०)
जो विष आणि अमृत उत्तम प्रकारे ओळखतो तो अमृत टाकुन देईल काय? त्याप्रमाणे जो सरळ मार्ग पाहतो तो आडमार्गाला जाणार नाही म्हणुन खरे काय आणि खोटे काय, याची पारख करावी अशी पारख झाली म्हणजे कधीही अनुचित प्रसंग येणार नाही असे केले नाही तर मृत्यूसमयी भ्रममय धूम्रमार्गाचे महान संकट आहे जो आयुष्यभर ज्या हेतुने अभ्यास केला जातो तो हेतु सफल होवु देत नाही जर अर्चिरादि मार्ग चुकला आणि तो योगी धूम्रमार्गत पडला तर जन्म-मरणाच्या चक्रात गुंतून फिरत राहतो. जन्म-मरणाचे अपार कष्ट पाहुन हे कष्ट कसे नाहीसे होतील हे तुला समजावे म्हणून दोन्ही योग्य मार्गाचे उत्तम प्रकारे स्पष्टीकरण केले तरी एका मार्गाने ब्रम्हस्वरुपाशी ऐक्य पावावे आणि दुसऱ्या मार्गाने पुन: पुन: जन्म घ्यावे परंतु देहावसानाच्या वेळेस दैववशात ज्याला जो मार्ग प्राप्त होईल त्याला तशी गती मिळेल. अचानक कोणत्या वेळेस देह जाईल हे कळत नाही, म्हणुन ही गोष्ट राहू दे. ब्रम्हप्राप्ती व्हावी या मार्गाची काय आवश्यकता आहे? तर आता देह जावो अथवा जावो आम्ही केवळ ब्रम्ह स्वरुप आहोत असे ज्ञानी जाणतात कारण दोन्ही कडुन विचार केला तर दोरीवर भासलेला सर्प जसा मिथ्या आहे तसा ज्ञानी देहाला मिथ्या जाणतात, आपल्यावर लाटावर लाटा येतात किवां येत नाहीत असे पाण्याला कधी वाटते काय? कारण ते पाणी कोणत्याही काळात जसेच्या तसे पाणीच असते ते पाणी लाटा निर्माण झाल्यामुळे जन्म पावत नाही अथवा लाटा नाहीशा झाल्या तरी नाश पावत नाही, त्याप्रमाणे जे देहात राहुन देहानेच ब्रम्ह झाले आहेत. (ओवी २४१ते २५०)
आता जे जीवन मुक्त झालेले असतात त्यांच्या अनुभवात देहाचे आडनावदेखील राहत नाही, तर मग ते कोणत्या काळी काय नाश पावणार? याचा तु विचार कर. जर सर्व देशकाल आपणच आहोत तर मग अर्चिरादि मार्ग अथवा धूम्रमार्ग कशासाठी शोधावा? कोणी कोठुन कुठे आणि कशासाठी जावे? ज्या वेळी घट फुटतो त्यावेळी घटाकाश नीट वाटेला लागते हे वाटेंला लागले तरच महाकाशाला जावुन नेमके मिळते नाहीतर चुकते काय? असे होते काय की ज्या वेळी घट फुटतो त्या वेळी घटाचा आकारच नाहीसा होतो घटाकाश कोठे जात नाही कारण घटापेक्षा भिन्न असलेले आकाश पुर्वीदेखील महाकाशामध्ये असतेच, अशा बोधाच्या साधनेने आपण ब्रम्हस्वरुप आहेत असा अनुभव प्राप्त झालेल्या योगी पुरुषात चांगल्या अथवा वाईट मार्गाचे संकट निर्माण होत नाही. या करीता अर्जुना ! तू योगयुक्त व्हावेस त्यामुळे तुला स्वताच्या ठिकाणी सर्वकाळ आपोआप ब्रम्हऐक्य प्राप्त होईल, मग असल्या ठिकाणी भलत्या वेळी देवरुपी बंध असो अथवा जावो परंतु अखंड बंधरहित ब्रम्हस्थितीत कोणताही बिघाड येणार नाही, तो कल्पाच्या आरंभी जन्मात सापडत नाही आणि ज्यावेळी कल्पाचा अंत होतो त्या वेळी मरण पावत नाही,तसेच मधल्या स्थितीकालामध्ये स्वर्ग आणि संसार यांच्या मोहाने फसला जात नाही, या आत्मज्ञानने जो योगी होतो त्याला या बोधाचा सरळपणा प्राप्त होतो कारण तो स्वर्गातील आणि संसारातील भोगांना तोलुन पाहतो आणि ते असार आहेत हे जाणून त्यांचा त्याग करतो त्यामुळे योगी निजस्वरूपाला प्राप्त होतो. हे अर्जुना ! इंद्रादिक देव स्वर्गामध्ये ऐश्वर्य-सुखाचा जो उपभोग घेतात ते देखील त्याज्य मानुन तो डावलतो. (ओवी २५१ते २६०)
जरी वेदाध्यनाने पुण्य झाले अथवा यज्ञाचे शेत पिकले अथवा तपाचे, दानाचे असलेले सर्वस्व पुण्य मिळाले अशा तऱ्हेने सर्व पुण्याचा मळा जरी फळांच्या भाराने बहरास आला तरी त्या निर्मळ ब्रम्हाची बरोबरी कोणाच्याही तुलनेलाही योग्य होत नाही, जे नित्यानंदाच्या तुलनेने ताजव्यात घातले असता छोटेसे दिसते आणि ज्याच्या प्राप्तीसाठी वेदयज्ञादी साधने करावी लागतात, जे स्वर्गसुख विटत नाही आणि संपतही नाही भोगणाऱ्याच्या इच्छा पुर्ण करते शिवाय जे स्वर्गसुख ब्रम्हसुखाचे धाकटे भावंडच आहे, अशा प्रकारे दिसण्यात जे सुख आहे ज्याला अदृष्ट अशा काम्य कर्माचा आधार आहे, आणि जे शंभर यज्ञ करून देखील कित्येकांना साध्य होत नाही, त्या स्वर्गसुखाला योगीपुरुष अलौकिक अशा ज्ञानदृष्टीच्या हातावर घेवुन कौतुकाने त्याचे अनुमान करतात, त्यावेळी ते सुख नाशवंत असल्यामुळे फारच हलके आहे असे त्यांना कळून येते मग अर्जुना ! त्या स्वर्गसुखाची पायरी करुन त्या परब्रम्हयाच्या अधिकारपदावर आरुढ होतात. असे जे चराचराने एकमेव भाग्य ब्रम्हदेव व शंकरानांही आराधना करण्यास योग्य व जे योग्यांना भोगण्यास योग्य असे भोगरुपी ऐश्वर्य आहे. जो परमेश्वर सर्व कळांची कळां आहे जो परमानंदाची मुर्ती आहे व जो संपुर्ण विश्वाच्या जीवाचा जिव्हाळा आहे जो सर्वज्ञतेचा प्रेमरुपी ओलावा आहे, जो यादवकुळातील कुलदिपक आहे, तो श्रीकृष्ण अर्जुनाला अशा प्रकारे बोलला. असा हा कुरूक्षेत्रावरील वृत्तांत संजय धृतराष्ट्रास सांगत आहे. ती गोष्ट पुढे श्रवण करा. असे योगिराज श्री निवृत्तीनाथांचे परमशिष्य कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती श्री ज्ञानदेव महाराज म्हणाले. (ओवी २६१ते २७१)
सर्वश्रेष्ठ ग्रंथराज सार्थ ज्ञानेश्वरीचा आठवा अध्याय श्री भगवंताच्या कृपेने संपन्न !
( भगवद् गीता श्लोक १ ते २८ आणि श्री ज्ञानदेवांची ज्ञानेश्वरी ओव्या १ ते २७१ )