तर आता त्याचे कूळ पवित्र झाले आहे. त्याला निर्मळ कुलीनपणा प्राप्त होतो; आणि जन्माला आल्याचे फळ नि:स्वार्थ भक्ती त्याला लाभते. तो सर्व शास्त्रेही शिकला तपामुळे तो तपस्वी झाला अष्टांग योगाचा त्याने अभ्यास केला. अर्जुना ! आता हे वर्णन पुरे ज्याची सर्व आवड अखंडपणे माझ्या ठिकाणी आहे तो कर्मबंधनातुन पुर्णपणे पार पडला आहे. केवळ प्रारब्धकर्माने त्याचे आयुष्य उरलेले असते.अर्जुना! एकनिष्ठ पेटीमध्ये मन, बुध्दी, इंद्रिय, देह यांचे सर्व व्यापार भरून ती पेटी त्याने माझ्या स्वरूपात ठेवलेली असते. तो भक्त काही काळाने माझ्यासारखा होईल असा शंकाभाव तुझ्या मनात निर्माण होईल. परंतु अरे! जो अमृतामध्ये वास्तव्य करेल त्याला मृत्यू कसा बरे येईल ? ज्यावेळी सुर्य उदयाला येत नाही त्या काळालाच रात्र म्हणायची असते. ज्याप्रमाणे माझ्या भक्तीवाचुन जे जे कर्म केले जाते ते ते महापाप नाही काय? म्हणुन हे अर्जुना ! त्या भक्ताच्या चित्ताला जेव्हा माझे ऐक्य लाभते त्या वेळेस खरोखर तो माझे स्वरुप होतो. ज्याप्रमाणे एक दिव्याने दुसरा दिवा लावावा आणि मग त्यातील पहिला दिवा कोणता, हे ज्याप्रमाणे ओळखता येत नाही त्याप्रमाणे जो मला सर्व भावाने भजतो तो मीच होऊन राहतो. मग माझी स्थिती, कांती आणि अखंड शांती त्याला प्राप्त होते फार काय सांगावे तो भक्त माझ्या जीवाने जगत असतो. अर्जुना ! याविषयी किती बरे सांगावे? जर माझ्या प्राप्तीची इच्छा असेल तर माझी प्रेमभक्ती कधीही विसरु नये. ( ओवी ४२१ ते ४३० )
अरे, माझी प्राप्ती हवी असेल तर कुळ शुध्द पाहिजे, असे काही नाही, जन्मजात श्रेष्ठपणा प्राप्त झाला असेल तर त्याची स्तुती स्वत: आपल्याच मुखाने कधीही करु नये. बुध्दीने वाढविलेला विद्ववत्तेचा हव्यास का बरे बाळगावा? आपल्या रुपाला सुंदर मानुन तारुण्याने का बरे उन्मत्त व्हावे? सत्ता व संपत्तीचा डौल का बरे मिरवावा ? हदयात माझी नि:स्वार्थ भक्ती नसेल तर इतर सर्व गोष्टी व्यर्थ आहेत.दाणे नसलेली दाट कणसे जरी पुष्कळ असली तरी त्यांचा काय बरे उपयोग? शहर भव्य दिव्य असुन ओसाड असेल तर काय बरे उपयोग? भला मोठा तलाव असुन तो आटलेला असेल, तर काय बरे उपयोग? वनामध्ये एका दु:खी माणसास दुसरा दु:खी माणूस भेटला अथवा फुलांनी फुललेले झाड सापडले पण त्याला फळेच नसतील तर हे जसे व्यर्थ. त्याप्रमाणे सर्व प्रकारचे वैभव आहे अथवा कुळजातीचा गौरव आहे, पण अतं:करणात प्रेमभक्ती नसेल तर काय उपयोग? जसे सर्व अवयवांसह शरीर आहे पण त्यात जीव नसेल तर काय उपयोग? त्याप्रमाणे माझी भक्ती नसेल, तर जीवंतपणाला काही अर्थच नाही. पृथ्वीवरील दगडाप्रमाणे त्याचे जीवन असते. हिवंर नावाच्या झाडाची सावली ही सर्वत्र पसरलेली असते परंतु त्या सावलीखाली बसल्यास वाईट बुध्दी निर्माण होते म्हणून सज्जनांनी ती सावली निषिध्द मानली आहे, त्याप्रमाणे भक्तीहिन लोकांना चुकवून पुण्य निघुन जातात. कडुलिंबाचे झाड लिंबोळयानी कितीही बहरुन आले तरी त्याचा कावळयाकरितांच सुकाळ होतो, त्याप्रमाणे अतं:करणात प्रेमभक्ती नसलेला मनुष्य केवळ पापांसाठीच वाढत असतो. षडरसांनी युक्त अन्न खापरात वाढले आणि भुताने पछाडलेल्या माणसांवरुन उतरुन चौरस्त्यावर ठेवले तर ते अन्न फक्त कुत्रांच खाऊ शकेल, त्याप्रमाणे भक्तीहिन माणसांचे जगणे हे केवळ पापाची वेल वाढविण्यासारखे असते. स्वप्नात देखील जो पुण्य करण्याचे जाणत नाही, त्याने संसार दु:खांकरिता ताट वाढुन ठेवले आहे असे जाणावे. ( ओवी ४३१ ते ४४० )
म्हणुन उत्तम कुळ नसले तरी चालेल जातीने अंत्यज असला तरी चालेल पशुंचा देखील देह प्राप्त झाला तरी चालेल परंतु भक्ती केली पाहीजे.हे पहा कि मगरीने पाण्यामध्ये गजेंद्राला धरले त्या वेळी गजेंद्राने मोठया काकुळतीने माझे स्मरण केल्याने मी धावुन आलो आणि त्याला माझी प्राप्ती झाली त्यामुळे त्याचा पशूपणा व्यर्थ झालाच कि नाही? हे अर्जुना ! अधमाहुन सुध्दा अधम आणि जिचे नावदेखील घेणे वाईट आहे अशा पापयोनीमध्ये ज्यांनी जन्म घेतला आहे ती पापयोनीत जन्मलेली माणसे दगडासारखी अज्ञानी जरी असली तरी काया, वाचा आणि मनाने सर्वभावे माझ्या ठिकाणी स्थिर झाली ज्यांच्या वाणीत सदैव माझेच नाव असते, ज्यांचे डोळे माझेच रुप पाहण्यात रमलेले असतात ज्यांचे मन माझ्याच प्राप्तीचा संकल्प करते, ज्यांचे कान माझ्या लिला विलास ऐकण्यावाचुन रिकामे नसतात ज्यांच्या सर्व देहाच्या ठिकाणी सेवेशिवाय दुसरे कोणतेच भूषण नसते ज्यांच्या बुध्दीला विषयांचे स्मरण देखील होत नाही, जे मला एकटयालाच जाणतात, अशा भक्तीचा लाभ झाला तर ते जगणे चांगले नाहीतर जीवन मरणप्राय होते. हे अर्जुना ! याप्रमाणे सर्व प्रकारांनी ज्यांनी आपल्या सर्व वृत्तीनां जगवण्याकरिता मलाच ओलावा केला आहे. ते पापयोनीमध्ये जन्म घेतलेले असोत अथवा शांस्त्राचा अभ्यास देखील न केलेले असोत पण त्यांची जर तुलना माझ्याबरोबर केली तर ते मजपेक्षा कमी नसतात. असे पाहा कि, भक्तीच्या संपन्नतेने दैत्यांनी देखील देवांना मागे टाकले. त्या भक्तीच्या महात्म्यासाठी मला नरसिंह-अवतार धारण करावा लागला. (ओवी ४४१ ते ४५०)
हे अर्जुना ! ज्या प्रल्हादाला माझ्यासाठी अनेकांनी खूप त्रास दिला, तो प्रल्हाद भक्तीने श्रेष्ठ झाला, माझ्या भक्तीने जे प्राप्त होते ते, माझ्या भक्ताच्या कथा ऐकल्यानेही प्राप्त होते. तसे पाहिले तर प्रल्हादाचे कुळ हे दैत्याचे होते, परंतु इंद्र सुध्दा प्रल्हादाएवढी योग्यता प्राप्त शकला नाही म्हणुन माझ्या प्राप्तीसाठी भक्ती हे प्रमाण आहे, जाती हे अप्रमाण आहे. राज्याच्या आज्ञेची अक्षरे शिक्क्याच्या रुपात ज्या एका कातडयाच्या तुकडयावर उमटवली जातात त्या कातडीच्या बदल्यात बाजारात अनेक प्रकारच्या वस्तु विकत मिळतात. प्रत्यक्ष सोने-रुपे जरी असले तरी त्याचीं व्यवहारात नाणे म्हणुन किमंत नसते, येथे राजांची आज्ञा हेच प्रमाण होय आणि त्याच राजशिक्क्याच्या कातडयाने सर्व वस्तू विकत मिळत असतात. त्याप्रमाणे आपला उत्तमपणा त्याच वेळेला टिकेल त्या वेळीच आपली सर्वज्ञता मान्य होईल ज्या वेळी मन आणि बुध्दी माझ्या निस्वार्थी प्रेमाने भरुन जाईल. म्हणुन हे अर्जुना ! उत्तम कुळ, जाती, वर्ण ही सर्व माझ्या प्राप्तीची कारणे नाहीत, माझ्या ठिकाणी अनन्य होण्यातच जीवनाची सार्थकता आहे. मन कोणत्याही हेतुने माझ्याशी ऐक्य पावेल असे करावे एखादा माझ्या स्वरुपाशी ऐक्य पावेल तर मागील जाती, कुळ, पाप या गोष्टी निष्फळ होतात. ज्याप्रमाणे ओढे, नाले वगैरे भेद तोपर्यत असतात जोपर्यत त्यांचे पाणी गंगाप्रवाहाशी ऐक्य पावत नाही, एकदा का ते पाणी गंगेमध्ये मिसळले की ते गंगारुप होऊन जाते. किवां हे लाकडे खैरांची आहेत, ही लाकडे चंदनाची आहेत, हा भेद तोपर्यत असतो जोपर्यत ती लाकडे अग्नीमध्ये घातली जात नाहीत. त्याप्रमाणे क्षत्रियं, वैश्य, स्त्रियां, शुद्र किवां अत्यंजादी तोपर्यतच तिला भिन्न आहेत, जोपर्यत माझ्याशी निस्वार्थी प्रेमाने त्यांचे ऐक्य होणार नाही. (ओवी ४५१ ते ४६०)
ज्याप्रमाणे मिठांचे कण समुद्रात घातल्यावर समुद्राशी एकरुप होऊन जातात त्याप्रमाणे सर्व भावाने मला शरण आल्यावर जाती, व्यक्ती, वगैरे सर्व प्रकारचे भेदभाव नाहीसे होतात. जोपर्यत सर्व नद्यां सागरात येऊन मिळत नाहीत तोपर्यत नद्यांची नावे भिन्न- भिन्न असतात आणि पूर्वेकडे, पश्चिमेकडे वाहणारे ओघ असे भेदभाव करतात. कोणत्याही एका निमित्ताने भक्ताचे चित्त माझ्या स्वरुपात प्रवेश करुन राहिले, म्हणजे तो आपोआप माझ्याशी ऐक्य पावतो.अरे परिसाला फोडण्यासाठी लोखंडी घण त्याचेवर घातला तर त्याचेही ताबडतोब सोने होते, असे पाहा की गोपींनी प्रेमा साठी आपले चित्त माझे ठिकाणी ठेवले तेव्हा त्या माझ्याशी ऐक्य पावल्या नाहीत काय? अथवा भीतीच्या निमित्ताने कंसाने मला प्राप्त करुन घेतले नाही काय? किवां माझ्याशी सदैव वैर केल्याने शिशुपाल, वक्रदंत आदींनीं माझी प्राप्ती करुन घेतली नाही काय ? अरे अर्जुना ! नातेपणांच्या संबंधांनेच यादवांना माझे सायुज्यपद मिळाले, का ममत्वामुळे वासुदेवादिक सर्वानां माझी प्राप्ती झाली? नारदाला, ध्रुवाला, अक्रुराला, शुक्राला आणि सनत्कुमारांना अर्जुना, ज्याप्रमाणे मी भक्तीप्रेमाच्या योगाने प्राप्त करुन घेण्यास योग्य झालो आहे. अशा प्रकारे सर्वाना मीच एक शेवटचे मुक्कामाचे ठिकाण आहे म्हणून निस्वार्थ भक्तीने, विषयभक्तीने, वैराग्याने अथवा विरोधभक्तीने (माझ्याशी वैर स्वीकारुन ) कोणत्याही जातीमध्ये जन्माला येवुन निस्वार्थ भक्ती करुन माझी प्राप्ती करुन घेता येते. (ओवी ४६१ ते ४७०)
म्हणून अर्जुना, असे बघ की, माझ्या स्वरुपात लीन होण्यासाठी येथे उपायांची उणीव नाही तसेच धर्माचे, जातीचे, कुलाचे, वर्णाचे, आश्रमाचे, गोत्रांचे, स्त्रियां अथवा पुरुष असे कोणतेही बंधन नाही. मग जे ब्राम्हण, सर्व वर्णामध्ये छत्र-चामराप्रमाणे सर्वाच्या वर असणारे आहेत, ज्यांना स्वर्ग हा इनाम दिलेला गाव आहे, मंत्रविद्येचे जे माहेर आहेत, जे या पृथ्वीवरचे जणु देवच आहेत जे तपाचे मुर्तिमंत अवतार आहेत ज्यांच्या योगाने सर्व तीर्थक्षेत्रांचे दैवच जणु उदयाला आले आहे जेथे अखंड यज्ञयागाचे सदैव वास्तव्य असते जे वेदांचे जणु काही वज्रकवच आहेत ज्यांच्या कृपादृष्टीच्या मांडीवर कल्याणाची वृध्दी होत असते ज्यांच्या परमश्रध्देच्या ओलाव्याने वेद, शास्त्र-पुराणांत सांगितलेले कर्म विस्तार पावत असते ज्यांच्या संकल्पाने सत्य हे समाजामध्ये जिवंत असते ज्यांच्या आर्शीवादाने अग्नीचे आयुष्य वाढले म्हणून सागराने आपले जल यांच्या प्रेमासाठी दिले.मी लक्ष्मीला दुर सारुन पलिकडे केली गळयातील कौस्तुभमणी काढुन हातात घेतला आणि मग ज्यांच्या पायधुळी करता छातीचा खळगा पुढे केला. (ओवी ४७१ ते ४८०)