पाठीराखा-साई- ११

भक्तवत्सल बाबा

 

हरी ॐ बाबा… !  ही श्री सदगुरु साईबाबांचीच योजना आहे. ती माझ्या मनपटलावरील बाबांच्या काही आठवणी. बाबांची सेवा, साधना, जप, नामस्मरण करताना मला आलेली प्रचिती शब्दरुपात व्यक्त होत आहे. त्यासाठी वेळ मिळत आहे आणि बाबांच्या सेवेसाठी चार ओळी शब्दबध्द होत आहेत. या अगोदर माझी अशी कोणतीच योजना नव्हती. त्यामुळे बाबांची निस्वार्थी भक्ती करायची. घडेल तेवढी बाबांची सेवा करायची. मिळेल तेवढा बाबांचा सहवास अनुभवयाचा हाच हेतू मनात असतो. काही मागू म्हणालो तर मागू शकत नाही. जेव्हा जेव्हा शिर्डीत जातो. समाधीपुढे लीन होतो. दर्शन घेवून मंदिरातून बाहेर येतो. तेव्हा आठवण येते अरे अरे बाबांना अमूक अमूक गोष्ट बोलायची विसरुन गेलो. असो. ही भक्ती सुध्दा बाबा मानून घेतात. बाबांच्या सहवासामुळे त्यांच्यावरील प्रगाढ श्रध्देमुळे जीवनात अडचणी आल्या तरी त्यावर मात करीत गेलो. ही सर्व बाबांचीच कृपा. जीवनात काय करायचे, काय नाही याची काहीच समज नसताना बाबांच्यावर आपोआप श्रध्दा जडली. सातारा येथील सोमवार पेठेतील पांडुरंग शंकर भुजबळ उर्फ साईरंग महाराज यांच्या साई दरबारामुळे ती वाढली. साई दरबाराविषयी ऐकले असता गावातील लोक दर गुरुवारी वारी करायचे. मी मात्र आजही त्या स्थानी गेलो नाही कदाचित योग नव्हता. कोठून तरी बाबांचा लाल कफनीतील फोटो मिळाला. तोच मला आवडला. त्याच फोटाचा पूजापाठ माझ्या अल्पबुध्दीला करता येईल त्याप्रमाणे केला आणि आजही बाबांच्या सेवेत आहे. तरीही रोज च बाबांच्या पायाशी मागणे मागावे असेच घडलेच नाही आणि मागावे असे बाबांनी ठेवलेच नाही. सारे बाबांच्या कृपेने आपोआपच मिळाले. असा संत महात्मा भूतलावर शोधूनही सापडणार नाही. गंगागीर महाराजांचे उद्‌गार साई सचरित्रामध्ये दिलेले आहेत. ते म्हणतात, हा हिरा आहे. आज जरी उकिरडयावर पडला असला तरी पुढे कोंदणात बसणार आहे. तरी रस्त्यावर फिरणाऱ्या या हिऱ्याची किमंत कमी समजू नका. अक्कलकोटकर महाराजांचे शिष्य आनंदनाथ महाराज शिर्डीस आले तेव्हा बाबांना पाहताच म्हणाले होते, हा हिरा आहे, हे माझे बोल कधीच खोटे ठरणार नाहीत. आमचेही भाग्य थोर. या हिऱ्याच्या सानिध्यात राहण्याचे. त्या हिऱ्याची समाधी रुपात सेवा करण्याचे परमभाग्य लाभले. त्यांच्याशी प्रामाणिकपणे एकरुप होता आले व त्यांनाच गुरु करता आले. बाबांनी आमची सेवा घ्यावी. पुढेही त्यांच्या भक्तीची ओढ लावावी ही बाबांना प्रार्थना. आपली भक्ती करताना वेळ आपोआपच मिळतो. कधीही स्वार्थी भाव मनात आणू देवू नये आणि आमच्या भक्तीचा कंटाळा करु नये. मागायचे काय? आणि द्यायचे काय? किती ? ते आपण जाणतच आहात. आपणापासून अशी कोणतीच गोष्ट लपून रहात नाही. जे मिळेल त्यात आम्ही सुख मानू. आपल्या चरणी सदा लीन राहू. एवढे मात्र त्रिवार सांगेन. कलियुगात भगवंताची भक्ती चांगल्या प्रकारे करण्यासाठी या संसार सागरातून पूर्ण तरुन जाण्यासाठी भगवंतांच्या चरणी लीन होण्यासाठी भक्तीचा मार्ग सांगितलेला आहे. तो म्हणजे भगवंतांचे नामस्मरण, जप. ज्ञान हा मनुष्याचा सुप्त असा तिसरा डोळा आहे असे मानतात. तर त्याच सुप्त शक्तीचा चांगला उपयोग व्हावा. मनुष्याने तसा करावा अन्यथा भगवान शंकराच्या तिसऱ्या डोळयात संपूर्ण संसार विध्वंस करुन टाकण्याची प्रगाढ शक्ती आहे. ती करुणासागर, कृपा मूर्ती, कोपमूर्ती झाल्यावर विध्वंसाला वेळ लागणार किती? तसाच मनुष्याचा तिसरा डोळा हा त्याच्या नाशास कारणीभूत होवू शकतो. बाबांच्या कृपेने मला काही ज्ञान मिळाले त्या ज्ञानाचा चांगला उपयोग व्हावा म्हणून बाबांना प्रार्थना करतो. त्याच प्रमाणे इतर भक्तही प्रार्थना करत असतील. प्रत्येकाचे मार्ग वेगवेगळे असतात. परंतु आपल्या त्या कृत्यामधून देवाची भक्ती घडते असे सर्वांनाच वाटते. इतरांना जरी तो मार्ग चुकीचा वाटत असला तरी आपण केलेली भक्ती बरोबर आहे असे त्या व्यक्तीस वाटते. परंतु तसे करण्याने ज्या ठिकाणी आपण मनोभावे पूजा, प्रार्थना करतो त्या ठिकाणच्या देवदेवतांची अवस्था काय असते? याचा आपण विचार करत नाही. आपल्या उपचारामुळे त्या मूर्तीचे, देवाचे पावित्र्य राखले जाईल काय? आपल्या सारख्या भक्तांचे त्या मूर्तीने किती अन्याय सहन करायचे याचा कोणी विचार करत नाही. खास करुन यात्रेच्या भाऊगर्दीत देवांच्या बाबतची ही बाब प्रकर्षाने जाणवते. योगायोगे शिखर शिंगणापूर येथे मला शंभू महादेवाच्या मंदिराजवळ डुयटी मिळाली. बंदोबस्तानिमित्त आम्ही ५० पोलीस तिकडे गेलो होतो आणि माझी डयुटी शंभू महादेवाच्या पूर्व दरवाजाजवळ होती. बाजूसच अंजनी सुतांचे छोटे मंदिर आहे. शिखर शिंगणापूर यात्रेत दहा ते बारा दिवसात खरोखरच लाखो भाविक येवून जातात. ते त्यांना मिळणाऱ्या पूजा साहित्याने तेथील देवांची पुजा करत असतात. महाराष्ट्र शासनाने मांढरदेवी यात्रेेत घडलेल्या दुर्घटनेमुळे सर्व ठिकाणच्या मोठया यात्रांत नियम घालून दिलेले आहेत. त्यानुसार भक्तांच्या भावनेपेक्षा त्या ठिकाणी कायदा व सुव्यवस्था अबाधित कशी राहील हा विचार समोर ठेवला आहे. मानवतेच्या दृष्टीकोनातून पशुहत्या थांबवल्या गेल्या ही सुध्दा चांगली बाब असली तरी काही भाविकांना ती मान्य नाही. शासनाच्या शिक्षेचा बडगा, पैशाचा दंड आदी स्वरुपात शिक्षा घेण्यासही काही भाविक तयार असतात. कारण त्यांची पिढीजात परंपरा आहे. ती आम्ही कशी मोडायची? असे त्यांचे म्हणणे आहे. तसेच देवाचा रोष कोण ओढावून घेणार? आदी भविकांमधून बोलले जाते. शिखर शिंगणापूर यात्रेत पशुहत्या नसली तरी लाखो नारळ फुटतात. खरे तर शंकराच्या मंदिरात नारळ अर्पण केला पाहिजे. परंतु येथे येणारे भाविक ही बाब मानत नाहीत. ते देवळाच्या आसपास कोठेही नारळ फोडून अस्वच्छता करत असतात. त्याबरोबर सोबत आणलेली दवणा, फुले, बेल, चंदन आदी सरसकट देवांना वाहत असतात. सोबतचे भस्म देवाला कसेही लावत असतात. माझी डयुटी ज्या ठिकाणी होती. ते अंजनीसूतही यातून सुटणार कसे? त्या ठिकाणीही या साऱ्याचा ढीगच लागला होता. मी तासा तासाला ते सर्व बाजूस करत होतो. परंतु पुन्हा तेथे ढीग साठलेला असायचा. याच मारुतीच्या मूर्तीला सर्वच भक्त कोठेही भस्म लावायचे. भाविकांची गर्दी एवढी होती की ओरडून घसा सुकायचा. एक वेळा असेच एका भाविकावर मी रागावलो. त्या भाविकाने अंजनीसुताच्या मूर्तीस संपूर्ण अंगास भस्मांच पट्टे ओढले होते. मी त्यास म्हणालो, अरे बाबा देव बोलत नाही. म्हणून तू मनाला वाटेल तेथे भस्म लावत बसला आहेस. तुझ्या अंगावर जर असे भस्म लावले तर किती विद्रुप दिसशील. पुढे मी माझ्या कामात गेलो. मारुतीच्या मूर्तीस भस्माचे पांढरे पट्टे ओढून तो भक्त निघून गेला. अर्धा तासाने समोरील दुकानदार मला ओरडूनच म्हणाला, बाजुला व्हा. एक चित्रविचित्र उघडे अंग ठेवलेला माणूस मारुतीच्या देवळाजवळ नाचत होता. तो मघाशी मी रागावलेला भक्त होता. त्याने त्याच्या संपूर्ण अंगास चित्रविचित्र भस्म लावले होते. तसेच अंगावरील कपडे फाडून स्वत:स विद्रुप करुन देवळाजवळ वेडेवाकडे नाचत होता. मी पोलीस ड्रेस अंगावर असल्याने त्याच्या जवळ गेलो नाही. निदान माझा पंचनामा नको म्हणून कारण तो पुढे काहीही करु शकला असता. मी त्याला लांबूनच हात जोडून नमस्कार केला. त्याच्या मनात काय होते देव जाणे परंतु मी तेथून दूर जावून त्याच्याकडे दुर्लक्ष केले. त्यानंतर संध्याकाळी डयुटी संपवून परत येताना सहकारी मित्रास म्हणालो, उद्या आपण मारुतीची मूर्ती चांगली धुवून काढू. पुढे वेगळेच घडले. रात्री मला स्वप्न पडले त्यात मी कॉटवर झोपलो होतो. या स्वप्नात एक सशक्त वानर माझ्याजवळ आले. त्याला ज्या ज्या ठिकाणी भस्म लावले होते. त्या त्या ठिकाणी जखमा झाल्या होत्या. त्या एकदम भयंकर होत्या. परंतु तरीही ते वानर माझ्यावर रागवले. त्याने चांगले दोन तीन वेळा मला उचलून आपटले. यानंतर सकाळपर्यंत जागाच होतो. सकाळी आठ वाजता तयार होवून डयुटीवर जायचे होते. त्या ठिकाणी पोहचून पाहतो तर माझ्या अगोदर एक नागाबाबा येवून त्यांनी आपले बस्तान मारुती मंदिराजवळ मांडले होते. मी मारुती पुढे जावून घडल्या प्रकाराबद्दल माफी मागितली. आता नागाबाबा त्या ठिकाणी आल्यामुळे लोक त्या मूर्तीचे लांबूनच दर्शन घेत होते. जे काही द्यायचे, घ्यायचे ते नागाबाबामार्फत चालायचे. काहीही असो नागाबाबांना तेथे आणण्याची योजना साईबाबांचीच असणार. तेच किमयागार आहेत. बाबांच्या कृपेमुळे नागाबाबा रोजच माझ्या डयुटीच्या अगोदर यायचे आणि मग रात्री परत जायचे. मी ही मारुतीच्या देवळाकडे दुर्लक्ष केले. ज्यांना जशी भक्ती करायची तशी करु देत. बाबांची भक्ती केल्याने बाबांचे आशीर्वाद मिळतील. सबुरी, दया, क्षमा, शांती आम्हास लाभली. अंजनीसूत आमच्यावर कोपले म्हणून नाराज झालो नाही अथवा रागावलो नाही. उलट श्रध्देने येताना दर्शन घेवून आलो आणि चुकले, माकले माफ करा असे सांगितले. तेथील लोकांनी येताना माझा नारळ, फुले, प्रसाद देवून सत्कारही सोबत प्रशस्तीपत्रही दिले. बाबांच्या कृपेने काय होवू शकते याचा अनुभव आला. या संसार सागरातून आपली जीवन नौका चालवत असताना प्रपंचातून परमार्थ करत असताना त्या घनशामाची कृपा माझ्यावर होतच राहील. संकटे मग ती कोणतीही असोत ती येतच राहिली आणि बाबांच्या कृपेने त्याचे निवारण होतच राहिले.

 

।। हरि ॐ बाबा ।।