भक्तवत्सल बाबा
हरी ॐ बाबा… ! संतशिरोमणी साई बाबा हे अवतारी पुरुष बाबांच्याबद्दल साई सचरित्र ग्रंथात वाचले असता बाबांचे वर्णन शब्दाने केवळ अशक्य आहे. परंतु मी पामर बाबांच्याबद्दल चार शब्द लिहिण्यास बाबांनी दिलेल्या बुध्दीमुळेच घेतले. जेवढे लिहितोय तेवढे लिहीन असे कधी वाटले नव्हते. बाबांच्यावर जेवढे प्रेम करतो ते कधी कधी एवढे वाढते की मी जास्तच काहीतरी करतोय. बोलण्याच्या, मागण्याच्या ओघात मागणे मागतच असतो. खरंच मनुष्य स्वार्थी आहे. आपल्या स्वार्थासाठीच सारं काही करत असतो. जेव्हा असे विचार येतात तेव्हा मन उगाचच खायला उठते. विचारांच्या वादळात कधी कधी स्वत:शी सावरण्यास मी मात्र असमर्थ ठरतो. माझेच घ्याना पीएसआय झाल्यावर बाबांची सातारा साई मंदिर गोडोली येथ सकाळची आरती ते रात्री शेजारतीपर्यंतचा एक दिवसाचा संपूर्ण पूजा खर्च करायचा ठरवला. कारण शिर्डीत बाबांच्या मंदिरातील अफाट गर्दीमुळे तेथे शांतपणे पाच ते दहा मिनिटे दर्शन अशक्य आहे. त्यामुळे सातारा येथील बाबांच्या मूर्तीस आपण संपूर्ण पोषाख केला तर तो दिवसभर त्यांच्या अंगावर राहील त्यामुळे तसे ठरवले. सातारा सम्राट गणेशोत्सव मंडळास १००१ रुपये देणगी, सांगलीच्या गणपतीला १००१ रुपये देणगी, अंबाबाईच्या मंदिरात १००१ रुपये देणगी, पोलीस गणेश मंडळास १००१ देणगी, कोेटेश्वराची दहीभाताची पूजा, पेढयाच्या भैराबास अभिषेक, ज्योतिबा कूलदैवताचे दर्शन, साईमंदिर शिर्डी येथे दर्शन आदी नवस बोललो होतो. परंतु, आपण असे नवस बोलून देवांना फसवत तर नाही ना? पीएसआय झाल्यावर हे सगळे करणारच तोवर नाही तर मग हे सारं मानसिक समाधान. मनात काहीतरी आशा, स्वार्थ. आपले इप्सित साध्य झाले तरच हे करायचे अन्यथा करायचे नाही काय? मग कशाला हे सारं? संपूर्ण सृष्टीचा जो निर्माता आहे. पालन, पोषण तोच करतो. तिथे माझ्या छोटयाशा नवसाचा बोलण्याचा काय पाड? असे विचार करत आपण त्या विधीच्या विधात्याला काय देवू शकतो? तोच तर सारी सृष्टी चालवतो मग हे नवससायास नकोच. असे बाबांना बोलून यायचे म्हणून. स्वत:वर रागवत बाबांचे मंदिर गाठले. दर्शन घेतले. पुढे मंडपात येवून बसलो. जे काही मनात होते ते सारे बाबांच्या पुढे बोलायचे. अगदी मनसोक्तपणे मन मोकळे करायचे. त्यामुळे या साऱ्यापासून सुटका करुन साधी भक्ती करायची ठरवले. कशाचे काय? जेवढया तावातावाने व जे बोलायचे ठरवून गेलो ते सारे तसेच राहिले. मी बाबांच्या मूर्तीकडे डोळे उघडे ठेवून पहात असताना बाबांची मनोहर, सुंदर हसरी मूर्ती अधिक तेजोमय दिसू लागली. त्या शांत मूर्तीने मलाही शांत केले. माझे विचार कोठच्या कोठे पळून गेले. बाबानाच माहिती. मी मात्र गलितगात्रपणे बाबांकडे पहात होतो. बाबांच्या मूर्तीच्या डोक्यावर ठेवलेल्या दोन जास्वंदाच्या फुलापैकी एक फूल चक्क हलत होते. दुसरे स्तब्ध होते. असे बराच वेळ चालू होते. अधूनमधून ध्यानामधून विचलित होत होतो. वाऱ्याचा, उघडया खिडकीचा अंदाज घ्यायचो पण तसे होत नव्हते. एक फूल हलत होते. एक फूल तसेच होते. बाबांनी मला साईमय करुन टाकले. मी त्या मूर्तीत मी प्रत्यक्ष आहे याचे प्रमाण दिले. माझे विचार बदलले. पुढे सायंकाळी थोडया वेळाने बाबांची आरती असल्यामुळे आरतीसाठी थांबलो. बाबांचे पुन्हा आभार मानले. बाबांचे करोडो भक्त आहेत. कितीतरी श्रीमंत आहेत. गर्भश्रीमंत आहेत. लाखो करोडो रुपये बाबांच्यासाठी खर्च करतात आम्ही मात्र आमच्या कष्टाच्या पैशातून चार पैशातील एक पैसा बाबांसाठी हक्काने देत असतो. म्हणत असतो बाबा या संसाराच्या रहाटगाडग्यातून आपल्या सेवेसाठी वेळ द्या. आणखीन कमाई वाढू द्या. म्हणजे गोरगरिबांना मदत करता येईल. असो. हे चालूच राहणार. बाबांची सेवा हे आमचे कर्तव्य आहे. ते आम्ही करत राहणार.
त्या कृपासिंधू बाबांची महान कृपा झाली आणि अगाध करणी घडली. साई भक्तीच्या या रचना स्फूरण पावून शब्दबध्द होत गेल्या. ही माझ्या भक्तीची प्रगाढ उपासना आहे. हळू हळू बाबांच्या भक्ती मार्गाला लागलो. त्यात कोणाचीही सक्ती नव्हती. की आसक्ती नव्हती. होती ती पूर्वजन्माची पुण्याई. सर्व शक्तीमान सृष्टीचा नियंता, निर्माता, पालनकर्ता, नाशकर्ता भगवान शिवांचा अंशात्मक अवतारी पुरुष परब्रम्ह साईबाबा यांच्या सेवेशी सादर व्हायला सक्ती नकोच मुळी. पाहिजे पूर्वसंचिताचे पुण्य. ज्याची असेल अशी पुण्याई तर तो होईल उतराई. कृपा माऊली श्री साईबाबांची नवविधा भक्ती बाबांनी आपल्या निर्वाणाच्या वेळी राधा माऊलीस आठवणीने दिलेली ९ नाणी साईरंग महाराजांनी बाबांची भक्ती करताना लिहिलेली ९ पुस्तके यातील साई सचरित्र हे मराठी रुपांतर मराठी वाचकांसाठी अमृताचे भांडार आहे. भक्तवत्सल बाबा या कडीचा हा ९ वा भाग आहे. ही बाबांसाठी अर्पण पुजा आहे. या कडीतच पुढे मी सातारा साई परिवारातील एक सदस्य झाल्याची एक हकीकत सांगतो. २००५ च्या दरम्यान बाबांना नवस बोललो होतो. पीएसआय झाल्यावर आपल्या साई चिंतन त्रैमासिकाची आजन्म सभासद म्हणून वर्गणी भरेन. परंतु बोललो म्हणजे झाले असे नाहीच मुळी. इतके सभासद असतील त्यात मी एक झालो नाही म्हणून काय फरक पडणार होता. काहीही असो. वर्गणी भरण्याचा योग येतच नव्हता. माझी पूर्व परीक्षा झाली. मुख्य परीक्षा झाली. यथावकाश शारीरीक चाचणी झाली. तेही पास झालो. हे सर्व बाबांच्या कृपेने झाले. २००८ साल आले मुलाखतीचे वेध लागले होते. परंतू त्यात काही नाव येत नव्हते. पहिल्या लिस्टमध्ये नाव नव्हते. नंतरच्या लिस्टमध्ये नाव नव्हते. ही प्रक्रिया लांबत चालली होती. शेवटी मी वर्गणी भरण्याचे आठवून आपले काम झाले अथवा न झाले तरी बाबांना कोडयात कशाला टाकायचे ? असा विचार करुन नवस बोलल्याप्रमाणे साईचिंतन त्रैमासिकांची ९०० रुपये वर्गणी गोडोलीतील साई मंदिरास २५ वर्षे पूर्ण झाल्याप्रित्यर्थ झालेल्या कार्यक्रमादिवशी भरुन सभासद झालो. बाबांचे दर्शन घेतले. पुढे साईरंग महाराजांचे दर्शन झाले. त्या दिवशी असणारा महाप्रसाद घेतला. त्यानंतर सभा मंडपात येवून थोडा वेळ ध्यानस्थ झालो. त्यानंतर मनात सहजच विचार आला आता आपण साई कुटुंबांचे सदस्य झालो. साईमय झालो. बाबांच्या कृपेने हा ही नवस त्यांनी पूर्ण करुन घेतला. कृपेची सावली बाबा स्वत: शाम्याकडून विष्णूसहस्त्रनाम पोथी वाचून घेत. हेमाडपंथाकडून, दामाजीकडून, तात्या कोते पाटील यांच्याकडून, जोग यांच्याकडून, दीक्षीत यांच्याकडून, बाळासाहेब देव या सर्वांकडून हरिपाठ, कीर्तन, गुरुचरित्र, रामायण आदी वाचन, भजन, कीर्तन करुन घेतले. बाबांची भक्ती करता आहात. म्हणून वरीलप्रमाणे भक्ती केलेली बाबांना आवडत नव्हती असे नाही. तर ते प्रत्येक भक्तास त्याच्या त्याच्या कुलदेवतेची आवडीच्या देवतेची पुजाअर्चा करण्यास सांगत. मी शाहूपुरी सातारा येथे राहतो. पश्चिमेला यवतेश्वराचा डोंगर आणि जोडूनच भैराबाचा पायथा या क्षेत्राला पेढयाचा भैराबा म्हणून दैवत आहे. या ठिकाणी गडकरआळी परिसरातील भाविक देवाची यात्रा साजरी करतात. भैरोबाची पालखी निघती. तिची मिरवणूक श्री. छ. शिवाजी महाराजांच्या वंशजांच्या जलमंदिर या राजवाडयावर जाते. चैत्र कृष्ण चतुर्थी दरवर्षी होणाऱ्या यात्रेत पेढे आणि गुलालाची उधळण भक्त करतात. आम्ही शाहूपुरीत रहावयास आल्यापासून भैरोबाच्या दर्शनास जात असतो. यात्रेचा दिवस आम्हास माहिती नव्हता. एकमेकांच्या तोंडून ऐकून जायचो. यावर्षी मी सुट्टी घेतल्याने घरीच होतो. गुरुवारचा साईबाबांचा उपवासही होता. त्या दिवशी चतुर्थीही होती. चंद्रोदय रात्री १० नंतर होता. माझ्या डाव्या पायास गुडघ्याजवळ अपघातात लागल्याने मी विश्रांती घेत होतो. अचानक दुपारच्या वेळी लोखंडीगेट वाजले. त्यामुळे माझे वडील बाहेर गेले. बाहेरील व्यक्तीशी बोलून ते आत आले. त्यांना मी विचारले, कोण आहे? असे विचारत विचारत मी बाहेर आलो. बाहेरील उभी असलेली व्यक्ती म्हणाली तुम्हालाच शोधत होतो मी. अहो आज भैरोबाची यात्रा आहे. ते सांगायला आलो आहे. वर्गणी देता की नाही. मी म्हणालो, पावती पुस्तक आहे का? ते म्हणाले, पावती पुस्तक नाही. ठीक आहे यात्रा आहे तर मी मंदिरात जाणारच आहे. त्यानंतर वडील पैसे घेवून बाहेर आले परंतु तोपर्यंत ती व्यक्ती रस्त्यावर कोठेच दिसली नाही. हा श्री साईबाबांच्या कृपेने भैरवनाथाने प्रत्यक्ष साक्षात्कार दिला. परंतु मी ओळखू शकलो नाही. पुढे मी साताऱ्यात जावून मोठा हार व पेढे घेवून आमच्या बहिणीच्या घरी गेलो. तेथे भाऊजींना विचारले. आज यात्रा असून सुध्दा तुम्ही का सांगितले नाही. ते म्हणाले, तुमच्या घरातील यात्रेसाठी कोणी येत जात नाही. त्यामुळे सांगितले नाही. त्यानंतर त्यांना मी दुपारची हकीकत सांगितली. ते म्हणाले, आपण निष्ठावंत भक्त आहात. वेळात वेळ काढून इतर वेळी दर्शन घेत असता. आज यात्रेच्या दिवशी आपले पुजा, दर्शन चुकले असते. त्यामुळे भैरोबाच कोणत्या ना कोणत्या रुपाने येवून आपणास जाग देवून गेले आहेत. त्या दिवशी माझ्या डाव्या पायाच्या गुडघ्यास बँडेज बांधलेले असतानाही मी काठीच्या सहाय्याने डोंगर चढला. देवळात गेल्यावर पुजारी दिसले. ते घरी आलेल्या व्यक्तीसारखेच वाटले. त्यामुळे त्यांना विचारले. तुम्हीच मघाशी मला बोलवण्यास आला होता ना? ते म्हणाले, यात्रेच्या दिवशी एवढी गर्दी असते. मला सवड कोठून मिळणार? तेही मी तुमच्या घरी कशाला येवू? असो. देवाधिदेव भैरोबाने मला दर्शन दिले. हे मात्र नक्की परंतु मी त्यांना ओळखू शकलो नाही. हे माझे दुर्भाग्य आणि काही वेळ त्यांना मी आणि वडील भेटलो, बोललो ते सौभाग्य. बाबांच्या कृपेमुळे असे जिवंत बरेच अनुभव येतात. आमची भोळी भक्ती सुरुच असते. चुकले माकले क्षमा करा आणि आम्हा सर्वांचे कल्याण करा. आमच्या हातून आपली भक्ती घडू द्या हे मागणे मागत असतो.
।। हरि ॐ बाबा ।।