पाठीराखा-साई- १६

भक्तवत्सल बाबा

 

हरी ॐ बाबा… !  भक्तवत्सल बाबांच्याबद्दल लिहायचे हाच माझ्या लेखनकलेचा मोठा गौरव होता. हा सोहळा बाबांनीच घडवून आणला आणि कधीही शक्य नाही अशी आतापर्यंतची पाने भरुन गेली. लिहायच लिहायचे काय? बाजूसच राहून गेले आणि लिहायचे किती ? हा प्रश्न पडला मला हे माहिती नाही की माझे अनुभव छापून भक्त वाचतील की नाही. परंतु या लिखाणात, अनुभवात बाबांचा सहवास नक्की लपला आहे. मीच भाग्यवान समजतो की बाबांच्या अनमोल कृपेमुळे हा शब्दप्रपंच अचानक साधला गेला. पुढे मला लिहिण्यासाठी अखंड शब्दभांडार आणि वेळ बाबा देत राहिले. हे सर्व आपोआप घडत गेले. सातारच्या साईमंदिरातील दीपक जॉईल या भक्ताची गाठ पडली आणि त्याच्याकडून ९ गुरुवारचे बाबांचे व्रत करण्याची संकल्पना लाभली. बाबांची भक्ती मनोभावे चाललीच होती. त्यातच २००२ साली पुण्यात बाबांच्या कृपेने बदली मिळाल्यामुळे आणखी भर पडली आणि बाबांच्या नित्य सहवासात पडलो. भरतीनंतर एवढी वर्षे बाबांच्या सानिध्यापासून दूर काढली. पुण्यात मात्र बाबांचा नित्य सहवास मिळाला. पुढे हळू हळू माझ्या मनातील कल्पनांना मार्ग मिळू लागला आणि माझी पावले पोलीस फौजदार परीक्षेचा अभ्यास करुन पुढे पुढे पडू लागली. सर्व काही बाबांच्या कृपेने घडू लागले. बाबा ते घडवत होते. करता करता २००८ साल उजाडले आणि मी बाबांच्या भक्तीत एवढा गुरफटून गेलो की कोणत्या ना कोणत्या रुपात बाबांची सेवा करत राहू लागलो. अचानक वेळ आल्याने ९ गुरुवारचे व्रताचे पुस्तक त्याच भक्तीचा भाग म्हणायचा. बाबांनी हे गुरुवार करण्याचे आदेश कसे दिले याचा अनुभव. मार्च महिन्यात शिर्डीस जाण्याचा योग बाबांनी आणून दिला. गुरुवारचे दर्शन झाले. तेथून येताना मला अचानक प्रेरणा झाल्याने बाबांना मी मनातच म्हणालो पुढील गुरुवारपासून मी उपवास करणार आहे. पुढे उपवासही चालू केले होते. साधारणत: दोन महिन्यानंतर ज्या प्रकारे ९ गुरुवार व्रताचे पुस्तक मला मिळाले. त्याप्रकारे ही उपवासाची योजना बाबांचीच होती हे समजून गेलो. फक्त गोडोलीच्या मंदिरात दीपक जॉईल या सेवेकरी भक्ताकरवी ९ गुरुवारच्या व्रताचा आदेश दिला आणि यथावकाश ते व्रतही करुन घेतले. या व्रताच्या नियमाप्रमाणे ते अत्यंत फलदायी आहे. परंतु ज्या कामासाठी ते व्रत करतो आहे ते काम झाले तरी ९ गुरुवार पूर्ण करुन मगच उद्यापन करायचे आहे. माझ्यावर बाबांनी बाका प्रसंग आणून या व्रताची परीक्षा घेतली. व्रत चालू करुन एक महिना होत आला तोपर्यंत नेटवर पीएसआयची अंतिम यादी लागली. या यादीत माझे नाव नव्हते. चार पाच वेळा सायबर कॅफेत चेक केले. मी माझ्या मित्राने, माझ्या धाकटया भावाने, पुण्यातील मित्राने माझा नंबर पुन्हा पुन्हा पाहून नाद सोडून दिला. साधारण तीन जुलै ते दहा जुलैपर्यंत प्रचंड मनस्तापाखाली काढले. ज्यासाठी गुरुवार करत आलो ते काम आता संपले होते. मग पुढे काय? बाबांचे महान चमत्कारीक व्रत मोडायचे की सोडायचे? परंतु माझ्या मनात असे काही आले नाही. सर्वमान्य, सर्वेश्वर बाबांनीच दिलेला आदेश मानून मी या गर्तेतून बाहेर येवून ९ गुरुवारचे व्रत पुढे सुरु . पुढे राहिलेले गुरुवार पूजा, अर्चा करताना पुस्तक वाचताना मी हे व्रत कशासाठी करतोय हे वाक्य सोडून देवून फक्त बाबांची भक्ती घडावी म्हणून करतोय म्हणायचो अशा प्रकारे बाबांचे ९ गुरुवार व्रत मी पूर्ण केले े. नवव्या गुरुवारी बाबांच्या मंदिरात जावून दर्शन घेतले. सर्वांना प्रसाद वाटला. घरी सर्वांना गोडधोड केले होते. ९ गुरुवारचे व्रत करताना जमलेले पैसे गोडोलीच्या साई मंदिरातील पुजारी श्री. रानडे यांना दिले आणि चांगल्या प्रकारे व्रत्ताचे उद्‌यापन करुन पुढे गुरुवारचे उपवास बंद केले. साधारणत: एप्रिल ते ऑगस्ट या कालावधीपुरते बाबांनी हे करुन घेतले. उपवासाच्या बाबतीत बाबांचाही फारसा आग्रह नाही. बाबांनी सांगितले आहे. मोकळया पोटाने देवाचा उपवास करण्यापेक्षा दोन घास खा. मग पूर्ण लक्ष देवून तन्मयतेने भक्ती करा. याबाबत बाबांनी त्यांच्या सचरित्रात देव शोधावयास निघालेल्या त्यांच्या चार साईभक्तांचे उदाहरण दिले आहे.  त्यात स्वत: साईबाबा एक आहेत. असे करुन बाबांनी व्यवहार रीत, जगरीत निभावली आहे. भाकरी डावलून देव शोधावयास निघालेल्या चौघांना देव भेटला नाही. परंतु नंतर मात्र बाबांनी चतकोर भाकरी तुकडा खाल्ला आणि पाणी पिवून देव शोधावयास निघाले तर जो वंजारी रुपात त्यांच्या बरोबर जंगलात त्यांना भेटले होते तेच गुरुरुपात प्रकट झाले. बाबा त्यांच्या परीक्षेत पास झाले. त्यांना देव मिळाला. त्यांना देव दिसला. गुरुची शाळा सापडली. त्या गुरुच्या शाळेचे वर्णन बाबांच्या तोंडून ऐकणे किती महतभाग्याचे. संसाराचे पाश तुटले, मोहमाया सुटली आणि परमार्थाची प्राप्ती झाली. मीही उपवासाची सक्ती नको म्हणून गुरुवार बंद केला. मात्र अंत:करणातून साईभक्ती बंद करु शकत नाही. ती तर माझ्या नसानसात भिनली आहे. बाबा ती करुन घेतात. बाबांच्या चरणी प्रार्थना आपला सहवास, आपली आस जन्मोजन्मी लाभू दे. लेखणी साईचरणी स्थिरावून हरि ॐ.

माझ्या साईबाबांची गोडी अमृताते पैजा जिंकी अशीच आहे. ज्याच्या मुखी सदासर्वदा साईनाम आहे तो कोणती आणि कशाची चिंता करील. त्याने संसाराची व्यर्थ चिंता करत बसू नये. त्याचा संसार सागर पार करण्याची जबाबदारी बाबांनी घेतलीच म्हणून समजा. मी एक शिर्डीचा फकीर पाच घरी भिक्षा मागून उदरनिर्वाह करतो. माझ्या मागे कुणीच नाही. कोणताही संसार नाही. मग चिंता कशाला? एकदा दोन शेळयांची ३२ रुपयांना खरेदी करताना वरील बोल बाबांनी त्यांच्या भक्तांना सुनावले. तीन चार रुपयांच्या शेळया तेवढया रुपयांना का घेतल्या? असा प्रसंग त्यांना सांगून त्या दोन शेळयांची पूर्वजन्माची कहाणी सांगितली. त्यानंतर त्या शेळयांना पोटभर चणे खाण्यास देवून पुन्हा कळपात सोडून दिले. बाबांची किमया आणि ते करणारे किमयागार बाबा. येथे चमत्काराची काहीच कमी नाही. म्हणूनच एका भक्ताला ओगलेवाडीच्या दक्षिणेस कराडजवळील मच्छिंद्रगड येथील पोथीवाचन करण्यास सांगितले. तेथ तुला मी दर्शन देईन असे सांगून त्यास दर्शन दिले. बाबांची करणी वेगळीच असायची. एकदा रोजच्या वाचनातील पाठ राहिल्यामुळे बाबांचे एक भक्त त्यांच्याजवळ आले. परंतु त्यांची ती इच्छा तशीच राहिल्याचे जाणून बाबांनी त्यांना शाम्याकडे पाठवून दिले आणि १५ रुपये घेवून येण्यास सांगितले. शाम्या उर्फ माधवराव देशपांडे पुजाअर्चा करेपर्यंत त्यांच्या घरात असलेले नाथ भागवतातील राहिलेला अध्याय त्या भक्तांनी वाचून काढला. थोडया वेळानंतर शाम्यांनी त्यांना १५ रुपये ऐवजी १५ नमस्कार बाबांना दिलेत म्हणून सांगण्यास सांगितले. अशा रीतीने त्या भक्ताच्या रोजच्या वाचनातील राहिलेला नाथ भागवताचा अध्याय वाचून घेतला असे हे बाबा. मीही त्यांच्या नजरेतून सुटणे अशक्यच. नवनाथांची पोथी वाचण्याची इच्छा झाली त्यामुळे नवनाथ भक्तीसार खरेदी करुन दिला. पुढे तो वाचायचा कसे. मोकळा वेळ मिळेल काय? आपल्या डयुटीतून हे साध्य होईल काय? हे सारे विचार करण्यापुरते होते. आठवडा सुट्टीत मोटार सायकलवरुन परिवारासह सासरवाडीस चाललो असता चाफळ फाटा येथे अचानक मारुती गाडी पुढे आल्याने छोटा अपघात झाला. त्यामुळे माझ्या पायास लागले. पोलीस हॉस्पिटलमधून उपचारासाठी सात दिवसांची सुट्टी मिळाली. घरी बसून सात दिवस काय करायचे हा विचार मनात सुरु असताना बाबांनी अचानक नवनाथ भक्तीसार वाचण्याची प्रेरणा दिली. ग्रंथ उघडून तो कसा वाचावा. कोणत्या दिवशी वाचन सुरु करावे हे पाहिले. पारायण करायचे असल्यास गुरुवारी सुरु करावे लागते. त्यानुसार दुसऱ्या दिवशीचा वार गुरुवार होता. बाबांनी वेळही दिली होती. मग पारायण सुरु केले. पुढे अपघाताची जखम बरी न झाल्याने आणखीन सात दिवस सुट्टी मिळाली आणि मी ९ दिवसांचे नवनाथांचे भक्तीसार ग्रंथाचे पारायण, उद्यापन करु शकलो. बाबांचा चमत्कार पहा. पारायण वाचन झाले. किमान दोन वाजले असतील. उपवास असल्याने खिचडी खावून बसलोच होतो एवढयात पोस्टमन घरासमोर आले त्यांनी माझे नाव घेवून आवाज दिला. मी बाहेर जावून त्यांच्याकडून एक पत्र घेतले. ते एमपीएससीचे पत्र होते. वडिलांकडून १० रुपये घेवून त्यास दिले आणि पत्र बाबांच्या फोटोजवळ ठेवले. त्यानंतर थोडया वेळाने उघडून पाहिले असता ते आयोगाचे मुलाखतीस बोलावण्यात आल्याचे पत्र होते. सात मे २००७ रोजी मुलाखत होती. बाबांच्या  कृपेने हा केवढा मोठा योगायोग. पुणे येथे मुलाखतीसाठी जाण्याअगोदर अभ्यासाऐवजी नवनाथ कथासार ग्रंथाचे पारायण करुन घेतले आणि पारायण संपता संपता मुलाखतीचे पत्र म्हणजे दुग्धशर्करेचा योग. मुलाखतीसाठी जाण्याअगोदर नाथ कथासार वाचून घेवून मुलाखतीचे मोठे संकट किती सोपे केले याचा प्रत्यय मुलाखत देवून आल्यावर आला. अशा या प्रत्ययकारी बाबांच गुणगाण किती आणि कसे करावेत हाच प्रश्न पडतो.

।। हरि ॐ बाबा ।।