पाठीराखा-साई- १७

भक्तवत्सल बाबा

 

हरी ॐ बाबा… !  भक्तीचा महिमा अगाध आहे. अपरंपार आहे. ज्या भावनेने आपण ईश्वराची सेवा करतो त्या भावनेने तो आपणाकडे पहात असतो. तो करुणा आणि दयेचा सागर आहे. सर्वसृष्टीत भरुन उरला आहे. सर्व प्राणीमात्रात आहे. आपली त्याच्याकडे पाहण्याची दृष्टी, त्याला शोधण्याची दृष्टी जशी असेल तसे तो साक्षात्कारही देतो. या सृष्टीचा तो नियंता आहे. कर्ता आणि करिवता आहे. भोगदाता आहे आणि भोक्ता आहे. शिव  आहे आणि शक्तीही आहे. दृष्टीरोचक आहे आणि दृष्टीअरोचकही आहे. त्यास तुमचा भक्तीचा भाव पाहिजे. जो सर्वसृष्टी चालवतो. ज्याने निर्माण केली, जो पालन करतो. समयानुसार विनाश करणारा आहे. त्या  विधात्यास तुम्ही काय देवू शकता. ज्या ज्या रुपात तुम्ही त्याची पूजा, अर्चा करता त्याच रुपात तो तुम्हास प्रचिती देतो. आपल्या आचरणानुसार आणि कर्मानुसार फळ देतो. तरीही तो फक्त तुमच्या भावाचा भुकेला आहे. परमार्थाचा भुकेला आहे. अर्थाचा नाही. कोणी एक कोटी दान दिले. कोणी हिरे, माणिक, मोती, सोने चांदी दिले. सहस्त्रभोजन दान दिले तर तेथेच कोणी चार उद्‌बत्या, कापुर, खडीसाखर, फुले भक्तीभावाने अर्पण केली. यथाशक्ती दान केले तरी एक कोटी देणारास आपण आपल्या परीने देवाचे पुण्य मिळवले ही भावना असते. तर चार उद्‌बत्ती लावणारा सुध्दा आज देवाचे दर्शन घडले म्हणून त्याच भावनेने सुखी असतो. देव तर दोघांचेही पूजा, उपचार घेत असतो.  एक कोटी रुपयाचे दान मिळाले म्हणून यथाशक्ती अर्पण केलेले दोन रुपयाचे दान नाकारत नाही. हिरे, माणिक अर्पण केले म्हणून नारळ परत देत नाही. दोघांचीही पूजा अर्चा स्वीकारतो कारण तो श्रध्दापूर्वक भक्तीभावाचा भुकेलेला आहे. बाबांची भक्ती करताना मला क्षणोक्षणी, वेळोवेळी हाच प्रत्यय आहे. एकदा तर बाबांचे दर्शन घेण्याच्या भरात एवढा हरवून गेलो होतो की शिर्डीत गेल्यानंतर नंबर लगेच येतोय म्हटलं की मी धावतच बाबांच्याजवळ गेलो. बाबांचे दर्शन घेतले. पुन्हा आठवले आपण हार, नारळ, पेढे, कापूर, उद्‌बत्ती काहीच आणले नाही. पुन्हा बाहेर येवून दुकानातून पूजेचे सर्व साहित्य घेवून बाबांचे पुन्हा दर्शन घेतले. त्यावेळी आजच्यासारखी गर्दी नसायची. दुकानेही तेवढी नव्हती. बाबांचे शांत दर्शन व्हायचे. असो. बाबांनी अंर्तमनाने हे सर्व जाणले असेल. पूजा उपचार सर्व मी करणार होतो. परंतु, दर्शन लगेच मिळतेय म्हटल्यानंतर हा गडबडीत समाधी मंदिरात धावत आला. ठीक आहे. पूजा साहित्य घेवून याला आपण पुन्हा बोलवूया त्याप्रमाणे माझे दोनदा दर्शन झाले. अलिकडेच सातारा येथील गोडोली मंदिरात दर्शन जेव्हा जेव्हा जायचो तेव्हा बाबांचा पोशाख चांगला असल्यास त्याचा फोटो काढून ठेवला पाहिजे असे वाटायचे. एक दिवस देवळातील सेेवेकरी दीपक यास असे बोलून दाखवले. त्यानंतर नेहमीप्रमाणे आमचे चहापाणी झाले. पुढे शिंदे यांच्याजवळ येवून दुकानात पूजा साहित्याचे बिल द्यायच्या वेळी अचानक एक वृध्द गृहस्थ शिंदे यांच्या दुकानासमोर आले आणि बाबांचा एक फोटा द्या असे म्हणाले. शिंदे इतर कामात होते. ते काम सोडून त्यांनी फोटोंची भरलेली पिशवी काऊंटरवर ठेवली. आश्चर्य म्हणजे त्यात सातारच्या बाबांच्या मूर्तीचे काढलेले बरेच फोटो होते. त्या फोटोतील सर्वात वरचा फोटो मला एकदम आवडून गेला. आता वृध्द गृहस्थांनी तो फोटो बाजूस ठेवला तर घ्यायचा असा विचार करत होतो. एवढयात शिंदेंना त्यांनी किमंत विचारली. शिंदेनी किंमत सांगितली. त्यांनी ती दिली. मी  इतर फोटो पहात त्या वृध्द गृहस्थाकडे पाहू लागलो तोपर्यंत तो गायब झाला होता. मी फोटोतील आणखी फोटो पाहून आणखी दोन तीन फोटो घेतले. त्यावेळी मला काही वेळा अगोदर दीपक याच्याशी देवळात केलेली चर्चा आठवली. त्या वृध्द गृहस्थाचे निमित्त होते किंवा स्वत: बाबा त्या वृध्द गृहस्थाच्या रुपात आले या दोन्ही पैकी एक नक्की. फोटो मागून त्यांनी कृतीद्वारे सांगून दिले. गोडोलीतील साईबाबांच्या रुपातील काढलेले फोटो पिशवीत भरपूर आहेत. ते स्वस्तही आहेत. तुला वेगळा फोटोग्राफर बोलवून फोटो काढण्याची गरज नाही. मी आनंदाने ते फोटो घेवून घरी गेलो. असेच एके दिवशी कराडवरुन घरी येत असताना रोज वापराच्या साहित्याच्या छोटी पिशवी माझ्याकडे होती. त्याच्यात साईभक्ती करताना आलेले अनुभव लिहिण्याचे डायरी, ९ गुरुवारचे व्रताचे पुस्तक व नाथांच्या शाबरी विद्येचे पुस्तक. ती पिशवी मी मंडपात ठेवून बाबांचे दर्शन घेवून आलो आणि छोटाशा जप करण्यास बसलो. त्यानंतर माझा जप संपल्यानंतर माझ्या लक्षात आले. माझ्याबरोबर असलेल्या तिन्हीही पुस्तकांची पिशवी बाबांच्या पादुकाजवळ ठेवून छोटीशी पूजा करुन घेवूया. म्हणून मी पुन्हा दर्शनास गेलो असता बाबांच्या समाधीजवळ असलेले सेवेकरी महाडिक तेथून खाली उतरले आणि शेजारीच दुसऱ्या सेवेकऱ्याबरोबर बोलत उभे राहिले. त्यामुळे त्यांना लगेचच पुन्हा बोलावून माझ्याजवळची पुस्तके समाधीला लावण्यासाठी द्यावीत असे वाटले नाही म्हणून मी बाबांच्या पादुकाजवळ ती पुस्तके ठेवून डोळे मिटून उभे राहिलो. तो पर्यंत माझ्यामागे दर्शनास कोणीही आले नव्हते. मनात विचार आला जर समाधीजवळ महाडिक असते तर त्यांनी ती पुस्तके बाबांच्या पायास लावून त्याच्यावर एक फूल ठेवून ती परत दिली असती.  हा विचार मनात येण्याचा अवकाश की अचानक एक पिवळे जास्वंदीचे फूल आपोआप माझ्या डायरी, व्रताचे पुस्तक व नाथांच्या शाबरी विद्येच्या पुस्तकावर पडले. मी बाबांचे मनोमन आभार मानले ते इतके की अशब्दच. ही कृती केवळ योगायोग होता. असे होणे केवळ अशक्य होते. ते प्रत्यक्षात झाले होते. बाजूच्या खिडकीशेजारी उभे असलेले महाडिक  व सेवेकरी हे सर्व बघत आणि बघतच राहिले. त्या क्षणाचे ते मूक, चालते, बोलते साक्षीदार होते. मी आनंदी मनाने फुलासह तिन्ही पुस्तके छातीशी धरली आणि समाधीस प्रदक्षिणा घालून आदरपूर्वक पुस्तके पिशवीत ठेवून दिली. माझ्या साईबाबांचे भक्तीचे अनुभव या लिखाणास बाबांची अशी अनपेक्षित, अघटीत, अचानक परवानगी मिळाली. ती लिहण्याअगोदर घेतली असती तर  परंतू अशी डायरी घेवून देवळात जावून पूजा करावी असे वाटलेच नव्हते. शेवटी ही सर्व बाबांचीच योजना कधी, कोठे, कसे काय घडेल हे आपण जाणू शकत नाही. मात्र त्रिकालज्ञानी बाबांना हे अशक्य नाही. योग्य वेळी, योग्य ते सर्व बाबा करुन घेतात. आपण असतो निमित्तमात्र.

 

।। हरि ॐ बाबा ।।