तुम्ही जाणा तुमची करणी
हरी ॐ बाबा… ! हेमाडपंत उर्फ गोविंद दाभोळकरकृत श्री साई सचरित्र आणि त्याचे मराठी भाषांतर करणारे आणखीन एक हेमाडपंत उर्फ साईरंग महाराज सातारचे श्री. पांडुरंग भुजबळ यांचे साई सचरित्रात तुम्ही जाणा तुमची करणी, मला तर नित्य तुमचीच घोकणी. या बाबांनी सांगितलेल्या ओळी आहेत. या ओळीत कितीतरी मोठा अर्थ दडलेला आहे. आम्ही अज्ञान पामरे आहोत. आम्हा पामरांना भूत, भविष्य, वर्तमान याची काहीच कल्पना नसते. भलेही आपण भविष्याची चिंता करत असू परंतु, वर्तमानात काय चालले आहे? हेही आपणास माहिती नसते. परंतु, सर्वव्यापी, सर्वसाक्षी बाबांना या साऱ्यांची खबर असते. बाबांच्या अध्यायांचे वाचन केले असता. अशा प्रकाराची कितीतरी उदाहरणे दिली आहेत. हीच प्रचिती बाबांनी मलाही दाखवून दिली आणि माझी साईभक्ती आणखीनच वाढवली. मी पुणे कॅम्प येथे नोकरीनिमित्ताने रहावयास होतो. सकाळपासून सायंकाळपर्यंत दक्षिण कमांड मुख्यालय पुणे येथे नोकरीस होतो. तेथून जवळच कार्पोरेशन ऑफिसजवळ तोफखाना परिसरात नदीच्या पात्रात डांबावर ॐ नम: शिवाय असा रात्रीचा ठळकपणे दिसणारी लाईटची अक्षरे आहेत. म्हणजेच भगवान भोलेबाबांचे मंदिर असणार असा माझा समज होता आणि जेथे भोलेबाबांचे मंदिर तेथे मी एकदा तरी पोहोचणारच. पाच-सात महिने झाले तरीही मंदिरात जायला वेळ मिळाला नाही. त्याबाजूस बसमधून येता जाता फक्त बोर्ड पहायचो. परंतु, मंदिरात जाण्याचा योग आला नाही. शेवटी बाबांनी जेव्हा बोलावले तेव्हाच हा योग आला. रस्ता सोडून हे मंदिर आतील बाजूस असल्याने कधी कधी थोडाफार वेळ असला तरी कंटाळा करायचो. एक दिवस मात्र आज काही झाले तरी चालेल परंतु त्या मंदिराचा शोध लावायचा आणि दर्शन घेवूनच जायचे म्हणून मी तोफखान्याकडे आलो. विचारत विचारत पेठेच्या रस्त्याने अर्धा पाऊण किलो मीटर आतील रस्ता चालत गेल्यानंतर त्या मंदिराजवळ पोहोचलो ते मंदिर श्री साईबाबांचे होते. किती मोठे सौभाग्य. आंधळा मागतो एक डोळा आणि देव देतो दोन डोळे अशी माझी गत झाली. बाबांचेच मंदिर असल्याने मनसोक्तपणे तेथील रिवाजानुसार दर्शन घेतले आणि त्याचवेळी किमान प्रत्येक गुरुवारी या मंदिरात यायचा संकल्पच केला. भगवान भोलेबाबा म्हणजे मीच तुझा साईबाबा हे बाबांनी आणखीन एकदा दाखवून दिले. मनात फक्त बाबांच्या दर्शनाचा बाबांच्या पवित्र दर्शनाचा हेतू ठेवूनच दर गुरुवारी किंवा मोटारसायकल असल्यास वेळ मिळेल तेव्हा येथे यायचो. येथे दर्शन घेणे, प्रसाद इतरास वाटणे याशिवाय गुरुवारी रात्रीचे जेवण घ्यायचे नाही. एका गुरुवारी बाबांचा चेहरा मला काळजीग्रस्त व चिंताग्रस्त भासू लागला. येथील बाबांची मूर्ती लहान आहे तरीही चेहऱ्यावरचे भाव स्पष्ट जाणवतात. दर्शन घेवून मंडपात बाबांकडे बघत ध्यान लावून बसायचो. तोपर्यंत बाबांचे नैवेद्याचे आवडते ताट यायचे. नैवेद्य दाखवून नंतर त्याच सर्वांना वाटप व्हायचे. गुरुवारी या मंदिरात भरपूर प्रसाद मिळायचा. असे तीन चार गुरुवार येत होतो. परंतु बाबांच्या चेहऱ्यात अजिबात फरक नव्हता. मीच मनात म्हणायाचे बाबा येथे कितीतरी भक्त येतात. असेच प्रत्येक मंदिरात लाखो भक्त दर गुरुवारी येत असतील. तितकेच शिर्डीतही असतील. सारेच बाबांना काही ना काही मागणे मागत असणार. बाबांच्यावर एवढे इच्छांचे ओझे कशासाठी? कोणी त्यांना असे का म्हणत नाही. बाबा तुम्ही असे करा. निवांत कोठेतरी दूर कोठेतरी एकांतात जा. स्वस्थ चित्ताने बसा. शांतपणे वेळ घालवा. मी असे म्हणतो. बाबा आपण कोठेतरी शांतपणे जा. निवांत बसा आम्ही स्वार्थी भक्त आपणाकडे काही ना काही तरी मागतच असू. पुढे सुट्टी मिळाल्यानंतर मी सातारा येथे घरी आलो. शनिवारी सुट्टी सुरु केली की सोमवारपासून सुट्टी चालू होते. त्यामुळे शनिवारी सायंकाळी घरी आलो. रात्री घरी पोहोचल्यानंतर जे मला कळाले. त अविश्वसनीय होते. माझी पत्नी गेले दहा दिवस आजारी होती. तिच्या वेदनेचे मूळ डॉक्टरांनी मूतखडा आहे असे सांगितले होते. सोनोग्राफी करुन त्याची खात्री केली होती. खडा मोठा होता. तो ऑपरेशन करुन काढावा लागणार होता. मागील दोन दिवसापूर्वी म्हणजे गुरुवारी तो आपोआपच बाहेर पडला होता. सकाळी मी तो खडा पाहून उडालोच. तो खडा बाहेर कसा पडला हे डॉक्टरांना कोडेच होते. मात्र, सार्इंचे अमोघ कृपाछत्र असेल तर काय काय होवू शकते याचा तो जिवंत पुरावा होता. मीही पत्नीस बाबांच्या पुण्यातील मंदिरातील साईबाबांच्या चेहऱ्यावरील याच काळातील चिंतेबाबत सांगितले. ती सुध्दा साईभक्त असल्यामुळे तिला सुध्दा भरुन आले. त्यावेळी मोबाईल नव्हते. माझ्याकडेही मोबाईल नव्हता. पुण्यातील ऑफिसचा नंबर मी घरी दिला नव्हता.त्यामुळे मला काहीही समजले नव्हते. असे काही असले तरी बाबांना भक्तांची अखंड काळजी असते आणि त्यांच्या त्यांच्या भक्तीप्रमाणे ते तसा प्रत्यय देतात. बाबांना आपण कोठेतरी शांतपणे जा. निवांत बसा आणि काही वेळ घालवा अशी प्रार्थना केली होती. पंरतु ते देवळ सोडून निवांतपणासाठी सातारा येथे आले आणि माझ्या पत्नीची ऑपरेशनच्या संकटातून मुक्तता केली आणि मोठया आर्थिक खर्चापासून मलाही वाचवले. बाबांच्या चेहऱ्यावरील चिंताग्रस्त आणि काळजीग्रस्त चेहऱ्याचे गूढ हे माझ्याबद्दल होते हे मला घरी आल्यावर कळाले. असे हे अलौकिक बाबा मी अनुभवले. बाबा म्हणतात, त्याप्रमाणे तुम्ही जाणा तुमची करणी. मला तर नित्य तुमचीच घोकणी. या उक्तीचा प्रत्यय साक्षात दिला.
॥ हरि ॐ बाबा ॥