भक्तवत्सल बाबा
हरी ॐ बाबा… ! ऐच्छिक निवृत्ती मिळवण्यासाठी कोणी एक वर्ष, कोणी दोन वर्षे वाट पहातात. बाबांच्या कृपेने मी मात्र दीड दोन महिन्यातच ऐच्छिक निवृत्ती मिळवली. सेवानिवृत्तीसाठीच्या आवश्यक कागदपत्राच्या पूर्ततेसाठी आमच्या ऑफिसला मुख्य ऑफिसचे पत्र आले. चार पाच महिने पुढील तारीख कळवली होती. या मुदतीत सर्व कागदपत्रे पूर्ण करुन पाठवायची असतात. यानुसार मी बेेंगलोर येथून दोन सप्टेबरला घरी पोहोचणार होतो. परंतु पीएसआय पूर्वपरीक्षा २८ ऑगस्टला होणार होती. त्यावेळी मी सेवानिवृत्तीवेतन कागदपत्र पूर्तता करण्यासाठी बंगलोर येथे असणार होतो. जरी पळापळ करुन यायचे म्हटले तरी बराच त्रास होणार होता. मी मनाची तशी तयारी केली होती. परंतु, बाबांच्या कृपेने परीक्षेची तारीख ४ सप्टेबर २००५ अशी बदलून आली. त्यामुळे घरी येवून दीड दिवस अभ्यास करु शकलो आणि पहिल्याच प्रयत्नात पूर्वपरीक्षा पास झालो. अर्थात बाबांच्याच कृपेने. ज्या दिवशी पूर्वपरीक्षा दिली त्याच दिवशी एका शैक्षणिक संस्थेत मुलाखतीसाठी जाहिरातीनुसार अर्ज करुन गेलो असता तेथील ऑफिसमध्ये संस्थापकाशी भेट झाली आणि चर्चा करुन त्यांनी दुसऱ्या दिवशी जॉईन व्हा म्हणून ऑर्डर दिली. या ठिकाणी जास्त काळ राहता आले नाही. याच कालावधीत माझी परमपूज्य मातोश्रींचे अचानक निधन झाल्याने दोन तीन महिने मी अपसेटच होतो. डॉक्टरांच्या सल्ल्याने औषधे आणि झोपेच्या गोळया खात होतो. योगासने करुनही काही फरक पडत नव्हता. बाबांच्या कृपेने धीर सोडला नसला तरी खूपच मनस्ताप अनुभवला. पुढे फोटो क्षेत्रात करिअर करायचे ठरवले. सातारच्या निर्मल कलर लॅब येथे काम होतो. त्याचबरोबर श्रीराम कॉम्प्युटर येथे एमसीआयटी, डीटीपी, टॅली आदी कोर्स लावले होते. हेतू हाच की आजकालच्या युगात कशात मागे नको. काही दिवसातच एमएससीआयटीची परीक्षा होती. सिव्हील लाईफमध्ये आल्यावर पहिली परीक्षा परंतु काही तरी करायला जाणे आणि त्यात अडचणी ठरलेल्याच. परीक्षेच्या एक दिवस अगोदर अभ्यासक्रम बदलून आलेला होता. पासिंग मार्क सिस्टिम बदलली होती. क्लासकडून दिले जाणारे मार्क बंद झाले होते. म्हणजे एकटयाचीच लढाई होती. एमएससीआयटी परीक्षा झाली. या परीक्षेत मला ५० मार्क्स पडले. ते नियमाप्रमाणे नसल्यामुळे रिझर्ल्ट स्वॉरी यू आर फेल असा मिळाला. परीक्षा सेेंटर वायसी कॉलेज सातारा येथे होते. येथून जवळच गोडोली येथ साईबाबांचे मंदिर आहे. मी टेंपररी मिळालेले मार्कशीट घेतले आणि बाबांच्या देवळात गेलो. बाबांच्या समाधी पादुकावर ते मार्कशीट ठेवले. मनात म्हणालो बाबा संघर्षमय जीवन मागून घेतले ते काहीतरी अधिकार लढण्यासाठी. त्याची अशी सुरुवात अपेक्षित नव्हती. परंतु ठीक आहे. आता हा मार्ग सोडून इतर रिटायर फौजींच्याप्रमाणे वॉचमनची नोकरी करतो. बहुतेक तेच आमचे नशीब दिसते. हताशपणे घरी आलो. जेवण करुन विश्रांती घेतली. सायंकाळी क्लासवर गेलो तेथे मार्कशीट जमा करायचे होते. या परीक्षेत बरीच मुले नापास झाली होती. परीक्षा पध्दत बदलल्याचा हा परिणाम होता. त्यामुळे मी क्लासवर जाताच तेथील जोशी मॅडम म्हणाल्या. देवरुखकर तुम्हाला ५० मार्क्स आहेत ना. मग तुम्ही पास आहात. तसा ई मेल दुपारी चार वाजता आम्हाला मिळाला आहे. त्यामुळे तुमचे अभिनंदन ! मी तसेच क्लासवरुन परत फिरलो. गोडोली येथे बाबांचे मंदिर गाठले आणि सकाळी बरंच काही बोलून गेल्याबद्दल माफी मागितली. सोबत पेढे आणि दोन बाबांची आवडती गुलाबाची फुले होतीच. बाबांच्या मूर्तीकडे पहात १० – १५ मिनिटे ध्यान लावले आणि एक आशा, उमेद घेवून नव्या उत्साहाने घरी परतलो. एका नापास निकालाचा ज्या प्रकारे पासमध्ये बदल झाला. ते करण्याची शक्ती बाबांच्या शिवाय कोणाकडे असणार? त्यांच्यावरच सर्व भार टाकून भारतीय सैन्यात दाखल झालोही आणि त्यांच्या कृपेनेच पेन्शनवर आलो. त्यांच्याच कृपेने फौजदार परीक्षेच्या जागाही निघाल्या. त्यांच्याच कृपेने पूर्वपरीक्षाही दिली. त्यामुळे बाबांना विचारुन त्यांच्यावर सोपवून केलेले कोणतेच काम निरर्थक वाया जात नाही हा अनुभव घेतला असल्यामुळे बाबांच्याबद्दल श्रध्दा व भक्ती दिवसेंदिवस वाढतच गेली. बाबांनी माझ्या नवीन सिव्हिल जीवनाची सुरुवात अशी केली. शेवटी सुख आणि दु:ख या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. त्या बाबांना सांगून देणे हे आपले कामच आहे. हा संसार मोहमाया आहे. यातून आपणास योग्य प्रकारे बाबांच्या आधाराने पार करुन जायचे आहे. बाबांचा आशीर्वाद पाठीशी असल्यावर कसली समस्या उद्भवणार ! बाबांचे वचनच आहे जरी हे शरीर गेलो मी टाकून, तरी मी धावेन भक्तासाठी….
।। हरि ॐ बाबा ।।