पाठीराखा-साई- ९

भक्तवत्सल बाबा

 

हरी ॐ बाबा… !  कोयनाधरण सुरक्षा गार्डसाठी धरण परिसरात रहात होतो. माझ्याबरोबर इतर पोलीस कर्मचारी रहात होते. त्यातील काहीजण सकाळी, संध्याकाळी चालत येणे जाणे करत असू. व्यायामाबरोबर वाटेतील देवांचे दर्शनही होत असे. धरणापासून जवळच काठेवाडी येथे भगवान साईबाबांचे स्थान आहे. आता तेथे देवळ बांधणे सुरु आहे. तेथील देसाइ यांची तोंडओळख झाली होती. चालण्यासाठी तिकडे जात असताना बाबांच्या मंदिरात दर्शन घेतले. तेवढयात आमच्यापैकी एक साईभक्त यांनी बाजूच्या उंच डोंगरावरील भगवा ध्वज फडकत असलेले मंदिर दाखवले आणि भोलेनाथांचे असल्याचे सांगितले. त्यामुळे साहजिकच माझा ओढा तिकडे लागला आणि आज तेही दर्शन करु असे म्हणत आम्ही सर्वांनीच तिकडे मोर्चा वळवला. तिकडून येण्यासाठी रात्र होईल हे आम्ही विसरुन गेलो. डोंगरातील पाऊलवाटेने जावून शिवभक्त आनंद दिघे यांनी जीर्णोध्दार केलेल्या शंभू महादेवाचे दर्शन घेतले. जवळील गावदेवीच्या मंदिरात जावून दर्शन घेतले. तोपर्यंत सात वाजले होते आणि अंधार पडला होता. आता मात्र, धरणावर कसे जायचे याबाबत आमच्यात चर्चा सुरु झाली. आम्ही पाचजण होतो. शेवटी डोंगरातील वरच्या बाजुने दहा फूटी रस्ता हुंबराळी त कोयनानगर असा जातो तेथून जाण्याचे ठरले. अंतर लांब होते आणि अंधार होता तरी पर्याय तोच होता. त्यामळे तिकडील रस्त्याने आम्ही गप्पा मारत चालू लागलो. गप्पामधून भक्ती तसेच बाबांच्या काही अनुभवांबाबत माझा मित्र राजू कांबळे यांचे बोलणे सुरु होते. एक कि. मी. पायी गेल्यानंतर हॉटेल सृष्टी वाटेत दिसले. कांबळे यांनी या ठिकाणी जावून राहण्याचे चॉर्जेस विचारावेत म्हणून हॉटेलकडे वळण्यास  मोर्चा वळवला. असा तसा आम्हास उशीर झालाच होता. त्या हॉटेलमध्ये चहा मिळेल म्हणून तेथ गेलो. तेथील स्टाफने उडवाउडवी केली तरी नंतर पोलीस असल्याचे कळाल्यानंतर आदरातिथ्य झालेच. तेवढयात त्या हॉटेलचे कराड येथील मालक पवार हे स्वत:च्या गाडीने तेथे आले. त्यांचा एक दोन स्टाफबरोबर जुना परिचय होता. ती ओळख निघाली. त्यांच्या गाडीतून काही सामान उतरवून ते लगेचच कराडकडे निघणार होते. त्यामुळे आम्हास कोयनानगरपर्यंत सोडतो असे त्यांनी सांगितले. साईकृपेने आम्हास चांगली संधी  मिळाली. नाही तर रस्त्याने जाता जाता आम्हास किमान रात्रीचे दहा वाजले असते. आम्ही गाडीत बसलो. ती गाडी सुरु झाली व एका वळणावर पवार यांनी थांबवली. लाईटच्या प्रकाशात रस्त्यावर पुन्हा पुन्हा पाहू लागले. त्यांच्या अशा वागण्याबाबत विचारले असता ते म्हणाले, आता येत असताना एक भला मोठा साप रस्त्यामध्येच थांबला होता. तो जाईपर्यंत मी गाडी बाजूस थांबवली. त्यानंतर मी गाडी पुढे घेवून आलो होतो. त्यांनी त्या ठिकाणी पुन्हा आसपास नजर फिरवली. त्यावेळी आम्ही सर्वजण मनात समजायचे ते समजलो कदाचित आम्ही हॉटेलमध्ये थांबलो नसतो तर अंधारात पायी चालत चालत या ठिकाणी नेमके पोहोचलो असतो. आम्ही पाचजण दहा फूटी संपूर्ण रस्त्यावरुन बोलत चाललो होतो. त्यामुळे कदाचित या सापाची आमची गाठ पडली असती. काहीही होवू शकले असते. परंतु, बाबा तारणार त्याला कोण मारणार? बाबांनीच त्या मोठया हॉटेलमध्ये आम्हाला पाठवले. वरुन थकल्यामुळे चहा पिण्याची इच्छा झाली तो चहा दिला. रस्त्यात चालताना आणखीन अडथळे येवू नये म्हणून गाडीही पाठवली. ती गाडी आम्हास हुंबराळी गावातून कोयनानगरपर्यंत सोडण्यास आली. पुढे साठेआठच्या शिपची दुसरी गाडी आम्हास मिळाली. त्यामुळे आमच्या राहण्याच्या ठिकाणापर्यंत आम्ही कोणतीही अडचण न येता पोहोचलो. बाबांच्या उक्तीची सार्थ प्रचिती आम्हास मिळाली. माझा जो झाला काया वाचा मनी तयाचा मी ऋणी सर्वकाळ. साई म्हणे तोचि, तोचि झाला धन्य, जाहला जो अन्योन्य माझ्या पायी ।।

भक्तवत्सल ही बाबांच्या नावापुढील उपाधी अगदी सार्थ अशीच आहे. बाबा आपल्या भक्तांची सर्व प्रकारे काळजी घेत असत. स्वत: परब्रम्हच ते. त्यांच्या पासून भूत, भविष्य, वर्तमान काय लपेल? त्यांना होणाऱ्या साऱ्या गोष्टींचा उलगडा अगोदरच व्हयाचा. त्या प्रमाणे ते भक्तांना सूचना द्यायचे.  नितांत श्रध्दा ज्यांनी ठेवली त्यांना याचा प्रत्यय आलाच. परंतु ज्यांनी अश्रध्दा केली तेही पुन्हा बाबांच्या चरणी माफी मागण्यासाठी दाखल व्हायचे. परंतु कोणाचे वाईट व्हावे ही बाबांची कदापि इच्छा नव्हती. २२ व्या अध्यायात साई भक्त बाळासाहेब  मिरीकर यांना बाबा सापाबद्दल विचारतात. ते म्हणतात, तुला साप माहिती आहे का? हाताने दाखवत सांगतात असा लांबडा असतो आणि असा फुस्स ऽ करतो. बाळासाहेब मिरीकर हे सर्व पाहून बुचकळयात पडतात. यावेळी बाळासाहेब मिरीकर यांच्याबरोबर जाण्यासाठी बाबा शाम्यासही पाठवतात. पुढील प्रसंगात त्यांना मोठा साप रात्रीच्या वेळी बिछान्यात कसा भेटतो आणि बाबांनी पाठवल्यामुळे शाम्याच्या मदतीने मिरीकरांचा अनर्थ कसा टळतो हे वर्णन आलेच आहे. मागील उल्लेखाप्रमाणे आम्हा पोलीस मित्रांचेही बाबांनी मोठया सापापासून कसे रक्षण केले. आम्हास डयुटीच्या ठिकाणी जाण्यासाठी गाडीची व्यवस्था कशी काय झाली? त्याचबरोबर इच्छेनुसार चांगला चहा हॉटेलमध्ये पिण्यासाठी कसा मिळाला. याबाबतचे वर्णन आलेच आहे. नरसोबाचीवाडी येथे आणि पंजाब येथे शिवमंदिरात यज्ञविधी केल्यापासून मी साप मारत नाही आणि आजपर्यंत जवळ असा कोणताच साप दिसला नाही. १९९६ साली पंजाब येथे रहात असताना दहा ते बारा फूट लांब नाग आमच्या क्वार्टरच्या मागे मोकळया जागेत रहायचा. आमच्या घरात भगवान शंकराची गाणी कॅसेटवर सुरु असायची. त्यावेळी ही स्वारी ती गाणी ऐकत क्वार्टरच्या मागील दरवाजाजवळ शांत पडून असायची. आजुबाजूच्या शेजाऱ्यांनी याबाबत आम्हास सांगितले तरी आम्ही गांभीर्याने घ्यायचो नाही. त्याने एकदाच आम्हास दर्शन दिले. त्यानंतर जवळून सर्पदर्शन दुर्मिळच झाले. मात्र कोयनानगर या ठिकाणी आल्यावर दोन वेळा हा योग आला. पहिल्यांदा अंधारात रस्त्याने हुंबराळीकडून डोंगरातून येत असताना त्यानंतर आम्ही जेथे रहात होतो. तेथे असाच मोठा सर्प दिसल्याबाबत मित्रांनी सांगितले. परंतु मला मात्र तो दिसलाच नाही. मात्र एके दिवशी सायंकाळी सहजच नागराजांचे दर्शन झाले. कोयना धरण परिसरात राईट डॅमच्या बाजुने जाणाऱ्या रस्त्याचे डांबरीकरण सुरु असल्याने त्या ठिकाणी चार पाच मशीन्स, पाच पंचवीस कामगार यांचा गोंधळ व खडखडाट सुरु होता. कदाचित यामुळेच नागराजाची ही स्वारी त्या ठिकाणच्या आपल्या बिळातून निघून दुसरीकडे जाण्याच्या तयारीत असावी. परंतु तो नागच होता. डांबरीकरणाचे काम सुरु असल्याने रस्त्याच्या बाजूने मी चालत चालत धरणाकडे निघालो असता अचानक माझे लक्ष रस्त्याकडे गेले. त्यावेळी हे नागराज माझ्या पुढे दहा फुटावर पळतच चालले होते. मी त्याच पावली मागे वळलो. लांबून पाहिले असता माझी चाहूल लागल्याने ही स्वारी कोठेतरी लपण्यासाठी जागा शोधत होती. लवकरच एका बिळात शिरत असताना त्यांना पाहिले आणि लांबूनच नमस्कार केला. काहीही झाले तरी शेवटी नागराजच ते. चुकून पाय पडला असता तर ? परंतु या ठिकाणी सुध्दा मी सार्इंचे स्मरण केले. तसेच रोजच एक तास सार्इंचे पूजन, भक्ती, प्रार्थना, अध्याय वाचन असायचे यामुळे बाबांनी नागराजाच्या संकटातून माझी सुटका केली. बाबांचे शतश: आभार.

 

।। हरि ॐ बाबा ।।