हरी ॐ बाबा… ! जे कर्ताही आहेत. करविताही आहेत, अशा सर्वमान्य, सर्वेश्वर श्री साइंचा हा साक्षात्कार आहे. माझ्या सारख्या अस्तित्व शुन्य भक्तासाठी चमत्कार आहे. जो पर्यंत बाबांची परवानगी नाही तोपर्यंत हा पसारा फक्त मांडूनच होतो आणि कितीही मांडला तरी तो सांडल्यासारखाच होता. यासाठी बाबांनी जेव्हा परवानगी दिली. त्याचवेळी ही लेखणी सरसावली. नाहीतर या लेखणीची काय बिशाद. जी एक अक्षरही लिहू शकेल. त्याचबरोबर या लेखणीचे आणि डायरीचे किती थोर नशीब आहे. जे साईनामात गुंतले आहेत. प्रारब्धाशिवाय असे शक्य नाही. प्रारब्धात होते म्हणून भगवान विष्णूंनी रामअवतारात चौदा वर्षे वनवास भोगला.तेथे तुम्हा, आम्हा पामरांची काय कथा? ही मागच्या जन्मीची पुण्याईच. त्यामुळे साईबाबांच्या सहवासात पडलो आणि तसा घडलो. टाकीचे घाव सोसल्यासारखे संसारातील प्रत्येक अडथळयाचे घाव सोशीत राहिलो. जेवढा पडत राहिलो तेवढा घडत राहिलो आणि बाबांच्या आशीर्वादाने या संसार सागरातून तरत राहिलो. बाबा हेच माझ्यासाठी सर्व काही होते. नाहीतर एरव्ही बाबांच्यावर रुसण्या, रागवण्याचे धाडस कोण करणार? कधी बाबांच्यावर जीवापाड प्रेम. अंत:करणातून हाक तर कधी बाबांच्यावर नाराज होणे. तरीही पुन्हा त्यांच्याच चरणापाशी. जेव्हा जेव्हा त्यांना वाटले त्यांनी बोलावून देवळात दर्शन घ्यावयास लावून दर्शनाचा सोहळा घडवून आणला आणि ज्या ज्या ठिकाणी कामानिमित्त मी जात राहिलो तेथे माझ्या अगोदर हजर असलेले बाबाही मी अनुभवले. याच बाबांचे माझ्यावर उपकाराचे ओझे आहे. अन्यथा एका सर्वेश्वराकडून एवढे कृपेचे छत्र या पामराला मिळणे शक्यच नाही. आजपर्यंत साईक्षेत्र पंढरपूर शिर्डीमध्ये बाबांच्या कृपेमुळे फक्त तीन वेळाच जाता आले. जेव्हापासून जीवन म्हणजे काय समजून एक जबाबदार व्यक्ती म्हणून जगण्यास सुरुवात केली ती मुळात कॉलेजपासून आणि संघर्षातच. भ्रष्टाचाराविरुध्द लढण्याच्या वृत्तीने कॉलेज सोडून भारतीय सैन्य दल गाठले. परंतु, तरीही मनात आशा ठेवली होती. पदवीधर व्हायचे आणि पोलीस फौजदार होण्यासाठी प्रयत्न करायचे. ते पद मिळवायचे. म्हणूनच भारतीय सैन्यात असताना देखील शिक्षण सुरु ठेवले होते. शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर येथे बाह्यविद्यार्थी म्हणून प्रवेश घेवून 9 वर्षांनी बी. ए. झालो ते ऑनर्स घेवूनच. बाबांच्या कृपेने ऑनर्स ग्रॅच्युएट व्हायची सुप्त इच्छाही पूर्ण झाली. भारतीय सैन्य दलात भरती झाल्यानंतर वर्षा दीड वर्षात एकदा औरंगाबाद येेथे असताना साईबाबांना भेटण्याचा दिवस नक्की केला. आमच्या सुट्टीचा वार रविवार. मित्रास माहिती देवून मी रविवारी पहाटे निघणार होतो आणि तो माझा निश्चय होता. परंतु, आदल्या रात्री शनिवारी दुपारपासून अचानक सोसाटयाचा वारा, वादळ, ढगांचा गडगडाट, विजांचा कडकडाट अशा वातावरणात तुफान पाऊस झाला. झाडांच्या फांद्यांचे पडणे, रात्रभर पाऊस, थंडी. परंतु संघर्ष हा आमचा नेहमीचा ठरलेला. पहाटे अंघोळ करुन तयार होवून दीड दोन किलोमीटर पळतच कसे न कसे औरंगाबाद बसस्टेशन गाठले. तेथे शिर्डीसाठी सकाळी 6.30 वाजता सुटणारी गाडी सुटता सुटताच धरली. त्या दिवशी भरपूर अडथळे, अडचणी यावर मात करत बाबांचे घाईगडबडीत दर्शन घेवून पुन्हा लवकर हजर होण्यासाठी माघारी फिरलो. बराच त्रास झाला. रात्री 9.30 वाजता पोहोचलो. कॅम्पमध्ये बरेच खोटे नाटे बोलावे लागले. पण एकदाचे बाबांचे दर्शन झाले. हे दुसऱ्यावेळीचे दर्शन होते. या अगोदर कॉलेजच्या सहलीतून बाबांचे दर्शन घडले होते. तिसरी वेळ ग्रॅच्युएट झाल्यानंतर व लग्नानंतर पत्नीसह बाबांच्या दर्शनासाठी येईन येईन म्हणता म्हणता पाच वर्षांनंतर हा योग आला आणि बाबांनी बोलावल्याखेरीज तुम्ही जावू शकणार नाही. यावेळी मी, माझी आई, पत्नी, मुलगा असे सकुटुंब शिर्डीस आलो. त्यावेळी दोन वेळा दर्शन मिळाले. मात्र, याचवेळी बाबांना नवस बोलून आलो. पोलीस फौजदार होवूनच आपल्या दर्शनास येईन. आपण तसे बोलवावे. मनात अगोदर असलेली इच्छा त्या सर्वेश्वर, परब्रम्ह, शिर्डीपती, देवाधिदेव, राजाधिराज साईबाबांना बोललो. मिलिट्रीमध्ये माझी दहा वर्षे सर्व्हिस झालेली आणि फौजदार परीक्षेसाठी असणाऱ्या अटीपैकी फक्त ग्रॅच्युएट झालो होतो. परंतु, लहानपणापासून इच्छा आणि तीही बाबांना नवसरुपात बोललो. त्यामुळे माझी शिर्डी बंद झाली. भावनेच्या भरात नवस बोलून बसलो. पुढे काय? आमचे कोणीही गॉडफादर नाहीत. सत्य हेच भांडवल आणि सच्चा मनाने बाबांची सेवा करणे आणि त्यांनाच आपले मानणे. तेच कर्ता, त्यांनाच बोलायचे, सांगायचे, आपले मानायाचे. शेवटी कोठेतरी मन मोकळे करायचे ते बाबांच्यापाशी. बाबा हीच आमची मन मोकळी करण्याची जागा. पुढे मिलिट्रीमध्ये १५ वर्षे पूर्ण होवून गेली. मी कारगील येथून पुणे येथे बाबांच्या कृपेनेच बदलून आलो. पेन्शनसाठी आवश्यक सेवा झाल्यानंतर ऐच्छिक सेवानिवृत्ती बाबांच्यामुळेच मिळाली. त्याचवेळी पोलीस फौजदार पदासाठी साधारणत: ५७४ जागा निघाल्या होत्या. या अगोदर १९९९ ची फौजदार भरती सोडल्यास पोलीस फौजदार पदासाठी जागा निघाल्या नव्हत्या. बाबांच्या कृपेने स्टडी सर्कलचे प्रा. आनंद पाटील यांची भेट झाली. त्यांचे मार्गदर्शन घेवून फौजदार परीक्षेचा अभ्यास केला. पुढे माझे सहकारी मित्र जगदाळे यांची भेट झाली आणि त्यांच्यामुळे अभ्यासास दिशा मिळाली. वेळोवेळी बाबांनीच दिलेल्या अमूल्य सहकार्यामुळे मी मुख्य परीक्षा पास झालो. आज फिजीकल परीक्षा देवून मुलाखत पत्राची वाट बघतोय. या मधल्या काळात आजपर्यंत पाच सात वर्षे झाली. एवढी वर्षे झाली आपण शिर्डीस गेलो नाही तेही एका नवसामुळे. फौजदार भरती प्रक्रिया अत्यंत क्लिष्ट अशी आहे. अजून किती वर्षे लागणार माहिती नाही. तेव्हा आपण बाबांना भेटून यावे हीच मनी हूरहूर लागली. आपण बाबांना असा अवघड नवस बोेलून उगीचच कोडयात टाकले असेही वाटायचे. मधल्या काळात मी आमच्या दुसऱ्या घरात रहावयास गेलो. तेथे बाबांची सेवा मनोभावे करायचो. माझ्या मनातील इच्छा बाबांनी कशी पुरवली आणि मला निमंत्रण कसे पाठवले. त्यासाठीच हा चार पानाचा पसारा. मी शक्यतो बाहेर एकटे खात नाही. काही गोडधोड आणले तर ते घरात आणून नैवेद्य दाखवून सर्वांनी खायचे हा जणू आमचा रिवाजच. एकेदिवशी असेच सातारच्या मल्हारपेठेतील ओळखीच्या राऊतांच्या दुकानातून पावशेर जिलेबी घेवून आलो. सायंकाळची वेळ सर्वांनी चहाच्या अगोदर जिलेबी खावून चहा घ्यावा हा विचार करुन देवघरातच लावलेल्या टेबलवर बसलो. आमची सर्वांची जिलेबी खावून झाली. पाणी पिवून चहा घ्यावा म्हणून कप उचलला व नेहमीच्या सवयीप्रमाणे जिलेबी आणलेल्या कागदावर काय लिहिले ते वाचू लागलो. ही माझी नेहमीची सवय. बाहेरुन आणलेले छोटे मोठे कागद हाती येताच त्यावर नजर फिरवायची. समोर पत्नी चहा पित बसली होती. मी हाती घेतलेला कागद बघतच राहिलो. चहाचा कप बाजुला ठेवला. मन आनंदाने गहिवरुन आले. डोळयातून दोन आनंदाश्रु वाहिले. समोर पत्नी हे सर्व बघत होती. ती म्हणाली,असे अचानक काय झाले? मी तो कागद पत्नीस वाचण्यास दिला. कागदावर मोठी जाहिरात होती. त्यामध्ये हेडिंग होते. निमंत्रण.. शिर्डी संस्थानचे ते कोणत्या तरी कार्यक्रमाचे निमंत्रण होते. बाबांचा नेहमीचा आशीर्वाद हात असलेला फोटा त्या कार्यक्रमाच्या निमंत्रण पत्रिकेत होता. त्या कार्यक्रमाचे निमित्त होतं. बाबांनी माझ्या मनातील इच्छा समजून मला शिर्डीला येता यावे म्हणून स्वत:च ते निमंत्रण पाठवले होते. बाबा, आपल्या परमभक्तांची इच्छा कशी पुरवतात हे त्यांनी दाखवून दिले. मधल्या काळात फक्त पेन्शनवरच माझे घर चालत होते. त्यामुळे पैशाचा तुटवडा नेहमी भासायचा.परंतु साईकृपेने कधीच उपाशी झोपलो नाही की निराश झालो नाही. जिद्दीने फौजदार परीक्षेचा अभ्यास केला. मध्येच सातारा पोलीस दलात भरती झालो. परिणामी बाबांची शिर्डी पुन्हा माझ्यापासून चार हात दूरच राहिली.तरीही बाबांनी जाहिरातीत दिलेले निमंत्रण हेच बाबांचे प्रमाण मानून नवस पूर्ण झाला नाही तरी शिर्डीस जाण्याचे ठरवले. बाबांची वाणीच आहे. तुम्ही जाणा तुमची करणी, मला तर नेहमी तुमचीच घोकणी. धन्य ते बाबा.. आणि धन्य ते शिर्डीवाशी जे बाबांच्यापाशीच राहिले. आम्हा पामरांना मात्र भेटीची आस लावून राहिले.
॥ हरि ॐ बाबा ॥