हरीपाठ-भाग-३

अभंग – ६

साधूसंताकडुन ज्यांना आत्मबोध होतो त्यावेळी त्या व्यक्तीचा मीपणा संपून जातो आणि तो केवळ अस्तित्वरुपाने उरतो. ज्यावेळी आत्मबोधरुपी अनुभवाची गोडी तो चाखतो त्याच वेळी तो द्वैतरहीत होवुन जातो. आणि निजतत्वामध्ये सामावुन जातो. कापूर ज्या वेळी जळतो त्याच वेळी तो असा काही जळतो की ज्यावेळी अग्निची ज्योत संपुन जाते त्यावेळी तेथे ज्योत आणि कापूर असे काहीही उरत नाही. त्याचप्रमाणे आत्मबोध ज्यावेळी होतो त्यावेळी त्याचे मीपण संपून जाते असतो तो फक्त आणि फक्त शुध्दात्मा आणि असा भक्त मोठा भाग्यावन असतो कारण साधूसंतानी त्याचा स्वीकार केला असल्यामुळे अशी व्यक्ती मोक्षपदाला प्राप्त होते.म्हणून ज्ञानमाऊली म्हणतात. एखादया भक्तास ज्यावेळी संतजनाचा सहवास मिळतो आणि प्रारब्धाने त्याला आत्मबोध होतो तेव्हा त्याला सृष्टीच्या कणाकणात आणि त्याच्यामध्ये सर्वत्र हरी आणि हरीच भरुन असलेला दिसतो.

अभंग – ७

जो भगवंताचा भक्त नसतो, जो देवांची पुजाअर्चा करीत नाही. साधे रस्यामध्ये येण्याजाण्याच्या वाटेवर असणाऱ्या देवाच्या देवळात ही जात नाही मग भजन पुजन आदी गोष्टी तर दुरच. अशा मनुष्याकडून मोठमोठी पापे घडतात. आणि ती पापे त्यांच्या प्रारब्धास चिकटून रहातात. काही केले तरी ती पापे त्याचा पिछा सोडत नाहीत. त्याची या जन्म-मरणाच्या चक्रातुन कधीही सुटका नाही आणि पापाचरामुळे मिळणाऱ्या फळापासुन तो सुटत नाही. अध्यात्माच्या भाषेत त्याला नास्तीक संबोधले जाते कारण त्याचा स्वतावर फाजील विश्वास असतो म्हणजेच ऐहीक सुखावर तो विश्वास ठेवतो उदाहरणार्थ तो म्हणतो. हे पहा जर मी कमवले नाही जर कामावर गेला नाही तर तुमचा देव मला काही माझ्या घरात आणून देणार आहे का? जर मी उत्त्म प्रकारे कमावले तर उदया मी चार चाकी गाडीत फिरू शकतो. तुमचा देव मला काय चारचाकी गाडी देणार आहे का ? जर मी चांगले कमावले तर फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये मला जे पाहीजे ते जेवण करू शकतो. न कमावता तुमचा देव मला त्या हॉटेलच्या गेटच्या आत जाण्यास तरी मदत करील का ? अशा आणि इतर प्रकारे तो ऐहीक सुखाच्या आणि माया,काया आणि जाया यांच्या आहारी गेल्यामुळे त्याच्या डोळयावर मायेचा पडदा  असतो आणि यामध्ये तो देवाचे अस्तित्व विसरलेला असतो. तो गर्व, अहंकार, अभिमानाने चुर झालेला असतो. ज्याला हरीभक्ती नाही तो अभक्त होय मोक्षाच्या मार्गावरुन तो पतित होतो, किबंहुना त्याला त्या मार्गाकडे जावे अशी इच्छाही होत नाही. ज्याच्या प्रारब्धात हरीची भक्तीच लिहीली नाही तो तरी करणार काय कारण तो दैवहीन असतो. जे लोक आपले पांडित्याचा डांगोरा पिटतात, मीच हुशार आहे मलाच धर्मातील आणि अध्यात्मातील सारेकाही समजते अशा थाटातच रहातात. ज्याच्यावर देव जरी दयाळू असला तरी त्यांच्या अशा प्रकारच्या वागण्याने तो त्यांना प्रसन्न होत नाही. पावत नाही. श्री ज्ञानमाऊली म्हणतात, मी प्रमाण भूत असा सिध्दात सांगतो तो असा कि आत्मा हाच परब्रम्ह आहे, तोच शाश्वत आहे, तोच सत्य आहे तोच शिव आहे. हया सर्व घटामध्ये सर्व चराचरामध्ये वास करणारा, आणि जळी, स्थळी, काष्ठी, पाषाणी तो विद्यामान आहे. अशा त्या परम परमात्म्याची तु अनुभूती घे.

 

 

अभंग – ८

साधूसंताच्या परमपवित्र सानिध्यात राहील्याने त्याच्याप्रमाणे शुध्द आचरण ठेवुन पुर्ण पणे भगवंताना शरण गेल्यास देव काय याचे आकलन तुला होईल मग पुढे तु याच मार्गाचा अवलंब करुन हरीला प्राप्ती जाणून घेवु शकतोस. वाचेने भगवंताचे नाम घ्यावे. जीवाभावाने त्या नामावर निष्ठा ठेवावी. भगवान श्रीशंकराना रामनाम प्राणप्रिय आहे जो नामाला सर्वश्रेष्ठ साधन मानतो, त्याला अनेक सांधनांचा गोधंळ त्रास देत नाही. योग्यांना ध्यानामध्ये हदयकमलात जी सूक्ष्म जीवनकला साधते, लाभते, तीच गोडी भक्तांना नामामध्ये मिळते. प्रल्हाद आणि उद्ध्व यांना कृष्णाने आपले ज्ञान नामसाधनेमुळेच दिले. श्रीज्ञानमाऊली म्हणतात की असे नाम सुलभ आहे. नामाचा महीमा सर्वाना ज्ञात आहे. आणि असे नाम न घेणारा एखादाच कोणी दुर्लभ भेटेल.

अभंग – ९

जो भगवंताच्या नामस्मरणा शिवाय इतर जप करतो. जी सात्वीक नाहीत, किवां नामस्मरण, पुजन, भजन, किर्तना शिवायची आहेत. आणि ज्याचे मन राम-कृष्ण या नामाच्या ठिकाणी नाही. त्याचे ज्ञान व्यर्थ असेच जाणावे. जो मानव अद्वैताचा मार्ग जाणत नाही तो दुर्दैवी समजावा. रामकृष्ण नामाच्या ठिकाणी त्याचे मन बसत नाही. तो अज्ञानी समजावा, तो अहंकारी असतो. त्याचा देवावर आणि दैवावर विश्वास नसतो. हे सारे थोतांड आहे असेच तो मानतो आणि दुसऱ्यालाही तो हेच सांगतो. परंतु गुरुशिवाय द्वैताचे निरसन करणारे ज्ञान कसे होणार? आणि ज्याला हे ज्ञान नाही. असा बोध होत नाही. त्याला नाम संकिर्तन तरी कसे काय जमेल? तो प्रभूंच्या चरणी कसा काय लीन होणार ? कारण असे करण्याने त्याच्या समजाप्रमाणे तो स्वतास लाचार समजणार आणि हा एकप्रकारचा कमीपणा त्याला कधीच घेता येत नाही. कारण तो जे काही या भुतलावर आहे ते मी आहे आणि माझ्याशिवाय कोणी मोठे नाही मी शिकलो शिकण्याच्या वयात मेहनत घेतली मोठाले ग्रंथ वाचण्यापेक्षा किवां नामस्मरणात किवां भजन करण्यात वेळ घालवला नाही म्हणून मी आज या स्टेटसने जगू शकतो नाहीतर एकवेळच्या जेवणाचे वांदे झाले असते. असे तो सातत्ययाने विचार करत असतो आणि यामधुन तो कधी बाहेर येवू शकत नाही. ज्ञानमाऊली म्हणतात, भगवंताचे नाम हे सगुण ध्यानच होय आणि ते नाम घेणाऱ्याचे प्रपंचातील बंधने आपोआप तुटून जाते. तो मायामोहाच्या पलीकडे आपोआप पोहचला जातो. भगवंताचे नामात काय जादू आहे हे त्याला होणाऱ्या अध्यात्मातील प्रंचड समाधानातुन जो जाणतो. ती जाणीव सर्वाना होत नाही किवां पुर्णता शब्दामध्ये ती व्यक्त करता येत नाही. नामजपाचा महीमा आपणासही सातत्याने ईश्वराचे नामस्मरण करुनच अनुभवला पाहीजे. ती गोडी चाखायची असेल तर ईश्वरावर नितांत श्रध्दा ठेवली पाहीजे. सर्वच ठिकाणी त्याच्या अस्तित्वाची जाणीव अनुभवली पाहीजे. म्हणजे पहावा विठ्ठल. बोलावा विठ्ठल, ध्यानात मनात, आचरणात, जेवणात, कामात, विश्रांती घेतानाही विठ्ठल. अशी जेव्हा आपली स्थीती होईल त्यावेळी जसे नामदेवाच्या प्रार्थनेवरुन देव नैवद्याचे जेवण जेवण करण्यास आले तसे आपल्या बोलावण्यावरुन येतील आणि सगुण निर्गुण साकार निराकार द्वैत अद्वैत आदी सारे सारे काही आपोआपच निरसन होईल भेदाअभेद रहाणारच नाही.

 पुढील भाग