पाठीराखा-साई- २०

भक्तवत्सल बाबा

 

हरी ॐ बाबा… ! भगवंत साईच ज्याचे तारक, मारक, चालक आहेत. त्यांना उद्याची काय चिंता? बाबांच्या स्मरणात, आठवणीत, त्यांच्या समवेत आपला काळ घालवावा. दुसरे काय? ज्यांनी बाबांची भक्ती स्वीकारली आहे. त्यांनी उद्याची काळजीच करु नये. बाबा स्वत:च ती वाहत असतात. विधीचे विधाते, कर्ते, करवते तेच आहेत. ते आकारही आहेत. निराकारही आहेत. माझ्या लहानपणापासून मी भगवान श्री शिवशंकराची भक्ती करतो. गावात असताना गावातील शंकराच्या देवळात जाणे. तेथे दर्शन घेवून पूजा प्रार्थना करण्यात वेळ घालवायचो. बाबांचाही पूर्वी लाल रंगाच्या कपड्यातील फोटो कोठून तरी मिळाला होता. त्यांची ही भक्ती करायचो. पुढे बाबाची भक्तीही वाढतच गेली आणि भगवान भोलेचीही भक्ती वाढत गेली. तरीही बाबांना हेच सुचित करायचे होते. अरे मी तुझा भगवंत आहे आणि माझ्या मनास अंतस्थ हीच प्रेरणा होत राहिली. पुढे योगा योगे आळंदीस जाण्याचा योग आला. त्या वेळी तेथे पुस्तकाच्या दुकानात नेहमीप्रमाणे पुस्तक चाळणे सुरु होते. त्यावेळी त्रिवेणी प्रकाशन, मुंबईचे श्री रोहित देसाई लिखित मराठी आवृत्तीचे साई सचरित्रकथा वाचनात आले. ते पुस्तक विकत घेवून मी संग्रही ठेवले आहे. त्या पुस्तकात साईबाबांच्या जन्माविषयीची दंतकथा वाचनात आली. त्यानुसार आंध्रप्रदेशात गंगा आणि देवगिरी अम्मा या ब्राम्हण कुंटुबियांच्या घरी एकदा पावसाळयात एक वृध्द गृहस्थ त्याच्या पत्नीसह रात्रीचा आश्रयास आला. त्या वृध्द जोडप्याने शिवपार्वतीच्या रुपात देवगिरी अम्मास दर्शन दिले आणि तुझ्यापोटी शिव पुत्र म्हणून जन्म घेतील, असा वर देवून अदृश्य झाले. त्यावेळी गंगा हा पावसाळयाच्या पाण्यात त्याची नाव वाहून जावू नये म्हणून नदीकाठी बांधण्यास गेला होता. तो आल्यानंतर पत्नीने घडलेला वृतांत त्याला सांगितला. त्यामुळे स्वत: शिवपार्वती आपल्या घरी येवून राहून गेले मात्र मी त्यांचे दर्शन घेवू शकले नाही. म्हणून तो संसारातून विरक्त होवून भगवतांच्या प्राप्तीसाठी जंगलात भटकू लागला. पुढे या दाम्पत्यास तीन मुले झाली. तिसऱ्या मुलाच्या वेळी गंगा ब्राम्हणाची विरक्ती पराकोटीस गेली. तो जंगलात भटकू लागला आणि वाघाच्या भक्ष्यस्थानी पडला. देवगिरी अम्मा बाळास जन्म देवून नाळ तोडून नदीकाठी येवून बाळास स्वच्छ केेले. परंतु काही वेळाने रस्त्याने चालता चालता अम्मा रस्त्यात कोसळली व बाळापासून अलग झाली ते बाळ जंगलातून  मार्गक्रमण करणाऱ्या निसंतान दाम्पत्यास सापडले. पुढे काही दिवसात तेही पितृछत्र हरवले. त्यानंतर मोठे झाल्यावर हे बाळ मशिदीत शिवपूजा व मंदिरात नमाज पठण करत असे. त्यामुळे मुलाच्या आईने या बाळास व्यंकूश महाराजांच्या आश्रमात दिले. त्या महाराजांना  भगवान शिवशंकराने आदीच्या रात्री स्वप्नात येवून साक्षात्कार दिला. आपण तुझ्याकडे रहावयास येत आहे. त्यामुळे त्या महाराजांनी हाच मुलगा शिवशंकर आहे हे नक्की केले. पुढे आश्रमातील त्याच्या  लाडामुळे त्याचे बरेच शत्रू तयार झाले. एकेदिवशी बेलपत्र आणण्यासाठी सर्व मुले जंगलात गेली असता. संधी साधून सर्व मुलांनी बाबूस मारहाण केली. एका मुलाने बाबूच्या डोक्यात वीट मारली. बाबू बेशुध्द पडला. पुढे व्यंकूश महाराजांनी तो आश्रमात न आल्याने शोधाशोध केली असता बाबू बेलाच्या झाडाजवळ पडल्याचा दिसला. महाराजांनी आपले वस्त्र फाडून त्याच्या जखमा बांधल्या व त्यास विचारले तुला कोणी मारले का? त्यावर त्याने कोणाचेच नाव सांगितले नाही. त्यामुळे आश्रमातील मुलांनी बाबूस त्रास देणे बंद केले. बाबू जंगलातून येताना ती वीट बरोबर घेवून आला होता. ती वीट तो सोबत ठेवत असे. पुढे काही दिवसात व्यंकूश महाराजांचे निधन झाले. त्यावेळी बाबू त्यांच्या जवळ होता. आशीर्वादयुक्त नजरेने बाबूकडे पहात ते अनंतात विलिन झाले. त्यांच्यावर अंत्यसंस्कार करुन बाबू त्या आश्रमातून निघाला ते बरोबर वीट घेवूनच. अशा आशयची बाबांच्या जन्माविषयीची दंतकथा या पुस्तकात वाचनास आली. त्यामुळे माझे साईबाबा म्हणजेच भोलेबाबा हे आणखीन पक्के झाले. तसेही बऱ्याचदा बाबांनी मला दाखले दिले आहेत आणि भगवान शिवच या सृष्टीचे निर्माते आहेत त्यामुळे कलियुगात साईबाबांची भक्ती म्हणजे शिवभक्ती करण्यासारखे आहे. तरीही बाबांची भक्ती सर्वच भक्त आपापल्या परीने करत असतात. साई सचरित्रामध्ये ज्या ज्या भक्तांना जसे जसे दर्शन पाहिजे होते त्या त्या रुपात बाबांनी दर्शन देवून कलियुगातील देवअवतार असल्याचे सिध्द करुन दाखवले आहे. काहीही असले तरी आपल्या भक्तीचा मार्ग आणि आपली भक्ती शुध्द पाहिजे. त्यातही कोणत्याही फळाशिवाय केलेली भक्ती शुध्द भक्ती होय. भगवान श्रीकृष्णांनी गीतेत सांगितल्याप्रमाणे फळाची अपेक्षा न करता कर्म करा यथावकाश फळ तुम्हाला मिळेलच. कोणतेही कर्म हे फळ देतेच. फळ दिल्याशिवाय कर्म शांत होत नाही. मग कधी एखाद्या कर्माचे फळ लवकर मिळते तर कधी उशिराने मिळते. शेवटी विधीच्या विधात्यास तुमची चिंता आहे. तुमचे बरे वाईट तो पहात असतो. त्यातून बरेच होते वाईटाचा नाश होतो. फक्त भगवंताच्या कठीण परीक्षेत पास होणे महत्त्वाचे आहे. हे ज्याने जाणले त्याचे जीवन सार्थकी लागले. त्यास भगवंत समजले एवढे मात्र नक्की.

।। हरि ॐ बाबा ।।