ज्याच्या आवडीच्या अधीन होउन निराकार परमात्मा आकाराला आला आहे आणि तो परिपुर्ण असूनही त्याला अर्जुनाचा वेध लागला आहे. हे अर्जुनाचे वर्णन ऐकून श्रोते म्हणाले, आमचे काय भाग्य आहे, ते पाहा, उत्तमोत्तम शब्दांची रचना करुन बोलण्याची शोभा वाढवली आहे. या शैलीने नादब्रम्हालादेखील जिकंले आहे. अशी ही परिशुध्द मराठी भाषा बोलली जाते हे सुध्दा आश्चर्य नाही का? या भाषेच्या रस-अलंकारात विविध रंगांचे प्रकार उसळतात. या भाषारुपी आकाशात ज्ञानाचे स्वच्छ टपोरे चांदणे पडले आहे.गुढ अशा अभिप्रायाचा गारवाही यामध्ये आहे. तसेच श्लोकाचा अर्थ जणु काही चंद्रविकासी कमळे सहजच प्रफुल्लीत होत आहेत. त्या बोलण्याची थोरवी श्रेष्ठ आहे.
ब्रम्हविद्या ऐकणाराची इच्छा या भाषेच्या श्रवणाने तृप्त होत असते.अशा या बोलांपासुन श्रोते अंतकरणात प्रसन्न होउन डोलू लागले. निवृत्तीनाथांचे शिष्य ज्ञानेश्वर महाराजांनी हे जाणले मग ते श्रोत्यास म्हणाले आता इकडे लक्ष द्या पांडवांच्या कुळामध्ये कृष्णरुपी प्रकाशमान दिवस उगवला देवकीने श्रीकृष्णाला आपल्या उदरात वाढविले यशोदेने मोठया कष्टाने यांचे लालन-पालन केले आणि तो शेवटी पांडवांच्या उपयोग पडला म्हणुन खुप दिवस श्रीकृष्णाची सेवा करावी आणि योग्य पाहुन उपदेश करण्यासंबंधी विनंती करावी एवढेदेखील श्रम त्या भाग्यवंत अर्जुनाला पडले नाहीत. श्रोते म्हणाले हे असो दे आता श्रीकृष्ण-अर्जुनाची कथा लवकर सांगावी ज्ञानेश्वर महाराज म्हणाले सांगतो ऐका.
अर्जुन म्हणाला, श्रीकृष्णा ! आपण सांगितलेली संतांची लक्षणे माझ्या अंगी प्राप्त होत नाहीत. एऱ्हवी लक्षणांचा सारभुत विचार केला, तर मी त्या मानाने खरोखर अयोग्य, अपुर्ण आहे परंतु हे देवा ! तुमच्या उपदेशानेच जर मला योग्यता आली तर येउ शकेल. (ओवी १३१ ते १४० ) महाराज तुम्ही जर माझे हित करण्याकडे लक्ष द्याल तर मी ब्रम्ह होईन तुम्ही मला जो अळयास करावयास सांगाल तो करणे मला अशक्य आहे का? अहो देवा! आपण कोणाची कथा सांगितली हे कळत नाही. परंतु ती ऐकल्यापासुन तिची स्तुती करावी असे वाटते. अशी श्रेष्ठ लक्षणे ज्याच्या अंतकरणात प्रगट झाली असतील त्याचे महत्व केवढे बरे बसेल हे देवा! याप्रमाणे माझ्या अंगी योग्यता प्राप्त होईल एवढे आपण करु शकाल काय? त्या वेळी श्रीकृष्ण स्मित हास्य करुन म्हणाले तुला आम्ही अवश्य ब्रम्हरूप करु.
असे पाहा की जोपर्यत संतोष प्राप्त हाते नाही तोपर्यत चोहोकडे सुखाचा दुष्काळ असतो एकदा का संतोष प्राप्त झाला की मग सुखाला कोठे कमतरता आहे? त्याप्रमाणे जो सर्वेश्वराचा पुर्णपणे सेवक बनला आहे तो सहजच ब्रम्हरुप होईल परंतु अर्जुनाला प्रश्न विचारण्याची आवश्यकता नव्हती कारण तो भाग्यरुपी पिकांच्या भाराने कसा भारावला आहे ते पाहा. इंद्रादिकांनी हजारो जन्म घेतले तरी ज्यांची भेट होणे दुर्लभ तो श्रीकृष्ण अर्जुनाच्या किती अधीन झाला आहे ते पाहा. जो अर्जुनाने प्रश्न विचारण्यापुर्वीच अधीर होउन प्रश्नांची उत्तरे देण्यास प्रवृत्त होत आहे. मग आता ऐका अर्जुनाने “मी ब्रम्ह व्हावे” असे जे म्हटले ते सर्व श्रीकृष्णांनी समजुन घेतले आणि त्याविषयी देवाने असे अनुमान काढले की, अर्जुनाला ब्रम्हस्वरुप होण्याचे डोहाळे लागले आहेत. याचे कारण त्याच्या बुध्दीच्या उदरात वैराग्यरुपी गर्भ राहीला आहे, एरव्ही अर्जुनरुपी वृक्षाला ब्रम्हप्राप्तीचे फळ येण्यासाठी अपुरे दिवस होते . तरीपण वैराग्यरुपी वसंत बहरुन आल्यामुळे “मी ब्रम्ह व्हावे” या इच्छेच्या मोहराने तो फुलुन आला होता. म्हणुन ब्रम्हप्राप्ती हे फळ येण्यास आता याला फार काळ लागणार नाही. कारण हा आता विरक्त झाला आहे. असा देवांचा दृढ भरोसा झाला आहे. (ओवी १४१ ते १५० )
श्रीकृष्ण म्हणाले, हा अर्जुन ज्या ज्या साधनांचे आचरण करेल ते ते साधन त्याला प्रारंभी फळ देईल म्हणुन याला सांगितलेला अभ्यास वाया जाणार नाही. असा विचार करुन त्या वेळी श्रीकृष्ण्ा म्हणाले हे अर्जुना! तुला आता योगमार्ग सांगणार आहे तो सर्व मार्गाचा राजा आहे. त्याचे तु श्रवण कर.या मार्गामध्ये प्रवृत्तिरुप झाडाच्या बुडालाच निवृत्तिरुप कोटयावधी मोक्षफळे दृष्टीस पडतात. या मार्गाचे भगवान श्रीशंकर आजही यात्रेकरु आहेत योगीजन प्रारंभी हदय-आकाशात आडव्या मार्गाने वाटचाल करु लागले नंतर अनुभवाच्या आधारे त्यांना परब्रम्ह प्राप्तीचा मार्ग सुलभ झाला.तेव्हा इतर सर्व अज्ञानरुप मार्गाचा त्याग करुन योगी पुरूषांनी आत्मबोधाच्या सरळ मार्गाने धाव घेतली.नंतर त्यांच्या मार्गाने महर्षी आले आणि साधकांचे सिध्द झाले. आत्मज्ञानीसुध्दा याच मार्गाने महान झाले.
या मार्गाने वाटचाल करताना अनुभव येउ लागला कि, तहान-भुक यांची आठवणही होत नाही. या वाटेने चालताना रात्र कळत नाही दिवस कळत नाही. या मार्गावरुन चालताना जेथे पाउल पडेल तेथे मोक्षाची खाणच उघडते. कदाचित आडमार्गाने जरी पाउल पडले तरी स्वर्गसुख लाभते. पूर्व दिशेच्या मार्गाने चालावे आणि पश्चिम दिेशेच्या घरात यावे असे आहे. हे धर्नुधरा! मन स्थिर ठेवणे हेच या मार्गाचे चालणे आहे.या मार्गाने ज्या ठिकाणी जावयाचे तो ईश्वररुपी गाव आपणच होतो हे काय सांगावे ? पुढे तुला ते सहजव कळेल. (ओवी १५१ ते १६० )
तेव्हा अर्जुन म्हणाला, हे देवा! असे जर आहे तर मग तू योगमार्ग केव्हा सांगणार? मी उत्सुकतेच्या सागरात बुडत असताना तुम्ही मला वर काढु नये काय ? तेव्हा श्रीकृष्ण म्हणाले, असे उतावीळपणाचे बोलणे कशासाठी? आम्ही आपण होउन सांगत आहोत त्याशिवाय तुही विचारले आहेस. तरी आत्ताच तुला सविस्तर सांगण्यात येईल प्रत्यक्ष साधना करुन अनुभव घेतला तर उपयोगी होईल यासाठी साधनेला योग्य असे स्थान पाहणे आवश्यक आहे. त्या पवित्र स्थानावर सुखशांती मिळवण्यासाठी बसल्यानंतर तेथुन उठावेसे वाटू नये आणि ते स्थान पाहता क्षणी वैराग्य दुप्पट वाढावे. जेथे संतांनी वास्तव्य केले आहे जेथे संतोष वाढण्यास मदत होते जेथे मनाला धैर्याचा उत्साह प्राप्त होतो जेथील पवित्र वातावरण आपणाकडुन साधना करुन घेते अनुभव हदयाला माळ घालतो अशी रम्यपणाची थोरवी ज्या ठिकाणी अखंड आहे.
हे अर्जुना! ज्या स्थानाजवळ सहज जरी गेला तरी देखील नास्तिकाला देखील साधना करावी अशी मनापासुन इच्छा होते आपल्या वाटेने चालत असता जर कोणी अचानक त्या ठिकाणी आला आणि तो विषयासक्त असला तरी देखील ते रमणीय स्थान पाहुन तो घरी जाण्याचे विसरतो असे पवित्र रमणीय स्थान न राहणाऱ्याला देखील राहावयास लावते भटकंती करणाऱ्यास एके ठिकाणी बसविते आणि वैराग्याला थापटी मारुन जागृत करते हे पवित्र स्थान पाहिल्यावर आपल्या राज्याचा त्याग करावा येथे निवांत राहावे असे शृंगारप्रिय विलासी राजालादेखील वाटावे. (ओवी १६१ ते १७० )
याप्रमाणे जे स्थान अत्यंत रमणीय आहे तसेच जे अतिशय परमपवित्र आहे, त्या ठिकाणी डोळयांना प्रत्यक्ष परब्रम्हाचे दर्शन होते.या स्थानाचे आणखी एक लक्षण पाहावे त्या स्थानी साधकाने साधना केलेली असावी फक्त प्रपंचात रममाण झालेल्या लोकांची येथे ये-जा नसावी. या स्थानात अमृतासमान मुळासह गोड फळे देणारी दाट झाडे पसरली आहेत या स्थानात पावला-पावलावर जल आहे ते पावसाळसात देखील शुध्द असते असे शुध्द पाण्याचे निर्मल झरे विशेष करुन पाणी काढण्यास सुलभ असावेत जेथे सुर्याचे उनदेखील शीतल,सौम्य,असावे कदाचित स्वच्छ उन पडले तरा त्यापासुन ताप होउ नये वारादेखील शांत असुन मंद झुळका येत असाव्यात. ते स्थान बहुत करुन निशब्द असावे, तेथे हिंस्त्र पशूंचा प्रवेश नसावा आवाज करणारे पोपट त इकडे-तिकडे फिरणारे भ्रमर नसावेत.
ज्या ठिकाणी जलाशयाजवळ राहणारे हंस, दोन चार चक्रवाक पक्षी आणि एखादे वेळेस एखादा कोकिळ येवुन बसलेला चालेल. नेहमी नाही. परंतु अधुन-मधुन काही दिवस मोर आले गेले तरी चालतील आमची त्याला ना नाही. परंतु हे अर्जुना! असले स्थान अवश्यही शोधुन ठेवावे की त्या ठिकाणी एखादा गुप्त मठ अथवा शिवालय असावे. या दोन्हीपैकी जे आवडेल आणि चित्ताला सुयोग्य वाटेल असे असावे विशेष करुन त्या ठिकाणी एकांतात बसुन साधना करता यावी. (ओवी १७१ ते १८० )
म्हणुन तसे पवित्र स्थान आहे की नाही हे पाहावे तेथे मन एकाग्र होते की नाही हे पाहावे मन एकाग्र व शांत होत असेल तर अशा प्रकारचे आसन तयार करावे तळात साग्र कोवळे दर्भ घालावे व त्यावर शुध्द कृष्णजिन घालुन त्यावर धूतवस्त्रांची घडी घालावी. ते दर्भ कोवळे सारखे आणि सहजपणे एके ठिकाणी राहील अशा उत्तम प्रकारे अंथरलेले असावे. ते आसन जमिनीपासुन फार उंच झाले तर शरीर हलू लागेल तसेच ते आसन फारच खाली झाले तर जमिनीतील दगड,माती, कृमी कीटक यांच्या संसर्गाने साधनेमध्ये दोष निर्माण होतील.
म्हणुन आसन उंच अथवा सखल करु नये सम प्रमाणाचे आसन तयार करावे आता हे वर्णन पुरे. सांराश योग्य प्रकारे आसन करावे. त्या आसनावर बसुन मन एकाग्र करावे आणि सदगुरूचे विनम्रभावे स्मरण करुन आत्मानंदाचा अनुभव घ्यावयास सुरुवात करावी सदगुरुचे अत्यंत आदराने स्मरण करु लागलो की आंतर बाहय अष्टसात्विक भाव दाटुन सेतात आणि अहंकार विरळ होत जातो विषयाचा विसर पडतो. बाहय गोष्टीत रममाण होणाऱ्या इंद्रियांची धाव कमी होते अंतकरणात मन हळुहळु विलीन होउ लागते. अंतकरण व मनाचे ऐक्य होईपर्यत स्थिर राहावे मग ऐक्य झालेल्या जाणिवेने आसनावरती बसलेले असावे. अशा जाणिवेच्या आसनावर बसल्यानंतर अंगच अंगाला सावरते प्राणवायु प्राणवायुला धारण करतो आणि अनुभवाचा उदय होउ लागतो. (ओवी १८१ ते १९० )
त्या ठिकाणी कर्म करण्याची प्रवृत्ती मागे फिरून समाधी अलीकडे येते आसनावर बसल्यानंतर जणु काही सर्व अभ्यास संपुन जातो आसनमुद्रेचे महत्व अशा प्रकारचे आहे तेच आता सांगत आहे. तरी त्याचं श्रवण कर, पोटऱ्या मांडयांस लावुन आसन घालावे दोन्ही पायांच्या टाचा वर कराव्यात आणि आधारचक्ररूपी वृक्षाच्या बुडाशी असलेल्या गुदस्थानाचे शिवणीपाशी दोन्ही टाचा घटट व स्थिर कराव्यात. उजव्या पायांची टाच खाली घालावी व टाचेने शिवणीचा मध्यभाग दाबावा, म्हणजे उजव्या पायावर स्वाभाविकच डावा पाय बसतो गुद आणि शिश्न यांमध्ये चार बोटे जागा असते त्यापैकी दीड बोटे वर व दीड बोटे खाली जागा सोडून मध्ये जी एक बोटे जागा राहाते तेथे उजव्या पायाच्या टाचेच्या वरच्या बाजूने आपले अंग तोलुन धरुन घटट दाबावे.
शरीर उचललेले न कळेल अशा तऱ्हेने पाठीचा खालचा भाग उचलावा आणि त्याच प्रकारे दोन्ही घोटे उचलुन धरावेत.याचेच “वज्रासन” असे गौण नाव आहे. अशा प्रकारे आधारचक्रावर वज्रासनाची मुद्रा पडते आणि खालचा मार्ग बंद पडला म्हणजे अपानवायू आतल्या आत वर सरकू लागतो. (ओवी १९१ ते २०० ) नंतर सहजच डाव्या पायावर दोन्ही हात द्रोणाकार करुन ठेवावेत त्यामुळे दोन्ही खांदे वर चढलेले दिसतात. उंचावलेल्या दंडाकार खांद्यामुळे शिरकमल दोन खांद्यात घटट राहाते. मग डोळयांच्या पाण्या हळुहळू मिटु लागतात. वरची पापणी खाली येते व खालची पापणी खालीच विकसित होते.
त्या वेळी डोळयांनी अर्धी उघडलेली व अर्धी मिटलेली अशी दृष्टी होते दृष्टी ही आतल्या आत अंतर्मुख होउनही स्वताच्या इच्छेने बाहेर पाउल टाकते आणि नाकाच्या शेंडयावर स्थिर होते अर्धोन्मिलीत स्थिती मध्ये अर्धी दृष्टी आतच राहते ती पुन: बाहेर येत नाही म्हणून अर्धीच दृष्टी नाकाच्या शेंडयाच्या ठिकाणी स्थिर राहाते आता दिशांची भेट घ्यावी म्हणजे चोहोकडे पाहावे अथवा रुपाची वाट पाहावी रुप या विषयाकडे धाव घ्यावी ही इच्छा सहजच नाहीशी होते मग कंठ संकुचित होत जातो. हनुवटी कंठाच्या हाडावर घटट बसते ती जादा बळकट होउन छातीवर दाब येतो. हे अर्जुना! त्या हनुवटीच्या खाली गळयाची घाटी दिसेनाशी होते. अशा प्रकारे हनुवटीचा बंध निर्माण होतो त्याला “जालधंरबंध” असे म्हणतात. “वोढियाणा बंध” बेंबीवर पुष्ट होतो. पोट खपाटीला जाउन छोटे होते आणि हदयकमल आतमध्ये विकसीत होते यामुळे स्वाधिष्ठान चक्राच्या वरच्या बाजुला आणि बेंबीच्या खालच्या भागाला जो बंध पडतो त्याला. “वोढियाणा बंध” असे म्हणतात. (ओवी २०१ ते २१० )