अध्याय-६-भाग-५

         देहानेच देहातील पंचमहाभुतांचा नाश करणे हे आदिनाथ संप्रदायाचे गुप्त वर्म आहे परंतु महाविष्णु श्रीकृष्णांनी ते वर्म प्रगट करून दाखवले आहे त्या संक्षेपरुपी कापडाच्या गठठयावरचे दोर सोडुन त्यातील कपडयाच्या घडया साफ करून श्रोते हे गिऱ्हाईक आहे असे जाणून उलगडुन दाखविले, म्हणजे श्रीकृष्णांनी संक्षेपाने जे ध्वनित केले त्याचेच मी विवरण केले अर्जुना ! ऐक, ज्यावेळी कुंडलिनी शक्तीचे तेज लोप पावते त्या वेळी देहातील पंचमहाभुताचे स्वरुप लय पावते. मग तो योगी जगाच्या डोळयामध्ये लपुन बसतो तो कोणाच्याही डोळयांना दिसु शकत नाही. एऱ्हवी तो पुर्वीप्रमाणे सावयव दिसत असतो, परंतु जणू काही तो वाऱ्याचाच बनविलेला आहे, असा होतो अथवा केळीची सोपटे काढुन त्याचा गाभा उभा केला तर काहीच उरत नाही, किवां आकाशाला जसे अवयव फुटावेत तसे त्याचे अवयव असुन देखील नसल्याप्रमाणेच असतात, त्याप्रमाणे शरीर बनल्यावर त्याला खेचर म्हणजे गगनामध्ये संचार करणारा म्हणतात, देहधारी लोकांमध्ये अशा प्रकारचे शरीर बनणे महणजे एक प्रकारचा चमत्कार आहे असा साधक योगाचा अभ्यास करून पुढे निघुन गेलेला असतो.

        त्या मार्गावर साधनरुपी पावलांची ओळ मागे राहते त्या ठिकाणी अणिमा, महिमा, लघिमा, गरिमा, प्राप्ती, प्राकाम्या, ईशत्व, वशित्व, इत्यादी सिध्दी असतात. अर्जुना !  हे लक्षात ठेव कि, या सिध्दीशी आपल्याला काय करायचे आहे? देहातल्या देहातच पृथ्वी ,आप, तेज या तीन भुतांचा लोप होतो. पाणी पृथ्वीला विरघळुन टाकते, अग्नी पाण्याला आटवुन टाकतो, आणि हदयाकाशामधील अग्नीला वायु नाहीसा करतो, पाठीमागे वायु एकटाच उरतो तो शरीराच्या आकाराने राहतो मग तोही काही काळाने हदयाकाशातुन निघुन मूर्धन्याकाशात जाउन मिळतो. (ओवी २९१ ते ३००) त्यावेळी कुंडलिनी हे नाव राहत नाही, तिला “मरूत ” म्हणजे वायुमय हे नाव प्राप्त होते, जो पर्यत ती शिवाशी एकरुप होत नाही, तोपर्यत तिचे शक्तिपण असतेच. मग ती शक्ती जालंधरबंधाचे उल्लंघन करून ककार ज्याच्या अंती आहे अशा कृकाटिकेचे तालुस्थानाचा भेद करुन मूर्धन्याकाशाच्या पहाडावर प्रवेश करते. ती ओमकाराच्या पाठीवर त्वरित पाय देवुन पश्यंती वाणीची पायरी मागे टाकते. पुढे ज्याप्रमाणे सागरात नद्या मिसळतात. त्याप्रमाणे अर्धमात्रापर्यतच्या ओमकाराच्या मात्रा मूर्धन्य-आकाशात मिसळतात. मग ती शक्ती ब्रम्हरंध्राचे ठिकाणी स्थिर होउन  “ते मी ब्रम्ह आहे”  या ज्ञानाच्या जणू बाहया पसरुन परब्रम्हरुपी लिंगाला आलिगंन देते, म्हणजे त्याच्याशी एकरुप होते. त्यावेळी पंचमहाभूतांचा पडदा नाहीसा होतो, आणि शिवशक्तीचे ऐक्य होते. त्या ऐक्यामध्ये मूर्धन्याकाशासह शक्तीचे रूप लोप पावते.
ज्याप्रमाणे समुद्राचे पाणी मेघाच्या द्वारे समुद्रापासुन वेगळे होउन नदीच्या पात्रात पडुन पुन्हा नदीच्या रुपाने समुद्रास मिळते, त्याप्रमाणे हे अर्जुना ! शरीराच्या द्वारे जेव्हा शक्तिरुप त्यागुन शिवच शिवात मिळते, ते एकत्वही  समुद्राच्या पाण्याप्रमाणे होय.या अवस्थेमध्ये  पुर्वी द्वैत होते का मुळातच अद्वैत होते असा विचार करण्यापुरतेही काही राहत नाही. आकाशदेखील ज्या महाशुन्यामध्ये लय पावते, असे जे काही परमात्मतत्व आहे, तो अनुभवाने जो कोणी होतो, म्हणजे त्या तत्वाशी जो एकरूप होतो , त्यालाच ही अवस्था प्राप्त होते. (ओवी ३०१ ते ३१०) म्हणुन ज्या शब्दांनी कोणतीही गोष्ट स्पष्ट करून सांगता येते, त्या शब्दांचे हात तेथील अवस्थेचे वर्णन करण्यापर्यत पोचत नाहीत. अर्जुना ! एऱ्हवी तरी “या अलौकिक अवस्थेचे मर्म मी सांगू शकेन ” असा अभिमान धरणारी वैखरी वाणी त्या अवस्थेपासुन दुरच राहते भिवयांच्या आतल्या बाजुस म्हणजे आज्ञाचक्रात ओमकारातील “मकार” मात्रेचा देखील प्रवेश होत नाही, त्याप्रमाणे एकटया प्राणवायुला देखील  मूर्धन्याकाशात येण्यास अडचण निर्माण होते. नंतर तो प्राणवायू मूर्धन्य-आकाशात विरुन जातो, तेव्हा शब्दांचा दिवस मावळतो म्हणजे शब्दांचे बोलणे खुंटले जाते, मग त्यानंतर आकाशाचाही लय होतो. परब्रम्हरुपी डोहात जेथे आकाशाचा थागं लागत नाही, तेथे वर्णन करण्याची नौका पलीकडे नेण्यासाठी या वैखरी वेळूचा लाग लागेल काय? म्हणुन ही ब्रम्हस्थिती शब्दाने वर्णन करता येईल अथवा कानांनी ऐकता येईल अशी नाही, हे त्रिवार सत्य आहे. जे दैवयोगाने अनुभवास येते त्या वेळी तो अनुभव घेणारा तद्रुप होउन जात असतो. ही अवस्था प्राप्त झाली म्हणजे जाणायचे  असे काही शिल्लक राहत नाही म्हणुन  हे अर्जुना ! आता उगीच किती बरे बोलावे? याप्रमाणे सर्व शब्द जेथून माघारी परततात, त्य‍ा ठिकाणी संकल्पही मावळतो आणि विचारांचा वारादेखील तेथे प्रवेश करू शकत नाही. ते परमतत्व मनरहित अवस्थेचे सौदर्य आहे जे चौथ्या ज्ञानरुप तुर्या अवस्थेचे तारुण्य आहे आणि जे नित्य सिध्द अमर्याद आहे.        (ओवी ३११ ते ३२०)

          जे परमतत्व संपूर्ण विश्वाचे मुळ आहे जे योगरुप वृक्षाचे फळ आहे, जे आनंदाचे केवळ जीवन आहे, जेथे आकाराचा शेवट होतो जेथे एका मोक्षावाचुन दुसरे काही नाही, ज्या ठिकाणी उत्पत्ती आणि नाश हे देखील लय पावले आहेत, जे पंचमहाभुताचे बीज आहे जे महातेजावे तेज आहे, अर्जुना! हे ब्रम्ह माझे मुळ स्वरूप आहे, नास्तिकांनी भक्तांच्या समुदायाचा पराजय केलेला पाहुन जी निर्गुण ब्रम्हचैतन्याची शोभा रुपाला आली आहे, तीच ही चर्तुभुज मूर्ती श्रीकृष्णरुपाने आकाराला आलेली आहे, असे हे महासुख अवर्णणीय आहे. परंतु याची प्राप्ती होईपर्यत ज्या पुरूषांचे प्रयत्न सातत्याने सुरू असतात. ते पुरूष अमर्याद सुख स्वताच झालेले असतात, आम्ही जे अष्टांगयोग साधन सांगितलेले आहे, ज्याने आपले शरीर बनवलेले आहे ते पुरूष योगसाधनेमुळे परिशुध्द झाल्यावर माझ्या योग्यतेला आलेले असतात. जणु काही परब्रम्हाचा रस देहरुपी आकृतीच्या मुशीत ओतुन तयार केलेले पुतळे जसे असावेत, तसे ते योगी पुरूष शरीराने दिसत असतात, या साधनेने अंतकरणात ब्रम्हज्ञान पुर्ण प्रगट झाले तर संपुर्ण विश्व मावळते. तेव्हा अर्जुन म्हणाला, तुम्ही हे जे सांगत आहात ते अगदी सत्य आहे, कारण हे देवा ! आता आपण जी योगरुप साधना त्या राजमार्गावरुन चालणाऱ्यांना ब्रम्हप्राप्ती होते, हे आपल्या उपदेशाने मला समजले.(ओवी ३२१ ते ३३०)

        देवा ! या योगमार्गाचे एकाग्रतेने श्रवण करीत असताना चित्तामध्ये ज्ञान प्रगट होते, तर मग त्याच्या अनुभवाने तल्लीनता का बरे प्राप्त होणार नाही? म्हणुन तुझ्या सांगण्यात काहीही खोटे मानण्यासारखे नाही, परंतु माझ्या बोलण्याकडेही क्षणभर लक्ष दयावे, हे श्रीकृष्णा ! तु जो योगमार्ग सांगितलास, तो मला उत्तम प्रकारे पटला, परंतु माझी योग्यता कमी असल्यामुळे माझ्या हातुन या योगमार्गाची साधना घडणार नाही, स्वभावत: माझ्या अंगी जेवढी योग्यता आहे, तेवढया योग्यतेने जर हा अभ्यास सिध्दीस जाईल, तर याच मार्गाचा मी सुखाने अभ्यास करीन, किवां देव जसे सांगतील तसे जर माझ्या हातुन होणार नसेल, तर योग्यतेशिवाय माझ्या हातून होण्यासारखे असेल, तेच विचारतो. माझ्या मनाची अशी समजुत झाली म्हणून विचारण्यासाठी हे कारण निर्माण झाले, मग अर्जुन पुन्हा म्हणाला, हे देवा ! माझ्या प्रश्नाकडे आपण लक्ष द्यावे. अहो महाराज, ऐकले काय ? आपण जे साधन स्पष्टपणे सांगितले, त्याचा वाटेल त्याने अभ्यास केला, तर ते त्याला प्राप्त होईल ? अथवा योग्यतेशिवाय केलेला योगाचा अभ्यास सिध्दीस जाईल काय? तेव्हा श्रीकृष्ण म्हणाले, हे अर्जुना ! तु हे काय बरे विचारतोस? ही योगाची साधना तर मोक्ष प्राप्त करुन देणारी आहे परंतु याशिवाय दुसरी साधारण जरी गोष्ट असली, तरी ती सुध्दा अधिकाराच्या योग्यते शिवाय सिध्दीस जाते काय? परंतु योग्यता जिला म्हणतात ती फलप्राप्तीच्या अधीन असते असे जाणावे. कारण योग्य होउन जे करावे ते आरंभीच फलदायक होते. (ओवी ३३१ ते ३४०)

          तर तसा काही येथे योग्यता हा सहजपणे बाजारात उपलब्ध होणारा माल नाही आणि दुसरे म्हणजे योग्यतेची एखादी खाण आहे काय? जर कोणी काही प्रमाणात विरक्‍त झाला, आहार इत्यादी देहधर्मा विषयी तो निग्रह करू लागला, तरी तो देखील व्यवस्थित आधिकारी नाही काय? अशा युक्तीने एवढी योग्यता तुझ्या ठिकाणी प्राप्त झाली आहे. अर्जुनाच्या मनात जसा संशय होता, तो या प्रसंगाने भगवंतानी दुर केला, मग  श्रीकृष्ण म्हणाले, हे अर्जुना ! या योगप्राप्तीची अशी व्यवस्था आहे जो अनियमितपणे वागतो, त्याची योगप्राप्तीची योग्यता नाही.जो जिभेच्या अधीन झाला आणि झोपेकरता सर्व आयुष्य देवुन विकला गेला, तो या योगाचा अधिकारी म्हटला जात नाही. अथवा जो दुराग्रहाच्या आवेशाने भुक-तहान यांना कोंडुन टाकतो, भुकेला मारून आहार तोडून टाकतो, तो निद्रेच्या वाटेस जात नाही, याप्रमाणे ज्याच्या ठिकाणी हटट निर्माण होउन जो नाचतो, त्याचे ते शरीर त्याच्या ताब्यात रहात नसते, तर मग तो योग कसा करणार? म्हणून विषयांचे अतिशय सेवन करण्याची इच्छा करू नये किवां त्यांचा संपुर्ण त्याग करण्याची इच्छा धरु नये.अन्नाचे सेवन तर केले पाहीजे, परंतु ते नियमांच्या मापाने मोजलेले असावे, त्याप्रमाणे सर्व कर्मे युक्तीने योग्य प्रमाणात करावीत. मोजके शब्द बोलावेत, मोजक्या पावलांनी चालावे, योग्य वेळी झोपेलाही मान द्यावा. (ओवी ३४१ ते ३५०)

         जागरणही परिमित असावे, अशा नियमित आचरणामुळे शरीरातील सप्तधातु समतोल राहतील, अशा नियमित आणि परिमित हाताने इंद्रियांना विषय दिले तर मनातील संतोषाचा वृक्ष बहरू लागतो. जेव्हा बाहय इंद्रियांना नियमितपणाचे सुयोग्य वळण लागते, त्यावेळी अंतकरणात सुख वाढते, अशा स्थितीत योगाच्या अवघड क्रिया न करताही योगाचा अभ्यास सहजच घडतो, ज्याप्रमाणे भाग्याचा उदय झाला असता उद्योगाच्या निमित्ताने सर्व प्रकारची समृध्दी घरी चालुन येते, त्याप्रमाणे जो नियमाने वागतो, तो कौतुकाने जरी योगाच्या  अभ्यासाकडे वळला तरी त्याला आत्मसिध्दी प्राप्त होते. म्हणुन अर्जुना! सात्विक आचरणाचा नियमितपणा‍ ज्या भाग्यवान पुरूषाच्या हातुन घडतो, तो मोक्षाच्या राज्याने सुशोभित होतो. नियमित सन्मार्गाने वागणाऱ्याला जर योगाचा अभ्यास करण्याची इच्छा झाली, तर तो योग नद्यांचा संगम झालेल्या प्रयागतिर्था प्रमाणे होय.

          त्या आत्मस्वरुपी प्रयागाच्या ठिकाणी ज्या पुरूषाचे मन क्षेत्रसंन्यासाप्रमाणे स्थिर राहते, त्या पुरूषाला तु योगी म्हण आणि प्रसंगाच्या अनुरोधाने हेही लक्षात ठेव की, त्याच्या चित्ताला निश्चल दिव्याची उपमा लागु पडते. आता तुझे मनोगत जाणुन आम्ही तूला काही विचार सांगणार आहोत, म्हणून तु एकाग्र चित्ताने ते ऐक. तु योगप्राप्तीची इच्छा करतोस, परंतु त्याचा अभ्यास करण्याविषयी तु योग्य प्रयत्न करीत नाहीस, तो योग-अभ्यास कठिण आहे, अशी तुझ्या मनाला भिती वाटते का, ते सांग.  (ओवी ३५१ ते ३६०)

पुढील भाग