ते दुखाच्या अखंड धारा प्रगट करणारे महाभयाला वाढविणारे आणि ते सर्व प्रकारच्या दुखांची पुर्तता करणारे भांडवल आहे ते वाईट बुध्दीचे उत्पत्तिस्थान आहे ते वाईट कर्माचे फळ आहे जे केवळ भ्रमाचे स्वरुपच आहे. त्या संसाराची बैठक आहे जे काम, क्रोध, लोभ, मद, मोह, मत्सर इत्यादी विकारांची फुललेली बाग आहे जे सर्व रागांचे वाढून ठेवलेले ताट आहे जे काळाने खावुन राहिलेले उष्टे अन्न आहे. जो आशेचा अंग टेकविण्यासाठी असलेला ओटा आहे जी स्वाभाविक जन्म-मृत्यूची वाहती अशी वाट आहे जे भ्रातिचे भरलेले भरीव असे रुप आहे जे संशयाचा ओतीव आकार आहे अधिक काय सांगावे? ते विचविंचक जणु काही पेवच आहे ते शरीर वाघाचे वसतिस्थान आहे. ते वारांगनांच्या स्नेहाप्रमाने वरवरचक दिखावू आहे ते विषयांचा अनुभव प्राप्त करुन देणारे उत्तम प्रकारे पुजा करुन ठेवलेले देवतायंत्र आहे. तो क्रुर राक्षसीचा कळवळा आहे तो निवालेल्या विषांच जलाचा घोट आहे तो ज्ञानाचे सोंग धारण केलेल्या चोराचा मिळविलेला विश्वास आहे ते कोडाने व्यापलेले मनुष्याचे अलिंगन आहे, तो प्राण हरणकरणा-या सर्पाचा मृदुपणा आहे ते हरिणांना भुलवून जाळया पकडणा-या पारध्याचे नकली गाणे आहे. तो वैरी लोकांनी केलेला पाहुणचार आहे तो दुष्ट-दुर्जनांनी दाखवलेला वरवरचा आदर आहे अधिक काय सांगावे? तो सर्व अनर्थाचा सागर आहे ते शारिरीक स्वप्नात पाहिलेले स्वप्न आहे अथवा मृगजळाच्या पाण्याने फोफावलेले वन आहे ते धुरांच्या कणाने भरलेले आकाश आहे. ( ओवी १४१ ते १५० )
अशा प्रकारे जे शरीर आहे ते जे पुरूष माझ्या विराट चैतन्याशी एकरुप होवुन राहीले आहेत त्यांना प्राप्त होत नाही. एरवी ब्रम्हपणाचा अहंकार असणा-यानां सुध्दा जन्म-मृत्यूचे चक्र चुकत नाही परंतु मृत्यू पावलेल्या माणसाचे जसे पोट दुखत नाही हतवा जागे झाल्यानंतर स्वप्नातील महापुरात कोणी बुडवू शकत नाही त्याप्रमाण माझ्या स्वरुपाशी जे ऐक्य पावले ते जन्म-मरणाच्या दुखाने लिप्त होत नाहीत एरवी चौदा भुवनाचे जे शिखर, सात चिरंजीवांमध्ये अग्रभागी असणारे आणि त्रैलोक्य रुप पर्वताचे मस्तक जे ब्रम्हभुवन, ज्या वेळी ब्रम्हलोकाचा एक प्रहर दिवसापर्यत एका इंद्राचे आयुष्य राहात नाही आणि एका दिवसामध्ये एकदम चौदा च्या पंक्ती उठतात.कृत, त्रेता, द्वापर व कली ही चार युगे हजार वेळा येवुन जातात त्यावेळी ब्रम्हदेवांचा एक परिपुर्ण दिवस होतो आणि त्याच रीतीने चार युगे हजारांच्या संख्येने सरली म्हणजे जेथील एक रात्र होते, ज्या ठिकाणचा दिवस व रात्र एवढी मोठी आहे त्या कालात जे मृत्यू पावत नाहीत ते भाग्यवान हा दिवस पाहतात ते स्वर्गातील चिरंजीव होत इतर दीर्घयुष्याच्या बाबतीत इतर देव-देवतांचे विशेष काय सांगावे ? मुळामध्ये देवराज इंद्राचीच दशा पहा की, ब्रम्हदेवांच्या एका दिवसात चौदा इंद्र जातात परंतु ब्रम्हदेवांच्या या आठ दीर्घ प्रहरांना जे दीर्घायुषी आपल्या डोळयांना पाहणारे आहेत त्यांनाच अहोरात्रवेत्ते असे म्हणतात. त्या ब्रम्हलोकांत जेव्हा दिवस उगवतो तेव्हा त्याची गणती करता येत नाही असे लीन असलेले विश्व आकाराला येते. (ओवी १५१ ते १६०)
पुढे त्या दिवसाचे चार प्रहर संपल्यावर हा आकाररुपी समुद्र आटुन जातो आणि त्यानंतर पहाट झाली म्हणजे हा विश्व-आकाररुपी समुद्र पुन: जसा होता त्याचप्रमाणे भरु लागतो. शरद ऋतुच्या प्रारंभी ज्याप्रमाणे मेघ आकाशात विरुन जातात आणि मग ग्रीष्म ऋतुच्या शेवटी जसे पुन: प्रगट होतात त्याप्रमाणे ब्रम्हदेवाच्या दिवसाच्या प्रारंभी ह्रे सर्व भूतसृष्टीचे समुदाय हजार चौकडयांच्या काळाचे कारण संपेपर्यत उत्पन्न होत असतात मग रात्रीची वेळ होते आणि सारे विश्व अव्यक्तात लीन होते ती रात्रीची वेळदेखील युगांच्या चौकडया हजार वेळा जाईपर्यत असते आणि पुन्हा पहाट झाली की पुर्वीप्रमाणेच सर्व भूतांची रचना होते हे सांगावयाचे कारण काय तर ब्रम्हलोकाच्या एका दिवस-रात्रीमध्ये संपूर्ण विश्वाची उत्पत्ती आणि संहार होतो ब्रम्हदेवाच्या मोठेपणाचे प्रमाण केवढे आणि कसे आहे हे पाहु गेलो तर हा त्रैलोक्याचा अफाट पसारा ब्रम्हदेवाच्या गावचा दिवस उदयाला आल्याबरोबर एकसारखा मांडला जातो मग रात्रीचा समय झाला असता त्रैलोक्याचा सर्व पसारा आपोआप अव्यक्तात लय पावतो आणि सर्व द्वैत नाहीसे होवुन अव्यक्ताच्या साम्याला येते ज्याप्रमाणे वृक्षाचा सारा विस्तार नाहीसा होवुन तो एका बीजामध्से समाविष्ट झालेला असतो किवां अनेक मेघ हे आकाश रुप होतात त्याप्रमाणे अनेकत्व ज्या एकात समाविष्ट होते त्याला ” साम्य” असे म्हणतात. त्या साम्यावस्थेत सम, विषम, हे काही दिसत नाही म्हणून त्या साम्यावस्थेस भूते असे म्हणता येत नाही जसे दुधाचे दही झाल्यानंतर त्या दुधाची नामरुपे नष्ट होतात. (ओवी १६१ते १७०)
त्याचप्रमाणे जगाचा स्थूल-सुक्ष्म आकार लोप पावल्याबरोबर जगाचे जगपणच नष्ट होते. परंतु हा आकार ज्या अधिष्ठानरुपी परमात्म्याच्या ठिकाणी होतो तो मात्र जसाच्या तसाच असतो त्याचा लोप कधीही होत नाही.तेव्हा त्याला सहजच अव्यक्त हे नाव आहे आणि तेच आकाराला आले म्हणजे व्यक्त होते ही दोन्हीही नावे एकाच्यामुळे दुसरे, अशी सापेक्ष दिलेली आहे येऱ्हवी परमात्मा स्वरुपाच्या ठिकाणी व्यक्त-अव्यक्त हे दोन्हीही भाव नाहीत ज्याप्रमाणे अलंकाराचे आकार आटविले, की त्या सोन्याला लगड असे म्हणतात पुन्हा लगडीचा घनवट आकार ज्यावेळी नाहीसा होतो त्या वेळी त्याच सोन्याचे निरनिराळे अलंकार होतात. अलंकार व लगड या दोन्हीचे होणे जसे एका आधारभुत सुर्वणावरती अवलंबुन असते त्याप्रमाणे व्यक्त आणि अव्यक्त यांमधील भेद एकाच साक्षीभूत चैतन्यावर अवलंबुन असतो. ते साक्षीभूत चैतन्य विश्वासारखे व्यक्त कार्य करत नाही किवां प्रकृतीसारखे अव्यक्त कारणही नाही, ते दोन्हीही भावाच्या पलिकडचे आहेत उत्पत्तीरहित आणि नित्यसिध्द आहेत ते चैतन्य विश्वाकार होवुन राहते परंतु विश्वपण लय पावले तरी ते चैतन्य लय पावत नाही, ज्याप्रमाणे अक्षरे पुसून टाकली तरी त्यातुन निर्माण होणारा आशय पुसला जात नाही असे पाहा की पाण्यावर तरंग येतात व जातात परंतु पाणी हे कायमच असते त्याप्रमाणे भुते निर्माण झाली आणि नाहीशी झाली तरी अविनाशी परब्रम्ह हे नाश पावत नाही. किवां अलंकार आटल्यावर सुवर्ण जसे आटत नाही त्याप्रमाणे मृत्यू पावणाऱ्या शरीरामध्ये जे अमर आहे. त्या परब्रम्हाला कौतुकाने अव्यक्त असे म्हटले तर त्याची स्तुती केली असे होत नाही कारण ते मन आणि बुध्दी यांना सापडत नाही, जे आकाराला आले असता ज्याचे निराकारपण जात नाही व आकाराच्या लोपाने ज्याची नित्यता बिघडत नाही. (ओवी १७१ते १८०)
म्हणून ज्याला अक्षर म्हणतात ज्याचा अक्षर म्हण्यातच बोध उत्पन्न होतो, त्या अक्षराच्या पलिकडे दुसऱ्या कोणत्याही पदार्थाचा विस्तार दिसत नाही म्हणुन त्याला “परमगती” हे नाव आहे. जे अक्षर या सर्व देहरुपी नगरामध्ये आहे पण जे देहाकडुन कोणत्याही प्रकारच्या व्यापार करवीत नाही आणि स्वतादेखील काही व्यापार करत नाही म्हणून ते देहात झोपी गेल्याप्रमाणे म्हणजे उदासीन आहे, येऱ्हवी अर्जुना ! देहात असणारा परमात्मा जरी काही करत नसला तरी सुध्दा देहाकडुन होणाऱ्या क्रिया बंद पडत नाहीत आणि दहा इंद्रियांचे मार्ग तर अनेक क्रियांच्या रुपाने वाहतच असतात, मन रुपी चव्हाटयावर विषयरुपी बाजार उघडलेले असतात आणि त्यापासुन होणाऱ्या सुखदुखाचा मुख्य हिस्सा अंतकरणापर्यत प्राप्त होतो, राजा सुखाने झोपी गेला तरीपण देशाचा व्यापार जसा बंद पडत नाही प्रजा आपल्या इच्छेने व्यापार करीत असते. त्याप्रमाणे बुध्दीची जाणण्याची क्रिया अथवा मनाचे संकल्प विवाद्य रुप घेण्या-देण्याची क्रिया, इंद्रियांचे कर्म व प्राणवायुचे स्फुरण देहाच्या या सर्व क्रिया परमात्म्याने स्वता न करविताही योग्य प्रकारे सुरू राहतात. ज्या प्रकारे सुर्याने स्वता न चालविताही त्याच्या प्रकाशात लोक आपोआप चालत राहतात त्याप्रमाणे अर्जुना ! हा परमात्मा शरीरात स्वस्थ आहे म्हणुन त्याला पुरूष असे म्हणतात हे समजुन घे, पतिव्रता जी अशी प्रकृती, तिच्याशी हा परमात्मा एकपत्नीव्रताने असतो, या कारणास्तव देखील त्याला पुरूष म्हणता येते. (ओवी १८१ते १९०)
वेदांचे सर्व ज्ञान ज्याचे अंगनदेखील पाहु शकत नाही, तसेच ज्याच्यात आकाशदेखील सामावलेले आहे असे जाणून योगी लोक त्याला परात्पर असे म्हणतात तो एकनिष्ठ भक्ताचा शोध करीत त्याचे घरी येतो. जे भक्त काया-वाचा-मनाने परमात्म्याशिवाय दुसरी गोष्ट श्रवण करीत नाहीत त्यांच्या एकनिष्ठेचे पीक देणारे हे उत्तम प्रकारचे शेत आहे हे पांडवा ! हे संपूर्ण त्रैलाक्यच परमात्मास्वरुप आहे अशी ज्याच्या मनाची धारणा झाली आहे त्या भक्ताचे जे निवासस्थान आहे.जे गर्वरहित पुरूषांचे मोठेपण आहे, जे गुणातीत पुरुषाचे ज्ञान आहे आणि जे आशारहित पुरूषास सुखाचे राज्य आहे जे संतुष्ट लोकांसाठी वाढलेले ताट आहे. हे धनंजया ! असे एकेक सांगुन किती बरे विस्तार करु ? आता थोडक्यात सांगतो त्या परमधामाला गेल्यावर तो ज्ञानी भक्त ते स्थानच होवुन राहतो. थंडगार वाऱ्याच्या लहरीने तापलेले पाणी देखील थंड होते अथवा सुर्यासमोर अंधार आला असता तो अंधारच प्रकाशरुप होवुन राहतो ज्याप्रमाणे लाकुड अग्नीमध्ये गेले असता अग्नीरुप होते आणि नंतर ते अग्नीरुप झाल्यावर प्रयत्नाने लाकुडपण निराळे काढु म्हटले, तर ते निराळे काढता येत नाही. अथवा पंडुसुता ! प्रखर बुध्दीवंत माणसाने अफाट प्रयत्न केला तरी साखरेचा पुन्हा उस होत नाही. (ओवी १९१ते २००)
परिसाच्या स्पर्शाने लोखंडाचे सोने झाले तर तो गेलेला लोखंडपणा कोण बरे परत आणू शकेल? ज्याप्रमाणे दुधाचे तुप झाल्यावर तुपाला जसा दुधपणा निश्चीत येवु शकत नाही त्याप्रमाणे परमधाम प्राप्त झाल्यावर पुनर्जन्म होत नाही, ते माझे खरोखरच परमश्रेष्ठ व सत्य असे निजधाम आहे. हे अंत:करणातील गुहय वर्म स्पष्ट करुन दाखवीत आहे. त्याप्रमाणे देहत्यागानंतर ज्या स्वरुपाला योगी प्राप्त होतात ते वर्म आणखी एका प्रकाराने जाणण्यास सोपे आहे अथवा अकस्मात असे घडते की जे योगी अयोग्य वेळी देह सोडतात त्यांना पुन्हा जन्माला यावे लागते, म्हणून योगी लोकांनी परिशुध्द काळात देह ठेवला तर देह ठेवताक्षणी ते परब्रम्हाशी एकरुप होतात एरवी अशुध्द काळात देह ठेवला तरते पुन्हा संसाराला प्राप्त होतात याप्रमाणे सायुज्य मुक्ती आणि पुर्नजन्म ही दोन्ही काळाच्या स्वाधीन आहेत, हे अर्जुना ! ऐक मरणकाळ जवळ आला असता शेवटी पंचमहाभुते आपापल्या वाटेने निघुन जातात, या प्रकारे प्राप्त झालेल्या प्रयाणकाळी भ्रम बुध्दीला गिळीत नाही स्मृती आंधळी होत नाही आणि मन मरत नाही. हा संपुर्ण चेतना देणारा वर्ग मृत्यूसमयी टवटवीत असतो.म्हणजे मृत्यूकाळीही अनुभवलेल्या ब्रम्हयाचे अखंड अनुसंधान ठेवतो. (ओवी २०१ते २१०)
याप्रमाणे सर्व इंद्रियसमुह सावध असतात आणि तो सावधपणा शेवट पर्यत टिकतो तेव्हा तो मरणकाळ योग्य मानला जातो परंतु जठराग्नी प्रदीप्त असेल तर हे घडते, असे पाहा की वाऱ्याने अथवा पाण्याने दिव्याचा प्रकाश नाहीसा होतो तेव्हा पूर्वी असलेली आपली दृष्टी कार्यरत असुनही अंधारात दिवा नसल्यामुळे पाहु शकते काय? त्यावेळी मृत्युमुखी होणाऱ्या विषमवाताने शरीर आत-बाहेर कफाने व्याप्त होते त्या वेळी जठराग्नीचक तेज विझून जाते. त्या वेळी प्राणाला क्रियाशक्ती नसते, अशा वेळी बुध्दी असुनही तो काय करु शकेल? म्हणुन देहात जठराग्नी असल्याशिवाय देहात चेतना वाहत नाही. अरे देहातील अग्नी जर नाहीसा झाला तर तो देह देह न राहता ओल्या चिखलाचा गोळा असतो, या वेळी आयुष्य आपला वेळ व्यर्थपणे अंधारात शोधीत राहतो. त्यावेळी मागे केलेले परमेश्वराचे स्मरण पुर्णपणे सांभाळावयाचे असते आणि मग देहाचा त्याग करुन ब्रम्हस्वरुपाशी ऐक्य पावावयाचे असते, परंतु असे घडत नाही देहांताच्या समयी कफाच्या चिखलात ज्ञानशक्ती बुडून गेल्याने मागील व पुढील गोष्टीचे स्मरण राहत नाही. आपण ठेवलेली वस्तु न दिसताच हातातील दिवा जसा विझुन जावा, त्याप्रमाणे मृत्यूच्या पुर्वी जो अभ्यास केलेला असतो तो मृत्यूपुर्वीच नाहीसा झालेला असतो , आता हे सर्व सांगणे असो, ज्ञात राहण्यासाठी जठराग्नी हे मुळ कारण होय, म्हणून मृत्यू-समयी त्या अग्नीचे संपुर्ण बळ हे असावे लागते. देहाच्या आतमध्ये जठराग्नीचा आणि बुध्दीच्या आत ज्ञानाचा प्रकाश तसेच बाहेर ( देह-त्यागाच्या वेळी ) शुक्ल पक्षाचा दिवस, उत्तरायणातील सहा महिन्यापैकी कोणताही एक महिना असावा. (ओवी २११ते २२०)