अध्याय-९-भाग-२

            आमची मायेच्या पलीकडे असणारी परिशुध्द स्वरुपस्थिती जर तु कल्पना टाकुन पाहशील तर माझ्या ठिकाणी सर्व भुते आहेत असे म्हणणे सुध्दा व्यर्थ आहे. कारण सर्व काही मीच आहे येऱ्हवी संकल्परुप संध्याकाळचे वेळी ज्ञानरुप डोळे काही काळ अज्ञानरुपी अंधकाराने ग्रासले जातात, म्हणुन मी अखंड एकरस जरी असलो तरीपण‍ कल्पनेच्या संध्याकाळामुळे माझे स्वरुप विशेष रुपाने अप्रकाशित व सामान्य रुपाने प्रकाशित जेव्हा असते तेव्हा अशा अर्धवट स्थितीमध्ये भूते मजहुन वेगवेगळी आहेत असे दिसते. तीच कल्पनेची संध्याकाळ आत्मज्ञानाने ज्या वेळी मावळते त्या वेळी मी अखंड अद्वैतरुप आहेच जसे भ्रम नाहीसा झाला की मायेच्या ठिकाणी भासलेला सर्पपणा नाहीसा होतो, एरवी जतिनीतुन गाडगी-मडकी यांचे आकार आपोआप प्रगट होतात का? तर नाही, परंतु कुंभाराच्या कल्पनेच्या पोटामध्ये जो आकाराचा गर्भ असतो, तो अनेक रुपाने प्रगट होतो, किवां समुद्राच्या अफाट जलामध्ये लाटांच्या खाणी असतात काय? परंतु जलापेक्षा लाटा वेगळया भासविण्याचे काम वाऱ्याचे नाही का? असे पाहा की, कापसाच्या पोटामध्ये उपजतच कापडाचा गठठा असतो काय? पण तो कापुस नेसणाऱ्यांच्या दृष्टीने कापड झालेला असतो, जरी सोने हे अलंकारारुपाने नटले  तरी सुध्दा त्याचा सोनेपणा मोडत नाही सुर्वणाहुन विविध आकारांचे अलंकार जे वरवर दिसतात ते दागिने घालणाऱ्याच्या दृष्टीने दिसत असतात. खोल दरीत आपल्या शब्दांचा जो प्रतिध्वनी ऐकु येतो किवां आरश्यामध्ये जे आपले बाहय स्वरुप आपण पहातो तो खरोखर आपल्या बोलण्याचा किवां पाहण्याचा परिणाम असतो किवां आपल्या पुर्वीपासुनच ते तेथे होते हे सांग बरे. त्याचप्रमाणे माझ्या उपाधिरहित शुध्द स्वरुपाच्या ठिकाणी जो भुतांच्या उत्पत्तीचा आरोप करतो त्याला त्याच्या कल्पनेमध्ये भूतांचा भास होत असतो, तीच भूतांचा आभास असणारी कल्पनारुपी प्रकृती आत्मज्ञानाने जेव्हा नष्ट होते, त्यावेळी मिथ्यारुप भुते मुळातच संपलेली असतात आणि मग  माझे निखळ स्वरुप शिल्लक राहते. ( ७१ ते ८० )

         जर आपण गरगर फिरलो असता अंगात भोवळ येते आणि दऱ्या, पर्वत आपल्या भोवती फिरत असलेले दिसतात. त्याप्रमाणे आपण सातत्याने कल्पना विलासात रमलेले असतो, त्यामुळे माझ्या अखंड स्वरुपात भिन्न -भिन्न भुते भासमान होतात. त्या कल्पनेचा त्याग करुन पाहीले, तर मी भुतांच्या ठिकाणी व भूते माझ्या ठिकाणी आहेत अशी स्वप्नामध्ये देखील कल्पना करण्यासारखी गोष्ट शिल्लक राहत नाही. आता मी “एक सर्व भूतांना धारण करणारा आहे अथवा भूतांत असणारा”  ही सर्व प्रकारची बोलणी संकल्प-कल्पनारुप सन्निपात झालेल्या माणसाची आहेत.म्हणुन प्रियोत्तमा अर्जुना ! ऐक याप्रमाणे जो विश्वासहित विश्वाचा आत्मा आहे तो मी या मिथ्यारुप सर्व भूतसमुदायाला सदैव उत्पन्न करण्यास योग्य असे अधिष्ठान आहे.ज्याप्रमाणे सुर्याच्या तीव्र किरणांनी जमिनीवर पाणी नसतानाही मृगजळाचा भास होतो त्याप्रमाणे सर्व भूतसमुदाय माझ्या ठिकाणी मृगजळाप्रमाणे मिथ्या समज आणि मी सुर्य किरणाप्रमाणे सत्यरुप समज.अशा प्रकारे सर्व भूतांना निर्माण करणारा असूनही सुर्य आणि  त्याचे तेज ही ज्या प्रकारे एकच आहेत, त्याप्रमाणे मी सर्व भूतमात्राहुन वेगळा नाही. हा आमचा ऐश्वर्ययोग तुला उत्तम प्रकारे समजलाय ना? तर आता सांग बरे, मी आणि सर्व महतभूतापासुनची देहापर्यतची तत्वे यांच्यात काही भेदाचा संबंध आहे काय? या करिता माझ्याहुन सर्व भूते वेगळी नाहीत आणि मलाही सर्व भूताहुन वेगळा कधी मानु नकोस. आकाश जेवढे मोठे आहे, तेवढाच आकाशातला वायुदेखील मोठा आहे म्हणून तो सहजपणे पंख्याने हलविला, तर आकाशापेक्षा वेगळा दिसतो, भासतो एरवी आकाश म्हणुन जे आहे तेच तो असतो. त्याप्रमाणे कल्पना केली असता सर्व भूतमात्रांचा मोठा समुदाय माझ्या ठिकाणी भासमान होतो, परंतु निर्विकल्प अवस्थेमध्ये तर काहीच नसते त्या अवस्थेत मीच सर्वत्र भरुन उरलेला असतो. (ओवी ८१ ते ९० )

          म्हणून भूतसमुदाय नाही आणि आहे हे दोन्ही अनुभव कल्पनेच्या संबंधामुळे निर्माण होतात कारण कल्पना नाहीशी झाली की भूतसमूदाय नष्ट होतात आणि कल्पना उत्पन्न झाली की भूतसमुदाय भासमान होतात. मुळामध्ये कल्पनाच नाहीशी झाली तर भूते आहेत आणि नाहीत हा अनुभव कोठुन येणार? म्हणून तू या  ऐश्वर्ययोगासंबंधी पुन: विचार कर. अशा अनुभवरुपी विशाल ज्ञानसागरामध्ये तू स्वताला एक  तरंग कर मग चराचरात जर तूच सर्वत्र समप्रमाणात ब्रम्हरुपाने भरला आहेस असे तूला अनुभवास येईल. देव म्हणतात हे अर्जुना ! तुला या ज्ञानाने जागृती आली ना ! हे द्वैतरुपी स्वप्न मिथ्या झाले ना. पुन्हा जर कदाचित बुध्दीला कल्पनेची झोप आली तर तुला झालेले अभेद ज्ञान नाहीसे होईल आणि तु द्वैतरुपी स्वप्नात फिरत राहशील. म्हणून आता यापुढे तुझी कल्पनारुपी झोप नाहीशी होईल आणि तुला परिशुध्द सच्चिदानंद स्वरुपाचे ज्ञान सहजपणे प्राप्त होईल असे जे वर्म आहे ते तुला उघडपणे दाखवितो. हे धैर्यवृध्दीगता धर्नुधारी अर्जुना ! एकाग्रतेने पूर्ण लक्ष दे, सर्व भूतमात्रांची उत्पत्ती, स्थिती व लय मायाच करीत असते. जिला प्रकृती असे नाव आहे, ती अपरा आणि परा अशी दोन प्रकारची प्रकृती तुला सांगितली आहे. अपरा प्रकृती आठ प्रकारचा भेद दाखवून स्पष्ट केली आहे, आणि दुसरी परा प्रकृती जीवरुप आहे. अर्जुना ! हा प्रकृतीचा सर्व विषय तु मागे ऐकला आहेस, म्हणून त्याबद्दल वारंवार सांगण्याचे कारण नाही. तरीही सर्व भूते महाकल्पाच्या शेवटी माझ्या अव्यक्त प्रकृतीमध्ये लयरूप ऐक्याला प्राप्त होत असतात. (ओवी ९१ ते १०० )

            वर्षा ऋुतूमध्ये जमिनीतुन निर्माण झालेले अनेक प्रकारचे गवत ग्रीष्म ऋुतूच्या कडक उन्हाळयात बीजासह पुन:  भुमीमध्ये लीन होऊन जाते, किवां वर्षा ऋुतूचे मेघाचे अवडबंर मावळुन जेव्हा शरद ऋुतूचा प्रारंभ होतो तेव्हा सर्व आकाशातील मेघांचा समुह आकाशातच विरुन जात असतो. अथवा  आकाशाच्या पोकळी मध्ये वायु जसा निवांत होऊन नाहीसा होतो किवां जलामध्ये उत्पन्न झालेल्या लाटा जलातच नाहीशा होतात अथवा जागृती आली म्हणजे स्वप्न जे मनातल्या मनात नाहीसे होते, त्याप्रमाणे कल्पांताच्या वेळी प्रकृतीपासुन निर्माण झालेली सर्व भूते  प्रकृतीमध्येच लीन होऊन जातात नंतर पुन्हा कल्पाच्या प्रारंभी मीच सृष्टी निर्माण करतो, असे लोक म्हणतात. तर त्या विषयी खरा काय प्रकार आहे ते ऐक. या विणकरीच्या आधाराने प्रारंभी लहान-लहान चौकडया विणल्या जाऊन नंतर एक वस्त्र पुर्ण विणुन तयार होते, त्याप्रमाणे सुक्ष्म प्रकृतीनंतर स्थुल पंचमहाभूतात्मक माया सृष्टीच्या आकाराने प्रगट होते. ज्याप्रमाणे विरजणाच्या संयोगाने पातळ असलेले दुध दहीरुपाने घटट होवु लागते, त्याप्रमाणे प्रकृतीही सृष्टीतील आकार बनू लागते.बीजाला पाण्याचे सानिध्य लाभले कि ते बीज लहान मोठया फाद्यांच्या रुपाने विस्तार पावु लागते, त्याप्रमाणे माझ्या सानिध्याने प्रकृतीपासुन प्राणिमात्रांची उत्पत्ती होते. अरे ! एखादे नगर राजाने वसविले आहे हे बोलणे जरी खरे असले तरी प्रत्यक्षात नगर रचण्यामध्ये राजाच्यां हातांना काही श्रम पडलेंले असतात का? (ओवी १०१ ते ११० )

          जसा स्वप्नावस्थेतील मनुष्यच जागृत अवस्थेत येत असतो, त्याप्रमाणे मी प्रकृतीचा स्विकार करतो. तरी अर्जुना ! स्वप्नातुन जागृत अवस्थेमध्ये येताना पाय दुखतात काय? किवां स्वप्नामध्येच असताना प्रवासाचे श्रम होतात काय? या सर्व दृष्टांमधील अभिप्राय काय आहे म्हणशील तर जी काही भूतांची उत्पत्ती होते त्यासंबंधी माझे कर्तव्य एकही नाही, असाच हया दृष्टांताचा मतितार्थ आहे. ज्याप्रमाणे राजाचा आश्रय असलेली प्रजा आपआपली कर्तव्य-कर्मे करीत असतात, त्याप्रमाणे प्रकृतीला माझा केवळ कल्पित आधार आहे बाकी सर्व कर्तृत्व हे प्रकृतीचेच आहे. अर्जुना ! असे पाहा की, पोर्णिमेच्या चंद्राची भेट होताच सागराला अपार भरती येते, त्यावेळी चंद्राला काही श्रम पडतात काय? लोखंड हे जड असते परंतु लोहचुबंका जवळ आले की ते हलते लोहचुबंका लोखंड हलविण्याचे श्रम पडतात काय? अधिक काय सांगावे ? मी स्वताच्या प्रकृतीचा स्वीकार करत असतो, तेव्हा ती प्रकृती सदैव भूतांची उत्पत्ती करु लागते. हे पाडंवा !  हा जो सर्व भूतसमुदाय आहे त्याचे अस्तित्व हे प्रकृतीच्या आधीन असते, ज्याप्रमाणे बीजापासुन निर्माण होणाऱ्या पालवीनां, वेलीनां आश्रय देण्यास भूमी समर्थ आहे, अथवा बालपण, तारूण्य, प्रौढत्व, वृध्दापकाळ अशा अनेक अवस्थांना ज्याप्रमाणे देहसंग हेच प्रमुख कारण आहे, अथवा आकाशात मेघांच्या अनेक पंक्ती निर्माण होण्यास वर्षाकाळ कारण आहे. अथवा स्वप्नाला कारण जशी निद्रा असते, त्याप्रमाणे हे नरेद्रां, त्या भूतरुपी विशाल सागराची स्वामिनी ही प्रकृतीच आहे.  (ओवी १११ ते १२० )

          जड असो वा चेतन असो, स्थुल असो वा सुक्ष्म असो, या सर्व भूत-समुदायाला प्रकृती मुळ कारण आहे. म्हणुन सर्व भूते उत्पन्न करावीत अथवा उत्पन्न केल्यावर त्यांचे पालन-पोषण करावे ही सर्व प्रकारची कर्तव्य माझ्या मुलभूत स्वरुपाकडे येत नाहीत. पाण्यामध्ये चंद्राच्या वेली पसरलेल्या दिसतात, परंतु त्या वेली चंद्राने वाढविलेल्या नसतात, त्याप्रमाणे विश्वाची उत्पत्ती, स्थिती, लय ही कर्मे प्रकृतीच्या संबंधाने मजकडे येवुनही परमार्थत: माझ्यापासुन दुर असतात. सागराच्या पाण्यापासुन लोट स्वैरपणे जोराने वाहू लागला तर त्याला मिठाचा घाट प्रतिबंध करु शकत नाही  कारण ते मीठ समुद्रात विरघळुन जाते त्याप्रमाणे सर्व कर्मे माझ्यामध्ये लय पावतात तर ती कर्मे मला कशी बांधू शकतील?   सोसाटयाने वाहणाऱ्या वाऱ्याला कसा धुराचा लोट थांबवील? अथवा सुर्यबिबांत कसा अंधकार शिरेल?  हे असो, पावसाच्या धारा पर्वतातील पदार्थाना काही बाधा करु शकत नाहीत त्याप्रमाणे प्रकृतीची सर्व कर्मे मला बाधा करु शकत नाहीत. एऱ्हवी प्रकृतीपासुन निर्माण झालेल्या कार्यामध्ये मीच एक व्याप्त आहे हे लक्षात ठेव. परंतु उदासीनाप्रमाणे मी काही करत नाही व कोणाकडुन काही करवत देखील नाही. ज्याप्रमाणे घरात ठेवलेला दिवा प्रकाश देतो पण अमुक काम कर अथवा करू नको असे कोणालाही सांगत नाही आणि कोण कोणते कर्म करतो इकडे लक्षदेखील देत नाही. ज्याप्रमाणे तो दिवा घरात साक्षीभूत असतो आणि घरातील सर्व कर्मप्रवृत्तीला कारण असतो, त्याप्रमाणे सर्व भूतांमध्ये मी असुनही त्यांच्याकडुन होणाऱ्या कर्मामध्ये मी अनासक्त असतो, हा एकच अभिप्राय खरा आहे.त्याबद्दल अनेक पर्यायांनी पुन्हा-पुन्हा काय सांगु ? तर हे सुभद्रा-पती आता एवढे  लक्षात ठेव.  (ओवी १२१ ते १३० )

          सृष्टीतील सर्व लोकांच्या व्यवहाराला सुर्य जसा निमित्तकारण आहे, त्याप्रमाणे हे अर्जुना ! जगाच्या उत्पत्तीला मी केवळ निमित्तकारण आहे हे जाणुन घे. कारण मी प्रकृतीचा अधिष्ठान रुपाने अंगिकार केला,  म्हणजे तिच्यापासुन चराचराची उत्पत्ती होते. या उपपत्तीमुळे मी संपुर्ण जगाचे निमित्त कारण आहे असे संभवते. आता या उपपत्तीच्या ज्ञानप्रकाशाने तु माझ्या ऐश्वर्ययोगाला उत्तम प्रकारे न्याहाळून बघ, म्हणजे तुला असे जाणवेल की माझ्या ठिकाणी सर्व भूते आहेत पण मी त्या भूतांमध्ये नाही. अथवा भूते माझ्या ठिकाणी नाहीत आणि  भूतांमध्ये मी नाही, हे महत्वाचे वर्म तू कधीही विसरु नकोस, हे आमचे सर्वस्वी गुप्त असे ज्ञान आहे, परंतु तुला उघड करुन दाखविले आहे. आता इंद्रियांची द्वारे बंद करुन घे आणि सुक्ष्म अशां गुहय विचारांचा अंत:करणामध्ये अनुभव घे. हे अर्जुना ! सुक्ष्म असे ज्ञानवर्म  जोपर्यत हदयात प्रगट होत नाही तोपर्यत माझे पारमार्थिक स्वरुप कळु शकत नाही.    ज्याप्रमाणे कोंडयामध्ये शोध घेऊ लागलो, तर दाण्याचा एक कण देखील सापडत नाही. एरवी तर्काच्या आधाराने माझे मुळचे स्वरुप कळल्यासारखे वाटते परंतु मृगजळाच्या पाण्याने जमीन कधी भिजते काय? कारण जाळे पसरुन जलामध्ये  टाकले असता त्यामध्ये चंद्रबिबं सापडले आहे असे वाटते परंतु ते जाळे पाण्यातुन बाहेर काढुन झाडले असता चंद्रबिबं कोठे असते हे तूच सांग बरे? त्याप्रमाणे आम्ही अनुभव संपन्न आहोत असे कित्येक लोक शब्द व वाणीच्या साहाय्याने सर्वाना भासवितात, परंतु खऱ्या बोधाची परीक्षा झाली म्हणजे त्यांना ज्ञान झालेले नाही व दुसऱ्याला ते करुन देता येत नाही, हे उघडपणे कळुन येते. किबंहुना अधिक काय सांगावे? जन्म-मरणरुपी संसारचक्राची भीती वाटत असेल तर आणि माझी प्राप्ती व्हावी असे मनापासुन वाटत असेल तर मी सांगितलेले वर्म तु पुर्ण लक्षात ठेव.(ओवी १३१ ते १४० )

पुढील भाग