असे हे ज्ञानेइंदियाचे व कर्मेइंद्रियांचे दहा विषय या देहामध्ये आहेत आता इच्छा कशाला म्हणतात हे सांगतो, मागील भुतकाळात भोगलेल्या विषयांच्या आठवणीने अथवा दुसऱ्याच्या मुखातुन ऐकलेल्या शब्दांनी कान झाकावेसे वाटतात अथवा अथवा शब्दं कानावर पडताच जी वृत्ती एकदम जागी होते आणि वर्तमानकाळामध्ये इंद्रिये व विषयांची प्रत्यक्ष भेट झाल्याबरोबर कामाचा हात धरुन जी वृत्ती अतिवेगाने उठते, जी वृत्ती उठली असता मन सैरावैरा धावु लागते, जिच्या संगतीच्या सहाय्याने प्रवेश करु नये, त्या शास्त्रांविरुध्द विषयांमध्ये इंद्रिये आपोआपच तिकडे वळतात, ज्या विषयांमध्ये अतिशय आवडीमुळे बुध्दी विचारहीन होते, वेडी होते, विषयभोगाची अत्यंत गोडी निर्माण होते अशा मनुष्यांच्या वृत्तीला इच्छा असे म्हणतात, आणि इच्छेप्रमाणे इंद्रियांना जेव्हा विषयांचे खाद्य मिळत नाही, त्या वेळी जी वृत्ती निर्माण होते त्यास द्वेष असे म्हणतात. आता या नंतर सुख ज्याला म्हणतात ते कशा प्रकारचे आहे ते जाण, त्या सत्यसुखाची प्राप्ती झाली असता जीव सर्व विषयांना विसरुन जातो जे सुख मनाला, वाणीला आणि देहाला आपआपले कर्म बंद करण्याविषयी आपली शपथ घालते आणि जे देहाच्या स्मरणाचा आधारच मोडुन प्राप्त होते, जे सुख प्राप्त झाले असता प्राण शांत होतो आणि सात्विक वृत्ती पुर्वीपेक्षा दुपट्टीच्या ही वर वाढते, जे सुख सर्व इंद्रियांच्या वृत्तीनां ह्दयरुपी एकांत स्थळात आणून त्यांना थोपटुन गाढ निद्रा आणते. (ओवी १२१ ते १३०)
अधिक काय सांगावे, जीवाचे आत्म्याशी जेव्हा ऐक्य होते तेव्हा त्या ऐक्याला “सुख” असे म्हणतात. अर्जुना, अशी सुखाची अवस्था प्राप्त न होता जे केवळ जगणे आहे, ते सर्वथा दु:खच आहे, असे जाणावे. ते सुख मनोरथांच्या संगतीने कधीही प्राप्त होत नाही, ज्या वेळी मनोरथ उरलेले नसतात, त्या वेळी सुख सहजच सिध्दीला गेलेले असते, मनाची स्थिरता व चंचलता ह्या दोनच गोष्टी सुख-दुखानां कारण आहेत. अर्जुना, असंग साक्षीभुत चैतन्याची देहामध्ये जी सत्ता असते, तिला या क्षेत्र-अध्यायात “चेतना” असे नाव आहे, जी चेतना या शरीरामध्ये पायाच्या नखापासुन ते मस्तकाच्या केसापर्यत नेहमी जागृत असते आणि जागृती, स्वप्न व सुषुप्ति या तिन्ही अवस्थांमध्ये जिच्यात बदल होत नाही, जिच्या योगाने मन, बुध्दी आदी प्रसन्न, टवटवीत असतात व जे नेहमी प्रकृतीरुपी मनाचा वसंत ऋतु आहे, जी जड व चेतन पदार्थामध्ये सारखेपणानेच आहे तिला “चेतना” म्हणतात हे तुला खोटे सांगत नाही, राजा आपले सैन्य किती आहे, हे जाणत नसुनही त्याची आज्ञाच जशी परचक्राचे निवारण करते अथवा पुर्ण चंद्राच्या उदयाने सागराला जशी भरती येते, अथवा लोहचुबंकाचे सानिध्य लोखंडाला जशी हालचाल करायला भाग पाडते, अथवा सुर्याची संगती लोकांना व्यवहार करण्यास प्रवृत्त करते, ज्याप्रमाणे कासवी आपल्या पिलांचे मुख स्तनाला लावल्यावाचुन फक्त आपल्या डोळयांनी पाहुन पोषण करते. (ओवी १३१ ते १४०)
अर्जुना, त्याप्रमाणे या शरीरामध्ये जी आत्म्याच संगतीने जड वस्तुला सजीवपणा आणते, जडाला चेतन करते, अर्जुना, त्या आत्मसत्तारुप संगतीलाच “चेतना” असे म्हटले जाते, आता धैर्याच्या विचाराचा प्रकार ऐक, आकाशादी पंचमहाभुतांमध्ये परस्परांत जाती-स्वभावानुसार अगदी उघड वैर आहे. जलाने पृथ्वीला नष्ट केले नाही असे कधी घडत नाही, जलाला तेज आटवत नाही असे कधी घडत नाही, प्रकाशाला नेहमी वायुशी झुंजावे लागते आणि आकाश तर सहजच वायुला गिळुन घेते, त्याचप्रमाणे आकाश सदैव सर्वाशी संबंधित राहूनदेखील कोणत्याही पदार्थाशी एकरुप होत नसते आणि सर्वात मिसळुन ते सर्वापेक्षा वेगळे असते, त्याप्रमाणे पंचमहाभुतेही एकमेकांना सहन करीत नसतात, परंतु परस्परांची वैरी असलेल्या पंचमहाभुतांचे मनुष्य देहाच्या ठिकाणी मात्र ऐक्य असते. ही पंचमहाभुते वैराचा विचार सोडुन मनुष्य देहाच्या ठिकाणी एकोप्याने राहातात आणि आपल्या स्वाभाविक गुणांनी एकमेकांचे पोषण करतात, याप्रमाणे ज्या पंचमहाभुतांचे स्वभावता कधी एकमेकाशी पटत नाही, त्यांची एकमेकाशी मैत्री असणे हे ज्या धारणशक्तीने चालते त्याचे नाव “धृती” असे मी मानतो अर्जुना, महाभुतादी ते धृतीपर्यत कथन केलेली तत्वे आणि जीव मिळुन क्षेत्रांचे छत्तीस प्रकार होतात, या छत्तीस तत्वांचा समुदाय म्हणजे “संघात” होय, याप्रमाणे छत्तीस प्रकार तुला स्पष्ट सांगितले आहेत, या सर्वाना मिळुन “क्षेत्र” हे नाव प्राप्त झाले आहे. (ओवी १४१ ते १५०)
अर्जुना, रथांचे सर्व वेगवेगळे भाग मिळुन त्यास रथ हे नाव प्राप्त होते किवां पायापासुन डोक्यापर्यत खालच्या वरच्या अवयवांना मिळुन जो आकार आहे त्यास देह हे नाव ठेवले आहे, किवां हत्ती, घोडे, रथ, व पायदळ या सर्वाना मिळुन जसे चतुरंग सेना हे नाव दिले गेले, किवां अक्षराच्यां समुदायांस वाक्य असे म्हणतात, जसे आकाशातील एकत्र आलेल्या जलधारांच्या समुदायाला मेघ किवां ढग असे म्हणतात, तद्वत पृथ्वीतलावर वास्तव करत असलेल्या जनसमुदायास, जीवमात्रांस मिळुन “जग” हे नाव आहे, अथवा तेल, वात, समई एकत्र करुन त्यास अग्नीने प्रज्वलित केले की त्यास दिप असे म्हणतात, त्याप्रमाणे ही छत्तीस तत्वे एकत्र करुन येतात त्यावेळी या सर्वाना मिळून क्षेत्र असे म्हणतात, लागवडीस आणलेल्या या शरीराच्या योगाने मृत्यूलोकात चांगल्या व वाईट कर्मामुळे पाप-पुण्य पिकते, म्हणुन आम्ही कौतुकाने या देहास क्षेत्र असे म्हणतात, कित्येकाच्या मताने याला देह असे म्हणतात, पण आता हे राहु दे, या क्षेत्राला जगत, विश्व असेही नाव आहे, परब्रम्ह्याच्या अलिकडे मायातत्वापासुन शेवटी स्थावरांपर्यत जे जे काही निर्माण होते व लय पावते, ते सर्वच क्षेत्र होय, परंतु गुण व कर्म यांच्या संगतीत गुंतले असता देव, मनुष्य, सर्प आदी जातीच्या वेगवेगळयापणाने या क्षेत्राची रचना होत असते, अर्जुना, या त्रिगुणांचा विचार पुढील अध्यायात सांगितला जाईल, सांप्रत, आता तुला ज्ञानाचे स्वरुप सांगतो. (ओवी १५१ ते १६०)
क्षेत्राची एकंदरीत सर्व लक्षणे विकांरासह तुला सांगितली तर यापुढे सर्व प्रकारच्या बंधंनातुन मुक्त करण्याविषयी उदार असलेले ज्ञान ऐक, ज्या ज्ञानाकरिता योगी स्वर्गाचा अडथळा ओलांडुन मूर्धन्यावकाशाला गवसणी घालतात, ज्या ज्ञानाकरीता योगी कोणत्याही प्रकारच्या सिध्दीची इच्छा करत नाहीत आणि ऐश्वर्याची देखील पर्वा करत नाहीत, तसेच कठीण प्रकारच्या योगसाधनेची अवहेलना करतात, तपस्वी तपरुपी डोगंर ओलांडुन पलीकडे जातात, कर्मठ लोक कोटयावधी यज्ञ करण्याकडे धाव घेत असतात, संन्यासी लोक नित्य, नैमित्तीक कर्मवेली उपटुन टाकतात, तसेच विविध प्रकारच्या भजन, किर्तनाच्या, देवांच्या स्तुती आदी मार्गांचा अवलंब करुन कित्येकजण इहलोकी सुषुम्नेच्या सुरूंगात प्रवेश करण्याचा प्रयत्न करतात, अशा ज्ञानाच्या प्राप्तीसाठी ऋषी-मुनी वेदरुपी झाडाचे पान् न पान अभ्यासतात, आणि त्याचा अर्थ समजुन घेण्याचा प्रयत्न करतात, हे अर्जुना, सदगुरुंची सेवा केली असता त्यापासुन ज्ञान प्राप्त होईल या इच्छेने त्या सेवेवरुन शेकडो जन्म ओवाळुन टाकतात, ज्या ज्ञानाची प्राप्ती झाली असता अविद्या म्हणजे अज्ञान नाहीसे होते आणि जीवाचे व आत्म्याचे ऐक्य घडते, जे ज्ञान इंद्रियांची द्वारे बंद करते म्हणजे इंद्रियांस विषयांची इच्छा होवु देत नाही, कर्माकडे होणाऱ्या प्रवृत्तीचे पाय मोडुन टाकते, तसेच सर्व प्रकारचे दारिद्रय नाहीसे करते,द्वैताचा दुष्काळ उजाडतो म्हणजे द्वैत नाहीसे होते आणि सर्वत्र समसाम्यता हा सुकाळ उगवतो, ज्या ज्ञानाची प्राप्ती अशी सर्वश्रेष्ठ अवस्था प्राप्त करुन देते. (ओवी १६१ ते १७०)
जे ज्ञान अहंकाराचा ठावठिकाणा पुसुन टाकते, महामोहाला ग्रासुन टाकते आणि हा आपला हा परका अशी भाषांच उरु देत नाही, जे ज्ञान संसाररुपी अज्ञानाला मुळासकट उपटुन टाकते, संकल्परुपी चिखल पुर्णपणे धुवुन टाकते, जे अनंत ब्रम्हाला व्यापुन राहते, जे ज्ञान प्राप्त झाले असता प्राण पांगळा होतो अशा ज्ञानी माणसाला इंद्रियांकडुन विषयभोग मिळवण्याची हाव नसते त्यामुळे त्याच्या प्राणाची क्रियाशक्ती शुन्य होते, तसेच ज्याच्या सत्तेने जगातील सर्व व्यवहार-कर्म चालत असते, ज्याच्या दिव्य प्रकाशाने बुध्दीचे डोळे पुर्णपणे उघडतात आणि जीव हा आपल्या आनंदमय स्वरुपस्थितीवर खुशाल लोळत राहतो, असे जे ज्ञान ते पवित्रपणाचा महान ठेवा आहे, आणि ते प्राप्त झाले असता अनेक विषयांनी बरबरटलेल, विटाळलेले मन निर्मळ होते, परिशुध्द सच्चिदानंदरुप आत्म्याला मी जीवरुप आहे, अशा भ्रमरुपी बुध्दीने जो क्षयरोग झाला होता, तो ज्याच्या प्राप्तीने नाहीसा होवुन जातो, असे जे ज्ञान त्याचे निरुपण करता येण्यासारखे नाही, बुध्दीशिवाय केवळ डोळयांनी ते दिसेल असे मात्र नाही, परंतु तेच ज्ञान जेव्हा आपल्या शरीरामध्ये प्रभाव प्रगट करते, तेव्हा इंद्रियांच्या आचरणावरुन डोळयांनी प्रत्यक्ष दिसते, ज्याप्रमाणे झाडांच्या टवटवीतपणावरुन वसंत ऋतु सुरु झाला आहे हे समजते, त्याप्रमाणे इंद्रियांच्या विशिष्ठ कर्मावरुन झालेली ज्ञानप्राप्ती लोकांस ओळखता येते अरे, झाडांच्या मुळांशी जमिनीमध्ये जल मिळाले म्हणजे जमिनीवर पसरलेल्या फांद्यांवर त्याची जशी टवटवी दिसते. (ओवी १७१ ते १८०)
अथवा कोंबाच्या कोवळेपणामुळे जसा जमिनीचा मृदुपणा दिसुन येत असतो किवां कुलीन माणसांच्या सदाचारावरुन त्यांचा थोरपणा दिसुन येत असतो, अथवा अतिशय स्नेही मनुष्य घरी आल्यानंतर त्याच्या आदरतिथ्याच्या तयारीवरुन घरच्या लोकांचे प्रेम दिसुन येते, किवां एखाद्याच्या दर्शनाने झालेल्या समाधानावरुन तो पुण्यपुरुष आहे हे कळते, अथवा केळीत उत्पन्न झालेला कापुर जसा सुवासाने समजुन येतो किवां काचेच्या आत दिवा ठेवला असता तो जसा काचेच्या बाहेरही प्रकाशाच्या रुपात पसरतो, त्याप्रमाणे हदयामध्ये झालेल्या ज्ञानाने देहाच्या ठिकाणी बाहेर जी लक्षणे उमटलेली असतात, ती आता तुला सांगतो, तरी तु उत्तम प्रकारे लक्ष देवुन श्रवण कर, कोणत्याही बाबतीत कोणाचीही बरोबरी करणे ज्याला आवडत नाही, तसेच मोठेपणाचे ज्याला ओझे वाटत असते, त्याच्यां अंगी असलेल्या गुणांचे कोणी वर्णन केले असता, त्याचा सन्मान केला असता किवां त्याच्यामध्ये असलेली योग्यता लोकांनी वर्णन केली असता, त्या वेळी तो असा घाबरा होतो की जणु काही पारध्याने हरिणीला वेढले आहे, अथवा एखाद्या मनुष्य हाताने पोहुन जात असता तो जसा भोवऱ्यात सापडावा, अशा प्रकारे अर्जुना, लोकांनी मानसन्मान केला असता जो कष्टी होतो व आपल्याकडे मोठेपणा येवु देत नाही, आपली पुज्यता आपल्या डोळयांनी पाहु नये आपली किर्ती आपल्या कानांनी ऐकु नये, आपण अमुक आहोत, अशी लोकांना आठवण सुध्दा होवु नये, अशी ज्याची इच्छा असते, अशा व्यक्तीला आपला सत्कार व्हावा असे कसे बरे वाटेल? तो आपला आदर व्हावा, अशी इच्छा कशी करेल? त्याला कोणी नमस्कार केला असता त्याला मरणासारखे दुख होते. (ओवी १८१ ते १९०)
बृहस्पतीच्या सारखी सर्वज्ञता जरी अंगी असली तरी आपला महिमा लोकांच्यामध्ये वाढेल, या भितीने तो वेडेपणात लपुन असतो, आपल्या अंगी असलेला चातुर्यपणा तो लपवुन ठेवतो, आपला मोठेपणा सोडुन देतो, आणि लोकांमध्ये आवडीने वेडेपणा मात्र स्वीकारतो, लोकांमध्ये होणाऱ्या प्रसिध्दीची ज्याला शिसारी येते, शास्त्रांचा वादविवाद करण्याचा ज्याला कंटाळा असतो, शांतवृत्तीने राहण्यावर ज्याचा अतिशय भर असतो. जगाने आपला अपमान करावा, नातेवाईकांनी आपल्याबरोबर स्नेहाचे संबंध ठेवु नयेत, अशा प्रकारची त्याची आंतरिक आवड फार असते, आपल्या अंगी अत्यंत नम्रता बाणेल, कमीपणा हेच आपले भुषण होईल, असे त्याचे वागणे असते, आपण जिवंत आहोत अथवा नाही अशी शंका लोकांच्या मनात निर्माण होण्याजोगे आपले वर्तन असावे, अशी त्याची इच्छा असते, हा आपल्या पायांनी चालत राहिला आहे की वाऱ्याने पुढे ढकलला जात आहे हे लोकांना कळु नये अशी त्यांची मनोमन इच्छा असते, आपले अस्तित्व लोपुन जावे माझे नाव अथवा रुप कोणाच्या डोळयांसमोर न येवो मला पाहुन प्राणीमात्र भितीने माझ्याजवळ न येवोत, अशा प्रकारे ज्याचे नवस असते, जो लोकांपासुन दुर एकांतात जावुन राहत असतो तेथे फक्त तो जगत असतो, त्या निर्जन वनात वायुची आणि त्याची भेट होत असते, आकाशाबरोबर बोलायला त्याला आवडते, झाडे आणि वेलीतील प्रवाह पाहुन त्याला जिवेभावे ती प्रिय वाटतात. (ओवी १९१ ते २००)
अधिक काय सांगावे? अशी लक्षणे ज्याच्या अंगी पुर्णपणे बाणलेली असतात त्याला खरे ज्ञान प्राप्त झाले आहे असे जाणावे. अशा त्याचा आचरणावरुन त्या पुरुषाच्या ठिकाणी अमानवित्व आहे असे मानावे, म्हणजे तो पुर्णपणे अभिमानरहित झाला आहे आता अदंभित्वाच्या लक्षणांचा आवडीने विचार करु. अदंभित्व असे असते की अत्यंत लोभी असलेल्या मनुष्याचे मन धनासाठी आसक्त असते, त्यामुळे जीव जाण्याची वेळ आली तरीपण तो कोणालाही धन ठेवल्याची जागा सांगत नाही. त्याप्रमाणे अर्जुना ! तो कोणत्याही प्राणसंकटात सापडला तरीपण केलेले पुण्य स्वताच्या मुखाने बोलत नाही, खोडाळ गाईला आलेला पान्हा ती जशी चोरते अथवा वारांगणा आपले वार्धक्य जशी लपविते. धनवान मनुष्य अरण्यात सापडला तर चोरांच्या भीतीने तो जशी आपली श्रीमंती लपवितो किवां नववधू आपले सर्वागं वस्त्रांनी ज्याप्रमाणे आच्छादित करते. शेतकरी हा पेरलेले बी माती टाकुन जसा झाकत असतो, त्याप्रमाणे आपणाकडुन झालेले दानांदिकांचे पुण्य तो झाकुन ठेवत असतो. साधूंची बाह्यचिन्ह धारण करुन तो वरवर देहाची पुजा करत नाही, ओठातुन गोड शब्द बोलुन तो लोकांचे मनोरंजन करत नाही, आपण आचरलेला धर्म आपल्या वाचारुपी ध्वजावर बांधत नाही म्हणजे आपले सदाचरणा बोलुन दाखवत नाही, आपण केलेला परोपकार तो बोलुन दाखवत नाही, वेद-शास्त्र-पुराणांचा अभ्यास तो विद्ववत्तेच्या रुपाने समाजात मिरवीत नाही, आपली प्रतिष्ठा वाढावी म्हणून मिळवलेले पुण्य विकण्याचा प्रयत्न करत नाही, शरीरभोगाकडे त्याचे दुर्लक्ष असते अंगावर साधे कपडे असतात तो थोडेच अन्न खात असतो, त्यामुळे त्याचे शरीर कृपण दिसते, पण धर्मकार्यात मात्र तो अनमोल संपत्ती वाटत असतो. (ओवी २०१ ते २१०)
त्याच्या घरात अनेक वस्तू पुरेशा प्रमाणात नसतात, जरी शरीर सुस्तावलेले असले तरी दानधर्माच्या कार्यात तो कल्पवृक्षालाही मागे टाकेल, किबंहुना तो सर्व धर्माविषयी आग्रही आणि योग्य प्रसंगी उदार असतो आत्मचर्चा करण्यामध्ये तो अतिशय चतुर असतो परंतु वर-वर तो सामान्य दिसत असतो, केळीची रोपे जशी हलकी व पोकळ दिसत असतात परंतु त्यास केळीचे घड आले की त्याची अंगे रसाने गाढ भरलेली दिसतात, किवां मेघ ज्याप्रमाणे हलके दिसतात आणि थोडया वाऱ्याने देखील वितळुन जातील असे वाटतात, परंतु एकदा का पाऊस सुरु झाला की सर्वत्र पाणीच पाणी भरुन टाकुन आश्चर्यचकित करतात, त्याप्रमाणे तो अतिशय गरीब असतो हे असो अशा सदगुणांची चिन्हे ज्याच्या अंगी दिसतात त्याच्या हाती ज्ञान आले असे समज, अदंभित्व ज्याला म्हणतात ते हे होय, आता अहिंसेचे लक्षण सांगतो जे श्रवण कर, अनेक विचारवंतानी आपल्या मनाचे निरुपण करताना विविध प्रकारे अहिंसा सांगितली आहे ती ऐक, ते प्रकार कोणते आहेत म्हणशील तर ज्याप्रमाणे झाडाच्या फांद्या तोडुन त्या झाडाच्या बुंध्याभोवती त्याचेच कुंपन जसे करावे, किवां हात तोडुन खावा व भुकेचे दुख शांत करावे, अथवा देऊळ मोडुन त्याच सामानाने देवळाभोवतीचा आवार करावा. (ओवी २११ ते २२०)
त्याप्रमाणे पशूंची हिंसा करुन अहिंसा करावी, असा पुर्वमीमांसेनेचे म्हणजे कर्मकांडाने निर्णय केला आहे. पाऊस न पडल्यामुळे अन्न-पाण्याचा दुष्काळ पडुन सर्व विश्व पिडले जाते त्यावर उपाय म्हणुन पावसाचा वर्षाव करणारे विविध प्रकारचे यज्ञयाग करावेत परंतु या इष्टीच्या बुडाशी तर पशुची प्रत्यक्षपणे हिंसाच घडतच असते. मग त्यांना अकिंसेच्या पलिकडील तीर कसा बरे दिसणार? प्रारंभी जिथे नुसती हिंसाच पेरली जाते तेथे अहिंसा कशी बरे उगवेल? परंतु बाबा , या याज्ञिकांचे धाडस आश्चर्यकारक आहे आणि सर्व आयुर्वेददेखील याच प्रवृत्तीचा आहे. कारण हे पांडवा! त्याचा सिध्दांत असा आहे की जीवाचे रक्षण करण्याकरता जीवाचा घात करावा, विविध रोगांनी ग्रस्त होवुन अनेक जीव लोळत आहेत हे पाहिले तेव्हा आयुर्वेदाने हे दुख निवारण करण्याकरता औषधांची योजना केली, त्या औषधांच्या योजनेसाठी प्रारंभी झाडाचे कंद खणून काढले काही झाडे मुळांसह व पानांसह उपटुन काढली, अनेक झाडे मध्येच मोडून औषधांसाठी त्यांच्या सोडांचा उपयोग केला, काही झाडांची साल काढली, तर काही झाडे फळ देण्याच्या तयारीत असताना त्यांचे गाभे काढले आणि ती उकडुन त्याचे विविध काढे तयार केले, ज्यांनी कोणाचे काही वाईट केले नाही अशा अजातशत्रु झाडांच्या सर्वागांचा चीक किवां रस काढण्याकरता धारदार शस्त्रांनी त्यांच्या शिरा उडविल्या जातात, हे धर्नुधरा, याप्रमाणे या अजातशत्रु वृक्षाचा जीव घेवुन त्यांना शुष्क केले जाते आणि हालचाल करत असलेल्या सजीव प्राण्यांच्या अंगात हात घालुन त्याच्या पोटातुन पित्त काढतात आणि त्याचा औषधांसाठी उपयोग करुन शिणलेल्या जीवांचे रक्षण करतात. (ओवी २२१ ते २३०)
अहो, राहते मोठे घर मोडुन त्या सामानाने देऊळ व देव्हारे बांधले, व्यवहारामध्ये लोकांना फसवुन त्या पैशाने अन्नछत्र सुरु केले, डोक्यावर जादा पांघरूण ओढुन घेतले, त्यामुळे शरीराच्या कमरेपासुनचा खालचा भाग उघडा पडला, स्वताचे घर मोडुन त्या लाकडाचा मांडव तयार केला अथवा पांघरुन जाळुन मग जसा शेक घ्यावा, हत्तीला स्नान घालून स्वच्छ केल्यावर तो जसा बाहेर येवुन सोंडेने चिखल घेवुन आपल्या अगांवर उडवितो, घरचा बैल विकुन त्या पैशाने गोठा बांधला पोपटास हुसकून लावुन पिंजरा तयार केला या कृती योग्य आहेत का माकड चेष्टा आहेत? या कृती पाहुन हसावे की रडावे हे काहीच कळत नाही. अनेक लोक हिंसेच्या भीतीने धान्य शिजवीत नाहीत त्यामुळे ते उपाशी राहतात आणि त्यांचे प्राण कासावीस होतात. ही हिंसा त्यांच्याकडुनच घडते हे सात्विक मनाच्या अर्जुना! याप्रमाणे हिंसेलाच अहिंसा मानण्याचा अशा प्रकारचा कर्मकांडातील सिध्दातं तु ओळखुन घे, जेव्हा आम्ही प्रथम अहिंसेचे नाव उच्चारले, तेव्हा आम्हांला अशी स्फुर्ती झाली की प्रारंभी खऱ्या अहिंसेची लक्षणे सांगावीत, ती आतुन प्रगटलेली स्फुर्ती कशी बरे टाळावी म्हणुन आम्हाला बोलणे भाग पडले. त्याचप्रमाणे तु देखील अहिंसेसंबंधी मते जाणुन घ्यावीस असे आमच्या मनात आले, अर्जुना! प्रामुख्याने हाचा हेतु मनात ठेवुन आम्ही तुला अहिंसेची लक्षणे सांगितली. एरव्ही आडवाटेने कोणी धावेल काय? (ओवी २३१ ते २४०)