ज्याप्रमाणे धान्याची मळणी झाल्यावर दाणे हे कोंडयापासुन वेगळे काढावेत त्याप्रमाणे देहाशी असलेले तादाम्य त्याने त्यागलेले असते आणि तो आत्मस्वरूपाच्या ठिकाणी स्थित राहीलेला असतो. किवां गंगा नदी सागराला मिळाली की तिचा खळखळाट आपोआप बंद होतो. त्याप्रमाणे अर्जुना! जो देह तादाम्य सोडुन आपल्या ब्रम्हस्वरुपी स्थिर झाला, त्याला सुख-दुख समान असतात. घरात असलेल्या खांबाला ज्याप्रमाणे रात्र किवां दिवस दोन्ही सारखेच असतात, त्याप्रमाणे आत्मस्वरुपाच्या ठिकाणी स्थिर असलेल्या गुणातीताला देहाला प्राप्त झालेली सुख-दुखादी द्वंद्वेही समान असतात. झोपी गेलेल्या पुरुषाच्या शरीराला जसा सर्प तशीच उर्वशी असते, त्याप्रमाणे आत्मस्वरुपामध्ये स्थिर असलेल्या पुरुषाला देहाच्या ठिकाणी सुख-दुखादी द्वंद्वेही समान असतात. म्हणुन त्याच्या ठिकाणी शेण व सोने यांची किमंत सारखीच असते, तसेच रत्न व दगड यात कोणत्याच प्रकारचा भेद तो जाणत नाही, घरी प्रत्यक्ष स्वर्गसुख येवो अथवा वाघ त्याच्या अंगावरती झडप घालो, परंतु त्याच्या आत्मबुध्दीचा केव्हाही भंग होत नाही, मृत्यू पावलेला माणुस शुध्दीवर येत नाही अथवा जळालेल्या बीजाला अंकुर फुटत नाही त्याप्रमाणे त्याची साम्यबुध्दी कधीही नाश पावत नाही.हा ब्रम्हदेव आहे म्हणुन त्याची स्तुती करावी किवां हा नीच आहे म्हणुन त्याची निंदा करावी असा कोणत्याही प्रकारचा भेद तो जाणत नाही. (ओवी ३५१ ते ३६०)
तो कोणाची निंदा-स्तुती करत नाही अथवा दुसऱ्याने निंदा-स्तुती केली तरी त्याच्यां अंत:करणात हर्ष वा विषाद होत नाही. सुर्याच्या घरी अंधार व प्रकाश या दोन्ही कल्पना नाहीत त्याप्रमाणे त्याच्या अंत:करणात सुख-दुखाची कल्पना नाही. ईश्वर समजुन त्याची पुजा केली अथवा चोर समजुन त्याचा छळ केला किवां बैल -हत्तीने त्याला वेढले किवां कोणी त्याल राजा केला. किवां मित्र जवळ आले अथवा शत्रु अंगावर धावुन आले तरीपण तो शत्रु-मित्र भेद जाणत नाही, ज्याप्रमाणे सुर्याचे तेज रात्र व दिवस जाणत नाही, आकाशावरती सहा ऋतु जरी येवुन गेले तरी ते अलिप्त असते, तसे तो राग-द्वेष यांपासुन मुक्त असतो, त्याच्या बुध्दीला विषमता ही माहीतीच नसते. आणखी एक आचार असा पहा की, त्याच्या ठिकाणी कोणत्याही कर्माचा अभाव झालेला दिसत नसतो. कर्तृत्व, अहंकार व फळाची इच्छा त्यागणे हाच त्याचा आचार असतो. त्याचे ऐहिक कर्म बंद पडते, पारलौकिक कर्म मावळून जाते; आणि त्याचे ठिकाणी कर्मफळे जळून जातात. कारण तो गुणातीत जणू ज्ञानाग्निरूप झालेला असतोच. इहलोक अथवा परलोकातील जेवढे भोग आहेत, ते प्रयत्नाने मिळविण्याची त्याच्या मनात इच्छा नसते. प्रारब्धाने जे काही प्राप्त होईल, त्याचे तो सेवन करीत असतो. ज्याप्रमाणे दगड कोणत्याही उपचाराने सुखावला जात नाही आणि दु:खीही होत नाही, त्याप्रमाणे तोगुणातीत पुरूष प्रिय किंवा अप्रिय भोगाने सुखावला जात नाही आणि दु:खीही होत नाही.त्याप्रमाणेच त्याच्या मनातील विचारचक्रे काही व्यापार करत नाहीत. आता या बोलण्याचा किती विस्तार करावा? ज्या पुरूषाचे असे आचरण असते, तोच खरोखर गुणातीत आहे, असे समज.ज्या उपायांनी गुणांचे उल्लंघन करता येते, तो प्रकार आता यापुढे श्रवण कर,असे श्रीकृष्ण म्हणाले. (ओवी ३६१ ते ३७०)
जो एकनिष्ठ भावाने माझी भक्ती करतो, तो तीन गुणांना स्वाधीन करतो. तर मी कोण आहे? भक्ती ती कशी असते? एकनिष्ठतेचे स्वरूप काय? या सर्व गोष्टी तुला स्पष्ट करून सांगितल्या पाहिजेत. हे अर्जुना ! रत्नाचे तेज व रत्न हे जसे एकच आहे, तसा मी या जगात आहे. अथवा पातळपणा व पाणी, पोकळी व आकाश, गोडी व साखर ही जशी भिन्न नसून एकच आहे, तसे जाळ तोच अग्नी, कमळाच्या पाकळया हेच कमळ, वृक्ष तोच जसे फांद्या, फळे वगैरे आहे. अरे, गोठलेला बर्फच जसा हिमालय झाला आहे, विरजलेले दूध तेच जसे दही असते, तसेच माझ्या स्वरूपाहून भिन्न सत्तावान असे विश्व झालेले नाही; म्हणून विश्व या नावाने जे प्रसिध्द आहे, ते मीच आहे. चंद्रबिंब जसे सोलावे लागत नाही, चंद्र पाहताना चंद्राच्या कला वेगळया करण्याची जरूरी नाही, तूप जरी थिजले, तरी त्या स्थितीमध्ये ते तूपच असते, अथवा सोन्याचे कंकण आटवून त्याची लगड केली नाही, तरी ते सोनेच असते, वस्त्र फाडून त्यातले तंतू जरी वेगळे केले नाहीत, तरीही ते तंतुमयच आहे, मातीची घागर पाण्यात न विरघळविताही ती जशी मातीच असते, त्याप्रमाणे विश्वाचा विश्वपणा जावा व नंतर मला घ्यावे, माझे ज्ञान व्हावे तसा हा प्रकार नाही. अर्थात संपूर्ण विश्वासह मीच आहे, विश्वासहच मला जाणले पाहिजे. (ओवी ३७१ ते ३८०)
अशा संपूर्ण अद्वैत रूपाने मला जाणणे याला ‘अव्यभिचारी भक्ती’ असे म्हणतात. विश्वामध्ये आणि माझ्यामध्ये थोडादेखील भेद पाहिला तर ती व्यभिचारी भक्ती होते. यासाठी सर्व प्रकारच्या भेदांचा त्याग करून एकनिष्ठ चित्ताने तू आपणासह मी या विश्वात भरलो आहे, हे जाण. अर्जुना, सुवर्णाची टीक करून जरी सुवर्णावर बसविली, जरी त्या दोहोंत ज्याप्रमाणे भेद नसतो, त्याप्रमाणे आपल्यापेक्षा विश्व हे वेगळे आहे, असे समजू नकोस. सूर्यापासून निघालेले किरण जसे तेजोमय असून, सूर्यापासून वेगळे नसतात, त्याप्रमाणे ब्रह्मापासून जीव अविद्येच्या उपाधीमुळे भिन्न भासत असला, तरीपण तो एकरूपतेने ब्रह्माशीच संबंधित आहे, असा दृढ निश्चय असावा. पृथ्वीवर असलेला अल्प परमाणू जसा पृथ्वीरूपच आहे किंवा बर्फाच्या पर्वतावरील बर्फचा कण जसा बर्फाचा पर्वतस्वरूप आहे त्याप्रमाणे माझ्या ठिकाणी आपला मीपणा पाहा. तरंग दिसावयास लहान असला, तरी तो समुद्राहून भिन्न नाही, त्याप्रमाणे ईश्वराहून मी भिन्न नाही. अशा प्रकारे जीव, जगत व जगतात्मा या ऐक्यभावाने ज्या वेळी दृष्टी विकसित होते, तेव्हा त्याला आम्ही ‘भक्ती’ म्हणतो. या विकसित अशा ऐक्यभावालाच ‘श्रेष्ठ ज्ञान’ असे म्हणतात आणि योगाचेही सर्व सार हेच आहे. सागर आणि मेघ यांमध्ये पाऊस पडू लागल्यावर ज्याप्रमाणे अखंड धारा पडत असताता, त्याप्रमाणे अर्जुना, ब्रह्म आणि जीव यामध्ये अखंडाकार वृत्ती प्रवाहित होत असते. अथवा आडाच्या तोंडी असलेल्या आकाशाचा महाकाशाशी जोड दिलेला नाही, तर ते दोन्ही एकरूपच आहेत, अर्जुना, त्याप्रमाणे तो गुणातीत परब्रह्माशी एकरूप होतो. (ओवी ३८१ ते ३९०)
प्रतिबिबांपासुन बिबांपर्यत जसा प्रथेचा एकसारखा सरळपणा असतो त्याप्रमाणे जीवापासुन ब्रम्ह्यापर्यत एकच सोहंम् अशी वृत्ती अखंडपणे असते हे तु लक्षात ठेव. याप्रमाणे “मी ब्रम्ह आहे” अशी वृत्ती बनल्यानंतर तीदेखील पुढे आपोआप लय पावुन एक अद्वितीय असे ब्रम्हच उरते. अर्जुना, ज्याप्रमाणे मिठाचा खडा सुद्रात टाकला असता तो विरुपन जातो वपुढे त्याचे विरणे आपोआप थांबते,अथवा गवताला जाळुन अग्नीदेखील स्वता आपोआप विझुन जातो, त्याप्रमाणे विश्वब्रम्हातील आणि जीवब्रम्हयातील सर्व प्रकारचे भेद नाहीसे करुन ते वृत्तिज्ञानही लय पावते. मी पलीकडे आहे व भक्त अलिकडे आहे हा मायेचा भास नाहीसा होतो आणि माझ्यात व भक्तात जे अनादि ऐक्य आहे तेवढेच शिल्लक रहाते. अर्जुना ! आता तो गणांना जिकंतो ही भाषादेखील संभवत नाही कारण ऐक्य झाल्यावर तेही नाहीसे होतात, फार काय सांगावे? हे सुंदशा मर्मज्ञ अर्जुना, अशा अद्वैत स्थितीलाच ब्रम्हभाव म्हणतात, जो अव्याभिचारी भावाने माझी भक्ती करतो तोच या ब्रम्हभावाला प्राप्त होतो, जगात या लक्षणांनी युक्त झालेला जो माझा भक्त आहे त्याच्याकरता ती ब्रम्हता पतिव्रता बनते आणि त्याची पत्नी होवुन त्याची एकनिष्ठेने सेवा करते. ज्याप्रमाणे गंगेच्या उगमापासुन निघालेले पाणी प्रवाहाच्या रुपाने हळुहळु जरी वाहत असले तरी त्याला विश्रांतीसाठी समुद्राला मिळावे लागते. अर्जुना! ज्याप्रमाणे अद्वैत-ज्ञानाच्या आधारे जो माझे भजन करतो तो ब्रम्हत्वाच्या मुकूटातील मुख्य रत्न होतो. (ओवी ३९१ ते ४००)
अर्जुना! या ब्रम्हप्राप्तीलाच सायुज्य मुक्ती असे म्हणतात. तिला चौथा पुरषार्थ असेही म्हणतात, माझी सगुण स्वरुपाची भक्ती या ब्रम्हतेच्या उच्च स्थानी चढण्याची पायरी आहे, हे खरे असले तरीपण सगुणरुप धारण करणारा असा जो मी तो निर्गुणाच्या प्राप्तीचे साधन आहे असे कदाचित तुला वाटेल. तर माझ्यापासुन ब्रम्ह हे निराळे आहे, असा निश्चय कदाचित तुझ्या चित्तात विस्तारला असेल, परंतु माझ्यावाचुन ब्रम्ह भिन्न नाही. हे पांडवा ! ब्रम्ह म्हणुन ज्याला म्हणतात, तो मीच आहे माझ्यावाचुन ब्रम्ह भिन्न नाही आणि ब्रम्हावाचुन मी भिन्न नाही. सर्व शब्दांनी जो वाचार्थ आणि लक्षार्थ सांगितला आहे, तोही सगुण-निर्गुण स्वरुपाने मीच आहे.चंद्र आणि चंद्राचे बिबं ज्याप्रमाणे भिन्न नाही त्याप्रमाणे हे ज्ञानवंत अर्जुना ! माझ्यात आणि ब्रम्हात भेद नाही. अर्जुना! जे ब्रम्ह नित्य, अचल, प्रगट, धर्मरुप, अमर्याद सुखरुप आणि अद्वितीय असे आहे, ते स्वगत सजातीय-विजातीय भेदरहीत असे आहे. संपुर्ण अज्ञानाचा नाश करुन ज्ञान ज्या स्वरुपामध्ये लय पावते, ते सिध्दांताने ठरवलेले पराकोटीचे शेवटचे स्वरुप मीच आहे. संजय म्हणाला, अहो धृतराष्ट्र महाराज, एकनिष्ठ अनन्यभक्तांचा जो परमप्रिय परमात्मा, तो शुर अर्जुनास याप्रमाणे सांगत आहे, त्यावेळी धृतराष्ट्र म्हणाला, हे संजया ! या गोष्टी तुला कोणी विचारल्याशिवाय तु व्यर्थ का सांगतोस? दुर्योधन विजयाची गुढी उभारेल ना ! एवढेच तु मला सांग आणि माझी काळजी दुर कर. त्यावेळी संजय मनात म्हणाला, दुर्योधनाच्या विजयाची गोष्ट सोडुनच दे. संजय आश्चर्यचकित होवुन त्रासुन मनात म्हणाला, काय आश्चर्य आहे या धृतराष्ट्राचे ? साक्षात भगवंताशी याचे इतके वैर कसे बरे आहे ? तरी हा कृपाळु भगवंत संतुष्ट होवुन विवेकाचा दिप प्रज्वलित करुन धृतराष्ट्राच्या मनातील मोहरुपी महारोग नाहीसा करो. संजय अशा प्रकारे विचार करत असताना श्रीकृष्ण-अर्जुनाच्या अमृतमधुर संवादाचे चिंतन करत असताना त्याच्या चित्तात आंनदाचा महापुर येत होता. म्हणुन अत्यंत उत्साही असलेल्या संजयाकडुन श्रीकृष्णाचा उपदेशआता सांगितला जाणार आहे. भगवान श्रीकृष्णांच्या शब्दांतील शुध्द भाव तुम्हा श्रोत्याच्या अंतकरणापर्यत पोहोचवीन तरी आपण एकाग्रतेन श्रवण करा. असे सदगुरू निवृत्तीनाथांचे परमशिष्य श्री ज्ञानदेव माऊली म्हणाले. (ओवी ४०० ते ४१५).
सर्वश्रेष्ठ ग्रंथराज सार्थ ज्ञानेश्वरीचा़ १४ वा अध्याय श्री भगवंताच्या कृपेने संपन्न !
( भगवत् गीता श्लोक १ ते २७ आणि मराठीत भाषातरीत ज्ञानेश्वरीच्या ओव्या १ ते ४१५ )
हरी ओम तत् सत्