पाठीराखा-साई- ८

भक्तवत्सल बाबा

 

हरी ॐ बाबा… !  बाबांच्या मुळेच मनातील इच्छा पूर्ण झाली आणि मी भोले बाबांच्या मंदिरी पोहोचलो. भगवान शिवशंकरांचा मी लहानपणापासून भक्त आहे. उत्तरोत्तर ती भक्ती वाढतच गेली. मध्येच साईबाबांच्या भक्तीत कसा आणि कधी गुरफटून गेलो हे बाबांनाच माहिती. भगवान भोलेनाथांचा आदेश म्हणून की काय पुढे साईमय होवून गेलो. अगदी बाबांनाच गुरु मानून त्यांची महादेव म्हणून त्या रुपात भगवान शंकरांनी महाराष्ट्रात साईरुपात माझी भक्ती कर असा आदेश दिला की काय म्हणून बाबांच्या सारखे गुरु लाभले हे ही माझे परमभाग्यच. त्यातही सदेह बाबा ज्यांना लाभले त्यांना तर तो अमृताचा घडाच होता. कितीतरी भाग्याचे ते लोक असा विचार माझ्या मनी आला. गुरु करावा म्हटलं तर तसा गुरु दिसला नाही. आणि जास्त शोधाशोध ती काय कामाची. तुज आहे तुजपाशी परी जागा चुकलाशी या प्रमाणे ज्या गुरुंच्या शोधात वणवण भटकत आहे ते गुरु गुरुच काय सदगुरु परमब्रम्ह साईमाऊलीच गुरु असताना दुसऱ्या गुरुची काय गरज? भोलेबाबांच्या रुपात साईबाबांना गुरु मानल्यानंतर त्यांच्याच आदेशाने सार्इंची गुरुभक्ती करण्याची परवानगी भोलेबाबांनी दिली. जसे भोलेबाबांनी मीच साईबाबांच्या रुपात आहे. कलियुगात मला प्राप्त करण्यासाठी माझी साईरुपात पूजा, अर्चा, जप, तप, यज्ञ, याग कर असे सुचवले. तशी साईबाबांनीही माझी ती इच्छा पुरवली. तुझे भोलेबाबा मीच आहे. हे कितीतरी वेळा समर्पकपणे दृष्टांताने दाखवून दिले. कोयनानगर येथे धरण सुरक्षा करत असताना आम्ही बाजार करण्यासाठी कोयनानगर या ठिकाणी जात असून एके दिवशी बाजारात रस्त्याच्या बाजूला कापडी बोर्ड दिसला. त्यावर भगवान शिवशंभू महादेवाचा जीर्णोध्दार व पिंडीची प्रतिष्ठापणा हा बोर्ड वाचून बरे वाटले. तारीख वाचली. चार दिवस पुढची होती. मनात विचार केला आपण येवू शकतो. पिंडीची स्थापना होण्याचा हा योग माझ्या आयुष्यात पहिल्यांदाच आला. मंदिर जीर्णोध्दार ही होताच. मनात ठरवले की नक्की जायचे. दिलेले ठिकाण एक दोन कि. मी. आसपास असेल ते शोधायचे. त्यानंतर डयुटीच्या ठिकाणी आलो. कामाच्या व्यापात विसरुन गेलो. ज्या दिवशी जीर्णोध्दार व प्रतिष्ठापणा कार्यक्रम होता. तो दिवस सोमवारचा होता. यादिवशी माझा उपवास असतो. मी सकाळपासून डयुटीवर होतो. माझी डयुटी राईट डॅमच्या बाजूस रस्त्यावर स्वागत कक्षापाशी होती. सकाळी १० च्या सुमारास दोन माणसे तेथे एका गाडीतून  उतरली. त्यानंतर ती गाडी पुढे निघून गेली. थोडा वेळ ती दोन माणसे रस्त्यावर थांबली होती. नवीनच दिसल्यामुळे मी त्यांना बोलावले. त्यांनी आम्ही कराड उंडाळे येथून आल्याचे सांगितले. पिशवीतून कार्यक्रमाची निमंत्रण पत्रिका काढून दाखवली व कार्यक्रमासाठी आलो असल्याचे सांगितले. वास्तविक कार्यक्रमाचे ठिकाण कोयनानगर येथे कोठेतरी होते व कोयनानगर ते धरण दोन तीन कि. मी. अंतर आहे. त्यातही इतर सर्व लोकांना धरण पाहण्यासाठी घेवून येणारी नेहरु गार्डन येते जात असते. मात्र ही दोन माणसे माझ्याजवळ उतरली. त्या दोघांनी त्यांना मिळालेली कार्यक्रम पत्रिका मला दाखवली. ज्यामुळे मलाही जीर्णोध्दाराचे कार्यक्रम ठिकाण माहिती पडले. मी त्यांना बसवून ठेवले आणि मनोमन सार्इंचे आभार मानले. एक तर विसरलेली गोष्ट आठवण करुन दिली. वरुन कार्यक्रम पत्रिका पाठवली. ती पत्रिका मी त्या दोन माणसांना परत केली. परंतु, त्यांच्यामुळेच त्याकार्यक्रमाच्या ठिकाणी पोहोचू शकणार होतो. पुढे १२ वाजता शिप बदली करणारी एक गाडी येथे आली. त्या गाडीतून त्या दोघांना मी कोयनानगर येथे पाठवून दिले. २ वाजता माझी डयुटी संपवून लवकरच साधा ड्रेस करुन साहेबांना सांगून कार्यक्रमस्थळी पोहोचलो. तेथे पिंडीचे मनसोक्त दर्शन घेतले व महाप्रसाद घेवून उपवास सोडला. बाबांनी दाखवून दिले. मीच तुझा भोलेबाबा आहे आणि मनातील मंदिर प्रतिष्ठापना कार्यक्रमाला जाण्याचे विसरलो असता आपणच माणसांच्या रुपात येवून डयुटीच्या ठिकाणी आठवण करुन दिली आणि दर्शन सोहळा घडवून आणला.

 

।। हरि ॐ बाबा ।।