अशी ती अदभुत, आश्चर्यकारक, भीतीदायक मुखे विश्वरुपाच्या ठिकाणी त्याने पाहीली आणखी अनेक मुखे असामान्य अलंकारांनी सजलेली आणि शांत स्वभावाची होती. अर्जुनाने ज्ञानात्मक दिव्य दृष्टीने पाहिले, परंतु ती मुखे कुठे संपली आहेत हे काही कळेना, मग कौतुकाने विश्वरुपाला किती डोळे आहेत हे तो पाहु लागला. तेव्हा विविध रंगांची कमलांची वनेच जणु विकसित झालेली आहेत असे विश्वरुपा डोळे अर्जुनाने पाहिले, जणु काही सुर्याचीही तेजस्वी पंगतच दिसत होती. गर्द काळया मेघांच्या दाटीमध्ये कल्पांताच्या वेळी विजा चमकतात, त्याप्रमाणे भिवंयाच्या खाली अग्नीप्रमाणे पिगंट असे नेत्र चमकत होते. अशा प्रकारे एक-एक आश्चर्य पाहत असताना अर्जुनाला त्या एकाच विराट विश्वरुपामध्ये अनेक दृश्ये एकदम पाहण्याचा योग हा सहजपणे फलद्रुप झाला. या विश्वरुपाचे पाय कुठे आहेत, तसेच मुकूट कोठे आहे? तसेच बाहु कोठे आहेत ? हे पाहण्याची त्याची इच्छा वाढत होती. मग भाग्यवान अशा अर्जुनाचे मनोरथ निष्फळ होतील काय ? पिनाक नावाचे धनुष्य हाती घेतलेल्या भगवान शंकराच्या भात्यात निष्फळ बाण असतात काय ? ब्रम्हदेवांच्या वाणीमध्ये जसे कधी खोटे शब्द येत नाहीत तसे अर्जुनाचे मनोरथ निष्फळ होत नाही म्हणून त्याने अमर्याद विश्वरुपाचा आदि आणि अतं पाहिला. ज्याचे विश्वस्वरुप वेदांनाही कळु शकले नाही, त्या विश्वरुपाची सर्व अंगे अर्जुनाचे दोन्ही डोळयांनी एकाच वेळी पाहिली. अर्जुन आपल्या डोळयांनी चरणांपासून मुकूटापर्यत विश्वरुपाची महानता पाहत होता, की जे विश्वरुप विविध प्रकारच्या रत्नांच्या अलंकारांनी शोभत होते. (ओवी २०१ ते २१०)
परब्रम्हाने आपण स्वता स्वरुप धारण करुन, आपल्या अंगावर घालण्या करिता अनेक अलंकार स्वताच बनला आहे. त्या अलंकाराचे वर्णन मी कसे बरे करु? ज्या महातेजाने सुर्यचंद्रादि मंडले प्रकाशित होतात आणि ज्या महातेजाने संपुर्ण विश्व प्रकाशित होते, त्यांचे जे खरोखर जीवन आहे, तो दिव्य प्रकाशाचा शृंगार कोणाच्या बुध्दीने बरे विषय होईल? देवाने स्वताच तो शृंगार धारण केला होता, असे ते विश्वरुप अर्जुन पाहत होता. मग विश्वरुपामध्ये ज्ञानदृष्टीने अर्जुन जेव्हा हाताचे पंजे पाहू लागला, तेव्हा त्या हातात प्रलयकाळाच्या अग्नीच्या ज्वाला जणू आहेत अशी झळकणारी लखलखीत शस्त्रे त्याला दिसली. आपणच अवयव, आपणच अलंकार, आपणच हात, आपणच शस्त्रे, आपणच जीव आणि आपणच शरीर, हा सारा काही देवाचा लीलाविलास होता, संपुर्ण चराचर देवांनेच व्यापलेले आहे, असे अर्जुन पाहत होता, ज्याच्या प्रखर किरणामुळे नक्षत्रे फुटत होती, ज्या महातेजाच्या उष्णतेमुळे अग्नीदेखील मागे सरकू लागला आणि समुद्रात प्रवेश करतो असे म्हणु लागला. मग जणु काही काळकुट विषाच्या लाटाच उसळलेल्या आहेत किवां प्रलयकाळच्या विजेचे अरण्यच प्रकट झाले आहे, त्याप्रमाणे उगारलेली शस्त्रे ज्या हातात आहेत असे अगणिक हात अर्जुनाने पाहिले, शस्त्राच्या भयांने अर्जुनाने तेथुन आपली दृष्टी काढली आणि तो त्या विश्वरुपाच्या कंठ व मुकूट यांकडे पाहु लागला, तेव्हा कल्पवृक्षांची उत्पत्ती ज्यापासुन झाली, तेच हे कंठमुकूट आहेत असे त्याला दिसले. जी फुले अष्टमहासिध्दीची महास्थाने आहेत, जेथे श्रमलेली लक्ष्मी विसावा घेते, अशी अतिशुध्द फुले विश्वरुपाने आपल्या मस्तकावर धारण केलेली त्याने पाहिली, मुकूटावर त्याच फुलांचे गुच्छ होते, मस्तकावर अनेक पूजा बांधलेल्या होत्या आणि गळयामध्ये दंडप्राय लांब मोठे हार रुळत होते. (ओवी २११ ते २२०)
स्वर्गाने सुर्याचे तेज नेसावे अथवा शुध्द सोन्याने मेरु पर्वत मढवावा, त्याप्रमाणे कमरेच्या खालच्या बाजुवर कसलेला पीतांबर तेजाने झळकत होता. श्री शंकराने जी कापराची उटी लावावी अथवा कैलास पर्वतावर जसा पाऱ्याचा लेप द्यावा अथवा क्षीरसमुद्राला पांढऱ्या शुभ्र जलाने आच्छादावे, ज्याप्रमाणे चंद्राची घडी उलगडुन त्यांची खोळ करुन आकाशाने आपल्या हाताने अंगावर घेतलेली असावी, त्याप्रमाणे त्या विश्वरुपाच्या सर्वागांवर अर्जुनाने चंदनाची उटी पाहिली. ज्याच्या योगाने प्रकाशणाऱ्या वस्तुला देखील तेज चढते, ज्याच्या शीतलतेने ब्रम्हरुप आनंदाची उष्णता नाहीशी होते, ज्याच्या सुगंधाने मुळची सुगंधीत असलेली पृथ्वीही अधिक सुगंधित होते, निर्लेप असलेले ब्रम्ह देखील त्या चंदनाचे लेप धारण करण्याची इच्छा करते, जे चंदन अगंहीन असलेला मदनदेखील धारण करतो, त्या चंदनाच्या सुगंधाचा महिमा कोण बरे वर्णन करील? याप्रमाणे एकेक शृंगाराची शोभा पाहत असताना अर्जुन भांबावुन गेला, तसेच देव बसले आहेत का उभे आहेत किवां निजलेले आहेत हे त्याला काहीच समजेना, डोळे उघडुन त्याने बाहेर पाहिले, तर सर्व जगत विश्वरुप आहे असे त्यास दिसु लागले, ” मग मी आता काही पाहणार नाही” अशा निश्चयाने त्याने डोळे मिटुन घेतले, त्या वेळीही त्याला विराट असे विश्वरुप दिसले. अर्जुन आपल्या समोर अगणित मुखे पाहत होता, त्यांच्या भीतीने तो ज्या वेळी त्यांच्याकडे पाठ करुन उभा राहीला, तेव्हा तिकडे देखील विश्वरुपाची मुखे हात, पाय होते तसेच दिसु लागले. ते विराट विश्वरुप डोळयांनी पाहिले असता दिसत होते, यात आश्चर्य ते काय? परंतु डोळे मिटुन घेतले तरी तेच विश्वरुप दिसत होते, हा चमत्कार ऐका. ही भगवंताच्या अनुग्रहाची करणी कशी आहे, पहा अर्जुनाचे पहाणे न पाहणे हे सर्व नारायणाने व्यापुन टाकले होते. (ओवी २२१ ते २३०)
म्हणुन आश्रयाच्या पुरात पडुन त्याच्या तीराला येतो न येतो तोच चमत्काराच्या दुसऱ्या एका अपार सागरात तो पडला होता.याप्रमाणे त्या अनंतरुपाने अर्जुनाला आपल्या अलौकिक दर्शनाच्या गुढ अशा कृतीने संपुर्ण व्यापुन टाकले होते, तो श्रीकृष्ण परमात्मा स्वभावताच सर्वतोमुख आहेच आणि तेच विश्वरुप दाखविण्यासाठी अर्जुनाने त्याला नम्रभावे प्रार्थना केली होती. त्यामुळे श्रीकृष्ण आपणास सर्व रुपे घेवुन नटला होता. श्रीकृष्णाने अर्जुनाला जी ” दिव्य-दृष्टी ” दिली होती ती दिव्याचा अथवा सुर्याचा प्रकाश असला तरच दिसेल अथवा ती दृष्टी मिटली असता बंद होईल, अशा स्वरुपातील नव्हती. म्हणुन अर्जुनाला दोन्ही प्रकांरानी डोळे उघडे ठेवुन अथवा मिदुन उजेड असो किवां अधांर असो सदैव विश्वरुपाचे दर्शन होत होते, हे वृत्त हस्तिनापुरात धृतराष्ट्राला संजय सांगत होता. हे धृतराष्ट्र राजा ! तुम्ही ऐकले का? विविध प्रकारचे अलंकार धारण केलेले आणि सर्व बाजुनी मुखे असलेले असे विराट विश्वस्वरुप अर्जुनाने पाहिले. हे धृतराष्ट्र राजा ! त्या विश्वरुपाचे प्रखर तेज कशाप्रकारे होते म्हणुन सांगू? प्रलयकाळी म्हणजे कल्पांताच्या वेळी बारा सुर्याचा एकत्र संगम होतो, तसे ते हजारो दिव्य सुर्य जर एकाच वेळी उगवले, तरी त्या तेजाच्या महिमेला विश्वरुपाची उपमा देता येणार नाही. सर्व विजेचा समुदाय केला आणि प्रलयकालच्या अग्नीचे सर्व साहित्य गोळा केले, तसेच दहा-दहा वडवाग्नी,दावाग्नी, विद्युदग्नी, काटस्तअग्नी ही सर्व महातेजाची दशके एकत्र मिळवली, तरी त्या विश्वरुपाच्या अगंच्या महाशुध्द तेजाची काही प्रमाणात थोडी बरोबरी होवु शकेल, परंतु त्या विश्वरुपाच्या तेजासारखे प्रखर शुध्द तेज जगात दुसरे नाही. (ओवी २३१ ते २४०)
याप्रमाणे त्या महात्मा श्रीहरीच्या सर्वागाचे तेज स्वाभाविकपणे सर्वत्र पसरलेले होते, ते मला महर्षी श्री व्यासमुनींच्या कृपेने प्रत्यक्ष पाहता आले. ज्याप्रमाणे समुद्राच्या पाण्यावर वेगवेगळे बुडबुडे दिसतात, त्याप्रमाणे त्या विश्वरुपामध्ये हे संपुर्ण जग आपल्या विस्तारासह दिसत होते. किवां आकाशामध्ये गंधर्वनगर जसे एका भागावर दिसत असते अथवा पृथ्वीच्या एका लहान भागावर मुंगी जशी घर बांधते, किवां मोठया मेरु पर्वतावर छोटे-छोटे परमाणु जसे बसलेले दिसवेत, त्याप्रमाणे त्या वेळी त्या देवाधिदेव श्रीकृष्णाच्या विश्वरुपमय शरीरावर अर्जुन सर्व विश्व पाहता झाला. तेव्हा हे विश्वही वेगळे आहे आणि आपणही त्याहुन भिन्न आहोत असे जे काही प्रमाणामध्ये द्वैत होते, तेही नाहीसे झाले आणि अर्जुनाचे अंतकरण एकदम विश्वरुपामध्ये विलीन झाले. अंतकरणामध्ये ब्रम्हानंद जागृत झाला, त्यामुळे सर्व इंद्रियांचे बळ हरपुन गेले, मस्तकापासुन पायांपर्यत सर्व शरीरावर रोमांच उभे राहीले. पावसाळयाच्या प्रारंभी पर्वतावरुन पाणी वाहुन गेल्यावर पर्वताचे सर्वागं जसे कोवळया कोवळया गवताच्या अंकुरांनी वेढलेले असते, त्याप्रमाणे अर्जुनाच्या शरीरावर रोमांच आले. चंद्रकिरणांनी स्पर्श केल्यावर चंद्रकात मणी आपोआप द्रवतर रुप धारण करतो, त्याप्रमाणे अर्जुनाच्या सर्व शरीरावर घामाचे बिदुं दाटले होते. कमळाच्या कळीत भुंग्यांचा समुदाय अडकल्यावर कमळाची कळी जशी पाण्यावर इकडून तिकडे आदळते, त्याप्रमाणे अर्जुनाचे शरीर अंतकरणाच्या सुखाच्या आवेगाच्या बळाने आत-बाहेर कापत होते. कापुर दाटल्यावर ज्याप्रमाणे कापुरकेळीची सोपटी उकलुन कापुराचे कण बाहेर पडु लागतात, त्याप्रमाणे अर्जुनाच्या डोळयातुन आनंदाश्रु ओघळत होते. (ओवी २४१ ते २५०)
उदयाला आलेल्या चंद्राच्या किरणांनी भरलेला समुद्र पुन्हा पुन्हा जसा भरतीला येतो, त्याप्रमाणे तो अर्जुन अंतकरणातील सुखाच्या आवेगाने वरचेवर डोलु लागला. याप्रमाणे अष्टसात्विक भावांतदेखील एकमेकांत चढाओढ लागली होती, या अवस्थेत अर्जुनाला ब्रम्हानंदाचे राज्य अनायसे प्राप्त झाले होते.तसे त्या सुखाच्या अनुभवानंतर कृपादृष्टीने पाहून द्वैताचा सांभाळ केला, मग देव व मी असे द्वैत कायम राहिल्यामुळे अर्जुनाने श्वासोच्छवास टाकुन श्रीकृष्णाकडे पाहिले, आणि ज्या बाजुला देव बसले होते त्या बाजुला वळुन नतमस्तक होवुन हात जोडुन प्रार्थना करु लागला. अर्जुन म्हणाला, हे प्रभो, आपला जयजयकार असो आम्हा प्राकृत जनांवर आपण अदभुत अपार कृपा केली आहे त्यामुळे आम्हाला अलौकिक विश्वरुप पहावयास मिळाले, आपण खरोखर उत्तम केले तु या संपुर्ण सृष्टीचा आश्रय आहेस, असे प्रत्यक्ष पाहिले आणि मला स्वाभाविकपणे संतोष झाला. देवा ! मंदराचल पर्वताच्या आश्रयाने ज्याप्रमाणे ठिकठिकाणी हिस्त्रं पशु असलेली दाट जंगले असतात, त्याप्रमाणे तुझ्या देहावर मी अनेक भुवने पाहत आहे, अहो महाराज, आकाशाच्या खोलीमध्ये ज्याप्रमाणे ग्रहांचे समुदाय दिसतात अथवा एखाद्या महावृक्षाच्या ठिकाणी अनेक प्रकारच्या पक्ष्यांची घरटी दिसतात, त्याप्रमाणे श्रीहरी, तुझ्या विश्वरुप विराट शरीराचे ठिकाणी इंद्रादिक देवसमुहांसह प्रत्यक्ष स्वर्ग दिसत आहे, हे प्रभो ! तुझ्या विराट शरीराच्या ठिकाणी आकाशादी महाभुतांचे पंचक आणि एकेक भुतसृष्टीतील प्राणी-समुदाय मी पाहत आहे. (ओवी २५१ ते २६०)
महाराज ! तुझ्या स्वरुपात मी सत्यलोक पाहिला आणि त्यात दिसतो तो चार मुखांचा ब्रम्हदेव नव्हे काय? आणि दुसरीकडे कैलासही दिसत आहे, तुझ्या एका अंशावर पार्वतीमाते सह देवाधिदेव महादेव दिसत आहे, हे ऱ्हषीकेशा श्रीकृष्णा, तुलाही या विराट विश्वरुपात मी पाहत आहे. तुझ्या विश्वरुपावर कश्यपादी ऋषींची कुळे मी पाहत आहे, तसेच नागांसह सप्त पाताळ पाहत आहे, फार काय सांगावे? हे त्रैलोक्यपते, तुझ्या एक-एक अवयवरुपी भिंतीवर चौदा भुवने जणु चित्राकृतींनी अंकुरली आहेत असे वाटते. आणि त्या लोकांतील जे जे प्राणी आहेत तीच विविध प्रकारची चित्रे होत, असा हा तुझा अगाध महिमा मी पाहत आहे. तुम्ही जी ” दिव्य-दृष्टी ” दिली आहे, त्यामुळे मी सर्वत्र पाहु शकत आहे. म्हणुन आता जणु काही असे वाटत आहे की तुझ्या बलशाली बाहूदंडापासुन आकाशाचा अंकुर निर्माण झाला आहे. त्याप्रमाणे हे देवा ! तुझे एकटे हातच अखंडपणे सर्व प्रकारचे कर्म करीत असलेले दिसतात, मग जणु ब्रम्हाच्या विस्ताराने जशी काही ब्रम्हाडांची भांडारेच उघडावीत अशी ती तुझी अमर्याद उदरे पाहत आहे. आपली हजारो मस्तके आहेत असे वर्णन वेदांमध्ये आहे त्या विश्वरुपाची कोटी पेक्षाही अधिक मस्तके एकाच वेळी मी पाहिली आहेत. जणु काही परब्रम्हरुपी वृक्षच वदनरुपी फळांनी दाट भरुन गेला आहे, असे मला दिसते. ज्याप्रमाणे तुझ्या विश्वमुर्तीवर जिकडे-तिकडे मुखे दिसत आहेत, त्याचप्रमाणे विस्तारलेल्या डोळयांच्या अनेक पंक्तीच्या पंक्ती दिसत आहेत. (ओवी २६१ ते २७०)