अध्याय-१२-भाग-३

         खडकावर पडलेला पाऊस अथवा अग्नीत पेरलेले अथवा स्वप्न हे जसे व्यर्थ असते तसे सर्व कर्म व्यर्थ असतात असे समज. ज्याप्रमाणे पित्याचे मन आपल्या कन्येविषयी निरिच्छ असते त्याप्रमाणे सर्व कर्मा विषयी तु निरिच्छ हो, ज्याप्रमाणे अग्नीच्या ज्वाला आकाशामध्ये वाया जातात, त्याप्रमाणे तुझ्याकडुन होणारे कर्म शुन्यामध्ये विरुन जाऊ दे. अर्जुना, हा फलत्याग सोपा वाटतो खरा पण सर्व योगांमध्ये हा फलत्यागरुप योग श्रेष्ठ आहे. वेळूची झाडे एक वेळ वाढल्यानंतर पुन्हा जशी वांझ ठरतात, त्या झाडापासुन दुसरी झाडे निर्माण होवु शकत नाहीत, त्याप्रमाणे फलत्यागाने ज्या ज्या कर्माला टाकुन दिलेले असते, त्या त्या कर्मा पासुन पुन्हा जन्म-मरणरुपी अंकुर निर्माण होवुन वाढत नसतो. अशा प्रकारे फळाचा त्याग केल्यामुळे सर्वच कर्मे र्निबीज होतात, त्यामुळे मनुष्यशरीरानेच पुन्हा शरीराला येणे संपुन जाते, पुन्हा-पुन्हा जन्म-मरणाच्या चक्रात फिरावे लागत नाही. अर्जुना, अभ्यासाच्या योगाने ज्ञान प्राप्त होत असते आणि ज्ञानाची प्राप्ती झाल्यावर ध्यान करता येत असते. एकदा का चित्तवृत्ती ब्रम्हनिष्ठ झाली की, कायिक, वाचिक, मानसिक सर्व प्रकारचे भाव ध्यानाला आलिंगन देतात, म्हणजे त्या ध्यानात एकरुप होतात, तेव्हा सर्व कर्मे सहजपणे दुर राहतात. मग कर्मच ज्या वेळी दुरावली जाते त्यावेळी फल-त्याग आपोआप घडतो आणि त्या त्यागामुळे परमशांती प्राप्त होते. म्हणुन हे सुभद्रापते, परमशांती प्राप्त करुन घेण्यासाठी साधनांचा हाच एक खात्रीचा मार्ग आहे तरी सांप्रतकाळी प्रारंभी तुला अभ्यास करणे हेच योग्य आहे.  (ओवी १३१ ते १४०)

        पार्था , अभ्यासापेक्षा ज्ञान अधिक गहन आहे आणि ज्ञानापेक्षा ध्यान अधिक कठीण आहे. नंतर कर्माच्या फलांची इच्छा त्यागणे हे ध्यानापेक्षाही अधिक उत्तम आहे आणि त्यागापेक्षाही ब्रम्हप्राप्तीची आनंद हा सर्व श्रेष्ठ आहे. अर्जुना , अशा या मार्गाने ज्याने इहलोकी मनुष्य-शरीरातच ब्रम्हरुप शांतीची प्राप्ती करुन घेतली आहे, तो सर्व भुतामात्राविषयी द्वेष कधीही करत नाही. ज्याप्रमाणे विश्वचैतन्य हा आपला हा परका असा भेद जाणत नाही,  त्याप्रमाणे  त्याचे ठिकाणी आप-पर भाव नसतो. उत्तमाचा  स्वीकार करावा आणि अधमांचा त्याग करावा हे ज्याप्रमाणे पृथ्वी जाणत नाही, अथवा फक्त राजाच्या देहाची हालचाल करावी आणि दारिद्री लेाकांनी देह टाकुन द्यावा, असे कृपाळु प्राण कधीही म्हणत नाही, फक्त गायीची तहान भागवावी आणि वाघाला विष होवुन मारुन टाकावे असे पाणी कधी जाणत नाही.  त्याप्रमाणे सकल भुतमात्रांविषयी ज्याचे समान रुपाने मित्रत्व असते आणि जो स्वता तर कृपेची जननी झालेला असतो , जो मी आणि तु ही द्वैताची भाषाच जाणत नाही, या विश्वात माझे काही आहे असे जो म्हणत नाही आणि ज्याला सुख-दुखांची जाणीव सुध्दा नसते, त्याप्रमाणे त्यांची क्षमेविषयी पृथ्वीसारखी योग्यता आहे आणि संतोषाला ज्याने आपल्या मांडीवर राहण्यास जागा दिली आहे. (ओवी १४१ ते १५०)

          वर्षा ऋतुशिवाय सागर जसा पाण्याने अखंड भरलेला असतो, त्याप्रमाणे जो कोणत्याही प्रकारच्या भोगावाचुन संतोषाने परिपुर्ण असतो जो आपली शपथ घालुन अंतकरणाला विषयांपासुन आवरुन धरतो आणि  कोणतेही सात्चिक कर्म करण्याच्या निश्चयाला ज्याच्यामुळे खरेपणा येतो, ज्याच्यां हदयरुपी मंदिरामध्ये जीव आणि शिव हे दोघे ऐक्यरुपी आसनावर बसुन  शोभत आहेत. असा जीव-शिव यांच्य ऐक्य योगाने संपन्न होवुन जो आपले मन व बुध्दी अखंड माझ्या ठिकाणी अर्पण करतो. आत-बाहेर माझ्याशी ऐक्य पावल्यानंतरही जो माझी भक्ती प्रेमाने करतो. अर्जुना !  तोच योगी आणि तोच खरा विमुक्त होय. तो जशी काही स्त्री आणि तिचा पती इतक्या स्वरुपाने तो मला आवडतो. हा पती-पत्नीचा दृष्टांतही बरोबर नाही. तो मला माझ्या जीवापेक्षाही जास्त प्रिय आहे. तरीपण मी या शुध्द प्रेमाला जो दृष्टांत देतो तो केवळ भ्रम आहे. वास्तविक या भक्तांच्या प्रेमाविषयी काही बोलता येत नाही, परंतु अर्जुना !  तुझी श्रध्दा मला बोलावयास लावते. म्हणुन आम्ही सहज जी उपमा स्फुरली ती बोलुन दाखवली, नाहीतर हे शुध्द प्रेम बोलुन दाखवता येईल काय?    अर्जुना ! आता हे असु दे, प्रिय भक्तांविषयी गोष्टी निघाल्या की आवडही दुप्पट वाढत असते. (ओवी १५१ ते १६०)

          त्यातही कदाचित सुखसंवाद करण्यास प्रेमळ मनुष्य मिळाला तर त्या गोडीला उपमा देता येईल काय?  म्हणुन अर्जुना !  तुच माझा आवडता मित्र असुन तुच अत्यंत आवडीने गोष्टी ऐकणारा आहेस आणि त्यातुन माझ्या नि:स्वार्थ प्रिय भक्तांचीच गोष्ट तुझ्याजवळ बोलण्याचा प्रसंग आला आहे, तरी अर्जुना !  आता सांगतोच मी या भक्तांच्या अमृतमधुर कथा सांगण्याच्या सुखाला प्राप्त झालो आहे, ज्ञानेश्वर महाराज म्हणतात असे म्हणत असतानाच देव डोलु लागले, मग श्रीकृष्ण म्हणाले, अर्जुना ! त्या नि:स्वार्थ भक्तांची लक्षणे तु जाणून घे, की ज्यांना मी माझे अंत:करणरुपी आसन बसावयास घालतो. समुद्र कितीही खवळला तरी जलचरांना कधी भिती निर्माण होत नाही आणि जलचंराना समुद्र कधी कंटाळत नाही.  त्याप्रमाणे अनेक गोष्टीमुळे‍ उन्मत्त झालेल्या जगाने कितीही त्रास दिला, तरी सुध्दा ज्याला खेद वाटत नाही आणि ज्याच्या योगाने लोकांना किचींतही त्रास होत नाही, फार काय सांगावे ?  अर्जुना ! शरीर जसे स्वताच्या अवयवांना कधी कटांळत नाही, त्याप्रमाणे मीच आत्मरुपाने सर्वाच्या अंत:करणात सम प्रमाणात आहे, अशा अद्वैत भावाने जो कोणत्याही प्राणीमात्रांचा कंटाळा करत नाही. जे जगच त्याचा देह झाल्यामुळे प्रिय-अप्रिय हे भाव त्याच्या चित्तातुन संपुन गेले व त्याच्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचे द्वैत नसल्यामुळे हर्ष व दु:ख हे विकार नाहीसे झाले. असा तो सुख-दु:ख द्वंद्वापासुन मुक्त आणि भय व उद्वेग आदीनीं रहित असतो, शिवाय अशा अवस्थेवर पोचल्यानंतरही तो माझे ठिकाणी अनन्य भक्त असतो, त्यामुळे त्याचा मला मोह असतो, त्या नि:स्वार्थ प्रेमाचे मी काय वर्णन करु?  इतकेच नव्हे तर तो माझ्याशी अनन्य असतो, तो माझ्या जीवाने जगतो. (ओवी १६१ ते १७०)

          जो आत्मानंदाने पुर्ण तृप्त झाला आहे, ज्याच्या रुपाने जणू काही मोक्ष‍ जन्माला आला आहे आणि जो पुर्णत:  ब्रम्हस्थितरुपी स्त्रीचा प्रिय पती झाला आहे.  अर्जुना ! ज्याचे ठिकाणी कोणत्याही विषयाच्या इच्छेचा प्रवेश होत नाही  त्याच्या अंत:करणात सुखाचा सदैव उत्कर्ष होत असतो, काशी हे तीर्थक्षेत्र मोक्षप्राप्ती करुन देण्यासाठी पुराण प्रसिध्द आहे, परंतु त्या ठिकाणी देह ठेवल्याशिवाय मोक्षप्राप्ती होत नाही, हिमालय पर्वतयात्रा केली असता दोषांचे क्षालन होते, परंतु  तेथे जाताना व येताना जीवीतहानी होते, परंतु संतांचे पावित्र्य धोकादायक नाही, गंगेचे पाणी पवित्रातील पवित्र आहे गंगेमध्ये स्नान केले की पाप व मनाचा ताप नाहीसा होतो परंतु गंगेमध्ये बुडी मारावी लागते, आणि त्यामुळे पाण्यात बुडण्याचा संभव असतो, ती भक्तीरुप नदीची खोली अपार असुन ती कळत नाही, परंतु या भक्तीरुप नदीत मनुष्य बुडून जात नाही, भक्तीमुळे मनुष्याला जिवंतपणेच मोक्ष प्राप्ती होते, संतांच्या केवळ शरीरस्पर्शाने गंगेची पापे नाहीशी होवुन जातात तर मग संतांच्या संगतीने साधकाला किती पावित्र्य प्राप्त होत असेल याची कल्पना करता येत नाही, आता हे वर्णन पुरे, जो संत आपल्या पावित्र्याने तीर्थाचा आश्रय असतो, जो आपल्या मनातील मल , विक्षेप आणि आवरण आदी विकार दशदिशांना पळवुन लावतो, सुर्य जसा अंर्तबाहय शुध्द असतो, त्याप्रमाणे जो आत-बाहेर  शुध्द असतो आणि जो मायेच्या आत असलेल्या ब्रम्हरुपी अनमोल धनाला प्रत्यक्ष पाहणारा पायाळु आहे, आकाश जसे व्यापक असते आणि उदासीन असते, त्याप्रमाणे ज्याचे मन सर्वव्यापक आणि आसक्ती रहित म्हणजे उदासीन असते. (ओवी १७१ ते १८०)

           ज्याप्रमाणे पारध्याच्या हातुन पक्षी सुटला, की तो निर्भय होतो, त्याप्रमाणे जो संसाराच्या दुखातुन सुटतो तो निरिच्छ होत असतो. ज्याप्रमाणे मृत पावलेल्या मनुष्याला आपले अंग उघडे पडले तरी लज्जा वाटत नाही त्याप्रमाणे जो सदैव आंनदी असतो, तो कोणत्याही परिस्थितीत दुखाला जाणत नाही, आणि कर्म करताना मी कर्ता आहे असा कोणत्याही प्रकारचा अभिमान ज्याचे अंगी नसतो,  ज्याप्रमाणे काष्टाशिवाय अग्नी आपोआप विझुन जातो, सर्व प्रकारचे द्वैत नाहीसे झाल्यामुळे जन्म-मरणाचे दुष्टचक्र नष्ट झाले आहे, आणि ज्याच्या भाग्याच्या वहीत मोक्ष लिहिला आहे, अर्जुना ! जो भक्त ते ब्रम्ह मी आहे या भावनेने परिपुर्ण भरलेला असतो, तो द्वैताच्या पलिकडच्या काठावर निघुन जातो, तो भक्तीतील आंनद घेण्यासाठी स्वतालाच देव आणि भक्त अशा दोन भागांमध्ये विभागुन घेतो व स्वताला सेवक मानतो. दुसऱ्या भागाला मी देव असे नाव ठेवतो देव व भक्त या दोन्ही कल्पना जो आपल्यातच करतो आणि भक्ती न करणाऱ्या लोकांना भक्तीमार्गाचे आचरण करुन दाखवतो, त्या भक्तांची आम्हाला सातत्याने आवड आहे, आमच्या ध्यानाचा विषय तो भक्तच असतो, अशा भक्तांची आम्हाला जेव्हा भेट होते, त्या वेळी आम्हालां समाधान लाभते. मला रुप नसतानाही त्या भक्तासाठी रुप घ्यायला लागते, आणि म्हणून मला त्यांच्या साठी सगुण रुपात प्रगट व्हावे लागते, अशा भक्तावरुन माझा जीव ओवाळावा असे मला वाटते, इतका तो मला प्रिय आहे.जो आत्मानंद हेच सर्वात श्रेष्ठ मानतो, त्याच्या प्राप्तीसारखे चांगले या जगात काहीच नाही म्हणून कोणत्याही भोगविशेषांच्या प्राप्तीने हर्षित होत नाही. (ओवी १८१ ते १९०)

पुढील भाग