ज्ञानदेवांची ज्ञानेश्वरी
सार्थ भगवद् गीता अध्याय – १७
श्रध्दात्रय विभाग योग
श्री ज्ञानदेवांनी भगवद् गीतेतील अध्याय – १७ मधील “श्रध्दात्रय विभाग योग” या अध्यायातील १ ते २८ संस्कृत श्लोकांचे इसवी सन १३ व्या शतकात तत्कालीन मराठीतुन ४३३ ओव्यामधुन सखोल निरूपण केले आहे. खरतर हा मराठी भाषेचा अतिव गौरव आहे, परंतु कालपरान्वये बोली आणि लिखीत मराठी भाषेमध्ये फरक पडल्यामुळे ती मराठी भाषाही अवघड वाटू लागली. श्री निवृत्तीनाथांचे परमशिष्य श्री ज्ञानदेवांच्या कृपार्शिवादाने तेच सखोल निरूपण मराठी वाचंकासाठी सोप्या मराठी भाषेत (२१व्या शतकातील प्रचलित मराठी भाषा) जसे आहे तसे देत आहे. हा श्री ज्ञानदेवांचा अमुल्यकृपा–प्रसाद आहे, मनुष्य जीवन जगण्यासाठी अनमोल संजीवनी आहे, किंबहुना संसारसागर पार करण्यासाठी अध्यात्मातील नौका आहे, तिच्या मदतीने संसार करता सावरता आपणही याचा अवश्य लाभ घेवून जीवनसागरातुन तरुन जावे आणि आपल्या जीवनाचे कोटकल्याण साधावे. ही ज्ञानदेवांची “अक्षरब्रम्ह ज्ञानेश्वरी” आत्मसाद करुन जीवनाचे सार्थक करावे.
जी तुझी योगमाया विश्वरूपी विकसित आकाराला प्रगट करते व जो जीवरूपी गणांचा तू स्वामी म्हणजे गणपती, त्या सदगुरूराया, तुला माझा नमस्कार असो. सत्त्व, रज, तम या त्रिगुणरूपी त्रिपुरांनी वेढलेला जीवदशरूपी संकटात सापडलेला जो जीवात्मा, तो तुमच्या स्मरणाने श्रीशंकरांनी मुक्त केला. म्हणून शिवाबरोबर तुझी तुलना केली असता श्रेष्ठत्वाने तुच अधिक मोठा आहेस.तरीपण जीवाला मायाजाळातून तारून नेत असल्यामुळे तू भोपळयासमान हलकाही आहेस. जे तुझ्या पारमार्थिक स्वरूपाविषयी अज्ञानी आहेत, त्यांच्याकरिता तू वक्रतुंड म्हणजे तोंड फिरवलेला आहेस; आणि ज्ञानी लोकांसाठी तुझे तोंड सरळ सन्मुख आहे. आपले डोळे पाहू गेले असता लहान दिसतात; परंतु त्यांच्या उघडझापीने ते जगाची उत्पत्ती व नाश या दोन्ही गोष्टी सहज लीलेने करतात. हे महागणपते! तुझ्या प्रवृत्तिधर्मरूपी कानाच्या हालण्याने उठलेल्या मायारूपी गंडस्थळातून वाहणाऱ्या विषयसुखरूपी मदस्त्रावाच्या सुगंधी वाऱ्याने लुब्ध झालेल्या जीवरूपी भ्रमराच्या नीलकमळाने तुझी पूजा केली जाते. नंतर जेव्हा निवृत्तिरूपी कानाच्या हालण्याने तुमची बांधलेली पूजा विसर्जित होते, तेव्हा आपले शुध्द स्वरूप तू मिरवतोस. तुझ्या डाव्या मांडीवर बसलेल्या मायाशक्तीची नृत्यक्रीडाच जगत् उत्पन्न करते व त्या नृत्याच्यामुळे जगताचे सर्व व्यवहार आपण चालविता. असो! हे गरूराया! तुझ्या भक्तांचा देव या रूपाने आणि शिष्यांचा गुरूरूपाने सोयरा होतोस, तो देव भक्तपणाच्या व गुरू-शिष्याच्या व्यवहारला मुकतो, ही केवढी आश्चर्याची गोष्ट आहे! तू बंधनांचा ठावठिकाणा नाहीसा करणारा आहेस; म्हणून ‘जगदबंधू’ या नावाची सार्थकता तुझ्या ठिकाणी आहे. (ओवी १ ते १०)
त्यांचा देहसुध्दा द्वैतपणाने शिल्लक राहत नाही; कारण दुसऱ्याला आपण स्वस्वरूप करता. मग सर्वत्र अद्वैत झाल्यावर दुजाभाव तरी कोठून उरणार? जे तुम्हाला वेगळे असे समजुन तुमची प्राप्ती करुन घेण्यासाठी फक्त धावत सुटतात त्यांना तुमची प्राप्ती होत नाहीते तुझ्यापासुन पुष्कळ अंतरांनी मागेच राहतात. जे ध्यानाच्या निमित्ताने तुझी मुर्ती मनात आणतात त्यांना तुम्ही सापडत नाही. त्याच्या देशातही तुम्ही वास करत नाही, परंतु जे ध्यानासह तुमचे विषयी आपला सर्व द्वैतकाम सोडुन देतात ते तुम्हाला अतिप्रिय आहेत. जे तुम्हाला स्वतासिध्द या रुपाने जाणत नाहीत ते या जगात सर्वज्ञपणाने जरी नांदत असले आणि त्यांचे वेदांएवढेही विशाल बोलणे असले तरीपण ते ऐकत नाहीस. मौन हेच तुझे जन्मराशीवरुन नाव आहे, त्यामुळे तुझी स्तुती करण्याविषयी कशी इच्छा बाळगू ? हे सर्व भासमान जगत् ही सर्व आपली माया आहे मग आता तुमचे भजन तरी कसे करु? महाराज! आपला सेवक होईन म्हटले तर सेव्य-सेवक भावामुळे तुमच्या अद्वितीय स्वरुपाचा भेद होईल आणि मी तुमच्या द्रोहाला प्राप्त होईन म्हणुन मी तुमच्या संबंधाने भक्त किवां सेवक यापैकी काही होणार नाही, जेव्हा मी सर्व प्रकाराने तुमचा कोणी नाही असे म्हणावे तेव्हाच तुमच्यात व माझ्यात अद्वैत आहे असे होईल. हे आराध्य देवता, गुरुराया, हे तुझे वर्म मी जाणले आहे, मीठ ज्याप्रमाणे पाण्यात मिळवले असता पाण्यापासुन वेगळे न राहता ऐक्य पावते त्याप्रमाणे तुझ्यात-माझ्यात द्वैतभाव नसुनही मी तुला नमस्कार करतो. यापेक्षा अधिक काय बरे बोलावे? रिकामी घागर समुद्रात बुडवली तर ती उचंबळतच भरुन बाहेर निघते अथवा वात दिव्याच्या संगतीने दिवाच होते त्याप्रमाणे हे गुरुराया, हे निवृत्तीनाथां! तुझ्या ऐक्यरुप नमनाने मी पुर्णपणे ब्रम्हरुप झालो आहे आता मी गीतेतील भावार्थ प्रगट करीन.(ओवी ११ ते २० )
तरी सोळाव्या अध्यायाच्या समाप्तीच्या श्लोकांत देवांनी जो निश्चीतपणे निर्णय करुन ठेवला आहे की, अर्जुना! चांगल्या अथवा वाईट गोष्टीचे आचरण करण्याविषयी तुला शास्त्र हेच सर्वतोपरी प्रमाण आहे. तेव्हा अर्जुन मनात म्हणाला, हे असे कसे देवाचे बोलणे? कोणतेही कर्म करण्यास शास्त्राशिवाय सुटका नाही काय? तर तक्षक नावाच्या महासर्पाच्या फण्याजवळ जावुन त्या फणीतील मणी कसा काढायचा? आणि सिंहाच्या नाकातील केस कसा काढायचा? आणि हे दोन प्राप्त झाले तर सिहांच्या केसाने नागाच्या फणीतील मणी कसा ओवायच आणि तो अलंकार कसा प्राप्त करुन घ्यायचा? नाहीतर मोकळा गळा ठेवायचा की काय? त्याप्रमाणे निरनिराळया शास्त्रांच्या निर्णयांना कोण बरे आकलन करु शकेल? आणि त्यांची एकवाक्यता करुन त्याचा उपयोग कोण करुन घेईल? जरी एकवाक्यता झाली तरी त्याप्रमाणे आचरण करण्यास वेळ कसा मिळेल? कारण सर्व कर्मे करण्याइतके आयुष्य कोणास असणार? आणि शास्त्र, अर्थ, देश व काल ही चारी जरी प्राप्त झाली तरी या चारी साधंनानी जे फळ मिळते ते एखाद्यालाच मिळणार. म्हणून शास्त्राचे अनेक प्रकार असल्यामुळे शास्त्रात सांगितलेले सर्व कर्म शास्त्रशुध्द पध्दतीने घडणे शक्य नाही. तर मग मोक्षाची इच्छा असलेल्या व शास्त्रशुध्द ज्ञान नसलेल्या मुमूक्षूंची परमार्थ-मार्गात कोणती गती आहे? हा मनातील अभिप्राय विचारण्यासाठी अर्जुन जो प्रस्ताव मांडणार आहे तोच येथील सतराव्या अध्यायातील प्रमुख विषय आहे. (ओवी २१ ते ३० )
जो विरक्त आणि सर्व विद्यांमध्ये निष्णात असलेला अर्जुन तो अर्जुनपणाने सर्वज्ञानसंपन्न कृष्णालाही आश्चर्य निर्माण करणारा जणु दुसरा प्रतिरुप कृष्णच वाटत होता. जो शौर्याचा आधार, जो सोमवंशीचे भुषण आहे आणि प्राणिमात्रांना सुखद्रव्यादी देण्याचा उपकार करणे ही ज्याची सहज लीला आहे. जो अर्जुन बुध्दीचा प्रिय पती आहे, जो ब्रम्हविद्येचे विश्रांती स्थान आहे जो सर्व काळ बरोबर राहणारा देवांचा मनस्वभाव आहे. तो अर्जुन म्हणाला, तमालवृक्षाप्रमाणे श्यामवर्ण असलेल्या श्रीकृष्णा, इंद्रियांना अनायसे प्रत्यक्ष झालेल्या ब्रम्हा, श्रीकृष्णा, तुझे मागील अध्यायातील बोलणे मला शंकायुक्त दिसते, कारण शास्त्रांवाचुन दुसऱ्या कोणत्याही साधनाने मानवाला मोक्ष प्राप्त करुन घेता येत नाही, असे का बरे? कोणता पक्ष घेवुन आपण बोललात ते सांगावे, तर शास्त्राप्रमाणे कर्मे करण्यास योग्य असे स्थळ मिळत नाही, ती कर्मे करण्यास तेवढे आयुष्य मिळत नाही तसेच शास्त्राचा अभ्यास शिकवणारे गुरुदेखील लांब असल्यामुळे त्यांच्याकडे जाणे होत नाही, आणि अभ्यासाला सहाय्य करणाऱ्या सामुग्री ज्या वेळी जवळ नाहीत पुर्व कर्म अनुकूल नाही, बुध्दीला शास्त्राचा अभ्यास पेलवत नाही, अशा कारणाने ज्यांना शास्त्राचा अभ्यास करुन ज्ञान संपादन करणे अशक्य झाले आहे, शास्त्रातील प्रमुख सुत्रांची एकवाक्यता होत नाही म्हणून ज्यांनी वादविवाद करण्याचे सोडुन दिले आहे, परंतु शास्त्राचां अभ्यास करुन त्यात सांगितल्याप्रमाणे विधियुक्त अनुष्ठान करुन परलोकी जे आनंदाने नांदतात. (ओवी ३१ ते ४० )
त्यांच्याप्रमाणे आपण व्हावे, अशी मनामध्ये इच्छा करुन त्या मार्गाचे जे आचरण करतात, हे श्रीकृष्णा दातारा! ज्याप्रमाणे वर काढलेल्या धडयाच्या अक्षराप्रमाणे लहान मुल खाली अक्षरे काढते ज्याप्रमाणे डोळस माणुस पुढे करुन आंधळा मनुष्य वाटचाल करतो, त्याप्रमाणे जे सर्व शास्त्रांमध्ये पारंगत आहेत त्यांचे आचरण प्रमाण मानुन त्याच्यावर जे परम श्रध्दा ठेवतात, मग शिव आणि विष्णू आदी देवतांची पुजा आणि भुमी , वस्त्र , धन यांची महादाने, अग्नीहोत्र, चार्तुमास आदी यज्ञ जे लोक परमश्रध्देने करतात, त्यांना सात्विक, राजस, तामस यापैकी कोणती गती प्राप्त होते? हे पुरुषोत्तमा! ते आपण आम्हांला सांगावे? तेव्हा जो वैकुंठस्थानाचे आराध्य दैवत, जो वेदरुपी कमळातील पराग आहे, व ज्याच्या आश्रित मायेने हे जग जगत असते. जो स्वभावताच सर्व नियामक असलेला काळ आहे, लोकोत्तर उत्कर्ष आहे, ज्याचे अद्वितीय रहस्य कोणालाही कळत नाही अशा स्वरुपाचे गूढ आहे आणि जो सर्व काळ आनंदघन आहे हे सर्व गुण ज्या शक्तीच्या आधाराने वर्णनीय होतात, ती शक्ती ज्याच्या अंगी आहे, तो भगवान श्रीकृष्ण स्वमुखाने बोलत आहे. भगवान म्हणाले, अर्जुना, शास्त्रांच्या अभ्यासाची अडचण आहे असा तुझ्या मनाचा कल आहे हेहीआम्ही जाणतो. तु फक्त श्रध्देने मोक्षप्राप्ती करुन घेवु इच्छीतोस पण हे चतुर अर्जुना! तु समजतोस तेवढे हे सोपे काम नाही. (ओवी ४१ ते ५० )
अर्जुना! केवळ श्रध्देने कार्यभाग होईल असा विश्वास धरु नये, श्रध्दाही रजोगुण व तमोगुणाच्या संसर्गाने वाईट देखील असते, अंत्यजांच्या संसर्गाने ब्राम्हणही अंत्यंज होत नाही काय? गंगेचे पाणी मुळामध्ये पवित्र असले तरीपण जर ते मद्याच्या भांडयात ठेवले तर ते घेता येईल काय? याचा तु विचार कर. चंदन हे शीतल असते त्या चंदनाचा ज्यावेळी अग्नीशी संबंध येतो त्या वेळी ते हातात धरले असता भाजु शकत नाही काय? अथवा अर्जुना, हिणकस सोने आटवीत असता त्यात उत्तम सोने पडले आणि मग ते उत्तम सोन्याच्या भावाने विकत घेतले तर त्यामुळे आपली फसवणुक होणार नाही काय? त्याप्रमाणे श्रध्देने स्वरुप स्वभावता खरोखर शुध्द असते परंतु ज्यावेळी ती प्राण्यांच्या वाटणीला येते तेव्हा त्यात भाग पडतात सर्व प्राणी तर स्वभावता अनादी असलेल्या मायेच्या शक्तीने तीन गुणांचे बनलेले आहेत. या तीन गुणांपैकी कोणतेही दोन गूण जेव्हा क्षीण होतात , तेव्हा एका गुणाचा उत्कर्ष होतो आणि त्या गुणाप्रमाणे जीवाच्या वृत्ती होतात, वृत्तीच्यां अनुरोधाने ते मन इच्छा धारण करते, मनाच्या इच्छेप्रमाणे जीव शुभ-अशुभ क्रिया करतात आणि मृत्यूनंतर कर्माप्रमाणे देह धारण करतात, बीज नाहीसे होते आणि झाड वाढते झाड नाहीसे होते आणि बीजात समाविष्ठ होते, हा क्रम कोटयावधी कल्पे चालला, तरीदेखील झाडाची जात नष्ट होत नाही, त्याप्रमाणे जीवांच्ह अनेक जन्मातंरे झाली तरी हे तीन गुण त्यांना सोडुन जात नाहीत.(ओवी ५१ ते ६० )
म्हणुन प्राण्याच्या वाटयाला आलेली जी श्रध्दा या तीन गुणांसारखीच होते ह सुक्ष्म दृष्टीने जाणुन घे. ज्यावेळी सत्वगुंण वाढीस लागतो तेव्हा तो ब्रम्हज्ञानाला हाक मारतो, परंतु राजस, तामस हे दोन गुण त्याच्या विरुध्द आहेत. सत्वगुणाच्या संगतीने ती श्रध्दा मोक्षरुप फळापर्यत पोचते,त्यावेळी रजोगुण आणि तमोगुण सत्वगुणाला विरोध केल्याशिवाय कसे बरे राहतील? सत्वगुणाचे बल नष्ट करुन रजोगुण जेव्हा आकाशापर्यत वाढत जातो तेव्हा ती राजस श्रध्दा जीवाला राजस कर्म करण्यास लावते. तमोगुणांची आग ज्यावेळेला भडकते तेव्हा ती तामस श्रध्दा जीवाला निषिध्द भोग भोगण्यास उद्युक्त करते. हे उत्तम कर्म करणाऱ्या अर्जुना! या जीवसमुदायामध्ये सत्व, रज, तम या तीन गुणांना सोडुन वेगळी श्रध्दा नाही म्हणुन सात्विक, राजस,तामस हया तीन गुणांच्या भेदाने श्रध्दा देखील स्वभावताच त्रिगुणात्मक आहे. ज्याप्रमाणे जल हे स्वभावताच जगविणारे आहे पण विषामध्ये मिसळले तर ते मारक होते अथवा मिऱ्यामध्ये मिसळले असता तिखट होते. अथवा ऊसामध्ये प्रविष्ठ झाले असता गोड होते. जो भरपुर वाढलेल्या तमोगुणात जन्मतो आणि मृत्यू पावतो त्या प्राण्यातील श्रध्दा तामस होवुन त्याच्याअंतकरणात ती तामस कर्मानी आणि तामस परिणामाला प्राप्त होते. काजळ आणि काळी शाई याच्या रंगामध्ये जसा भेद दिसत नाही. त्याप्रमाणे तामसी श्रध्दा तमोगुणांहुन भिन्न नसते. (ओवी ६१ ते ७० )
त्याचप्रमाणे श्रध्दा ही रजोगुणी अंतकरणात रजोगुंणाच्या रुपाने असते आणि सत्वगुणयुक्त अंतकरणामध्ये ती सत्वाचीच असते, याप्रमाणे जगातील सर्व जीवांचा आकार केवळ श्रध्देनेच भरलेला आहे. हे सर्व जग तीन गुणांच्या अधीन असल्यामुळे त्यांच्या ठिकाणी असलेल्या श्रध्देमध्ये तीन प्रकारचे चिन्ह उत्पन्न झाले आहे. हे तु ओळखुन ठेव, झाड जसे फुलावरुन ओळखता येते, अथवा मनाचा स्वभाव बोलण्यावरुन समजतो, अथवा या जन्मातील सुखदुखाच्या भोगावरुन जसे मागील जन्मात केलेले कर्म ओळखता येते. त्याप्रमाणे जगामध्ये ज्या ज्या लक्षणांनी आणि तीन प्रकारच्या श्रध्देच्या रुपांनी जे लोक दिसतात त्यांचे प्रकार तुला सांगतो, तरी ते आता श्रवण कर, सात्विक श्रध्देने ज्यांचा पिडं बनलेला आहे, त्यांची बुध्दी बहुदा स्वर्गप्राप्तीविषयीचीच असते. सात्विक लोक वेद विद्येचे अध्ययन करता, यज्ञक्रिया निवडतात, आणि ते स्वर्गलोकांत जातात. हे वीरश्रेष्ठ अर्जुना, राजस श्रध्देने ज्याचा पिडं झाला आहे. ते राक्षसांची आणि आकाशात फिरणाऱ्या यक्षांची उपासना करतात. जे लोक तामसी श्रध्देने निर्माण झाले आहेत त्यांचे लक्षण तुला आता सांगतो, ते केवळ पापांची राशी असुन अतिनिदर्य व निष्ठुर असतात, ते जीवांच्या वधाने बळी देण्याचे कार्य करतातआणि स्मशानामध्ये संध्याकाळी भुत-प्रेतादीची पुजा करतात. (ओवी ७१ ते ८० )