एरवी आपले रुप आपल्याला पाहता येत नाही पण आरशामुळे ते पाहता येते, त्याप्रमाणे जी ब्रम्ह वस्तु आहे ती संवादाच्या निमित्ताने व्यवहार्य होते आणि त्यामुळे ब्रम्हवस्तुचा आनंद अनुभवता येतो. मग संवाद बंद पडला तर ब्रम्हप्राप्तीचा आनंद बंद होईल म्हणुन ब्रम्हानंदाचा अनुभव घेण्यास लालचावलेल्या अर्जुनाला सुखसंवाद बंद पडणे कसे बरे सहन होईल? याकरता त्याग व संन्यास विचारण्याचे निमित्ताने गीतारुपी दिव्यवस्त्रांची घडी अर्जुनाने पुन्हा उलगडण्यास लावली. हा अठरावा अध्याय नव्हेच तर ही एक अध्यायाची थोडक्यात गीताच आहे जेव्हा वासरु गायीला पान्हा आणते तेव्हा दुध सोडण्यास तिला किती वेळ लागणार? त्याप्रमाणे गीता संपण्याच्या वेळी अर्जुनाने देवाकडुन पुन्हा गीतेचा आरंभ करविला देव आणि परम भक्ताचे प्रेम कोणताही संवाद घडवुन आणु शकते. परंतु ही गोष्ट राहु द्या.या अध्यायात अर्जुनाने प्रश्न विचारला आहे तो म्हणाला, देवा आता माझ्या विनंतीकडे लक्ष द्यावे. अहो महाराज संन्यास व त्याग या दोन शब्दांचा एकाच अर्थाशी संबंध असल्याचे दिसुन येते, जसा संघात आणि संघ या दोन शब्दांनी समुदायाचे जरी सारखेच ज्ञान प्राप्त होते त्याप्रमाणे त्याग आणि संन्यास या दोंन शब्दांनी त्याग हा एकच अर्थ सांगितला आहे अशी आमची मनाची निश्चीत समजुत झाली आहे. पण त्याग व संन्यास या दोन शब्दांच्या अर्थात काही भेद असेल तर तो देवांनी स्पष्ट करुन सांगावा त्या वेळी देव म्हणाले या दोन शब्दांचे अर्थ वेगवेगळे आहेत. एऱ्हवी अर्जुना, तुझ्या मनाला त्याग व संन्यास हे दोन शब्द एकाच अर्थचे आहेत असे वाटते आणि मीही तेच खरे मानतो. (ओवी ८१ ते ९०)
या दोन शब्दांनी सामान्यपणे ‘त्याग’ हाच अर्थ सांगितला आहे, हे त्रैकालिक सत्य आहे. परंतु या दोन शब्दांच्या अर्थामध्ये भेद असण्याचे कारण एवढेच आहे की, मुळात कर्मच करावयाचे नाही, याला ‘संन्यास’ असे म्हणतात आणि कर्म करून कर्तृत्व-अहंकार व फलाशा टाकणे, याला ‘त्याग’ असे म्हणतात. तरी कोणते टाकावे आणि कोणत्या कर्माचे केवळ फळ टाकावे, याचे विवरण करून सांगतो, तरी चित्ताची एकाग्रता करून श्रवण कर. रानावनात व डोंगरात अनेक प्रकारची निरूपयोगी झाडे उगवत असतात; परंतु धान्य व फुलांच्या बागा आपोआप उगवत नाहीत. ज्याप्रमाणे बीची पेरणी न करताच पुष्कळ गवत उगवत असते; परंतु साळीच्या पिकास पेरणी व राब केल्याशिवाय ती उगवत नाही. शरीराचे अवयव आपोआप वाढत असतात; परंतु अंगावर घालावयाचे दागिने प्रयत्नाने करावे लागतात. नदी आपोआप तयार होते; पण विहिरी खणून तयार कराव्या लागतात.त्याप्रमाणे नित्य-नैमित्तिक कर्मे स्वभावत:च होत असतात; परंतु जे काम्य कर्म आहे, ते फलाची इच्छा न करता होत नाही. काम्य कर्मांची उभारणी होण्याकरता फळांच्या इच्छाचा समुदाय कारण असतो. आणि ज्या काम्य कर्मांमध्ये अश्वमेधादिक यज्ञभाग समाविष्ट आहेत, परोपकारासाठी विहीर खणणे, विविध प्रकारचे बगीचे निर्माण करणे, वेदशास्त्राच्या अभ्यासासाठी सत्पात्री गाव इनाम देणे, महानगरे निर्माण करणे, आणखी अनेक प्रकारची व्रते आहेत. असे जे इष्टापूर्त कर्म, ज्याला कामना मूळ कारण आहे आणि ज्याचे आचरण केले असता ते कर्म करणाऱ्यास बध्द करून जबरदस्तीने त्याचे फळ भोगावयास लावते. (ओवी ९१ ते १००)
अर्जुना! देह धारण केल्यानंतर जन्म-मृत्यूच्या सोहळयांना ‘नाही’ म्हणता येत नाही. ते भोगावेच लागतात; किंवा विधात्याने जे कपाळावर लिहलेले असते, ते काही केले तरी पुसता योत नाही. तसेच, देहाचे काळेपण अथवा गोरेपण कितीही धुतले, तरी ते नाहीसे होत नाही. ज्याप्रमाणे कर्ज फेडल्याशिवाय कर्जदाराची त्यापासून फळाच्या इच्छेने केलेले कर्म फल भोगण्याकरिता जीवापुढे धरणे देऊन बसत असते. ज्याप्रमाणे युध्दभूमीवर गेलेल्या माणसाच्या अंगाला युध्द न करताही दुसऱ्याचे बाण कारण नसताना लागतात, त्याप्रमाणे अर्जुना! फळाची इच्छा नसताही इष्टापूर्त कर्म अचानक घडले, तरीपण भोग प्राप्त होतात. न समजून गुळ तोंडात टाकला, तरीसुध्दा तो आपली गोडी जिभेला देतच असतो. राखुंडी समजून अग्नीवर पाय दिला, तरीपण तो पाय पोळूनच निघत असतो. जाणतेपणी अथवा अजाणतेपणी केलेल्या कर्माचे फळ निश्चीतपणे भोगावयास लागते. हे काम्य कर्मामध्ये सामर्थ्य आहे म्हणुन मुमुक्षू लोकांत या काम्य कर्माविषयी कौतुकाने देखील आवड नसावी. अर्जुना ! फार काय वर्णन करावे? असे हे काम्य कर्म आहे , विष पोटात गेले म्हणजे ते जसे ओकुन टाकतात, त्याप्रमाणे जे काम्यकर्म आहे त्याचा त्याग करावा. मग त्या काम्यकर्माच्या त्यागालाच “संन्यास” असे म्हणतात. असे सर्वाच्या अंर्तयामी असणारे भगवान श्रीकृष्ण बोलले. धनाचा त्याग केला की चोराचे भय नाहीसे होते त्याप्रमाणे काम्य कर्माचा त्याग केला म्हणजे संपुर्ण इच्छा नाहीशा होतात. अथवा सुर्य-चंद्र ग्रहणे आल्यानंतर त्या पर्व काळामध्ये पार्वण श्राध्द केलें जाते. (ओवी १०१ ते ११०)
अथवा आई-वडिलांच्या मृत्यूचे ठरलेले श्राध्दाचे दिवस अथवा अतिथी घरी आला असता भोजनांची व्यवस्था करणे अशा निमित्ताने जे जे कर्म करावे लागते. ते नैमित्तीक कर्म होय. वर्षाकालामध्ये आकाश भरुन येवुन मेघाची गर्जना होते किवां वसंत ऋतुचे आगमन झाले असता वने प्रफुल्लित होतात. किवां तारुण्यावस्था जशी शरीराला सुशोभित करते सोमकांत मणी हा चंद्राच्या किेरणांनी द्रवतो किवां सुर्याच्या किरणांमुळे सुर्यविकासी कमळे विकसीत होतात. या ठिकाणी जे मुळचे असते तेच विस्तार पावते वेगळे काही उत्पन्न होत नाही. त्याप्रमाणे जे नित्य कर्म असते त्यालाच काही कारणाने नियम प्राप्त होतात व त्या योगाने त्याला नैमित्तीक कर्मे असे नाव प्राप्त होते. जे कर्म प्रत्येक दिवशी सकाळी, दुपारी अथवा सांयकाळी करावे लागते परंतु डोळयांतील दृष्टी जशी डोळयांना केव्हाही कमी-अधिक होत नाही. अथवा गतीचा स्विकार न करता ती जशी पायामध्ये आपोआप असतेच किवां दिव्याच्या ठिकाणी त्याचे तेज सहजपणे असते. चंदनाला वरुन वास लावल्याशिवाय जसा त्याच्या अंगचाच सुगंध असतो, तसे नित्य कर्माच्या अधिकाराचे स्वरुप आहेत त्या कर्माला अर्जुना, जगामध्ये नित्यकर्म म्हणतात, हे तू समजुन घे. याप्रमाणे नित्य आणि नैमित्तीक दोन्ही प्रकारच्या कर्माचे स्वरुप दाखवलेले आहे. हीच नित्य-नैमित्तिक कर्म करणे प्रत्येकाला आवश्यक आहेत ही नित्य-नैमित्तिक कर्मे केल्यामुळे कोणतेही फळ प्राप्त होत नाही. म्हणुन या कर्मास निष्फळ कर्मे असे म्हणतात. भोजनापासुन जशी तृप्ती होवुन भुक जाते त्याप्रमाणे नित्य-नैमित्तिक कर्माच्या सर्वागांमध्ये फल आहे. (ओवी १११ ते १२०)
ज्याप्रमाणे हिणकस सोने अग्नीमध्ये घातल्यावर त्याचा हिणकसपणा जावुन त्याचा कस लागतो. त्याप्रमाणे नित्य-नैमित्तिक कर्मापासुन फळाची प्राप्ती होते, अंतकरण शुध्द होते कारण या कर्माच्या आचरणाने दोष गळुन पडतात आणि स्वताचा अधिकार वाढत जातो. असे झाल्यावर हातोहात सदगती प्राप्त होते नित्य-नैमित्तिक कर्माच्या अंगी एवढे मोठे फळ आहे, परंतु मुळ नक्षत्रावर जन्माला आलेले मुलाचा त्याग करायचा असतो, त्याप्रमाणे त्या फळाचा त्याग करावा. वसंत ऋतु आला की , वेली सर्वागांनी फल-फुलांनी भरुन जातात. आम्रवृक्षाला पालवी फुटते परंतु वसंत ऋतु यापैकी कशालाही हात न लावता सर्वाना सोडुन पुढे निघुन जातो. त्याप्रमाणे कर्माची मर्यादा न सोडता नित्य-नैमित्तिक कर्माकडे लक्ष द्यावे. परंतु त्यापासुन उत्पन्न होणाऱ्या सर्व फलाचां वांतीप्रमाणे त्याग करावा. अशा प्रकारे नित्य-नैमित्तिक कर्माच्या फलांचा त्याग करणे यालाच जाणते पुरुष त्याग असे म्हणतात. याप्रमाणे तुला संन्यास आणि त्याग स्पष्ट करुन सांगितले, याप्रमाणे संन्यास जेव्हा घडतो तेव्हा काम्य कर्मापासुन बाधा होवु शकत नाही, निषिध्द कर्मे तर शास्त्रांच्या निषेधामुळे साधकापासुन अगोदरच आपोआप दुर गेलेली असतात, ज्याप्रमाणे शीर कापल्यानंतर धड आपोआप निर्जीव होवुन खाली पडेल त्याप्रमाणे नित्य-नैमित्तिक कर्माच्या फळाचा त्याग केल्याने बाधा होवु शकत नाही, धान्य पिकल्यानंतर जशी पिकाची वाढ थांबली जाते, त्याप्रमाणे संन्याशाने काम्यकर्मे, शास्त्रे, निषिध्द कर्मे, आणि कर्मफलाच्या त्यागाने नित्य-नैमित्तिक कर्मे नाहीशी झाल्यावर आत्मज्ञान हे मुमुक्षूला आपोआप शोधीत येत असते. अशा प्रकारे दोन्ही त्याग व संन्यास हे आचरणात आणले असता त्या आत्मज्ञानाच्या प्राप्तीला योग्य होतात. (ओवी १२१ ते १३०)
ही युक्ती चुकुन जर कोणी अनुमानाने त्याग केला, तर कर्माचा त्याग न होता त्यात अधिकच गुंतुन पडतात. रोगाची चिकित्सा न करता औषध घेतले तर ते विषतुल्य होते, रोग्याला मारक ठरते. अथवा सेवन केले नाही तर भुकेने मनुष्य मृत्यू पावणार नाही का? म्हणुन ज्या गोष्टीचा त्याग करु नये, असे सांगितलेले आहे त्यांचा त्याग करु नये आणि ज्या गोष्टीचा त्याग करावा असे सांगितलेले आहे त्याचे आचरण करण्याचा लोभ धरु नये त्याग करण्याचे वर्म चुकले असता सर्व कर्माचा त्याग केला तरीही त्यांचे ओझे असतेच आणि मनुष्य कर्मबंधामध्ये सापडतो म्हणुन विरक्त पुरुष आहेत, ते फलत्यागावाचुन वेगळे दुसरे कोणतेही त्यागाचे वर्म पाहत नाहीत. कित्येकांना फलाची इच्छा नाहीशी करता येत नाही म्हणुन ते कर्म हे बंधन कारक आहे असे म्हणतात. आपण कपडे न घालता राहायचे आणि जग हसले किवां काही म्हटले तर जगाला भांडखोर म्हणायचे किवां जिभेच्या अधीन झालेला रोगी पाहीजे ते खातो आणि ते अन्न पचले नाही तर खाल्लेल्या अन्नाला दोष देतो. अथवा कुष्ठरोगी आपल्यावर न रागावता अंगावर बसणाऱ्या माशींना रागावतो, त्याप्रमाणे जे फळाची इच्छा आवरण्याविषयी असमर्थ असतात ते कर्मच दोषयुक्त आहे असे म्हणतात, आणि सर्व कर्माचा केवळ त्यागच मरावा असा स्वताच्या बुध्दीने निर्णय देतात. कोणी म्हणतात की यज्ञ, दान व तपे ही कर्मे अवश्य करावीत कारण त्यावाचुन चित्तशुध्दी होण्यास दुसरे कोणतेही साधन नाही जर चित्त-शुध्दीच्या मार्गामध्ये लवकर विजयी व्हावे असे वाटत असेल तर चित्तशुध्दी करण्यासाठी कर्म करण्याविषयी आळस करु नये. सोने जर शुध्द करायचे असेल तर ते अग्नीत तापविण्याविषयी कंटाळा करु नये. अथवा आरशाला स्वच्छ करायचे असेल तर त्यावरील डाग काढण्याकरता चुना लावुन तो साफ करावा लागतो. (ओवी १३१ ते १४०)
विविध प्रकारचे कपडे स्वच्छ करावेत असे मनात वाटत असेल तर धोब्याच्या घरचे कुंड अस्वच्छ आहे असे मानु नये. त्याप्रमाणे कर्म ही त्रास देणारी आहेत म्हणुन त्यांचा त्याग करु नये स्वयंपाक करण्याचा त्रास घेतल्याशिवाय उत्तम प्रकारच्या अन्नाचा लाभ होईल काय? या प्रकारचे सिध्दात निश्चित करुन कोणी कर्म करण्यास तयार होतात तर कोणी कर्माचा त्याग करतात. अशा रीतीने त्यागाविषयी एक असा निश्चय काहीच होत नाही. परंतु आता परस्परविरुध्द मतभेदांचे निरसन होईल आणि त्यागाचा स्पष्टपणे निर्णय होईल हे तुला उत्तम रितीने सांगतो तरी एकाग्रतुने श्रवण कर. अर्जुना! कर्मत्यागाच्या बाबतीत त्याग तीन प्रकारचा आहे असे जाणावे हया तीनही प्रकारच्या त्यागांचे भेद मी तुला उत्तम रितीने सांगतो. त्यागाचे तीन प्रकार पुढे स्पष्ट सांगावयाचे आहेत तरीपण तु माझ्या बोलण्यातील तात्पर्याचे सार जेवढे आहे तेवढेच जाणुन घे. माझ्या सर्वज्ञाच्या बुध्दीला जे खरोखरच अतिशय पटते ते त्यागाच्या निश्चयाचे तत्व प्रांरभी एकाग्रतेने श्रवण कर. संसारापासुन आपण मुक्त व्हावे म्हणुन जो मुमूक्षू दक्ष असतो, त्याने त्यागाचे स्वरुप जाणुन काया-वाचा-मनाने ते करावे. जो यज्ञ, दान व तप ही कर्मे आहेत ती अवश्य केली पाहिजेत ज्याप्रमाणे प्रवासी माणसाने पायाने चालणे जसे सोडु नये . हरवलेली वस्तु जोपर्यत सापडत नाही तोपर्यत शोधाचे साधन बंद करु नये अथवा भोजन करुन तृप्त न होताच वाढलेले पान जसे दुर लोटू नये. (ओवी १४१ ते १५०)
किवां नाव नदीच्या किनारी पोचल्याखेरीज मध्येच सोडता येत नाही. अथवा केळी आल्याशिवाय केळीचे झाड कापता येत नाहीत, किवां अंधारात ठेवलेली वस्तु सापडल्या शिवाय हातातील दिवा ठेवु नये. त्याप्रमाणे आत्मज्ञानाविषयी दृढनिश्चय झाला नाही. तोपर्यत यज्ञ, दान व तप याविषयी उदासीन होवु नये. आपल्या अधिकाराप्रमाणे यज्ञ, दान व तप यथाविधि वरचेवर करावीत. चालण्याची गती वाढली म्हणजे पुढे तीच गती विसावा घेण्यास उपयोगी पडते. त्याप्रमाणे कर्माचे अधिक आचरण करणे हे कर्मत्यागास उपयोगी पडते. एखादा रोगी औषध घेण्याचा जसजसा अधिक नियम करील तसतसा औषधाच्या सेवनाने तो रोगमुक्त होईल. त्याप्रमाणे कर्मे शास्त्रशुध्द पध्दतीने वारंवार केली जातात, तेव्हा रजोगुण व तमोगुण समुळ नाहीसे होतात. हिणकस सोन्याला क्षारांची पुटे देणे जेव्हा घडते तेव्हा त्यातील किडाळ लवकर नाहीसे होते आणि शुध्द सोने बनते. त्याप्रमाणे निष्ठेने कर्माचे आचरण केले असता ते रजोगुण व तमोगुण नाहीसे करुन सत्वशुध्दीचे साक्षात दर्शन करवुन देते. म्हणुन अर्जुना, चित्तशुध्दीची इच्छा करणाऱ्याला कर्मे ही तीर्थाप्रमाणे पावन करणारी आहेत असे जाणावे. तीर्थक्षेत्रात स्नानाने देहावरचा बाहेरचा मळ धुतला जातो. परंतु सत्कर्माने चित्तशुध्दी होते, याप्रमाणे सत्कर्मे हीच पवित्र तीर्थे आहेत असे जाण. (ओवी १५१ ते १६०)
मारवाड प्रांतातील तहानेने व्याकुळ झालेल्या माणसास जसा एखादा अमृताचा झरा सापडावा, किंवा आंधळया माणसाच्या डोळयांत सुयर्सचे तेंज यावे, बुडणाऱ्या माणसास वाचविण्यासाठी नदीच जशी धावुन यावी, अथवा पडणाऱ्यास जसे पृथ्वीनेच झेलावे किवां मरणाऱ्यास मृत्युनेच आयुष्य वाढवुन दयावे, हे अर्जुना! त्याप्रमाणे मुमुक्षूला कर्मानेच कर्मबंधापासुन सोडविले आहे. ज्याप्रमाणे मनुष्य मृत्यू होत असता रसायनाच्या पध्दतीने विष शुध्द करुन दिल्यास त्या विषानेच जसा माणुस जगविला जातो, त्याप्रमाणे कर्म ही बंध निर्माण करणारी असली तरीसुध्दा विशेष प्रकारच्या हातवटीने केली असता ती जीवाला मुक्त करण्यासाठी कारणीभुत होतात. आता तीच हातवटी मी तुला सांगतो, की ज्या हातवटीने कर्म केले असता कर्मच कर्माला नाहीसे करते. तर मंचमहायज्ञादी प्रमुख कर्मे यथविधी पार पडत असता जो कर्तृत्वाचा अभिमान थोडाही बाळगत नाही, जो दुसऱ्याकडुन पैसे घेवुन तीर्थयात्रा करतो त्याला मी तीर्थयात्रा करत आहे असा आत्मप्रशंसेचा संतोष नसतो. जो सैनिक शक्तीमान राजाच्या सत्तेच्या बळाने शक्ती एकवटुन शत्रुशी युध्द करतो आणि जय मिळवतो तो मी जिंकलो आहे अशा गर्वाला प्राप्त होत नाही जो दुसऱ्याची कास धरुन तरतो, त्याला पोहण्याचा अभिमान असत नाही. अथवा ज्याप्रमाणे राजाचे कोशाध्यक्षाने दुसऱ्यास आपल्या हाताने दिेलेल्या दानाबद्दल अभिमान वाटत नाही, त्याप्रमाणे कर्तृत्वाचा अभिमान न बाळगता ज्या ज्या वेळेस जी जी कर्मे करायची ती यथाविधि तो करत असतो. (ओवी १६१ ते १७०)