श्री ज्ञानदेवांची ज्ञानेश्वरी
भगवदगीता अध्याय – ४
ज्ञानकर्मसंन्यास योग
श्री ज्ञानदेवांनी भगवदगीतेतील अध्याय – ४ मधील “ज्ञानकर्मसंन्यास” योग या अध्यायातील १ ते ४२ संस्कृत श्लोकाचे इसवी सन १३ व्या शतकात तत्कालीन मराठीतुन २२५ ओव्यामधुन सखोल निरूपण केले आहे खरतर हा मराठी भाषेचा अतिव गौरव आहे. परंतु कालपरान्वये बोली आणि लिखीत मराठी भाषेमध्ये फरक पडल्यामुळे ती मराठी भाषाही अवघड वाटू लागली. श्री ज्ञानदेवांच्या कृपार्शिवादाने तेच सखोल निरूपण मराठी वाचंकासाठी सोप्या मराठी भाषेत (२१व्या शतकातील प्रचलित मराठी भाषा) जसे आहे तसे देत आहे. हा श्री ज्ञानदेवांचा अमुल्य कृपा-प्रसाद आहे, आपणही याचा अवश्य लाभ घेवून जीवनाचे कोटकल्याण साधावे.
आज श्रवणेंद्रियांसाठी भाग्याचा दिवस उजाडला, कारण या श्रवणंद्रियांनी गीतारुपी अनमोल धनाचा ठेवा पाहिला. जणू काही स्वप्नच खरे व्हावे, त्याप्रमाणे आता झाले आहे.आधीच ही विवेकाची कथा. त्यामध्ये जगजेठी श्रीकृष्ण प्रतिपादन करणारे आणि भक्तराज अर्जुन ऐकणारा आहे. जसा पंचम स्वर, सुगंध, घमघमाट सुटलेले रुचकर मिष्टान्न हे सर्व एकत्र आल्यावर त्यापासुन आनंद प्राप्त होतो, त्याप्रमाणे या कथेतुन अलौकिक आनंद प्राप्त होत आहे. या भाग्याचे श्रेष्ठत्व काय वर्णन करावे की,ज्यामुळे जणू काही अमृताची गंगाच श्रोत्यांच्याकडे वळली आहे किवां श्रोत्यांनी अनेक जन्मात केलेली जप-तपे-अनुष्ठाने फळाला आली आहेत. आता सर्व इंद्रिय-समुदायांनी आपआपले विषय सोडावेत आणि एका श्रवणेद्रियाच्या घरी यावे आणि कृष्ण-अर्जुन संवादरुपी गीतेचे सुख भोगावे. श्रोते म्हणाले, ज्ञानेश्वरा, हे तुमचे बोलणे पुरे करा आणि कृष्ण-अर्जुन या दोघांमध्ये जो सुखसंवाद झाला तो आम्हाला सांगा. ज्ञानेश्वर श्रोत्यांना सांगतात, त्या वेळी संजय धृतराष्ट्रास म्हणाला, खरोखर भाग्याने अर्जुनाचा आश्रय केला आहे कारण अतिप्रेमाने नारायण श्रीकृष्ण अर्जुनाशी बोलत आहेत, जे गुहय पिताश्री वसुदेवांना सांगितले नाही, माताश्री देवकीला सांगितले नाही, बंधुराज बलरामाला सांगितले नाही, ते रहस्य श्रीकृष्ण अर्जुनाला सांगत आहे. सदैव जवळ राहणारी लक्ष्मीदेवी तिलाही ज्या प्रेमसुखाचा लाभ झाला नाही त्या श्रीकृष्ण प्रेमाचा सुकाळ या अर्जुनाकरिता आहे. आपण श्रीकृष्णाशी सुखसंवाद करावा अशी सनकादिकांची इच्छा खूप दिवसांपासुन होती, पण त्या इतक्या प्रमाणात ते यशाला प्राप्त झाले नाहीत. ( ओवी १ते १०)
या जगदीश्वराचे प्रेम अर्जुनाचे ठिकाणी निरुपम दिसत आहे. अर्जुनाने हे सर्वोत्तम पुण्य कसे प्राप्त केले बरे ? अर्जुनाच्या प्रेमामुळे श्रीकृष्ण हा निराकार असूनही साकार झाला आहे.अर्जुनाची त्या देवांशी झालेला एकरुपता मला आवडली आहे. येऱ्हवी हा श्रीकृष्ण परमात्मा योग्यांनाही जाणता येत नाही. वेदांना याचे वर्णन करता आले नाही. ध्यानानेही याला जाणता येत नाही तो ही आत्मस्वरुप, उत्पत्तिरहित, अचल असा आहे परंतु कोणत्या कारणाने अर्जुनावर कृपावंत झाला आहे हे समजत नाही. हा त्रैलाक्यरुपी वस्त्राची घडी आहे. हा सर्व प्रकारच्या आकाराच्या पलिकडचा आहे परंतु अर्जुनाच्या निस्वार्थ प्रेमाने या अनंताला आपल्या आटोक्यात आणले आहे. देव म्हणाले, अर्जुना! हाच योग आम्ही विवस्वानाला (सुर्याला) सांगितला, परंतु ही गोष्ट पुष्कळ दिवसांची आहे मग त्या विवस्वान सुर्याने या योगाची संपुर्ण स्थिती उत्तम प्रकारे मनुला सांगितली. मनूने स्वता त्या योगाचे आचरण केले आणि मग आपला पुत्र इक्ष्वाकू यास त्याचा उपदेश केला. अशी ही परंपरा मुळापासून चालत आली आहे इक्ष्वाकू नंतर आणखी काही राजर्षी या योगाला जाणणारे होउन गेले परंतु तेव्हा पासुन आज पर्यत या योगाला कोणी जाणत नाही,याचे कारण म्हणजे प्राणिमात्राचा भार “काम” या विषयावर होता आणि ते देहीलाच सत्य मानत होते व देहावरच प्रेम करत होते म्हणून त्यांना आत्मज्ञानाचे विस्मरण झाले.( ओवी ११ ते२०)
बुध्दी आडमार्गाकडे जाउ लागल्यामुळे लोकांना विषयांतच आत्यंतिक सुख वाटु लागले आणि देहाचेच विचार प्राणांप्रमाणे प्रिय झाले. ज्या गावात वस्त्रे घालीत नाहीत त्या गावात उंची वस्त्रांचा काय उपयोग ? किवां जन्मापासुन अंध असणाऱ्याला सुर्याचा काय उपयोग ? किवां बहिऱ्या माणसास संगीतसभेत गाण्याचा कोणी मान देईल काय ? किवां कोल्हयाला चांदण्याची आवड कधी निर्माण होईल काय ? चंद्राचा उदय होण्यापुर्वी ज्याचे डोळे मिटतात ते कावळे चंद्राला कसे बरे ओळखतील ? त्याप्रमाणे ज्यांनी वैराग्याची सीमा देखील पाहिली नाही सत्य व असत्य याची भाषा जे समजत नाहीत ते अज्ञानी मला ईश्वराला कसे बरे प्राप्त होतील ? असा हा अज्ञानाचा मोह कसा वाढला हे काही कळत नाही त्यामुळे बहुतेक काळ हा योग परंपरेपासून व्यर्थ गेला म्हणुन या लोकी हा योग लुप्त झाला. हे कुंतीसुता! तोच योग आम्ही तुला यथार्थ पणाने कथन केला आहे याविषयी मनात कोणत्याही प्रकारची भ्रांती बाळगु नकोस हा योग म्हणजे हदयातील विशेष गुहय आहे. परंतु हा योग तुझ्यापासुन गुप्त काय ठेवु शकेन? तु तर माझा आत्यांतिक आवडता आहेस म्हणुन मी तुला तो सांगितला आहे. हे अर्जुना! तु जणू काही प्रेमाचा पुतळा आहेस भक्तीचा जिव्हाळा आहेस जिवलग मित्रत्वरुपी चैतन्याचा अंश आहेस जरी आम्ही युध्दाला सज्ज झालो आहोत तरी हे अर्जुना! तुझा आणि माझा अगदी जवळचा संबंध आहे त्यामुळे तुझ्यापासुन काही लपवुन ठेवता येईल काय? (ओवी २१ ते ३०)
तरी काही काळ हा युध्दाचा प्रसंग बाजुला ठेव आमचे प्रथम कर्तव्य म्हणजे तुझे अज्ञान दुर केले पाहिजे. त्यावेळी अर्जुन म्हणाला हे कृपानिधे श्रीहरी! आई आपल्या मुलावर प्रेम करते यात आश्चर्य ते काय ? आणि तु तर संसारश्रमाने दमलेल्या जिवांची सावली आहेस . अनाथ जीवांची मातोश्री आहेस आणि खरोखर तुझ्या कृपेच्या वर्षावानेच आमचा जन्म झाला आहे हे देवा,आईच्या पोटी एखाद्या पांगळया मुलाचा जन्म झाला तर त्याच्या जन्मापासुन आईला त्रास सोसावा लागतो. हे सर्व तुम्ही जाणता तर मग हया सर्व गोष्टी तुझ्यासमोर बोलुन दाखवाव्यात काय ? हे देवा ! आता तुला मी जे विचारणार आहे, त्याच्याकडे उत्तम लक्ष दे माझ्या प्रश्नाचा राग मनामध्ये आणु नये, ही नम्र विनंती. हे अनंता ! तु पुर्वीचा इतिहास मला जो सांगितलास तो क्षणभर माझ्या मनाला पटत नाही, विवस्वान म्हणजे कोण याची आपल्या आई वडिलांना देखील कल्पना नाही तर मग तु त्यांना उपदेश केलास हे कसे बरे शक्य आहे ? तो सुर्य तर फार प्राचीन काळातला आहे असे आम्ही ऐकतो आणि हे कृष्णा ! आपण तर अगदी अलिकडच्या काळात जन्माला आला आहोत म्हणुन तुझ्या बोलण्यामध्ये विसंगती दिसत आहे हे देवा ! तुझे चरित्र आम्हास काही कळत नाही. तर मग आपण जे बोलता ते खोटे आहे असे एकदम कसे म्हणावे ? प्राचीन काळी सुर्याला तु जो उपदेश केलास ती गोष्ट मला उत्तम प्रकारे समजु शकेल अशा पध्दतीने सांगावी.( ओवी ३१ ते ४०)
त्या वेळी श्रीकृष्ण म्हणाले हे अर्जुना! ज्या काळी तो विवस्वान होता त्या काळी आम्ही नव्हतो अशी जर तुझ्या मनामध्ये भ्रांती निर्माण झाली असेल तर तुला हे माहीत नाही की माझे आणि तुझे आजपर्यत पुष्कळ जन्म झाले आहेत.परंतु तुला आपल्या गतजन्माचे स्मरण नाही. हे अर्जुना! मी ज्या वेळेस जे जे अवतार धारण केले त्या सर्व अवताराचे मला स्मरण आहे . मी सच्चिदानंद आहे म्हणुन मला मागील सर्व गोष्टीचे स्मरण होते मी जन्मरहीत आहे तरी पण मायेच्या योगाने मी अवतार धारण करत असतो. माझे आध्यात्मिक अविनाशत्व तर कधीही नाहीसे होत नाही, परंतु अवतार घेणे आणि तो संपवणे हा जो प्रकार दिसतो तो माझ्या शुध्द स्वरुपाच्या ठिकाणी मायेमुळे भासमान होतो माझे स्वातंत्र तर कधीही नष्ट होत नाही, मी कर्माच्या अधीन आहे असे जे दिसते ते भ्रांतीमुळे होय परंतु खरोखर तसे काही नाही एकच वस्तु आरशामुळे दोन ठिकाणी दिसु लागते एरवी वस्तुस्थितीचा सुक्ष्म विचार केला तर दुसरी वस्तु आहे काय ? त्याप्रमाणे हे अर्जुना! मी निराकारच आहे परंतू ज्या वेळी मी प्रकृतीचा आश्रय घेतो, त्या वेळी धर्मकार्यासाठी मी सगुण रुपाच्या वेषाने नटत असतो.धर्माच्या संपुर्ण स्वरुपाचे प्रत्येक युगात मी रक्षण करावे असा हा क्रम स्वभावत:च जगाच्या आरंभापासुन चालत आलेला आहे म्हणुन ज्या वेळी अधर्म हा धर्माचा शेवट करु लागतो त्या वेळी मी माझा जन्मरहित पणा बाजुला ठेवतो आणि माझ्या अव्यक्तपणाची आठवणही न ठेवता मी अवतार धारण करतो. ( ओवी ४१ ते ५०)
त्या वेळी माझ्या भक्तांच्या कैवारासाठी मी देह धारण करुन अवतरतो आणि अज्ञानरुपी अंधकार नाहीसा करतो. अधर्मांची मर्यादा तोडुन टाकतो, दोषाने लिहिलेले लिखाण फाडुन टाकतो आणि सज्जनांच्या कडुन सुखाची ध्वजा उभारवितो. दैत्यांच्या कुळाचा नाश करतो साधूंचा गेलेला मान पुन्हा मिळवुन देतो आणि धर्म व नीतीची सांगड घालतो. मी अविवेकाची काजळी नाहीशी करतो आणि विवेकदीप प्रज्वलित करतो त्या वेळी योगी लोकांना अखंड आनंदाच्या दिवाळीचा अनुभव येतो. मग आत्मसुखाने सर्व विश्व भरुन जाते फक्त धर्मच जगात नांदत असतो भक्तंच्या हदयात सात्विकतेचे भरते येते. हे अर्जुना! ज्या वेळी मी अवतार रुपाने प्रगट होतो, त्या वेळी पापांचा पर्वत नाहीसा होतो आणि पण्याची पहाट उदय पावू लागते अशा या कार्यासाठी मी युगायुगांचे ठायी अवतार धारण करत असतो माझे हे कार्य जो जाणतो तो या जगात खरा विवेकी होय.मी उत्पत्तिरहित असूनही माझे जन्म घेणे आणि निष्क्रिय असूनही कर्म करणे हे अविकारस्वरूप जो जाणतो तो परममुक्त आहे तो इंद्रियाने कर्म करीत असला तरी कोणत्याही प्रकारच्या आसक्तीने बांधला जात नाही. देहरूपाने असला तरी देहभावाने बध्द होत नाही. त्याचा देह ज्या वेळी पंचतत्वात विलान होतो त्या वेळी तो माझ्या स्वरूपी एकरूप होतो. एरव्ही जे आपल्याबद्दल किवां दुसऱ्या बद्दल शोक करत नाहीत ज्याचें मन वासनारहित झालेले असते जे कधीही क्रोधाच्या मार्गाने जात नाहीत. ( ओवी ५१ ते ६०)
जे माझ्या भावनेने सदैव संपन्न असतात माझ्या सेवेसाठी ज्यांचे जगणे असते आत्मज्ञानाने जे संतुष्ट असतात आणि ज्यांची विषय-आसक्ती नष्ट झालेली असते जे तपरूपी तेजाच्या राशी सहजच येउन मिळतात जे मीच होउन राहतात त्यांच्यात आणि माझ्यामध्ये कोणत्याही प्रकारचा भेदाचा पडदा राहत नाही. असे सांग ही हिणकस सोप्यामधील असलेला पितळेचा गंज आणि काळेपणा हे दोन दोष पूर्णपणे नाहीसे झाले तर शुध्द असे सोने काही वेगळे मिळवावे लागते काय ? त्याप्रमाणे जे यम-नियमांचे शास्त्रशुध्द पध्दतीने आचरण करतात जे तपाने आणि ज्ञानाने शुध्द झाले आहेत ते आणि मी एकरुप झालो आहोत यामध्ये संशय तो कसला ? येऱ्हवी असे पहा की जे लोक माझी अनन्य भवाने जशी भक्ती करतात त्याप्रमाणे मीही त्यांच्यावर प्रेम करतो.हे पाहा की, मनुष्यमात्रांची स्वभावत:च माझे भजन करण्याकडे वृत्ती आहे. परंतु ज्ञान नसल्यामुळे बुध्दीच्या ठिकाणी अनेक भेद निर्माण होतात. वास्तविक मी जो एक आहे, त्या माझ्या ठिकाणी ते अनेकत्वाची कल्पना करतात, अभेदाच्या ठिकाणी अनेक प्रकारचे भेद पाहतात. मी नामरहित असताना मला अनक प्रकारची नावे देतात मी चर्चेचा विषय नसताना मला देव -देवी म्हणतात. मी सर्वत्र सदैव सम प्रमाणात असताना भेदबुध्दीने संभ्रमित झालेले लोक हा उत्तम हा अधम असा भेदभाव पाहतात.(ओवी ६१ ते ७० )