जो यम, नियम, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान व समाधी या मार्गानी योगारुढ होतो तो निसशंय परिपुर्ण होतो त्या योगी पुरूषाची चिन्हे तुला निवडुन सांगतो ती श्रवण कर. तर ज्याच्या इंद्रियरुपी घरात विषयांचे येणे-जाणे होत नाही. आणि जो आत्मबोधाच्या घरात शांत पहुडलेला असतो ज्याच्या मनाला सुखदुखांनी कितीही धक्के दिले ते मन जागृत होत नाही विषय जवळ आले तरीदेखील हे काय आहे म्हणुन त्याच्या चित्तामध्ये विषयभोगांना प्रवेश मिळत नाही.
ज्याची इंद्रिये कर्म करत असली तरी ज्याच्या अंतकरणात फळांची इच्छादेखील निर्माण होत नाही. जो देहधारी असला तरी विदेही अवस्थेला पोहोचलेला असतो जो व्यवहाराने जागा असुनदेखील परमात्म्यामुळे वृतिशुन्य अवस्थेला पोहोचलेला असतो त्यामुळे तो निद्रिस्ता प्रमाणे क्रियाशुन्य दिसतो तोच श्रेष्ठ योगारुढ आहे. असे जाणावे. त्या वेळी अर्जुन म्हणाला हे अनंता, तुझे बोलणे ऐकुन मला अतिशय आश्चर्य वाटत आहे. एवढी महान योग्यता त्या योगारुढाला कोणी दिली, ते आपण मला सांगा. त्यावेळी श्रीकृष्ण हसुन म्हणाले, तुझे हे बोलणे आश्चर्यकारक नाही का? अरे या अद्वैत स्थितीमध्ये कोणाकडुन कोणाला काय देणे घडेल? अविवेकरुपी भ्रमाच्या शय्येवर प्रबळ अज्ञानाने जेव्हा मनुष्य निजतो.
त्या वेळी हे जन्ममरण रुपी दु:स्वप्न तो अनुभवत असतो ज्यावेळी स्वरुपा विषयी अकस्मात जागृती येते, तेव्हा ते पुर्वीचे सर्व स्वप्न मिथ्या आहे असे त्याला ज्ञान उत्पन्न होते ते ज्ञानदेखील आपल्याच ठिकाणी आपणास प्राप्त होते म्हणुन हे धंनजया! खोटया देहावर भरवसा ठेवला, म्हणजे आपणच आपला घात करत असतो. (ओवी ६१ ते ७०)
सुक्ष्म विचाराने देहावरील अहंकार त्यागावा त्यामुळे आपले मूळचे ब्रम्हस्वरूप प्रगट होते असे झाले म्हणजे आपले कल्याण आपणच केल्यासारखे होते. जो वरुन सुंदर दिसणाऱ्या शरीराला च आत्मा मानतो तो स्वताच्या अंगाभोवती स्वताला राहण्यास तयार केलेल्या कोशातील किडयाप्रमाणे आपणच आपला शत्रु होतो लाभाच्या वेळी दुदैवी माणसाला आधंळेपणाचे डोहाळे कसे प्राप्त होतात ते बघ तो आपले डोळे आपणच झाकुन घेतो किवां एखादा वेड लागलेला मनुष्य जो मी पूर्वीचा होतो तो आता नाही मी चोरला गेलो असे म्हणातो आणि अतंकरणात तोच खोटा भाव धरुन बसतो येऱ्हवी भ्रमाशिवाय पाहु गेलो तर तो स्वताच ब्रम्हरुप आहे परंतु काही केले तरी त्याच्या बुध्दीला तशी जाणीव होत नाही. असे पाहा कि स्वप्नातील हत्याराच्या वाराने कोणी खरोखर मृत्यू पावतो काय ? पारधी हा पोपटाला पकडण्यासाठी दोरीत नळी ओवुन झाडाला बांधतो. पोपट त्यावर बसतात नळी कोणत्या तरी एका बाजुला फिरते त्या वेळी वास्तविक पाहता पोपटाने उडुन जाणे आवश्यक आहे परंतु नळी सोडल्यास आपण पडुन मरुन जाउ अशी शंका आल्यामुळे तो नळी सोडत नाही. तो पोपट मानेला व्यर्थ पिळे देतो.
छातीने व चवडयाने ती नळी चोचीने आवळुन धरुन ओरडतो. मग तो मनात समजतो कि खरोखरच मी बांधला गेलो आहे. अशा भ्रामक कल्पनेच्या खोडयात तो सापडतो आणि मोकळया असलेल्या आपल्या पायाचा चवडा अधिकच गुंतवितो. असा तो कारणाशिवाय अडकुन राहतो. त्याला कोणी अर्धा तोडुन नेण्याचा प्रयत्न जरी केला तरी तो नळी सोडत नाही. आता तुच सांग कि,त्या पोपटाला दुसऱ्या कोणी बांधुन ठेवले आहे काय? म्हणुन ज्याने मी शरीर आहे, असा संकल्प वाढविलेला आहे तो आपणच आपला शत्रु होय. परंतु जो मिथ्या देहाचा अभिमान धरत नाही. तो स्वताच्या आत्मस्वरुपाचा विचार करणारा होय.(ओवी ७१ ते ८० )
ज्याने आपले मन जिंकलेले आहे ज्याच्या सर्व विषयवासना नष्ट झाल्या आहेत त्याला परमात्मा कोठे पलीकडे दुर नाही. सोन्याचा हिणकसपणा अग्नीत तापवुन नाहीसा झाल्यावर ते शंभर नंबरी सोने होते. त्याप्रमाणे घटाचा आकार नाहीसा झाल्यानंतर त्यातील पोकळीला महाआकाशाशी एकरुप होण्यासाठी दुसरीकडे जावे लागत नाही त्याप्रमाणे ज्याच्या देहाच्या ठिकाणी असलेला मिथ्या अहंकार अज्ञानासह नष्ट झाला आहे तो पुरूष अज्ञान-निवृत्तीपुर्वी सुध्दा परमात्माच होता आणि नंतरही परमात्माच आहे. शीत-उष्णाचा ओघ सुख-दुखाचा विचार मान-अपमानाची बोलणी हे काहीही त्या पुरुषाच्या अंत:करणात प्रवेश करु शकत नाही कारण त्याचे अंत:करण परब्रम्हभावाने परिपुर्ण भरलेले असते.
ज्या वाटने सूर्य जात असतो तिकडचे सर्व विश्व प्रकाशमान होत असते त्याप्रमाणे योगी पुरुषाला जे जे प्राप्त होते ते तो ते त्याचेच स्वरुप असते मेघातुन सुटणाऱ्या धारा ज्याप्रमाणे समुद्राला टोचत नाहीत त्याप्रमाण योगी पुरमषला शुभ-अशुभ द्वंद्वे आत्मस्वरूपापेक्षा भिन्न नसतात.
म्हणून त्रास देत नाहीत. तो योगारूढ पुरूष दृश्य प्रपंचाचा विचार करू लागतो तेव्हा त्याच्या दृष्टीने तो प्रपंच मिथ्या झालेला असतो मग अनुभवाने तो ज्या वेळी आत्मस्वरुपाला पाहू लागतो त्या वेळी ते अनुभव-ज्ञानदेखील त्याचे स्वरूप झालेले दिसते. मी व्यापक आहे का मर्यादित आहे अशी चर्चा द्वैत संपल्यामुळे आपोआपच थांबलेली असते ज्यांनी आपली सर्व इंद्रियं पुर्णपणे जिंकलेली आहेत तो देहधारी अवला तरी त्याची परब्रम्हाच्या बरोबरीने तुलना होते. (ओवी ८१ ते ९० )
असे बघ कि, शुध्द सोन्याचा मेरु पर्वताएवढा ढीग आणि मातीचे ढेकुळ जो सारखेच मानतो, पृथ्वीची किमंत ज्याच्यापुढे काहीच नाही, असे अनमोल रत्न देखील जो दगडासमान मानतो त्याचे अंत:करण निरिच्छ बनलेले असते. त्याच्या ठिकाणी आप्त आणि शत्रू उदासीन आणि मित्र अशा वेगवेगळया द्वैताच्या विचित्र कल्पना कशा येणार? मीच विश्वाच्या रूपाने सर्वत्र पसरलेलो आहे.
असे ज्याला विश्वव्यापक ज्ञान प्राप्त झाले आहे त्याला कोण कोणाचा बंधू असणार आणि त्याला द्वेषी तरी कोण असणार? हे अर्जुना ! त्याच्यां अंत:करणात हा उत्तम आणि अधम असा भेद असू शकेल काय ? परिसाच्या कसोटीवर घासले असता सुवर्णाचे चांगले-वाईट असे प्रकार करता येतील काय ? त्या कसोटीपासून जसे शुध्द सोनेच निर्माण होते त्याप्रमाणे त्याच्या बुध्दीमध्ये चराचरा विषयी समता उदय पावलेली असते.विश्वातील प्राणिरुप अलंकाराचे समुदाय जरी वेगवेगळया आकाराचे असले तरीपण ते एकाच परब्रम्हरुपी सोन्याचे बनलेले आहेत. असे सर्वश्रेष्ठ आत्मज्ञान योगारूढ पुरूषाला प्राप्त झालेले असते म्हणून तो वरवरच्या या विविध प्रकारच्या आकारांनी फसत नाही. सुक्ष्म दृष्टीने वस्त्र पाहिले बसता त्यामध्ये उभ्या-आडव्या तंतुतंतूची रचना दिसते स्थुल दृष्टीने पट दिसत असला तरी देखील त्यात एका तंतूवाचून दुसरी गोष्ट नसते.(ओवी ९१ ते १०० )
अशा अतिव्यापक ज्ञानाने हे सारे विश्व व्यापलेले आहे असा ज्याला ब्रम्हानुभव आहे तो सर्वत्र सम प्रमाणात चैतन्यपाहणारा योगारुढ आहे असे जाणावे या माझ्या बोलण्यात खोटे असे काही नाही. ज्याचे नाव तीर्थराज आहे ज्याचे दर्शन घेतले असता अंत:करणात प्रसन्नतेच्या, समाधानाच्या लहरी निर्माण होतात. तसेच ज्याच्या संगतीमुळे अहंकाराने भ्रमित झालेल्या माणसाची भ्रांती संपून जाते व तो ब्रम्हरुप होतो. ज्याच्या सहज बोलण्यातुन धर्म प्रगट होत असतो, ज्याच्या कृपादृष्टीने महासिध्दी प्रगट होतात ती स्वर्गातील सुखे ज्याच्या सहजच लीला आहेत अशा महापुरूषाचे जो कोणी मनात सहज जरी स्मरण करील तर तो महापुरुष त्याला आपली योग्यता प्रदान करतो.
ज्याचा कधी अस्त होत नाही असा अद्वैताचा दिवस ज्याच्या हदयात उजाडला आहे तो पुरूष सदैव आपणच आपल्या ठिकाणी रममण असतो अशा व्यापक दृष्टीने जो विचारी बनलेला असतो तो कुठेही सदैव एकटाच आहे. तो परिग्रह न करणारा आहे कारण तोच तिन्ही लोकांत ब्रम्हरुपाने भरलेला आहे अशीही सिध्द पुरुषाची असाधारण लक्षणे श्रीकृष्णांनी आपल्या सर्वज्ञतेने सांगितली आहेत.जो ज्ञानी लोकांचा श्रेष्ठ पिता आहे व सर्व पाहणांऱ्याच्या दृष्टीने प्रकाशक आहे आणि ज्या समर्थाच्या केवळ संकल्पाने विशाल विश्वाची रचना होते.ओमकाराच्या पेठेमध्ये तयार झालेले जे शब्दब्रम्ह म्हणजे वेद हे मर्यादित असल्यामुळे ज्याच्या अनंत यशाला लपेटू शकले नाहीत त्या यशाचे संपुर्ण वर्णन करु शकत नाहीत. त्याच्या स्वयंभू प्रकाशावर चंद्र-सुर्याचे कार्य चालते, सुर्य-चंद्राला जर परमेश्वराचा प्रकाश नसला तर त्यांना हे जग दिसले नसते संपूर्ण जगच परमेश्वराच्या प्रकाशावर आधारित आहे. (ओवी १०० ते ११० )
ज्ञानेश्वर महाराज स्वताच्या मनाला म्हण्तात हे मना ! ज्या एका नामाचा विचार केला असता ते इतके व्यापक आहे की, त्याच्या पुढे विशाल आकाशदेखील ठेंगणे दिसते त्या भगवंताचे एक-एक गुण तु कसे जाणशील ? म्हणून आता ही स्तुती पुरे कारण अशा लक्षणांनी युक्त जो श्रीकृष्ण भगवान तो स्वता ज्या साधुचे वर्णन करतो त्यांची लक्षणे आम्ही सांगू शकत नाही, परंतु ती सांगावीत म्हणुन सांगितली.द्वैताचा नाश करणारे आत्मज्ञान जर उघडपणे व्यक्त केले, तर अर्जुन मला आवडतो ही प्रेमाची गोडी खरोखर नाहीशी होईल.
म्हणुन भगवंत तसे बोलले नाहीत परंतु मध्ये त्यांनी अगदी पातळ असा पडदा ठेवला अर्जुनाचे मन त्याच्या व आपल्या प्रेमाचा उपभोग घेण्याकरता भगवंतानी वेगळे ठेवले.जे “मी ब्रम्ह आहे” अशा बोधात अडकलेले आहेत आणि जे मोक्षसुखासाठी दीन झालेले आहेत, त्यांच्या दृष्टीचा कलंक तुझ्या प्रेमाला कदाचित लागेल आत्मज्ञानाच्या उपदेशाने अर्जुनाचा संपुर्ण अहंकार जर अकस्मात नाहीसा झाला आणि तो जर मीच होईल तर मग मी एकटयाने काय बरे करावे ? ज्याला डोळयांनी पाहताच अमाधान लाभावे किवां तोंड भरुन बोलावे अथवा दृढ आलिंगन द्यावे असा अर्जुनाशिवाय जगात दुसरा कोण बरे आहे ? जर अर्जुनाचे आणि माझे ऐक्य झाले तर आपीया मनाला योग्य वाटणारी आणि अंत:करणात न सामावणारी अशी गोष्ट कोणाला बरे सांगावी? अशा काकुळतीने भगवंतांनी योगारुढ पुरुषांची लक्षणे सांगण्याच्या हातोटीने बोलण्यामध्ये द्वैत ठेवुन आपल्या मनाने अर्जुनाच्या मनास आलिंगन दिले. हे ऐकण्यास जरी अवघड वाटत असले तरी पण निश्चीतपणे असे समज कि, अर्जुन हा खरोखर श्रीकृष्णाच्या सुखाची ओतीव मुर्ती आहे. (ओवी ११० ते १२० )
वय जादा झाल्यावर वार्धक्यामध्ये एखाद्या वांझोटया स्त्रीला जर बाळ झाले तर ती बाई ते मुल आणि मुलाचे कौतुक अशी मोहाची त्रिपुटी उल्हासित होते. तशी श्रीकृष्णाची अवस्था झाली. त्याचे अर्जुनावरील प्रेम दिसुन आले नसते तर मी असे बोललो नसतो प्रेमाचे आश्चर्य ते पहा कुठे आत्मज्ञानाचा उपदेश आणि कुठे युध्दप्रसंग ? परंतु अशा या ठिकाणी भगवंताच्या प्रेमाचे चित्र जो अर्जुन, त्याच्यापुढे कौतुक प्रगट होत आहे आवड आहे पण लाज निर्माण करते तर ती आवड कसली ? तसेच व्यसन आहे आणि त्याने कष्ट होत असतील तर ते व्यसन कसले ? ते चक्क वेड आहे परंतु भ्रम निर्माण करत नाही तर ते वेड कसले ? म्हणुन याचा भावार्थ असा कि, अर्जुन हा भगवंताच्या मित्रत्वाचे आश्रयस्थान आहे किवां सुखाने शृंगारलेल्या मनाचे प्रतिबिबं पाण्याचा तो एक आरसा आहे याप्रमाणे तो अर्जुन पुण्याने धन्य असुन पवित्र आहे.
या जगात भक्तिरुप बीज पेरण्यासाठी त्याची हदयरुपी भूमी उत्तम आहे आणि म्हणूनच तो श्रीकृष्णकृपेला पात्र झाला आहे. अथवा आत्मनिवेदनाच्या अलिकडची “सख्य” नावाची जी आठवी भक्ति मानली जाते. त्या ठिकाणची अर्जुन हा प्रमुख देवता आहे.जवळच असलेल्या प्रभुचे वर्णन न करता भक्ताच्यां गुणांचे वर्णन करावे, इतका अर्जुनच श्रीहरीला आवडतो. असे बघ कि, जी पतीची प्रेमभावाने सेवा करते आणि प्रियोत्तम हा जिला अतिशय मानतो, त्या पतिव्रतेचे पतीपेक्षाही अधिक वर्णन केले जात नाही का? त्याप्रमाणे देवांपेक्षाही अर्जुनाची विशेष स्तुती करावी असे माझ्या मनाला भावते कारण तो त्रिभुवनातील भाग्याचे एकमेव स्थान झाला आहे. (ओवी १२१ ते १३० )