भक्तवत्सल बाबा
हरी ॐ बाबा… ! कलियुगातील साक्षात्कारी महिमा असणारे, आपल्या भक्तांना सन्मार्गाला लावणारे, भक्तांना आपलेसे वाटणारे, वटवृक्षाची सावली देणारे, संसारातील चिंता संपवून जीवन जगण्याचा यशस्वी मार्ग दाखवणारे सदगुरुच नव्हे तर जगतगुरु असे जागृत दैवत कोणते असेल तर ते म्हणजे अनंतकोटी ब्रम्हांडनायक परमब्रम्ह श्री सच्चिदानंद योगीराज साईनाथ महाराज. शिर्डीचे आणि सर्व भक्तजनांच्या हृदयाचे अनाभिषिक्त सम्राट साईबाबा. सर्वांच्याजवळ आणि सर्वत्र असणारे परंतु पूर्वजन्मीच्या थोडया फार तरी पुण्यसंचयाच्या जोरावर या जन्मी पुन्हा परमार्थाची आणखी एक संधी देणारे नाव म्हणजे साईबाबा. बाबा स्वत:च म्हणतात, नको कोणाशी वादावादी, नको कोणाची बरोबरी, नसता श्रध्दा, सबुरी परमार्थ साधेना तीळभरी. सबका मालिक एक है. आपण सारे त्याचीच चाकरी करुया. असे महान, परोपकारी संत शिर्डीत होवून गेले. ज्यांच्या विषयी लिहिण्यासाठी शाम्या उर्फ माधवराव देशपांडे विचारण्यास गेले असता बाबा म्हणतात, अरे कोणाच्या गोष्टी करता. मी हा असा फकीर. भिक्षा मागून उदरनिर्वाह करणारा. माझ्या काय गोष्टी लिहणार? लोक हसतील. नेमका याच्या उलटा प्रत्यय आज बाबांचे सचरित्र वाचताना येतो. तो म्हणजे लोक रडतात. परंतु ते आनंदाश्रु असतात. त्यातून हृदयात दडलेली आपुलकी. बाबांच्याबद्दलच प्रेम बाहेर पडते. हृदयात बाबांच्या भक्तीचे, सन्मार्गाने, भक्तीमार्गाने, निस्वार्थी वृत्तीने जेव्हा गुणगान करतो. भजन, कीर्तन करतो. त्याला अंत:करणापासून भजतो. भक्तीचे कोणतेही अवडंबर न माजवता जेव्हा पुजतो तेव्हाच भगवंत भेटतो. प्रल्हादालाही भेटला. त्यासाठी हा मानवदेह आहे. या जन्माचे सार्थक करणे तुमच्या हातात आहे. यासाठी हा मानवदेह आहे त्याचा उपयोग करुन शक्य तितका वेळ देवाच्या सत्कारणी लावा. कलियुगात मुक्तीचे हेच साधन आहे. त्यासाठी दैवावर आणि देवावर विश्वास ठेवा. अनादि कालापासून अनंतापर्यंत हे सृष्टीचक्र चालवणारी एक अमोघ निसर्गशक्ती आहे यावर विश्वास ठेवा आणि गुुरुला शरण जावा. गुरुचे नाव घ्या. त्यांच्यावर सर्व काही सोपवा. वाटाडया असेल तर हा संसारसागर यशस्वीपणे पार करता येतो. म्हणून गुरुंना सदगुरु साईबाबांना अन्योन्यभावाने शरण जावा. श्री साईसमर्थ यांच्या मी शरण गेलो हीच गुरुदिक्षा झाली आणि माझी निष्काम सेवा बाबांनी मान्य केली. माझ्यासारखी चिमणी ओढून घेतली. तिला चारा, आसरा, सहारा मिळवून दिला. जीवनाच्या सागरात दीपस्तंभासारखे मार्गदर्शकाची भूमिका कितीतरी वेळा निभावली. सर्वसाक्षी, जगत्पती त्याला नको कोणाची मध्यस्थी याप्रमाणे बाबांच्या आणि आमच्या भक्तीमध्ये कोणी आले नाही. चालता फिरता गुरु म्हणजे तुमच्या मागे चालती फिरती लागलेली पणवती. कलियुगामध्ये कोणी निस्वार्थी गुरु मिळेल याची शाश्वती नाही. शिष्याकडून सेवा करुन घेणारा स्वत:च गुरु म्हणून घेतो. शिष्यास उपदेश देणारा शिष्याचे कान फुंकणारा, शिष्याकडून मोबदला घेणारा गुरु म्हणून घेतो. अशा गुरुचा काय भरवसा. त्याच्या दिलेल्या ज्ञानाने तुमचा ससांर तारुन जाईल काय? असा गुरु काय कामाचा, जो पैसा घेवून कान फुंकतो. असा गुरु काय कामाचा, जो दिक्षा देवून भिक्षेस लावतो. गुरु निष्काम आणि कर्मयोगी पाहिजे. मला गुरु भेटले भोलनाथांच्या कृपेने सहजस्पर्श करावा म्हणून दगडास स्पर्श केला आणि तो परीस निघाला. मला परिस मिळाला. तो अवलिया मिळाला. त्यांना भेटलो आणि त्यांचाच झालो. जसा मी काल, आज, उद्या तसेच राहिलो. बाबांनी मला सांभाळूनही घेतले आणि समजूनही घेतले. आईवडिलांची माया दिली. संकटे आली त्यावर मात करण्याची शक्ती दिली. काहीही न करताच ती माघारी लावली. संघर्षाचे तप गेले. कसे गेले कळालेच नाही. या काळात उजळून निघालो. जसा पडलो. त्याच्या दुप्पट ताकदीने उभा राहिलो. कोणत्याही संघर्षात अंतिम विजय सत्याचाच असतो. बाबांच्या कृपेने याच सत्याचे दूध पिलो ते अमृतासारखे मधूर होते. बाबांनी तो अनुभव दिला. गुरुंच्या कृपेशिवाय हे शक्य होते का?
बाबांच्या भक्ती करु लागल्यापासून साईनामावाचून मनास गोडवा वाटत नाही. बाबांची भक्ती न करता जर तो दिवस गेला तर संपूर्ण दिवस मनास अपराधी वाटते. बाबांच्या स्मरणाविना, दर्शनाविना वाया जाणारे क्षण म्हणजे भक्तीसागरात पडणारा भक्तीरसाचा एक एक थेंब वाया जाण्यासारखे आहे. संत कबीरांचा याबाबत एक दोहा आहे. बसत राम, सोवत राम, जागत राम, तन मे राम, मन राम. तद्वतच आमचेही उठता, बसता, जागता सार्इंचेच नामस्मरण घडून येते. पूर्वी मी कोठेही गेलो तरी भगवान भोलेनाथांचे मंदिर असल्यास त्याठिकाणी दर्शन घेण्यासाठी जायचोच. बऱ्याचदा भगवान शंकरांच्या मूर्तीत बाबांचीही मूर्ती दिसत असे. साई चरित्रातील मेघा या अहमदाबादच्या बाबांच्या भक्तासारखेच मीही बाबांना शंकरासारखे त्रिपुंड काढून सार्इंची शंकराच्या रुपात पुजा करायचो. ॐ नम शिवाय व हरि ॐ बाबा हे दोन्ही जप आपोआप व्हायचे. परंतु सातारा पोलीस दलात भरती झाल्यानंतर प्रशिक्षण कालावधीत बाबांचे दर्शन होईल काय? हीच मनात चिंता होती. परंतु बाबांनी मात्र चुटकीसरशी हा प्रश्न सोडवला. पोलीस प्रशिक्षणासाठी हजर झाल्यावर आमची रवानगी गोळीबार मैदानाकडे झाली. त्यामुळे तेथून मुख्यालय येता जाता रस्त्याने रोजच सार्इंचे दर्शन अर्धा मिनिट का होईना व्हायचे. महिनाभरातच आम्ही मुख्यालय आवारात राहण्यासाठी आलो. याचवेळी एमपीएससीच्या पूर्व परीक्षेचा निकाल लागल्याने मुख्य परीक्षेचा अभ्यास सुरु केला. त्यामुळे चार पाच महिने मीही साऱ्यापासून अलिप्तच होतो. परंतु पुढे नागपूर येथे प्रशिक्षणासाठी जावे लागणार होते. या ठिकाणी बाबांचे मंदिर कोठे असेल? हाही प्रश्न पुन्हा होताच. परंतु नागपूर येथे गेल्यानंतर दोन आठवडयातच माहिती मिळाली. त्यानुसार वर्धा रोड नागपूर येथे साई बाबांचे मंदिर असल्याचे कळाल्याने एक दिवस गुरुवारी सायंकाळी या मंदिरात दर्शनासाठी गेलो. या ठिकाणी बाबांची मूर्ती शिर्डीच्या मूर्तीसारखीच भव्य दिव्य आहे. दर्शन घेतल्याने मनास समाधान वाटले. पुढे प्रशिक्षण केंद्रात जावून ही गोष्ट माझे नाशिकचे मित्र मेजर पाटील यांना सांगितली. त्यांनीही पुढील वेळी एकत्रच साईदर्शनास जावू असे सांगितले. पुढे दोन गुरुवार हा योग आला नाही. त्यानंतर मात्र गुरुवार आणि रविवारी सायंकाळी आम्ही दोघेही साई मंदिरात दोन दोन तास घालवायचो. एक दिवस आम्ही मेसच्या कार्यालयात सायंकाळी बसलो असता तेथील ऑफिसच्या कपाटात काय काय ठेवले आहे हे पहात असताना अचानक साईबाबांचे कॅलेंडर मिळाले. ते एवढे चांगले होते की दोघापैकी कोणी घ्यायचे यावर बराच वेळ चर्चा झाली. त्यानंतर या कॅलेंडरची कलर झेरॉक्स प्रत काढून एकाने घ्यायची असे ठरले तरीही फोटातील साई बाबांच्या अंगावरील शाल हिरवी होती. तीच जर भगवी असती तर किती चांगले दिसले असते. असे दोघांचेही मत पडले. ती शाल भगवी कशी करता येईल यावरही आमची चर्चा झाली. पुढे हा विषय येथेच थांबला. पुढे दोन गुरुवार मंदिरात जाता आले नाही. पुढील गुरुवारी आम्ही दोघेजण साई मंदिरात गेलो. दर्शनानंतर दहा मिनिटे ध्यान लावले. माझे मित्र पाटील यांचे ध्यान चांगले लागायचे. मीही सार्इंना मनातल्या मनात प्रार्थना करायचो श्री. पाटील यांचे कोण गुरु आहेत. त्या रुपात त्यांना दर्शन द्या. कदाचित त्यामुळे तसे झाले असेल बाबांनी त्यांना त्यांच्या गुरुच्या रुपात दर्शन देवून प्रचिती दिली असणार. पुढे आम्ही दर्शन घेवून जात असताना बाजूच्या दुकानाकडील पोस्टरकडे अचानक नजर गेली आणि आम्ही आश्चर्यचकीत झालो. त्या ठिकाणी बाहेर उंचावर सर्वांना दिसतील अशी सार्इंची वेगवेगळी कॅलेंडर्स होती. यात जे कॅलेंडर आम्हास कपाटात सापडले होते तसाच फोटो असलेेले भगवी शाल असलेेले कॅलेंडर आम्हास दिसले. त्यामुळे आम्ही दोघांनीही एक एक कॅलेंडर खरेदी केले. भगव्या रंगाची शाल असलेले कॅलेंडर आम्हास पाहिजे होते. आमच्याकडील कॅलेंडरकडील झेरॉक्स काढून सुध्दा हिरवी शाल भगवी झाली नसती. सार्इंनी मात्र आमच्या मनातील इच्छा अंतर्मनाने जाणून नागपूरच्या साई मंदिर परिसरातील दुकानात भगव्या रंगातील शालीचे आम्हांस हवे असलेल कॅलेंडर पाठवून दिले. पुढे हे कॅलेंडर लॅमिनेशन करण्यासाठी पाच महिने गेले. या लॅमिनेशन केलेल्या दोन फोटोपैकी सध्या एक फोटो माझ्या बहिणीच्या घरी आहे. दुसरा फोटो साईध्यान मंदिर, शहापूर येथे दिला आहे. बाबांच्या बद्दल काय बोलायचे. त्यांचा महिमा अपार आहे. नागपूरमध्ये मंदिर असेल का? तेथे सार्इंचे दर्शन मिळेल काय? ही मनातील शंका हवेतच विरुन गेली. तेथे भव्य मोठया परिसरात मंदिर आणि शिर्डीसारखीच मूर्तीचे दर्शन मिळाले. साताऱ्यात येर्इंपर्यंत तेथेच बाबांची सेवा करत राहिलो. येताना सातारा येथे जाणार असल्याचे सांगून उदी प्रसाद घेवून आलो. बाबांच्या अद्भूत चमत्कारांनी मी जिथे जाईन तेथे बाबा अगोदरच हजर असतात. माझी शंका फोल ठरते. त्या ठिकाणी जावून मी पुन्हा साईमय होवून जातो.
।। हरि ॐ बाबा ।।