पाठीराखा-साई- ५

भक्तवत्सल बाबा

 

हरी ॐ बाबा… !  माझ्या भक्तास मी कधीच काही कमी पडू देणार नाही. जो माझ्या चरणी अन्योन्य भावाने तनाने, मनाने अर्पण झाला. त्याची मला काळजी आहे. त्याला माझी मशीदमाई तारेल, अल्ला मालिक है असे बाबा म्हणाले आहेत. विधीचा विधाता, भक्तांचे तारणहार आणि सर्वच संकटात या ना त्या रुपाने धावत येणारे शिर्डीपती भगवान श्री साईबाबा. त्यांच्या चरणी जो माथा ठेवेल त्याचे नेहमी भलेच होईल. जो जो मज भजे । जैसा जैसा भावे । तैसा तैसा पावे मी त्यास।। हे बाबांचे वचनच आहे. ज्या प्रकारे तुम्ही बाबांची भक्ती करता त्यावर तुमचा मनोभाव अवलंबून आहे. माझी परमपूज्य आई साईचरणी लीन झाली आणि शिवपदास पावून कैलासास निर्वाण केले. बाबांनी एका भक्तास सांगितले होते. तुला मी विमानात बसवून नेईन. तद्वतच माझ्या आईबद्दल घडले. हृदयविकाराचा झटका आला म्हणून दवाखान्यात माझा धाकटा भाऊ घेवून गेला. पुढे तासाभरात ती चांगली झाली. दुपारच्या वेळी जेवणही जेवली. आम्हासही बरे वाटले. धोका टळला होता. इतर पेशंट आणि काही डॉक्टरांच्या अनुभवतातून एकदा झटका आला तरी पुढे पाच दहा वर्षे ठणठणीत जगणारी माणसे बघितली होती. त्यामुळे आम्ही निश्चिंत होतो. परंतु, दुपारी जेवण करुन पुढे अचानक माझ्या आईस पुन्हा झटका आला व तिने आपली जीवनयात्रा संपवली. माझ्या आईसही बाबांना विमानातून बसवून नेले. मागे सांगितल्याप्रमाणे आमचे फॅमिली डॉक्टर दिवेकर यांनी आमची औषधे बंद केली व आम्हा दोघा भावांना औषध न घेता मनावर नियंत्रण मिळवा असे सांगितले. पुढे मी आमच्या दुसऱ्या बंगल्यावर रहावयास गेलो. तेथे बाबांचा मोठा फोटो ड्रेसिंगरुममध्ये लावला होता. देव्हाऱ्यात बाबांची  चांदीची मूर्ती होती. दोन्ही ठिकाणी मनोभावे पूजा करुन रोजच जेवणाचे ताट नैवेद्य दाखवून मगच जेवण घेत होतो. नोकरी करण्यापेक्षा व्यवसायात स्थिर व्हावे हे प्रयत्न होते. परंतु, पीएसआयच्या फायनल परीक्षेनंतर निर्णय घ्यायचा होता. त्यामुळे सुवासिक अगरबत्ती व सेंट बनवण्याचा छोटा व्यवसाय सुरु केला. मात्र त्यात म्हणावसे असे यश आले नाही. पीएसआयच्या नोकरीशिवाय पुन्हा ड्रेसची नोकरी करायची नाही. हे ठरवले होते. परंतु गेल्या चार पाच महिन्यात ज्या प्रकारे परिस्थिती आली त्यामुळे आता वॉचमन किंवा सुपरवायझर अशी तात्पुरती नोकरी करावी लागेल हे ठरवले. लिंब येथे माझे चुलते, चुलती राहतात. काकीस आणि चुलत भावास भेटावे तसेच कोटेश्वराचे दर्शन घ्यावे आणि तेथील पोस्टातही माझे काम होते. अशी सारी कामे एकत्र करण्यासाठी लिंब येथे गेलो असता माझ्या चुलतभावाने पेपरातील पोलीस भरतीची जाहिरात आल्याचे सांगितले. अशा प्रकारे भरती व्हायचे ठरवले नव्हते त्यामुळे मी जाहिरातीकडे लक्ष देत नव्हतो. परंतु जे वॉचमन, सुपरवायझर नोकरी करायचे ठरवले होते त्यापेक्षा भरती कधीही चांगली असा विचार करुन सातारा येथे पोलीस भरतीसाठी गेलो. या भरतीमध्ये १८८ जागा होत्या. मात्र, अर्ज ९ ते दहा हजारावर विकले गेल्याचे कळाले. भरतीच्या दिवशी मी उशिरा ११ वाजता मैदानावर गेलो तरीही गर्दी संपली नव्हती. शेवटी त्या गर्दीत सापडलो आणि झालेल्या चेंगराचेंगरीत चांगलाच चेंगरलो. नोकरी मिळवण्यासाठीची ही गर्दी पाहून आता भाऊगर्दीत माझा टिकाव लागणार का? असा प्रश्न निर्माण झाला. अर्थात बाबांना सांगूनच यात उतरलो असलो तरी कितीतरी अनिश्चित, क्लिष्ट आणि वेळोवेळी बदलणाऱ्या लिस्ट अशा प्रकारे दोन महिन्याच्या प्रक्रियेनंतर सुध्दा साईबाबांच्या कृपेने या गर्दीत मी उरलो होतो. माझ्याबरोबरच्या इतर फौजींबरोबर मीही भरती झालो होतो. असेच सोळा वर्षापूर्वी कोल्हापूरच्या भरतीमध्ये उतरल्याची आठवण आली. त्यावेळीही निकालाचे पाकिट घेवून साईबाबांच्या लाल रंगाच्या फोटोपुढे मला नोकरी मिळाली म्हणून रडलो होतो. तेच आनंदाश्रू आज गोडोलीमध्ये पुन्हा बाबांच्या चरणावर माथा ठेवताना आले. त्यावेळीही परीक्षा पास व्हावे म्हणून केलेल्या वहयांच्या पानावरील हरि ॐ बाबा हा जप आजही आठवतोय. यावेळीही बाबांनी माझी जिद्द पाहिली. माझ्या संघर्षाची परीक्षा घेतली. परंतु आज सुध्दा सत्याची कास सोडली नाही. तर खडतर जीवन जगण्याची तयारी आजही तीच आहे. बाबा म्हणाले, असतील बाळा तू स्वत:बद्दल एवढी काळजी करु नकोस. तुझे प्रयत्न प्रामाणिक असतील तर मी सदैव तुझ्या पाठीशीच आहे. तू माझ्या चरणी लीन झाला आहेस. मी तुला उपाशी देणार नाही. हा माझा शब्द आहे.

 

।। हरि ॐ बाबा ।।