हरीपाठ-भाग-४

अभंग – १०

एखादया माणसाने त्रिवेणी संगमामध्ये आणि इतर अनेक तीर्थक्षेत्री जावुन स्नान करुन तेथील मंदिरामध्ये जावुन देवालयातील देवांचे दर्शन घेतले तरी परंतु त्याला भगवंताच्या नामामध्ये जर गोडी नसेल मनापासुन तो भगवंताची भक्ती करत नसेल तर त्याच्या सर्व तीर्थक्षेत्राच्या यात्रा व्यर्थच होणार. नामाला विन्मुख झालेला मनुष्य हा शेवटी पापीच असतो. आणि अशा पापी, दुराचारी मानसाचा उध्दार एका भगवंताशिवाय इतर कोणी करु शकणार आहे का? पुराणातील प्रसिध्द वाल्मीकऋषी म्हणतात कि नामाने तिन्ही लोकांचा उध्दार होतो आणि म्हणूनच ज्ञानमाऊली म्हणतात कि भगवंताचे नामस्मरण करणाऱ्या भक्ताच्या पिढयानपिढया पावन होतात.

अभंग – ११

हरीचे नामाच्या उच्चारणाचा महीमा इतका अगाध आहे की, आपल्या आराध्य भगवंताचे नामाचा उच्चार केला असता पापाच्या अनंत राशीचा समुळ नाश होवू लागतो. ज्याप्रमाणे गवताच्या राशीला अग्नीचा स्पर्श होताच गवताचे तृण जळू लागते त्याप्रमाणे पापाचा नाश होवुन मनुष्य हरीरुप होवू लागतो. हरी हा मंत्र एक गंभीर, अगाध, प्रभाव असणारा महामंत्र आहे, हरीच्या जपामुळे सारी भूतबाधा पळून जाते ज्ञानदेव म्हणतात, हरीचे उच्चारण यात एवढे सामर्थ्य आहे कि याचे रहस्य आजवर उपनिषादांना, वेदांना, पुराणानाही कळाले नाही.

अभंग – १२

एका भगवंताच्या चरणी जर आपली भावभक्ती नसेल तर कोणीही मनुष्यमात्राने कितीही तीर्थयात्रा केल्या व्रतवैकल्ये, उपवास आदी नियमादी पाळून केले तरी काही उपयोग नाही कारण याने हरी तुम्हास प्राप्त होणार नाही हे सारे उपाय करुनही व्यर्थच आहे. हरी आपणास श्रध्दाभावाने, ईश्वराच्या, भगवंताच्या चरणी समर्पण केल्याने समजू शकतो. आपण भक्तीपुर्वक कोणताही आकस, गर्व, अहंकार, अभिमान न ठेवता ईश्वराच्या चरणी लीन झालात तर तो हरी आपणास हातावरील आवळयाप्रमाणे स्पष्ट दर्शन देतो याची खात्री बाळगा. ज्याप्रमाणे भूमीवर पडलेला, विखुरलेला पारा कधीच एकत्र करणे शक्य नाही त्याप्रमाणे एका नामाशिवाय नामस्मरणाशिवाय ईश्वराची आराधना केल्या शिवाय इतर अन्य कोणत्याही साधनानी भगवंताची प्राप्ती होणे शक्य नाही. ज्ञानमाऊली म्हणतात, सदगुरु निवृत्तीनाथांनी निर्गुण अशा परमात्म्याची मला पुर्णपणे प्राप्ती करुन दिली आहे. आणि त्यामुळे माझा त्रिकाल आता हरीच्या नामस्मारणातच व्यतीत होत असतो. माझा मीच नामस्मरणात हरवून गेलेलो असतो, आणि यामुळे मिळणाऱ्या अमोघ समाधानाचे मी वर्णनच करु शकत नाही.

अभंग – १३

भगवंताची भक्ती करताना एकदा का आपण ईश्वराशी समरस झालो की आपलीच आपल्या ठिकाणी जणू काही समाधीच लागते, परंतु जोपर्यत आपण भक्तीशी तादात्म्य साधत नाही, ईश्वराशी एकरुप होत नाही तोपर्यत ही गोष्ट सहजशक्य नाही, भगवंताशी एकरुप होणे हेच खरे बुध्दीचे वैभव आहे. एका केशवाच्या प्राप्तीमध्येच सर्वकाही आपणास प्राप्त होते.जोपर्यत त्या परमानंदामध्ये आपले चित्त रमत नाही तो पर्यत साऱ्या सिध्दी, समृध्दी, संपत्ती, स्त्री कितीही मिळाल्या तरी या मायामय संसारात आपणास कमीच असतो आणि जरी त्याचा आपणास त्रास होत असतो तरी आपला मोह कधीच संपत नाही, म्हणून ज्ञानदेव माऊली म्हणतात, मी सदा सर्वकाळ केवळ हरीचे चितंन करतो आणि त्या समाधीनेच मला सारे काही प्राप्त मिळाल्याचे आत्याधिक समाधान लाभते,

 

अभंग – १४

जो कोणी भक्त नित्यानियमीतपणे रोजच भगवंताला सत्य, मानुन त्याचे नाम घेत असतो. त्याच्याकडे कलीकाळ मुळीच पहाणार नाही, राम आणि कृष्णाच्या उच्चाराने तप यवढे वाढते की पापाचे कळपच्या कळप सुध्दा नामाच्या उच्चारण सामर्थ्याने पळून जातात, हरी हे नाम भगवान शिवशंकराना एवढे प्रिय आहे की जो कोणी भक्तभाविक प्रेमाने आदराने हरीचे नाम स्मरण करील त्यांना मोक्ष मिळणार हे नक्कीच समजा, ज्ञानदेव माऊली म्हणतात, मी “नारायण”“नारायण” असे नामउच्चार करतो आणि त्या नामाच्या उच्चाराने मला आत्मानंदाची आणि आत्मस्थिती प्राप्त होते ती अशी असते की मी त्या स्थिती सांगू शकत नाही.

अभंग – १५

जो भगवंताचे सतत नामस्मरणाने नाम घेणाऱ्या भक्ताच्या जीवनातुन द्वैत कायमचे दुर निघुन जाते. परंतु हे अद्वैत प्राप्त करणारा मनुष्य वेगळा आहे आपली मनोवृत्ती साम्याावस्थेत ठेवुन जो नाम घेतो त्याला सर्वत्र भगवंतच दिसतात. त्याला शमदमादी सााने हरीकृपेने सहज शक्य होतील, मग त्याला सर्व चराचरांत, सर्वाच्या देहात असणारा आत्मा सुर्यप्रकाशाप्रमाणे दिसेल, ज्ञानदेव म्हणतात भगवंताचे नाम घेण्याचा माझा नित्याचा नियम आहे. त्यामुळे मागील जन्मात मुक्त झालेला मी या जन्मी जीवनमुक्त झालेला असेल.

अभंग – १६

ईश्वराचे नामस्मरण करणे सोपे आहे, परंतु ते नामस्मरण करताना त्या ईश्वराकडेच आपण आपले तन-मन- धन अर्पित करणे हे ज्याला जमते असे नाम घेणारे मात्र दुर्लभच आहेत, रामकृष्णाच्या नामाच्या जपाने सर्व सिध्दी प्राप्त होतील परंतु त्याचबरोबर उन्मनी अवस्था येते, या हरीपाठाच्या मागोमाग धर्म, सिध्दी आणि बुध्दी आपोआप येतात आणि साधूसंताच्या संगतीने स्वता प्रपंचात राहूनही परमशांती प्राप्त करता येते, ज्ञानदेव म्हणतात, माझ्या मनावर रामकृष्णाच्या नामाचा ठसाच उमटलेला आहे, त्यामुळे मला सर्वत्र आपल्या जीवनाचे कल्याण करणारे सदासर्वदा आत्मारामच प्रत्यायास येतात.

अभंग -१७

भगवंताचे नामस्मरणाने आणि त्यांचे गुणसंकीर्तन करण्याने मनुष्याचा देह पवित्र होतो. नामस्मरणाच्या तपाने फार मोठी साधना घडते, ईश्वराचे आपल्या आराध्याचे नामस्मरण किर्तन करणारा मनुष्य दिर्घायुषी होतो, वैकुंठात तो चिरकाल कल्पपर्यत सुखी जीवन जगतो, त्याचे जवळचे सर्व नातलग त्याच वैकुंठातज जातात आणि त्यांना चर्तुभुज रुप येते व तेही तेथेच रहातात, ज्ञानदेव म्हणतात, हे अत्यंत गुढ असे ज्ञान मला हरीपाठाच्या साधनेने आणि माझे गुरु निवृत्तीनाथाच्या कृपेने त्यांच्याकडून मिळाले.

 पुढील भाग